Tuesday, December 30, 2008

ओंकारेश्वराची शाही स्वारी


नर्मदा नदीस मध्यप्रदेशची जीवनरेखा मानण्यात येते। या नदीवरच ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे. बारा ज्योर्तीर्लिगांपैकी ते एक आहे. येथील सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रम्य वातावरणात आल्यावर भाविक शिवभक्तीत तल्लीन होतात. वैशिष्ट्य म्हणजे मंदिर असलेल्या डोंगराचा आकारही ॐ असा आहे आणि या डोंगरावरून पाहिल्यास माता नर्मदाही ॐ आकारात वाहत असल्याचे दिसते. इतरत्र वेगात वाहणार्‍या नर्मदा नदीचे शांत रूप येथे बघायला मिळते.वैशिष्ट्य म्हणजे येथे एक नव्हे तर दोन शिवलिंग आहेत. ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर. दोन्ही शिवलिंग जागृत असल्याचे मानण्यात येते. संथपणे वाहणार्‍या नर्मदेच्या भिन्न किनार्‍यांवर ती वसली आहेत.

मंधाता नावांच्या दिव्य पुरूषाची अंबरिष व मुषुकुंद ही दोन मुले होती। त्यांनी कठोर तपस्या केल्याने येथे दोन शिवलिंग असल्याचे मानले जाते. यामुळेच येथील पर्वत मंधाता पर्वत म्हणून विख्यात आहे. शिव पुराणानुसार... ओंकार बाबा व ममलेश्वरजी ओंकारेश्वराचे अधिपती असल्याचे मानले जाते. प्रत्येक सोमवारी प्रजेचे सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी ते शहरात फिरत असतात. भगवान ओंकारास वाजत गाजत नावेत बसवून ममलेश्वर मंदिराच्या घाटावर आणण्यात येते. येथूनच दोन्ही देवता नगर भ्रमणासाठी निघतात.

दर सोमवारच्या या पालखीला श्रावण सोमवारी विशेष स्वरूप प्राप्त होते. आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी शहरभर भक्तांची गर्दी होते. शेवटचा श्रावणी सोमवार तर मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येतो.

मनोवांच्छित ते देणारा सिद्ध‍िविनायक


सध्या महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। कला आणि विद्येची देवता असलेल्या आणि विघ्नांचे हरण करणाऱ्या या गणेशाचा रूप प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणूनच या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी विविध गणपती मंदिरात भाविकांची गर्दी उसळलेली असते. अशीच गर्दी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरातही दिसून येते. हे मंदिर खूप प्रसिद्ध असून येथे मनोकामना पूर्ण करणारा सिद्ध‍िविनायक आहे.

या मंदिरातील गणेशाच्या मूर्तीचे रूप इतर मंदिरातील मूर्तींपेक्षा वेगळे आहे। ही मूर्ती काळ्या पाषाणापासून तयार केलेली असून अडीच फूट उंच व दोन फूट रूंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या गळ्यात भुजंग आहे. तसेच मूर्तीच्या कपाळावरील त्रिनेत्राचे चिन्ह शिवरूपाचे प्रत‍ीक दर्शविते। सिद्धिविनायकाचे हे शिवरूप विलक्षण आहे. या मूर्तीला रोज नारंगी रंगाचे वस्त्र चढविले जाते. त्यामुळे मूर्ती काळसर रंगाऐवजी लालसर दिसते. गणेशाच्या हातात मोदक आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत.रिद्धी-सिद्धीला विद्या आणि धनसंपत्तीची देवता मानले जाते. या दोन मूर्ती विराजमान असल्यामुळे या मंदिराला सिद्धिविनायक मंदिर असे म्हटले जाते.

साधारणत: गणपतीची सोंड हाताकडे उलट्या स्वरूपात वळलेली असते। परंतु या मुर्तीची सोंड सरळ हाताकडे अशा स्वरूपात वळलेली आहे. म्हणूनच या विघ्नहर्त्याचे रूप विलोभनीय आहे. मंदिराची निर्मिती 19 नोव्हेंबर 1801 रोजी झाली. मंदिराच्या परिसर नेहमी वर्दळीचा आणि रहदारीचा होता.मंदिर रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे धूळ आणि केरकचरा मोठ्या प्रमाणात जमत असे. नंतर मंदिराचा जीर्णाद्धार एका महिलेने केला. या जीर्णोद्धाराचीही एक कथा आहे. या परिसरातील काकासाहेब मार्ग आणि एस. के. बोले मार्ग नेहमी वाहतुकीने गजबजलेला असल्यामुळे वाहनांचा कर्कश आवाज ऐकू येत असे.

माटूंगा येथील आगरी समाजाच्या श्रीमती देऊबाई पाटील यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. श्रीमती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आर्थिक मदतीवर व्यावसायिक लक्ष्मण विठू पाटील यांनी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. श्रीमती पाटील यांच्याकडे संपत्ती मोठ्या प्रमाणात होती. पण त्यांना मूल नव्हते. त्या रात्रंदिवस पुत्रप्राप्तीसाठी गणपतीची पूजा करत असत.पुत्र झाल्यावर गणपतीचे एक भव्य मंदिर बांधेन असा नवस त्यांनी केला होता. गणपती पूजेवर त्यांचा खूप विश्वास होता. म्हणून त्यांनी एका मूर्तिकाराला घरातील दिनदर्शिकेवर असलेल्या गणपतीसारखीच हुबेहूब मूर्ती तयार करण्यास सांगितले. योगायोगाने ते चित्र मुंबईतील वाळकेश्वर येथे असलेल्या बाणगंगाचे होते आणि ती मूर्ती 500 वर्ष जुनी होती.

श्री अरूणाचलेश्वर (तिरूअन्नामलय्यर) मंदिर


अरूणाचलेश्वर मंदिर असलेल्या पवित्र टेकडीस प्रत्येक पौर्णिमेस जवळपास दोन ते तीन लाख भाविक अनवाणी पायांनी चौदा किलोमीटर प्रदक्षिणा घालतात। मंदिराच्या वार्षिक सोहळ्याच्या निमित्ताने या पवित्र टेकडीवर प्रज्वलित करण्यात आलेल्या ज्योतीचा 'याची देही याची डोळा' अनुभव घेण्यासाठी जवळपास पंधरा लाख भाविक जमतात. हिंदू धर्मांत महाशिवरात्र या पवित्र सणांची सुरवात या ठिकाणाहूनच झाली. दक्षिणेतील सुप्रसिद्ध श्री अरूणाचलेश्वर मंदिर तमिळ भाविकांमध्ये तिरू अन्नामलाईयार नावानेही प्रचलित आहे. साक्षात भगवान शंकराची ही टेकडी असल्याचे मानण्यात येते. टेकडीची उंची साधारणत: अडीच हजार फूट आहे.

धार्मिक, अध्यात्मिक महात्म्य लाभलेल्या या ठिकाणी एकदा तरी डोके टेकवून पुण्य पदरी पाडलेच पाहिजे। भगवान शिवशंकराच्या पंचमहाभूतांपैकी श्री अरूणाचलेश्वर एक आहे. (अरूणाचलेश्वर हे अग्नीक्षेत्र आहे. कांची व तिरूवरूर हे पृथ्वी, चिदंबरम आकाश, श्री कलाहस्ती वायू व तिरूवनायका जलक्षेत्र आहेत.)

महाशिवरात्र-

शिवपुराणानुसार भगवान शंकराने विराट अग्निरूप धारण करून ब्रह्मा व विष्णूस आपल्या श्रेष्ठत्वाची प्रचिती येथेच दिली होती। देवराज ब्रह्मा व विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वासाठी वाद झाला. श्रेष्ठ कोण यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ते भगवान शंकराकडे आले. शंकराने दोघांपैकी जो माझ्या डोक्याचे किवा पायांचे दर्शन घेऊ शकेल तो श्रेष्ठ, अशी अट घातली. भगवान शंकराने धरतीपासून आकाशापर्यंत पेटत्या ज्योतीचे रूप धारण करून दोघांनाही डोके व पाय शोधण्यास सांगितले. भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण केले व भगवान शिवाचे पाय शोधण्यासाठी जमीन खोदण्यास सुरूवात केली. ब्रह्मदेवाने हंसाचे रूप धारण करून महेश्वराचे डोके शोधण्यासाठी आकाशात भरारी घेतली. मह्त्प्रयायासानंतरही त्यांना महेश्वराचे डोके किवा पाय शोधण्यात यश आले नाही.

विष्णूंनी पराभव स्वीकारला. ब्रह्मदेवही दमले. त्यांनी आकाशातून फूल पडत असल्याचे पाहिले. ब्रह्मदेवाने त्याला विचारणा केली असता, भगवान शंकराच्या केसांच्या जटांमधून पृथ्वीवर पोहचण्यासाठी युगायुगाचा प्रवास करत असल्याचे उत्तर त्याने दिले. शिवाच्या अग्निरूपातून निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेत धरती तर होरपळून निघालीच, शिवाय स्वर्गही असहाय्य उष्णतेने उकळून निघाला.

Sunday, December 28, 2008

सर्वधर्मभावाचे प्रतीकः अजमेर शरीफ दर्गा


अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हे भारतातील मुस्लिमांचे सर्वांत पवित्र स्थळ आहेच। पण मुस्लिमांशिवाय इतर धर्मातील लोकही या दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे एका अर्थी हे स्थळ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. हा दर्गा म्हणजे प्रसिद्ध मुस्लिम संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी आहे. भारतात इस्लामच्या आगमनाबरोबरच सुफी पंथाचीही सुरवात झाली. सूफी संत एकेश्वरवादावर विश्वास ठेवतो.

पण या पंथाचा भारतातील प्रसार सहिष्णू पद्धतीने झाला। सहिष्णुता, उदारमतवाद, मानवप्रेम आणि बंधूभाव हा या पंथाचा आधार होता. या पंथातील एक होते हजरत मोईनुद्दीन चिश्ती.

त्यांचा जन्म इराणमध्ये झाला होता। तेथे काही वर्षे व्यतीत केल्यानंतर ते भारतात आले. ख्वाजा साहेब ईश्वरभक्तीत अखंड बुडालेले होते. लोकांच्या सुखासाठी ते सर्वशक्तीमान अल्लाकडे प्रार्थना करत. मानवसेवा हाच ख्वाजासाहेबांचा धर्म होता. बादशाह अकबराने एकदा पुत्रप्राप्तीसाठी या दर्ग्यात येऊन प्रार्थना केली होती. त्यानंतर अकबराला मुलगा झाला. या आनंदाप्रित्यर्थ ख्वाजा साहबसमोर माथा टेकण्यासाठी अकबर आमेरपासून अजमेर शरीफपर्यंत चालत आला होता.

तारागढ डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा दर्गा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे। इराणी व भारतीय वास्तुकलेचा संगम याच्या बांधणीत दिसतो. दर्ग्याचे प्रवेशद्वार व घुमट अतिशय सुंदर आहे. याचा काही भाग बादशाह अकबर आणि शहाजहानने बांधला होता. दर्ग्याचे पक्के बांधकाम मांडूचा सुलताना ग्यासुद्दीन खिलजीने केले होते.

दर्ग्याच्या आत अतिशय सुंदर नक्षी असणारा चांदीचा पिंजरा आहे। त्यात ख्वाजा साहेबांची मजार आहे. हा पिंजरा जयपूरचे महाराजा जयसिंह यांनी बनविला होता. दर्ग्यात मैफिलीसाठीची खास खोलीसुद्धा आहे. तेथे कव्वाल ख्वाजाच्या स्तुतीप्रित्यर्थ कव्वाली गातात. दर्ग्याच्या आजूबाजूला अनेक ऐतिहासिक इमारतीही आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक- धर्माच्या नावावर एकीकडे दंगली होत असताना येथे मात्र हिंदू, मुस्लिमांसह इतर धर्माचे लोक येऊन ख्वाजासाहेबांवर चादर चढवतात. डोके टेकवतात आणि मनःशांतीचा अनुभव घेतात. येथील उरूस इस्लामी दिनदर्शिकेनुसार रजब महिन्याच्या एक ते सहा तारखेपर्यंत साजरा केला जातो. उरसाची सुरवात ख्वाजासाहेबांच्या मजारवर हिंदू कुटुंबाद्वारे चादर चढवूनच होते.

डेंग- दर्ग्याच्या समोरच मोठी डेंग (भले मोठे पातेले) ठेवले आहे। बादशाह अकबर व जहांगीरने ते दिल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून आजपर्यंत त्यात काजू, बदाम, इलायची, केशर टाकून भात केला जातो व गरीबांना वाटला जातो.

कसे जावे- अजमेर शरीफ दर्गा राजस्थानातील अजमेर शहरात आहे. हे शहर रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गाने जोडले आहे. परदेशात रहात असाल तर दरगाह अजमेर डॉट कॉम किंवा राजस्थान पर्यटन विभागाकडून आपल्याला अधिक माहिती मिळू शकते.

अंबाजी येथील अंबा माता


गुजरातमधील धार्मिक स्थळांमध्ये अंबा देवीचे स्थान प्रमुख आहे। उत्तर गुजरातमध्ये अहमदाबादपासून १८० किलोमीटरवर अंबाजी या गावात या देवाचे स्थान आहे. या देवीला आरासुरी असेही म्हणतात. आरासुरी म्हणजे डोंगरावर असलेली देवी. हे मंदिर खूप प्राचीन आहे. त्याच्या गर्भगृहात प्रत्यक्षात देवीची मूर्ती नाही. तेथे देवीचे आसन आहे. त्यावर देवीचे दागदागिने आणि वस्त्रे अशा पद्धतीने ठेवली आहेत, की ते पाहून असे वाटते, देवीच तेथे बसली आहे. येथे देवी रोज वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते, अशी श्रद्धा आहे.

गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर पालनपूरपासून ६५ किलोमीटवरवर आणि माऊंट अबूपासून ४५ किलोमीटरवर अंबाजी हे गाव आहे। येथेच अंबामातेचे हे मंदिर आहे. गुजरातमधील बड्या मंदिरात याचा समावेश होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत असल्यामुळे राज्यातील श्रीमंत मंदिरापैकी हे एक आहे. अंबेचे मूळ स्थान मात्र या मंदिरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या गब्बर नावाच्या डोंगरावर आहे. देवीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या ठिकाणी दुर्गामातेचे ह्रदय पडले होते, असे मानले जाते.

गब्बर येथील अंबेचे मंदिर प्राचीन आहे. आर्यांच्या अस्तित्वापूर्वीपासून अंबामातेची पूजा केली जाते असे मानले जाते. आर्यांनी ही देवी स्वीकारून तिची आराधना पुढे सुरू ठेवली. गब्बर डोंगरावर असलेली पदचिन्हे व रथाच्या चाकाचीही चिन्हे मातेचीच आहेत, अशी श्रद्धा आहे. येथेच श्रीकृष्णाचे मुंडन करण्यात आल्याचे सांगितले जाते. येथे सुवर्ण यंत्र कोरण्यात आले असून त्यात ५१ श्लोक आहेत.

Saturday, December 6, 2008

तीन देवींचे त्रिशक्ती रूप


श्री कालीमाता अम्मावरी देवस्थान हे हे त्रिशक्ती पीठ णून प्रसिद्ध आहे। आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे ‍असलेले हे मंदिर कृष्णवेणी या नदीच्या काठी वसले आहे. येथे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत. त्या इच्छाशक्ती, क्रियाशक्ती व ज्ञानशक्ती आहेत असे मानले जाते. हे स्थान अष्टदश पीठात मोडते.

स्थळ पुराण-

नेल्लोरजवळील जंगलात एका लष्करी अभियंत्याला स्वयंभू श्री महाकालीची मूर्ती सापडली। ती त्याने विजयवाडा येथे आणली. शक्तीची उपासना करणारा गुंजा रामास्वामी याने 14 ऑक्टोबर 1947 ला कृष्णवेणी नदीच्या काठी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. 'कालिदास' अर्थात कालीचा शिष्य या नावाने ओळखल्या जाणार्‍या या उपासकाने 11 वर्षे या लहानशा मंदिरात या देवीची पूजा केली. त्यानंतर काही कारणांमुळे हे मंदिर बंद झाले. सन 1965 साली तुर्गा वेंकटेश्वरलू याने 15 वर्षांपासून बंद असलेल्या या मंदिराचे द्वार उघडले. द्वार उघडल्यानंतर त्याला व त्याच्यासोबत असणार्‍यांना मंदिरात ज्योतीचा प्रकाश पसरलेला दिसला. मूर्तीभोवती त्यांना आभा दिसली. महाकालीच्या शक्तीचा त्यांना प्रत्यय आला. त्यानंतर शास्त्राप्रमाणे नियमित वैदिक पध्दतीने पूजा केली जाऊ लागली. त्यानंतर येथे भाविकांच्या गर्दीत नवरात्र, दिवाळी व विविध उत्सव साजरे केले जात आहेत.

दशमुखी माहाकाली
या महाकालीला दहा तोंड व दहा पाय आहेत। ती निळ्याशार रंगाची आहे. तिच्या आठही हातात नक्षीदार आभुषणे व शस्त्रे आहेत. तिने तलवार, चक्र, धनुष्य, मानवी डोके, चक्र, कमान, शंख, गोफ, खण आदी आयुधे धारण केली आहेत. तिला योगनिद्रा असे संबोधले जाते. तिच्या प्रभावाखालीच भगवान विष्णूला निद्रेच्या आधीन झाले. म्हणून ब्रह्मदेवाने तिला विनंती केली, की मधू व कैटभ या राक्षसांचा निःपात करण्यासाठी विष्णूला निद्रेतून जागे कर.

अठरा हातांची महालक्ष्मी
महालक्ष्मी ही देवीचे राजस रूप आहे। ही महालक्ष्मी लाल रंगाची आहे. तिच्या अठरा हातांमध्ये तलवार, खण, धनुष्यबाण, पाण्याचे भांडे, कमळ, सुदर्शन चक्र, जपमाळ, वज्रास्त्र, गदा, घंटा, त्रिशूळ, ब्रम्हपाश आदी शस्त्रे आहेत. ही देवी शक्तीचे आणि त्याचवेळी आसुरी शक्तींविरूद्ध लढण्याच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा रंग रक्ताचा, युद्धाचा म्हणजे लाल आहे. तिने महिषासूरालाही संपविले आहे. म्हणूनच महिषासूर मर्दिनी म्हणूनही शक्ती उपासक तिची उपासना करतात.

अष्टहातांची सरस्वती
महासरस्वती ही देवीचे सात्विक रूप आहे। ती शिशिरातल्या चंद्रासारखी दिसते. तिच्या आठ हातांमध्ये घंटा, त्रिशूळ, धनुष्यबाण आदी शस्त्रास्त्रे आहेत. ही देवी शारीरिक शक्तीचे व सौंदर्याचे प्रतीक आहे. सरस्वतीने धुम्रलोचन, चंड, मुंड, निशुंभ, शुंभ या असुरांचा वध केला. माहेश्वरी किंवा राज राजेश्वरी ही या तिनही देवींच्या उर्जेचा स्त्रोत आहे. तिलाच 'ललिता त्रिपूरसुंदरी' असे तिला म्हणतात. ललिता म्हणजे सौंदर्य.

मंदिरापर्यंत कसे जाल

विजयवाडा शहराच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर वसले आहे. रेल्वे स्टेशनपासून किमान 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. विजयवाडा हे शहर हैदराबादपासून 275 किलोमीटरवर आहे. हे शहर रस्ता, रेल्वे, हवाई सेवेने पूर्ण देशाशी जोडले आहे.

मदर मेरीचे केरळमधील अनोखे चर्च


मदर मेरीने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिला तो दिवस सर्वत्र नाताळ म्हणून साजरा होतो। या पावन दिनी जगभरात मदर मेरीसोबत प्रभू येशूची प्रार्थना करण्यात येते. यानिमित्त प्रभू येशूची आई मदर मेरी यांच्या सन्मानार्थ केरळमध्ये बनवण्यात आलेल्या ऐतिहासिक चर्चची भेट आपणास घडवणार आहोत. नऊशे वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1023 मध्ये या चर्चची निर्मिती करण्यात आली होती. पोर्तुगाली वास्तुशैलीत चर्चचे बांधकाम करण्यात आले आहे. चर्चमध्ये स्थापन करण्यात आलेली मदर मेरी यांची मूर्ती फ्रान्सहून मागवण्यात आली होती. मूर्तीत मदर मेरीचे सुंदर रूप साकारण्यात आले आहे. चिरथल्ला मुट्टम सेंट मेरी फॅरोना नावाने हे चर्च प्रसिद्ध आहे. केरळच्या एलापुजा जिल्ह्यात चिरथल्ला हे छोटेसे गाव आहे. प्राचीन काळी हे शहर केरळमधील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते.

शहराची स्थापना ज्यू लोकांनी केली होती असे मानण्यात येते। संत थॉमस येशूच्या संदेशाच्या प्रचारासाठी सर्वप्रथम केरळात आले होते. येथे त्यांनीच सर्वप्रथम सात चर्चची स्थापना केली होती. यानंतर ख्रिश्चन धर्माच्या अनुयायात वाढ होऊन त्यांनी अनेक ठिकाणी चर्चेस स्थापन केली. चिरथला येथील मुट्टम चर्च त्यातीलच एक आहे. मुट्टम येथील चर्चमध्ये प्रत्येक धर्माचे भाविक प्रार्थनेसाठी येतात. येथे आल्यानंतर मनोकामना पूर्ण होण्यासोबतच दु:खाचे हरण होते, अशी श्रद्धा आहे. परिसरातील कोणत्याही धर्माची व्यक्ती नवकार्याच्या शुभारंभापूर्वी येथील मदर मेरीच्या चर्चमध्ये येऊन आशीर्वाद घेते. जीवनातील सुख-दु:ख वाटण्यासाठी ते येथेच येतात. मदर मेरी प्रभू येशू ख्रिस्त व भाविकांमधील दुवा असून ती भक्तांची इच्छा प्रभूपर्यंत पोहचवते, अशी श्रद्धा आहे. मदर मेरीस पवित्र माता मानण्यात येते. सहावे पोप यांनी ही बाब पहिल्यांदा सांगितली.

मुट्टम येथील चर्चमध्ये आठ डिसेंबरनंतरच्या पहिल्या रविवारी मदर मेरीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याशिवाय दुसरी मुख्‍य मेजवानी आठ जानेवारीस असते. यावेळी मदर मेरी व येशू ख्रिस्ताच्या मूर्तींची शोभायात्रा काढण्यात येते. मदर मेरीस मानवतेची देवी समजण्यात येते. आई मुलांचा सांभाळ करते त्याप्रमाणेच मदर मेरी सर्वांना आशीर्वाद देते, त्यांचे कल्याण करते, असे मानले जाते. म्हणूनच ‍फक्त ख्रिश्चनच नाही तर सर्व धर्मातील भाविक येथे भेट देतात.

शिवशंकराचे निवासस्थान- कैलास


भारतीय अध्यात्मात कैलास पर्वताचे स्थान अद्वितीय आहे। भगवान शंकराचे निवासस्थान म्हणून त्याची पौराणिक महती तर आहेच, पण अध्यात्म आणि दर्शनशास्त्रातही या पर्वताचे महत्त्व अलौकीक आहे. म्हणूनच तप, तपश्चर्या यासंदर्भात कैलास पर्वताचे उल्लेख वारंवार येत असतात. त्याच्या पवित्र स्थानामुळेच त्याच्याभोवती एक गूढ पण अध्यात्मिक वलयही आहे. कदाचित त्यामुळेच या पर्वताची यात्रा हा अतिशय दिव्य व तितकाच पवित्र अनुभव ठरतो.

कैलास पर्वतावर प्रकाश व ध्वनी यांचा संगम होऊन त्यातून ‘ॐ’ च्या आवाजाची निर्मिती होते, असे मानले जाते। भारतीय अध्यात्मात, दर्शनशास्र्त्रात या पर्वातचे स्थान ह्रदयाच्या जागी आहे. कल्पवृक्षाची कल्पना जी पुराणात आहे, तो येथेच असल्याचे मानण्यात येते. या पर्वताच्या चारही दिशांना चार रत्नांची नावे आहेत. उत्तर बाजू ही सोन्याची आहे. ऐश्वर्य ज्याच्या पायी लोळण घेते त्या कुबेराची राजधानीही कैलासावर असल्याचे मानले जाते. विष्णूच्या पायातून निघालेली गंगा कैलासावर अभिषेक करते आणि येथे शिवशंकर तिला आपल्या जटेत धारण करतात. त्यातूनच गंगा पुढे वाहत जाते.

कैलासाचे स्थान केवळ हिंदूधर्मियांसाठीच महत्त्वाचे आहे, असे नव्हे, तर इतर धर्मातही त्याला तेवढेच मह्त्व आहे। कैलासावरच बुद्धाचे डेमचौक हे रूप बौद्धधर्मियांसाठी तेवढेच पवित्र आहे. बुद्धाच्या या रूपाला धर्मपाल असेही संबोधतात. येथे आल्यानंतर निर्वाणाची प्राप्ती होते, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्याचवेळी जैन धर्माच्या पहिल्या तीर्थंकरानेही येथेच निर्वाणानुभव घेतला. गुरू नानक यांनीही निर्वाणासाठी कैलासाला येणेच पसंत केले होते, असे काहींचे म्हणणे आहे.

मानसरोवरामुळे कैलास पर्वताचे अध्यात्मिक महत्त्व खूपच वाढले आहे। विलक्षण सौंदर्य आणि उच्च कोटीचा धार्मिक, पवित्र भाव येथे आल्यानंतर निर्माण होतो. मनोव्याधी झडून जातात. सर्व शरीर व मनात असा एक भाव निर्माण होतो, जो आपण कधीही अनुभवलेला नसतो. कैलासाचे महत्त्व वारंवार सांगितले जाते ते कदाचित यामुळेच असावे.

मानसरोवर दर्शन-

राजा मानधाता यांनी मानसरोवर शोधून काढले असे मानले जाते। त्यांनी या सरोवराच्या किनाऱ्यावर बसून तपस्या केली होती. या सरोवरात असा एक औषधी वृक्ष आहे, ज्यामुळे सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक रोगांवर उपचार करता येतो, असे बौद्ध धर्मियांचे म्हणणे आहे. येथे जाण्यासाठी काही बाबींकडे मात्र लक्ष द्यावे लागते. या स्थानाची उंची साडेतीन हजार मीटरहून अधिक आहे. त्यामुळे ऑक्सिजन कमी आहे. परिणामी डोके दुखणे, श्वास घेण्यात अडचण, कसेनुसे वाटणे याचा अनुभव येऊ शकतो.

कैलास मानसरोवर येथे कसे जावे-

१। भारतातून रस्ता मार्गे- भारत सरकारतर्फे रस्तामार्गे या यात्रेचे आयोजन केले जाते. येथे पोहोचण्यासाठी २५-३० दिवस लागतात. त्यासाठी आगाऊ बुकींगही होते. ठरावीक संख्येतच लोकांना नेले जाते. त्याची निवड परराष्ट्र मंत्रालयातर्फे केली जाते.

२। हवाई मार्ग- काठमांडू येथे विमानाने जाऊन तेथून रस्तामार्गे मानसरोवर येथे जाता येते.

३। कैलासापर्यंत हेलिकॉप्टरनेही जाता येते. काठमांडूहून नेपालगंज व तेथून सिमीकोट येथे जाता येथे. तेथून हिलसापर्यंत हेलिकॉप्टरने जावे लागते. मानसरोवरापर्यंत जाण्यासाठी लॅंडक्रूझरचाही वापर करू शकता.

४. काठमांडूहून ल्हासा येथे चायना एअरची हवाई सेवा उपलब्ध आहे. तेथून तिबेटच्या शिंगोटे,ग्यांतसे, लहात्से, प्रयांग येथे जाऊन मानसरोवराला जाता येते.

जैन महातीर्थ मोहनखेडा


इतिहासप्रसिध्द धार जिल्ह्यातील सरदारपूर तालुक्यात मोहनखेडा येथे श्वेतांबर जैन समाजाचे एक तीर्थक्षेत्र आहे। हे तीर्थक्षेत्र केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. परमपूज्य दादा गुरूदेव श्रीमद् विजयराजेंद्र सूरीश्वरजी महाराजांचे वास्तव्य येथे आहे. दरवर्षी गुरूसप्तमीच्या दिवशी येथे भाविक चांगलीच गर्दी करतात. लाखो भाविक पूज्य गुरूदेवांचा जयघोष करत त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त करतात. या वर्षी 15 जानेवारीला गुरूसप्तमीचे पवित्र पर्व आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे.

पूजनीय दादा गुरूदेव श्रीमद् विजय राजेंद्र सूरीश्वरजी यांच्या दिव्य दृष्टीतून हे मंदिर बांधले गेले आहे। त्यांनी सन 1928 व 1934 मध्ये राजगड येथे चातुर्मास केला होता. 1938 मध्ये त्यांनी आलीराजपुरात चातुर्मास केला. त्यानंतर धार जिल्ह्यातील राजगड येथे त्यांचे पुनरागमन झाले. त्यावेळी त्यांनी शिष्य लुणाजी पोरवाल यांना सांगितले, की सकाळी उठून नदीवर जा आणि ज्या ठिकाणी कुंकूचे स्वस्तिक दिसेल तेथे खूण ठेवून त्याच जागी मंदिर बांधा. गुरूदेवांच्या आदेशावरून लुणाजी यांनी मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू केले. संवत 1940 मध्ये ते राजगड नगरीत राहीले. श्री गुरूदेवांनी या दरम्यान शुक्ल सप्तमीच्या शुभ दिवशी मूळ नायक ऋषमदेव भगवंत यांच्यासह 41 जैन साधूंची पूजा बांधली. हे तीर्थ आगामी काळात मोठे तीर्थ बनेल व ते मोहनखेडा या नावाने पुकारले जाईल, असे त्यांनी सांगितले. ते आता प्रत्यक्षात उतरले आहे.

मंदिराचे वर्तमान स्वरूप -

सध्या या परिसरात भव्य व तीन मजली मंदिर आहे। मंदिरात मूळ नायक आदिनाथ यांची 31 इंची सुदर्शन मूर्ती आहे. या मूर्तीची प्रतिष्ठापना गुरूदेवांनी केली आहे. श्री शंखेश्वर व श्री चिंतामणी यांच्याही मूर्ती येथे आहेत. तळघरात प्रवेश करण्यासाठी संगमरमरी तीन कलात्मक द्वार आहेत. त्या ‍जागी श्री अनंतनाथ, श्री सुमतीनाथ व अष्टधातू यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या वरील भागात अजून एक मंदिर आहे. ते श्री शांतीनाथ यांचे आहे. याशिवाय परिसरात श्री आदिनाथ मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. भगवान आदिनाथ यांची 16 फूट 1 इंच श्यामवर्ण कायोत्सर्ग मुखवटा असलेली मूर्ती आहे. ही प्रतिमा अष्टमंगल आसनावर स्थानापन्न आहे. मोहनखेड्यात मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूस तीन शिखरांनी युक्त पार्श्वनाथ मंदिराची स्थापना केली आहे. यात श्री पार्श्वनाथ यांच्या श्यामवर्णाच्या दोन पद्मासन प्रतिमा स्थापित आहेत. जैन परंपरांमध्ये तीर्थकार भगवान, आचार्य, व मुनी भगवंतांच्या चरण पादुकांची स्थापना करण्याची परंपरा आहे.

सुवर्णजडित समाधी मंदिर-

गुरूदेवांची पवित्र मूर्ती मोहनखेड्याला आहे। त्यांचे निर्वाण येथेच जाले. त्यांची मूर्ती सुवर्णजडित आहे. आजही मंदिराच्या भिंतींवर सुवर्ण जडवण्याचे काम सुरू आहे.

सामाजिक बांधिलकी-

गुरूदेवांच्या आशीर्वादामुळेच हे तीर्थक्षेत्र आज मानवसेवेचे मोठे तीर्थक्षेत्र बनले आहे। येथे श्री आदिनाथ राजेंद्र जैन गुरूकूल चालविले जाते. यात विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवण्याची व त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे शेकडो विद्यार्थी शिकत आहेत. मानवसेवेसारखा कोणताच धर्म नाही ही शिकवण प्रत्येक धर्म देतो. हीच शिकवण हे मंदिर देते. नेत्रसेवेसाठी देखील हे तीर्थ प्रसिध्द आहे. 1999 मध्ये याठिकाणी 5 हजार 427 लोकांचे ऑपरेशन केले गेले. याशिवाय शाकाहाराचा प्रचार व व्यसनमुक्तीसाठी शिबिरे आयोजित केली जातात. इतकेच नव्हे तर गोवंशासाठी मोठी गोशाळा बांधली आहे. यात सर्व सुविधांनी युक्त गो निवास बनविले आहेत. प्राण्यांसाठी 10 हजार वर्गफूटाचे भव्य कुरण आहे. ज्योतिष सम्राट श्री ऋषभचंद्र विजयजी यांच्या प्रेरणेने व त्यांच्या मेहनतीने साकार झाले आहे.

संशोधन संस्था-

श्री गुरू राजेंद्र विद्या संशोधन संस्थेची स्थापना मोहनखेडा तीर्थ येथे केली गेली। याचा मुख्य उद्देश जैन साहित्याची आवड असणार्‍यांना ग्रंथालय उपलब्ध करून देणे व संशोधन साहित्य प्रकाशित करणे हा होय.

कसे पोहचाल-

मोहनखेडा येथे जाण्यासाठी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील सरदारपुर तालुक्यातील राजगड येथे जावे लागते. तेथून मोहनखेडा 5 किमी दूर आहे. इंदूरहून राजगडला जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. धार जिल्हा मुख्यालयापासून प्रत्येक तासाला बससेवा उपलब्ध आहेत. मोहनखेडा येथून 60 किमी अंतरावर मेघनगर रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी यात्रेकरूंची राहण्यासाठी धर्मशाळांची व्यवस्था आहे.

Monday, December 1, 2008

भाविकांचे श्रध्दास्थान शिर्डीचे साईबाबा


अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील 'शिर्डी' हे आधुनिक भारतातील तीर्थक्षेत्र बनले आहे। साईबाबांच्या वास्तव्याने पुनित झालेले एकेकाळचे खेडेगाव आता शहर बनले आहे. बाबांचा आधार घेण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे येत असतात. मनमाड अहमदनगर या राज्य मार्गावर हे गाव वसलेले आहे.

अलौकिक विभूती असलेले सदगुरू श्री साईबाबा शिर्डीत प्रकटले व जवळपास 60 वर्षे आपले मानवी वेशातील अवतारकार्य पूर्ण करून येथेच समाधीस्थ झाले। शिर्डीस येणे, वास्तव्य करणे हीच मोठी साधना असल्याचा प्रत्यय स्वत: साईबाबांनी घेतला व तोच इतरांनाही येत असतो. श्री साईबाबांच्या पवित्र पदस्पर्शाने व अलौकिक अवतार कार्याने पावन झालेली ही पुण्यभूमी आज सर्वच जाती-धर्मातील पंथ, संप्रदायातील लोकांना मुक्त प्रवेश असणारे ठिकाण आहे.

श्री साईबाबांनी आपल्या अवतारकार्यात आपल्या भक्तांना आश्वासन दिलं होतं, ''माझ्या देहत्यागानंतर माझी हाडं माझ्या तुर्बतीतून बोलतील... मुंग्यांसारखी माणसांची रीघ लागेल।'' त्याचा प्रत्यय आज येतो आहे. शेकडो, हजारो, लाखो भाविक देशाच्या कानाकोपर्‍यातून, विदेशातून शिर्डीला गर्दी करीत आहेत. येथूनच बाबांनी संपूर्ण जगाला 'श्रध्दा-सबूरी' हा महामंत्र दिला. त्याचमुळे बाबांचे समाधीस्थळ लाखो भाविकांच्या मनाला उर्जा देणारे केंद्र बनले आहे. शिर्डीस आल्यावर श्री साईबाबांच्या दर्शनानंतर प्राप्त होणारी मन:शांती, मिळणारा आत्मविश्वास, परम् मन:शांतीचा येणारा प्रत्यय यामुळे शिर्डी हे जगातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.

श्री साईबाबांचे समाधी मंदिर -

हे मुख्य मंदिर आहे। मंदिराची ही इमारत नागपूरचे निस्सीम साईभक्त श्री. गोपाळराव बुट्टी यांनी बाबांच्या आशीर्वादाने बांधली होती. म्हणून 'बुट्टी वाडा' या नावानेही ती ओळखली जाते. १५ ऑक्टोबर १९१८ रोजी विजयादशमीच्या दिवशी बाबांनी आपल्या ऐहिक जीवनाचे सीमोल्लंघन केले आणि त्यांच्या व्यक्तव्यानुसार त्यांचा देह या वाड्यात ठेवण्यात आला, ते आजचे समाधी मंदिर होय. या ठिकाणी श्री साईबाबांची पवित्र समाधी व मूर्ती आहे. समाधी मंदिरात दररोज नित्य पूजा, अभिषेक व चार आरत्या होतात.

गुरूस्थान -

बाबा सोळा वर्षांचे असताना ज्या ठिकाणी प्रथम दृष्ट्रीस पडले ते हे समाधी मंदिर परिसरातील ठिकाण, त्यांच्या गुरूचे आहे, असे बाबा सांगत असत। श्री साईसच्चरितात उल्लेख असलेला प्रसिध्द निंब वृक्ष येथेच आहे. या ठिकाणी गुरूवारी व शुक्रवारी उद (लोबान, धूप) प्रज्वलित केल्यास भाविकांचा दु:ख परिहार होतो, असे श्री साईसच्चरितात म्हटले आहे.

द्वारकामाई(मशीद) -

बाबा शिर्डीस आल्यापासून समाधीस्थ होईपर्यंत त्यांचे वास्तव्य सलग 60 वर्षे समाधी मंदिर परिसरातील या ठिकाणी होते। असंख्य भक्तांना या ठिकाणी बाबांनी कृपाप्रसाद दिला. बाबा ज्या शिळेवर बसत असत, ती येथेच आहे. शिवाय बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी या ठिकाणी अखंडपणे प्रदीप्त आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाबा याच धुनीतून त्यांना उदी देत असत. आताही भक्तांना द‍िली जाणारी उदी याच धुनीतून प्राप्त होते. बाबा येथे अन्न शिजवून भक्तांना वाढीत असत.

चावडी -

एक दिवसाआड बाबा या ठिकाणी मिरवणूकीने द्वारकामाईतून येत असत व मुक्काम करीत असत। समाधी मंदिर परिसराच्या जवळच पूर्वेला चावडी आहे. आता प्रत्येक गुरूवारी रात्री 9:15 ते 10:00 या वेळी द्वारकामाईतून चावडीकडे पालखी मिरवणूक निघत असते. या पालखीतच बाबांची तसबीर, सटका व पादुका ठेवलेल्या असतात.

लेंडीबाग-

समाधी मंदिर परिसरातच असलेल्या या ठिकाणी बाबा फेरफटका मारावयास जात असत. बाबांनी स्वत: या ठिकाणी लावलेल्या पिंपळ वृक्षाशेजारी नंदादीप अखंडपणे तेवत ठेवलेला आहे. शिवाय या ठिकाणी दत्तमंदिर असून बाबांचा आवडता घोडा श्यामकर्ण (श्यामसुंदर) जवळच चिरनिद्रा घेत आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरीस 'बाबांची शिवडी' असे म्हटले जाते

जैन सिद्ध क्षेत्र बावनगजा


धर्मयात्रा या सदरात आम्ही आपल्याला जगप्रसिद्ध जैन सिद्ध क्षेत्र बावनगजा (चुलगिरी) येथे घेऊन जात आहोत। नुकताच या सिद्ध क्षेत्री शतकातील पहिला महामस्तकाभिषेक सोहळा झाला. मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यापासून 8 क‍िलोमीटरवर असलेल्या या पवित्र स्थळी जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेवजी (आदिनाथ) यांची 84 फूट उंच मूर्ती आहे. प्रतिमेचा रंग भूरा असून एकाच दगडात ती कोरली आहे. शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेली ही ऋषभदेवजींची मूर्ती अहिंसा आणि सद्भावनेचा संदेश देणारी आहे

इतिहास : या मूर्तीची निर्मिती केव्हा आणि कधी झाली यासंबंधीचा कुठलाही उल्लेख इतिहासात आढळत नाही। परंतु, ही मूर्ती 13 व्या शतकातील असल्याचे म्हटले जाते. एका शिलालेखानुसार इ. स.1516 मध्ये भट्टारक रतनकिर्ती यांनी बावनगजा मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

मुस्लिम राजांच्या काळात ही मूर्ती उपेक्षितच राहीली। ऊन, पाऊस, वारा यांचा या प्रतिमेवर बराच विपरीत परिणाम झाला. दिगंबर जैन समाजाचे या मूर्तीकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मदतीने मूर्तीच्या जीर्णोद्धाराची योजना आखली. 1979 मध्ये या मूर्तीचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यासाठी 59,000 रुपये खर्च आला होता.

मूर्तीचा आकार :

उंची :84 फूटदोन्ही हातांमधील अंतर :26 फूटहाताची लांबी :46 फूट 6 इंचकंबरेपासून तळपायापर्यंतची लांबी :47 फूट पाय :13 फूट 09 इंचनाक 3 फूट 3 इंच लांबडोळे :3 फूट 3 इंच रूंदकान :9 फूट 8 इंच लांबदोन्ही कानांमधील अंतर :17 फूट 6 इंचपायाचा घेर :5फूट 3 इंच

महामस्तकाभिषेक :

महामस्तकाभिषेक जवळपास 17 वर्षांनी होत असून या वर्षी 20 जानेवारीपासून 4 फेब्रुवारीपर्यंत तो सुरू आहे। यादरम्यान लाखो भाविकांनी येथे येऊन भगवान आदिनाथांचे दर्शन घेतले. पाणी, दुध आणि केशर यांनी अभिषेक केला जातो. दुग्धाभिषेकात दुधाची धार आदीनाथजींच्या डोक्यावरून थेट पायांपर्यंत वाहते. भाविक भजने म्हणत भगवंताची स्तुतीसुमने गातात. केशर अभिषेकाने संपूर्ण मूर्ती जणू केशरी झाल्याचे वाटते. नुकत्याच झालेल्या सोहळ्याला खूप गर्दी झाली होती. परिसरातील आदिवासीही या सोहळ्यास उपस्थित राहिले.

सौंदर्य :

बडवानीपासून बावनगजापर्यंतचा रस्ता सुंदर डोंगर दर्‍यातून जातो। पावसाळ्यात येथे नैसर्गिक झरे पाझरतात. त्यामुळे बावनगजातील नैसर्गिक दृश्य पाहून डोळे दिपून जातात. पावसाळ्यातच हे सौंदर्य बघण्यासाठी गर्दी होते. मध्य प्रदेश सरकारने बावनगजा (चुलगिरी) हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.

कसे पोहोचाल

इंदूर (155 किमी), खांडवा (180 किमी) येथे जाण्यासाठी टॅक्सी सुविधा उपलब्ध आहे। जवळचे विमानतळ : देवी अहिल्या विमानतळ (155 किमी) इंदूर

राहण्याची व्यवस्था : बावनगजात 5 धर्मशाळा असून त्यात 50 पेक्षाही जास्त खोल्या आहेत. बडवानीत प्रत्येक वर्गातील सुविधेनुसार राहण्यासाठी हॉटेल आणि धर्मशाळा यांची व्यवस्था आहे.

धारची भोजशाळा


मध्य प्रदेशातील धारच्या ऐतिहासिक भोजशाळेत दरवर्षी वसंत पंचमीला सरस्वती देवीच्या उपासकांची जत्रा भरते। या ठिकाणी सरस्वती मातेची या दिवशी पूजा-अर्चा केली जाते. येथे यज्ञवेदीत पडणारी आहुती आणि अन्य अनुष्ठाने पूर्वीच्या वैभवाची आठवण करून देतात. या वर्षी 11 फेबुवारी 2008 ला वसंत पंचमी असून उत्साहित, आनंदी वातावरणात साजरी केली जाणार आहे. राजा भोज हे सरस्वती देवीचे उपासक होते. त्यांच्या काळी सरस्वती देवीच्या साधनेला विशेष महत्त्व होते. त्या काळात सामान्य लोकही संस्कृतचे विद्वान असायचे. त्यामुळे धार, संस्कृत आणि संस्कृती यांचे केंद्रबिंदू होते. राजा भोज, सरस्वतीच्या कृपेने योग, न्याय, ज्योतिष, धर्म, वास्तुशास्त्र, राज्य-व्यवहार शास्त्र यासारख्या बर्‍याच शास्त्रात पारंगत होता.

त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही नावाजले जातात। परमार वंशातील महान राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजा भोजचा धारमध्ये 1000 इ.स. पासून 1055 कार्यकाल होता. राजा भोज विद्वानांचे आश्रयदाता होते. त्यांनी धारमध्ये एक विद्यापीठाची स्थापना केली होती, तेच नंतर भोजशाळा या नावाने प्रसिद्ध झाले. त्या काळातील साहित्यात या नगराचा उल्लेख धार तसेच शासन यशोगानचा असा आहे.

भोजशाळा एका खुल्या मैदानात बांधली आहे। भोजशाळेच्या समोर एक मुख्य मंडळ आणि मागच्या बाजूला एक मोठे प्रार्थना घर आहे. नक्षीदार स्तंभ तसेच प्रार्थनागृहाचे नक्षीदार छत भोजशाळेच वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी दोन मोठे शिलालेख (काळ्या रंगाचे दगड) आहेत. या शिलालेखांवर संस्कृतात नाटक कोरलेले आहे. हे अर्जुन वर्माच्या काळात कोरलेले आहे.

या काव्यबध्द नाटकाची रचना राजगुरू मदन यांनी केली होती. ते विख्यात जैन विद्वान आशाधर यांचे शिष्य होते. या नाटकाचा नायक पूरंमंजरी आहे. हे नाटक धारच्या वसंतोत्सवात अभिनित करण्यासाठी लिहिले गेले आहे. भोजशाळेत स्तंभांवर धातूपासून बनविली जाणारी वर्णमाला अंकित आहे. भवन कलेच्या रूपात भोजशाळा एक महत्त्वाची कलाकृती गणली जाते.

केरळमधील आट्टुकाल देवीचे मंदिर


केरळमधील तिरूवनंतपुरम शहरातील आट्टुकाल भगवती मंदिराचा लौकीक वेगळाच आहे। धर्मयात्रेच्या या भागात आम्ही या तीर्थक्षेत्राविषयीची माहिती देत आहोत. कलिकालाच्या दोषांचे निवारण करणारी ही जगदंबा केरळची राजधानी तिरूवनंतपुरम शहराच्या दक्षिणेला आट्टुकाल नावाच्या गावात विराजमान आहे. अनंतपुरी नगरीत अनेक मंदिरे आहेत. काशीइतकेच ते पवित्र असल्याचे येथील भाविकांचे म्हणणे आहे. भारततभरातून येणार्‍या भाविकांच्या उपस्थितीने तिरूवनंतपुरम नगरी सदैव गजबजलेली असते. या भाविकांची यात्रा आट्टुकाल करूणामयी देवीचा आशीर्वाद प्राप्त केल्याने सुफळ संपूर्ण होते.

मंदिराचा इतिहास
आट्टुकाल गावातील मुल्लुवीड कुटुंबाला ही देवी पहिल्यांदा दिसली। तोच मंदिराच्या उत्पत्तीचा आधार मानला जातो. ही देवी पतिव्रताधर्माच्या प्रतीकाच्या रूपात प्रख्यात असलेली कणकींचा अवतार मानली जाते.

पोंकाला महोत्सव
आट्टुकाल मंदिराचा पोंकाला उत्सव हा सर्वांत मोठा आणि प्रसिद्ध उत्सव आहे। हा सण द्राविडी परंपरेतील आहे. हा उत्सव कुंभ महिन्यात पूर्ण नक्षत्र आणि पौर्णिमा दोघांच्या मीलनाच्या मुहूर्तावर साजरा केला जातो. दिवसा कीर्तन, भजन आणि रात्री लोकनृत्य आणि इतर कार्यक्रम चालतात. संगीत कार्यक्रमदेखील चालतात. सजविलेले रथ-घोडे यांची मिरवणूक निघते. नारळाच्या पानांपासून किंवा चमचमणार्‍या कागदांपासून सजविलेल्या तख्तावर देवीची मूर्ती ठेवून दीपमाळा बनविल्या जातात. त्या डोक्यावर ठेवून वाजत गाजत, संगीताच्या तालावर काढल्या जाणार्‍या मिरवणुका मनमोहक असतात.

नवव्या दिवशी तिरूवनंतरपूरम नगरीचे सर्व रस्ते आट्टुकालकडे जातात। जवळपास पाच किलोमीटरच्या आत असलेली घरे, त्यांचे अंगण, पटांगण, रस्ते, जिथे जिथे रिकामी जागा आहे तिथे पोंकालाचे केंद्र बनते. केरळच नव्हे तर बाहेरूनही पोंकाला नैवेद्य तयार करण्यासाठी लाखोंनी स्त्रिया येथे येतात. या सर्व स्त्रिया एक दिवस आधीच पोंकाला क्षेत्रात येऊन दाखल होतात. त्या आपल्या सोबतच पोंकालासाठी आवश्यक सामग्री तांदूळ, साखर, नारळ, लाकडे घेऊन येतात. या सर्व गोष्टी या ठिकाणाहून खरेदी करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात येणार्‍या स्त्रियांसाठी राहण्याची आणि संरक्षणाचीही व्यवस्था अनेक संस्थांकडून केली जाते. पोलिसही जागरूक असतात.

स्वयंसेवक, सेवा समिती, मंदिर ट्रस्टचे स्वयंसेवक या सर्व प्रकारच्या सेवेसाठी कटिबद्ध असतात। प्रयागच्या कुंभ मेळाव्याची आठवण देणारा अशी ही पोंकाला यात्रा आहे. विविध प्रकारचे लेपन करून देवीला सुंदर बांगड्या घातल्या जातात. तेव्हाच उत्सवाचा शुभारंभ होतो. उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये संपूर्ण मूर्ती लेपयुक्त होऊन जाते. या काळात देवीचे चरित्र गायले जाते. पांड्य राजाच्या वधापर्यंत हे चरित्र गान केले जाते.पांड्य राजाच्या वधापर्यंत आनंदोत्सव चालतो. सोबतच पोंकाला चूल पेटविली जाते. नंतर सायंकाळी एका निश्चित वेळी पुजारी पोंकाला पात्रांमध्ये तीर्थजल शिंपडतात तेव्हा विमानातून पुष्पवृष्टी होते. देवीच्या नैवेद्य-स्वीकृतीने प्रसन्न होऊन नैवेद्य डोक्यावर धरून स्त्रिया परत जाऊ लागतात.

कसे पोहोचाल-

तिरूवनंतपूरम सेंट्रल रेल्वे स्टेशनपासून हे पीठ फक्त दोन किलोमीटरवर आहे. येथील विमानतळापासून हे ठिकाण सात किलोमीटरवर आहे. भारताच्या सर्व प्रदेशांमधून येथे पोहचता येते. तिरूवनंतपुरम पोहचणारे भाविक रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवरून सरळ आट्टुकालला पोहोचू शकतात. या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी बस, टॅक्सी आणि ऑटो रिक्शा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. श्री पद्मनाभस्वामींच्या मंदिरासमोरून दोन किलोमीटर दक्षिण-पूर्वेला पायी चालत गेलो तर तीस मिनिटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे.


शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप


गंगा नदीच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते। ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्या मठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्‍या साधूंच्या चरणी नतमस्तक होतात.

धार्मिक महत्त्व
वाराणसी अर्थात काशीचे महत्त्व फार मोठे आहे। पृथ्वीची निर्मिर्ती झाली तेव्हा प्रकाशाची पहिली किरणे काशीच्या भूमीवरच पडली असे मानले जाते. तेव्हापासूनच काशी ज्ञान, अध्यात्माचे केंद्र झाले. काशीची निर्मिती झाल्यानंतर काही कालांतराने शंकराने येथे काही काळ वास्तव्य केले होते. ब्रह्माने दहा घोड्यांचा रथ (दशाश्वमेघ) घाटावर पाठवून त्यांचे स्वागत केले होते.

काशी विश्वनाथ मंदिर
गंगेच्या किनार्‍यावर अरुंद विश्वनाथ गल्लीत विश्वनाथाचे मंदिर आहे। त्याच्या चहूबाजूने मंदिरे आहेत. येथे एक विहीरही आहे. तिला 'ज्ञानव्यापी'ची संज्ञा दिली जाते. ती मंदिराच्या उत्तरेला आहे. विश्वनाथ मंदिराच्या आत एक मंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या आत चांदीने मढविलेले परमेश्वर विश्वनाथांचे साठ सेंटिमीटर उंच शिवलिंग आहे. हे शिवलिंग काळ्या दगडातून निर्मित आहे. मंदिराचा आतील परिसर मोठा नसला तरीही तेथील वातावरण शिवमय आहे.

ऐतिहासिक महत्त्व

हे मंदिर ऐतिहासिक काळात निर्माण झाले होते, असे मानले जाते। इसवी सन 1776 मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठी रक्कम दान केली होती. लाहोरचे महाराजा रणजीतसिंह यांनी मंदिराच्या शिखरासाठी एक हजार किलो सोने दान दिले होते. 1983 मध्ये उत्तरप्रदेश सरकारने मंदिराचे व्यवस्थापन आपल्या हातात घेतले आणि काशीचे माजी नरेश विभूती सिंह यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती केली.

पूजा-अर्चनाहे मंदिर रोज भल्या पहाटे 2।30 वाजता मंगल आरतीसाठी खुले केले जाते. ही आरती सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत चालते. भाविक तिकिट घेऊन या आरतीत भाग घेतात. त्यानंतर 4 वाजेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वांसाठी मंदिर खुले होते. 11.30 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत नैवैद्य आरतीचे आयोजन होते. 12 वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत परत या मंदिरात सार्वजनिक दर्शनाची व्यवस्था आहे. संध्याकाळी 7 ते 8.30 पर्यंत सप्तऋषी आरती चालते त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत सर्व भाविक मंदिराच्या आत दर्शन करू शकतात. 9 वाजेनंतर मंदिर परिसराबाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. शेवटी 10.30 वाजता रात्री शयन आरती प्रारंभ होते. लोकानी वाहिलेला प्रसाद, दूध, कपडे आणि अन्य वस्तू गरीबांमध्ये वाटल्या जातात.

कसे पोहचाल

हवाई मार्गे : वाराणसी शहर देशाच्या जवळपास सर्व मुख्य शहरांशी हवाई मार्गे जोडलेले आहे. तरीदेखील दिल्ली-आग्रा-खजुराहो-वाराणसी मार्ग पर्यटकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. रेल्वेमार्गे : वाराणसी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि भारताच्या बर्‍याच महत्त्वपूर्ण भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडले आहे. दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणांसाठी वाराणसीहून राजधानी एक्सप्रेसही जाते. वाराणसीपासून फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर स्थित मुगलसरायपासूनही बर्‍याच स्थानांसाठी रेल्वे व्यवस्था आहे. रस्तामार्गे : गंगेच्या मैदानात असल्यामुळे वाराणसीसाठी रस्त्यामार्गे जाण्याची उत्तम व्यवस्था आहे. उत्तर प्रदेशाच्या विविध भागांतून येथे सरकारी आणि खाजगी बसची उत्तम व्यवस्था आहे.

ॐ शनिदेवाय नमः


शनी म्हटलं की त्याचा कोप आठवतो. शनी महाराज प्रसन्न असले तर ठीक. पण एकदा का चिडले की 'साडेसाती' ठरलेली. तर अशा या शनीचा महिमा जाणून घेण्यासाठी आम्ही शनी शिंगणापूरला कुच केले. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे। शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभ म्हणजे शनिदेवाची मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.

येथील कथाही रोचक आहे। शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. कोणीही चोर गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.

येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत। शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तिळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.

कसे पोहचाल

हवाई मार्ग : शनी शिंगणापूरपासून सर्वांत जवळचे विमानतळ असलेले शहर पुणे येथून 160 किमी अंतरावर आहे. रेल्वेमार्ग : येथील सर्वांत जवळील रेल्वे स्टेशन श्रीरामपूर आहे. रस्ता मार्ग : नाशिकहून या ठिकाणासाठी बस, टॅक्सी या सुविधा आहेत. मुंबई, पुणे, अहमदाबाद येथूनही या सुविधा आहेत. शिर्डीला गेल्यानंतर शनी शिंगणापूरला जाणे उत्तम.

तिरूचनूरची पद्मावती देवी


तिरूचनूर हे तिरूपती जवळील एक लहानसे गाव आहे। या छोट्याशा गावात देवी पद्मावतीचे सुंदर मंदिर आहे. पद्मावती देवी अतिशय दयाळू आहे. तिला शरण गेल्यास आपली सगळी पापे नष्ट होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रध्‍दा आहे. तिरूपती बालाजीच्या मंदिरात मागितलेली इच्छा पद्मावती देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतरच पूर्ण होते अशीही समजूत आहे. तिरूपतीपासून हे मंदिर अवघ्या पाच किलोमीटरवर आहे.

मंदिराचा इतिहास-

तिरूचनूर गावातील हे मंदिर प्राचीन असल्याचे मानले जाते। तिरूपतीतील वेंकटेश्वराचे मूळ मंदिर येथेच होते, असे सांगितले जाते. पण येथील जागा कमी पडू लागल्याने मंदिर तिरूपतीत स्थलांतरीत करण्यात आले. दोन महत्त्वाचे पूजाविधी वगळता बाकीचे रितीरिवाज तिरूपतीमध्येच पार पाडले जाऊ लागले. त्यामुळे तिरूचनूरचे महत्त्व थोडे उणावले. बाराव्या शतकात यादव राजांनी येथे कृष्ण-बलरामाचे सुंदर मंदिर बांधले. त्यामुळे या मंदिराला महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर येथे सोळाव्या आणि सतराव्या शतकात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सुंदरा वरदराजाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि देवी पद्मावतीसाठी वेगळे मंदिर बांधण्यात आले. पौराणिक कथेनुसार देवी पद्मावतींचा जन्म कमळाच्या फुलात झालेला असल्यामुळे मंदिर तलावात बांधण्यात आले.

मंदिर परिसर-

मंदिर परिसरात बर्‍याच देवी-देवतांची लहान-लहान मंदिरे आहेत। देवी पद्मावती व्यतिरिक्त कृष्ण-बलराम, सुंदरराजा स्वामी आणि सूर्यनारायण मंदिरेही आहेत. पण प्रभू व्यंकटेशांची पत्नी असल्यामुळे देवी पद्मावती मंदिराला जास्त महत्त्व पद्मावती देवीची मूर्ती कमळाच्या आसनावर तिच्या वरील दोन्ही हातांमध्ये कमळाचे पुष्प आहे.?

कसे पोहोछाल

मंदिर तिरूपती रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटरवर आहे. रस्त्यालगत असलेल्या या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी तिरूपतीहून बससेवा उपलब्ध आहे. हैदरापासून 547 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेमार्ग: तिरूपती हैदराबादपासून 547 किलोमीटर अंतरावर असून तेथून रेल्वेसेवादेखील उपलब्ध आहे. हवाईमार्ग: येथे हैदराबाद, चेन्नई, बंगलोर येथून विमानाने जाता येते.

स्तंभेश्वर महादेव


या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष समुद्रच शिवशंभूला जलाभिषेक करतो। गुजरातमधील भडोच जिल्ह्यात कावी नावाचे छोटेसे गाव आहे। समुद्रकिनारी वसलेल्या या गावात स्तंभेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या गावाकडील किनार्‍यावर भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी मंदिराच्या आत येऊन शिवलिंगावर अभिषेक करून परत जाते. स्तंभेश्वराच्या या मंदिरात शिवलिंग आहे. समुद्र-देवता स्वत: येऊन त्याला अभिषेक घालते, अशी लोकांची समजूत आहे. भरतीच्या वेळी शिवलिंग पूर्णपणे जलमय होऊन जाते. प्रत्येक भरतीला हा प्रकार घडतो.

या मंदिरामागे एक दंतकथाही आहे। शंकराचा पुत्र कार्तिकेय सहा दिवसाचे असताना देवसेनेचे सेनापती म्हणून नियुक्त केले गेले होते. त्यावेळी तारकासुर नावाच्या दैत्याने देवांना भयभीत करून सोडले होते. देव, ऋषी, मुनी, सामान्य जनता त्रासले होते. कार्तिकेयाने या तारकासूराचा वध केला.

तारकासूर शंकराचा परमभक्त होता असे नंतर कार्तिकेयाला समजले। त्यामुळे व्यथित झालेल्या कार्तिकेयाने मनाची शांती मिळविण्यासाठी वधस्थळावर शिवमंदिर बांधावे, असे विष्णूंनी सुचविले. कार्तिकेयाने तसेच केले. समस्त देवगणांनी एकत्र येऊन महिसागर संगम तीर्थावर विश्वनंदक स्तंभाची स्थापना केली. पश्चिम भागात स्थापित स्तंभात शंकर स्वतः आहेत, असे लोक मानतात. म्हणूनच या तीर्थाला स्तंभेश्वर संबोधले जाते. येथे महिसागर नदीचा सागराशी संगम होतो.

स्तंभेश्वर महादेव मंदिरात दर महाशिवरात्री आणि अमावस्येला यात्रा भरते. प्रदोष, पौर्णिमेला संपूर्ण रात्र येथे पूजा-अर्चना सुरू असते. कानाकोपर्‍यातून भाविक येथे शिवशंभूच्या जलाभिषेकाचे अलौकिक दृश्य पाहण्यासाठी येतात.

देवासची चामुंडा आणि तुळजा देवी


देवी भवानीचे हे मंदिर प्रसिद्ध आहे. खरे तर इथे दोन मंदिरे आहेत. मोठ्या डेवीला तुळजा भावानी आणि लहान देवीला चामुंडा देवीचे रूप मानले जाते।

येथील पुजारी सांगतात, की या दोन्ही देवी बहिणी आहेत। एकदा दोघींमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झाला. वादाने दुःखी होऊन दोघीजणी आपले स्थान सोडून जायला लागल्या. मोठी देवी पाताळात शिरायला लागली आणि लहान देवी टेकडी सोडून जायला निघाली. संतापलेल्या या दोघींना पाहून त्यांचे साथीदार (असे मानले जाते की हनुमान मातेचा ध्वज घेऊन पुढे आणि भैरूबाबा कवच बनून मागे चालत होते.) हनुमान आणि भैरूबाबाने त्यांचा रांग शांत करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत मोठ्या देवीचे अर्धे शरीर पाताळात गेले होते ती त्याच अवस्थेत टेकडीवर थांबली. लहान देवी टेकडीवरून खाली येत होती आणि रस्ता बंद झाल्याने ती क्रोधित झाली. ज्या अवस्थेत ती खाली उतरत होती त्याच अवस्थेत ती टेकडीवर थांबली.

म्हणून आजही दोन्ही देवी त्याच स्वरूपात येथे आहेत। इथल्या लोकांच्या मते, या दोन्ही देवी स्वयंभू व जागृत आहे. येथे केलेले नवस पूर्ण होतात. देवासबाबत आणखी एक बाब सांगितली जाते. एक म्हणजे देवासमध्य दोन वंश राज्य करीत होते. एक होळकर राजवंश आणि दुसरे म्हणजे पवार वंशाची कुलदेवी.

टेकडीवर दर्शन करण्यासाठी येणारे भाविक दोन्ही देवींबरोबरच भैरूबाबाचे दर्शन करायला विसरत नाही। नवरात्राच्या वेळी येथे दिवसरात्र लोक येत असतात. या दिवसात येथे मातेची विशेष पूजा करण्यात येते.

पोहचण्याचा मार्ग

हवाई मार्ग - येथून जवळचे विमानतळ म्हणजे मध्य प्रदेशची औद्योगिक राजधानी असलेले इंदूर आहे.रस्ता मार्ग - हे शहर मुंबई- आग्रा महामार्गाजवळ आहे. हा रस्ता देवीच्या टेकडी जवळूनच जातो. इंदूरपासून देवास 30 किलोमीटरवर आहे. इंदूरहून आपण बस किंवा टॅक्सीने देवासला जाऊ शकतो. रेल्वे मार्ग - इंदूरहून देवासला रेल्वेद्वारे जाऊ शकता

इंदूरची बिजासन देवी

संपूर्ण देशात सध्या चैत्र नवरात्र साजरे केले जात आहे। देवीच्या मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा आहेत. धर्मयात्रेत या वेळी आम्ही आपल्याला इंदूरच्या बिजासन देवीचे दर्शन घडवित आहोत. मंदिरात चैत्र नवरात्रातील 9 दिवस रोज शतचंडी महायज्ञ होत आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होत आहे. मंदिरात देवीच्या पाषाण मूर्ती आहेत. वैष्णोदेवीप्रमाणे येथेही देवी पाषाणातील पिंडरूपात आहे. मंदिराच्या पुजार्‍यांच्या मते, या पिंडी स्वयंभू आहेत. त्या येथे कधीपासून आहेत, याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही. आम्हीच अनेक वर्षांपासून त्यांची पूजा करत आहोत, असे पूजारी सांगतात.
आधी ही टेकडी होळकरांच्या राज्यात होती। एकदा शिकारीसाठी आलेले असताना राजघराण्यातील लोकांची दृष्टी ह्या मंदिरावर पडली. त्यानंतर मग सन 1920 मध्ये येथे पक्के मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत येथे भाविकांची अपार गर्दी असते. येथे केलेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या प्रांगणात एक तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत. या माशांना अन्न घातले तर पुण्य प्राप्त होऊन सर्व मनोरथ पूर्ण होतात, असे भाविक मानतात. मंदिरात प्रत्येक नवरात्रीला यात्रा भरते. टेकडीवरून बघितल्यावर इंदूर शहराचे नयनरम्य दृश्य दिसते. मंदिरच्या जवळच गोम्मटगिरी आणि हिंकारगिरी नावाचे जैनांचे पवित्र स्थळ आहे. येथे दरवर्षी चातुर्मासात जैन मुनी येतात.
कसे पोहचाल
इंदूर मध्यप्रदेशची औद्योगिक राजधानी आहे. मुंबई-आग्रा महामार्ग इंदूरमधूनच जातो. देशाच्या कुठल्याही भागातून येथे रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गे पोहचता येते. हे मंदिर इंदूर विमानतळापासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे.

जागृत देवस्थान चंद्रिका देवी मंदिर


लखनौ नवी दिल्ली महामार्गावर बक्षी तलाव या छोट्याशा गावाजवळ चंद्रिका देवीचे मंदिर आहे। या देवीचा महिमा मोठा आहे. गोमती नदीजवळील महीसागर संगम तीर्थावर प्राचीन मानल्या जाणाऱ्या लिंबाच्या झाडात नऊ देवींसोबत त्यांच्या ऋचा अनंत काळापासून सुरक्षित ठेवल्या आहेत. 18 व्या शतकानंतर येथे चंद्रिका देवीचे भव्य मंदिर बांधण्यात आले. उंच पर्वतावर एका मठात देवीची आराधना करत अमावास्येला येथे यात्रा भरवण्याची प्रथा आजही कायम आहे.

इथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात। देवीवर त्यांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळेच देवीकडे नवसही केले जातात. नवसाची अभिनव पद्धत आहे. देवीकडे नवस केल्यानंतर मंदिरात ओढणी बांधली जाते. नवस पूर्ण झाल्यानंतर देवीला प्रसाद आणि ओढणी चढवली जाते.

यज्ञकुंडात ऋचा टाकण्याची परवानगी वगळता, देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचा बळी देणे किंवा साधा नारळ फोडण्यासही येथे मनाई असल्याने मंदिराचा परिसर स्वच्छ आहे। देवाच्या दारी सारेच समान या तत्वानुसार येथे कोणताही भेदभाव केला जात नाही. आलेल्या प्रत्येकाला केवळ भाविक म्हणूनच ओळखले जाते.येथे भरणाऱ्या यात्रेचे सारे नियोजन स्वर्गीय ठाकूर बेनीसिंह चौहान यांचे वंशज अखिलेश सिंह करतात. ते कठवारा या गावाचे सरपंच आहेत. महीसागर संगम तीर्थाचे मुख्य पुरोहित आचार्यही आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पददलित समाज बांधवांकडूनच भैरवनाथाची पूजा केली जाते.

या मंदिराचा पुराणातही उल्लेख आहे। स्कंद पुराणानुसार घटोत्कचाचा मुलगा आणि भीमाचा नातू बर्बरिक याने येथे तपश्चर्या केली होती. चंद्रिका देवीच्या उत्तर,पश्चिम, आणि दक्षिण भागातून गोमती नदी वाहते. पूर्वेस महिसागर तीर्थ आहे.या तीर्थाचा प्रत्यक्ष संबंध पाताळाशी असल्याने येथे कधीही पाण्याची कमतरता जाणवत नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

येथे भाविक चंद्रिका देवीसह बर्बरिकचीही पूजा करतात। दक्षाच्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने याच महिसागर तीर्थात स्नान केले होते. त्रेता युगात लक्ष्मणपुरीचे (लखनौ) अधिपती उर्मिला पुत्र चंद्रकेतूला येथील जंगलाची भीती वाटली. तेव्हा त्याने येथील नवदुर्गेची आराधना केली. चंद्रिका देवीच्या कृपेने तो भयमुक्त झाला. महाभारत काळात पांडव द्रौपदीला घेऊन या संगमावर आले होते. युधिष्ठिराने सोडलेला अश्वमेध यज्ञाचा घोडा येथील हंसध्वज राजाने रोखल्यानंतर त्याला पांडवांशी युद्ध करावे लागले होते. यात हंसध्वज राजाचा मोठा मुलगा सूरथ याने युद्धात सहभाग घेतला होता, तर दुसरा मुलगा सुधन्वा चंद्रिका देवीची आराधना करत होता.

युद्धात सहभागी होण्या ऐवजी पूजेत रमल्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला गरम तेलात टाकण्यात आले, पण त्याला कोणतीही इजा न झाल्याने येथील कुंडाला सुधन्वा कुंड संबोधले जाते. तसेच युधिष्ठिराची सेना अर्थात कटक येथे वास्तव्यास असल्याने याला कठहारा असेही म्हणतात.येथील चंद्रिका देवी मंदिरात एक विशाल यज्ञकुंड, देवीचा दरबार, बर्बरिक दरवाजा, सुधन्वा कुंड, महिसागर तीर्थ अशी अनेक पवित्र स्थळे आहेत. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक स्वर्गीय अमृतलाल नागर यांनी आपल्या 'करवट' या पुस्तकात चंद्रिका देवीचा महिमा वर्णन केला आहे. या पुस्तकाच्या कथेतील नायक बंसीधर हा नियमित चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी येत असे असा त्याचा उल्लेख आहे.

परशुरामाचे जन्मस्थळ-जलालाबाद

उत्तरप्रदेशातील शाहजहानपूरपासून तीस किलोमीटरवर असलेल्या जलालाबाद येथे भगवान परशुरामाचे जन्मस्थळ आहे। हजारो वर्षापासून परशुरामपुरी’ म्हणूनच ते ख्यातनाम आहे. मुगल काळात रोहिल्यांचा सरदार नजीब खॉं याचा मुलगा रहमत खॉंच्या धाकट्या मुलाच्या (जलालुद्दीन) नावावरून जलालाबाद असे नाव ठेवले होते. मात्र अजूनही अनेक ठिकाणी परशुरामपुरी असेच लिहिलेले आढळते. परशुरामांचा जन्म येथेचे झाला होता, असा येथील लोकांचा ठाम विश्वास आहे. त्रेतायुगात हे ठिकाण कान्यकुंज राज्यात होते. इतिहास काळात रोहिला सरदार नजीब खॉंचा मुलगा हाफिज खॉं याने या भागात एक किल्ला बांधला होता. याच किल्ल्याच्या ठिकाणी सध्या तहसील कार्यालयाची इमारत आहे. हाफीज खॉंने धाकटा मुलगा जलालुद्दीनचा विवाह येथील अफगाणी कबिल्यात केला होता. त्यांनी हा भाग आपल्या मुलीला हुंड्याच्या स्वरूपात दिला होता. तेव्हापासून नगरीचे नाव परशुरामपुरी बदलून जलालाबाद असे ठेवले होते.
येथे भगवान परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे। मंदिराच्या गाभार्‍यात शिवलिंग आहे. समोरच भगवान परशुरामाची प्राचीन मूर्ती आहे. परशुरामाने येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यानंतर भाविकांनी या मंदिराचे बांधकाम केले होते, असे मानले जाते. मंदिर 30 फूट उंचीवर बांधण्यात आले असून मंदिराची उंची हे प्राचीनतेचे उदाहरण आहे. अनेक वेळा हे मंदिर तोडण्यात आले आणि भक्तांनी पु्न्हा या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धारावेळी ढिगार्‍याखाली परशुरामाशी संबंधित अनेक वस्तू सापडल्या.
एकदा मंदिराच्या ढिगार्‍याखाली आठ फूट उंच आणि अडीच फूट रूंदीचा परशू सापडला होता. तो आजही मंदिराच्या उजव्या बाजूला आहे. सत्ययुगाच्या शेवटी परशुरामाने अवतार घेतला होता असे मानण्यात येते. रोहिणी नक्षत्रात परशुराम याच भागात जन्मले होते. त्यांचे वडील मदग्नी यांचा जन्म येथेच झाला होता असे सांगितले जाते. परशुरामाची आई रेणुका दक्षिण देशाची राजकुमारी होती.