Sunday, January 25, 2009

कृष्णाकाठचे औंदुंबर


श्रीनरसिंह सरस्वतींच्या चातुर्मास-निवासामुळे हे क्षेत्र निर्माण झाले आहे। पुण्याहून हुबळीकडे जाणार्‍या दक्षिण लोहमार्गावर किर्लोस्कर वाडीच्या पलीकडे भिलवडी स्टेशनपासून चार मैलांवर कृष्णेच्या काठी हे ठिकाण आहे. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे आणि पैलतीरावर औदुंबर आहे. भिलवडीजवळ भुवनेश्वरीचे प्राचीन शक्तिपीठ आहे. त्यामुळे या स्थानी तपस्वी जनांची वर्दळ नेहमी असे. कृष्णेच्या तीरावरील वृक्षांच्या दाटीमुळे येथे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झालेले होते. त्यामुळें या निसर्गसिद्ध तपोवनांत, औंदुंबरांच्या दाट शीतल छायेंत शके 1344 च्या सुमारास श्रीनरसिंह सरस्वतींनी चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिलें. येथील कृष्णेचा घाट प्रशांत आणि प्रशस्त आहे. या घाटावरच दत्तपादुकांचें मंदिर आहे. ज्या घाटावर दत्त पादुकामंदिर आहे, तो घाट येथील ब्रह्मानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी बांधविला आहे.

पावसाळ्यांत श्रींच्या पादुका कृष्णेच्या महापुरांत बुडून जातात आणि त्यामुळें नित्योपासना व दर्शन अशक्य होऊन बसते. ही अडचण दूर करण्यासाठीं सन.1926 मध्ये उंच जागीं एक देवघर बांधले आहे. पावसाळ्यांत देव तेथे नेतात आणि तेथेच पूजा-अर्चा होते. श्रेत्रांतील नित्यनैमित्तिक उपासनेसाठी अनेक सरदार-संस्‍थानिकांकडून दाने व इनामे मिळाली आहेत. मंदिराच्या परिसरांत औदुंबर वृक्षांची घनदाट छाया आहे. आकाशांत सूर्य तळपत असतांना भूमीवर छाया-प्रकाशाची रांगोळी तळपत राहते. या क्षेत्रांत ब्रह्मानंदस्वामींचा मठ आहे. हे सत्यपुरुष 1826 च्या सुमारास गिरनारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. येथील शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणांत त्यांच्या तपाला सिद्धीचें यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. कोल्हापूरच्या मंदबुद्धी ब्राह्मणाला श्रीगुरूंनी ज्ञानदान केल्याची गुरुचरित्रांतील कथा याच स्थानांत घडलेली आहे.

श्रीगुरूंची नरसोबाची वाडी


मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर या पहिल्याच स्टेशनवर उतरून आठ मैलावर कृष्णा-पंचगंगा-संगमावर हे ठिकाण लागते। वाडी हे नावाप्रमाणेच एक खेडेगाव आहे. सर्व वस्ती कृष्णेच्या काठावर एकवटली आहे. कृष्णेच्या घाटावरच दत्त पादुका मंदिर आहे. वाडीचा कृष्णाघाट प्रशस्त आहे. श्रीनरसिंह सरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून इथे आले आणि बारा वर्षें इथे राहून पुढे गाणगापूरला गेले. श्रीगुरुंच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या तीरावरील भूमीला आवेगाने मिठी देण्याची तिलाही जणू ओढ असावी. पादुकांच्या समोरून कृष्णा वाहत चालली आहे आणि जवळूनच उजव्या बाजूने पंचगंगा धावत आली आहे. दत्त दर्शनाचा आनंद पंचगंगेच्या हृदयी रिचवण्याची जणू कृष्णेला घाई झाली आहे आणि जवळच, एक फर्लाग अंतरावर, तिनें पंचगंगेशी मिळणी साधली आहे.

इथे बारा वर्षे राहून, अनेक दीनदलितांच्या जीवनांत समाधानाचे नि सुखाचे मळे फुलवून, अनेकांची संकटें दूर सारून ते पुढें गाणगापूरला गेले। कृष्णेच्या पैलतीरावर औरवाड आणि गौरवाड या नांवाची दोन गांवे आहेत. ही गांवे विजापूरच्या आदिलशहाने वाडीच्या दत्तपूजेसाठी इनाम दिलेली होती. यांपैकी औरवाड म्हणजेच गुरुचरित्रांतील अमरापूर. या अमरापुरांत अमरेश्वर नांवाचे शिवस्थान आहे. या अमरापुराचा आणि त्याच्या कृष्णापंचगंगा-संगमाचा महिमा गुरुचरित्रांत असा वर्णिला आहे :

पंचगंगा नदीतार। प्रख्यात असे पुराणांतर।

पांच नामें आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें।।

शिवा भद्रा भोगावती । कुंभी नदी सरस्वती।

पंचगंगा ऐसी ख्याति । महापातक संहारी।।

ऐसी प्रख्यात पंचगंगा। आली कृष्णेचिया संगा।

प्रायगाहूनि असे चांगा। संगमस्थान मनोहर।।

अमरापुर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम।

जैसा प्रयाग संगम। तैसें स्थान मनोहर।।

वृक्ष असे औदुंबरु । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु।

देव असे अमरेश्वरु । तया संगमा षट्‍कूळीं ।।

नदीच्या बाजूने घाटाच्या पहिल्या टप्प्यावरच लहानसे दत्त पादुकामंदिर आहे। या पादुकांना 'मनोहर पादुका' अशी संज्ञा आहे. मंदिराच्या मागे औदुंबराचा पार आहे. दुपारी बारा वाजता या मनोहर पादुकांची महापूजा होते. महापूजेच्या वेळी पुजारी पादुकांवर लोटीभर दूध ओततात आणि त्यानंतर त्या अमृताच्या अभिषेकानें मनोहर पादुका दर्शनेच्छूंच्या डोळ्यात भरतात.घाटाच्या अखेरच्या टप्प्यावर श्रीवासुदेवानंद सरस्वतींचें स्मृतिमंदिर आहे. वाडीचें दत्तस्थान हेंच वासुदेवानंदाचें प्रेरणास्थान होय. त्यांच्या स्मृतिमंदिरामागें श्रीगुरूंशीं समकालीन असलेले श्रीरामचंद्रयोगी यांचें स्मृतिस्थान आहे आणि उजव्या हाताला ओळीने नारायणस्वामी, काशीकरस्वामी, गोपाळस्वामी, मौनीस्वामी या तपोनिधींची स्मारकें आहेत. त्यांच्या तपानें आणि चिरविश्रांतीनें कृष्णाकांठ पुनीत झाला आहे. मुक्तेश्वरानें भावार्थ रामायणाचें उत्तरकांड याच पवित्र स्थानीं रचले.

Monday, January 12, 2009

इंदूरचे श्रीदत्त मंदीर


श्री गुरूदत्ताला ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तीन रूपात मानले जाते। दत्तामध्ये गुरू आणि ईश्वर या दोन रूपांचा समावेश असल्यामुळे त्यांना श्रीगुरूदेवदत्त म्हणूनही ओळखले जाते. दत्तात्रयाचे हे मंदिर सुमारे 700 वर्ष जुने असून कृष्णपुराच्या ऐतिहासिक छत्रीजवळ आहे. इंदुर शहर होळकर राजघराण्यांची राजधानी आहे. होळकर राजघराण्याचे संस्थापक सुबेदार मल्हारराव होळकर यांच्या आगमनापूर्वीच अनेक वर्षापासून येथे दत्त मंदिर आहे. जगतगुरू शंकराचार्यांसह अनेक साधू-संत पुण्यनगरी अवंतिकाला (सध्याचे उज्जैन) जाताना आपल्या आखाड्यांसह या मंदिर परिसरात मुक्काम करत असत. श्री गुरूनानकजी मध्यप्रदेशाच्या दौर्‍यावर होते. तेव्हा ते इमली साहब नावाच्या पवित्र ठिकाणी तीन महिन्यापर्यंत मुक्कामास होते. दरम्यान, दररोज नदीच्या या संगमावर येत असल्यामुळे मंदिर परिसरातील साधू-संतांबरोबर त्यांची धर्माबाबत चर्चा होत असे.

भगवान दत्ताची निर्मिती हा भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील अद्भूत चमत्कार आहे। भक्ताद्वारे अचानक मदत करणार्‍या शक्तीला दत्ताच्या रूपात मानले जाते. तसेच, मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. गुरूदेवाने भक्तांच्या प्रार्थनेत गुरूचरित्र पाठाला विशेष महत्त्व दिले आहे. गुरूचरित्राच्या एकूण 52 अध्यायात 7491 ओळी आहेत. काही लोक वर्षातून एकदा, तर काही जण एक दिवस किंवा तीन दिवस गुरू चरित्राचे वाचन करतात. मात्र, अधिकांश लोक दत्त जयंत्तीनिमित्त मार्गशीर्ष शुद्ध 7 पासून मार्गशीर्ष 14 पर्यंत वाचन पूर्ण करतात. त्यांचे भक्त 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या महामंत्राचा जप करत भक्तीत मग्न असतात. दत्तमूर्तीबरोबर नेहमी एक गाय किंवा त्यांच्यापुढील चार श्‍वान दिसतात. पुराणानुसार भगवान दत्ताने पृथ्वी आणि चार वेदांच्या संरक्षणासाठी‍ अवतार घेतला होता. त्यामध्ये गाय आणि चार श्‍वान हे वेदाचे प्रतिक होते. औदुंबराच्‍या वृक्षांखालीही दत्ताचा वास असल्याचे मानले जाते. म्हणूनच प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी आपल्याला औदुंबराचे झाड दिसून येते. शैव, वैष्णव आणि शाक्त या तीनही संप्रदायाला एकजूट करणा-या श्रीदत्तांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभर पसरलेला आहे. गुरूदेव दत्तात्रय यांच्यामध्ये नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायांची अगाध श्रद्धा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दत्त संप्रदायातील हिंदूबरोबर मुसलमानांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

कसे पोहचाल-

हवाईमार्ग: - इंदूरला मध्यप्रदेशाची व्यावसायिक राजधानी असे मानले जाते। येथे अहिल्याबाई होळकर नावाचे विमानतळ आहे.

रेल्वे मार्ग:- इंदुर जंक्शन असल्यामुळे कोठूनही येथे रेल्वेने पोहचणे सहज सोपे आहे।

रस्ता मार्ग:- इंदुरमधून देशातील सर्वात प्रमुख महामार्ग (आग्रा-मुंबई) जात आहे. देशातील कोणत्याही कानाकोपर्‍यात रस्ता मार्गाने सहजपणे पोहचल्यानंतर रिक्षाने भगवान दत्त मंदिरापर्यंत सहज पोचता येते.

Tuesday, January 6, 2009

डोळे दिपवून टाकणारे 'भेडाघाट'


मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वताच्या अंगाखांद्यावरून हिंदोळे घेत नर्मदा नदी प्रवास करत आहे. नर्मदेवर असलेल्या घाटामध्ये 'भेडाघाट' त्याच्या अद्वितीय लावण्यामुळे डोळे दिपवून टाकतो. चहुबाजुंनी उभे असलेले पांढरे शुभ्र डोंगर आणि नर्मदेचा शांत निळा प्रवाह आजही पर्यटकांना खुणावतो आहे.सरत्या हिवाळ्यात नर्मदा उत्सव साजरा केला जातो तर उन्हाळ्याच्या प्रारंभी येणार्‍या पोर्णिमेला धमाल असते. त्यावेळी तर भेडाघाटवर मुंगीला देखील 'एन्ट्री' मिळत नाही इतकी गर्दी असते. नर्मदा नदी अमरकंटक येथून धावत येते आणि या ठिकाणी जवळपास 50 ते 60 फुटांवरून उडी घेते. येथे निर्माण झालेला दुधाळ धबधबा पर्यटकांचा प्रवासातील शीण क्षणात नाहीसा करतो. उंचावरून उडी घेऊन दम भरलेली नर्मदा पंचवटी येथे पुन्हा शांत होते. तेथील संगमरवरी अलौंकिक सौंदर्य पर्यटकांना दाखविण्यासाठी जुन्या बनावटीच्या होड्या सज्ज असतात. मात्र, नाविक पर्यटकांना होडीत बसवून प्रत्येक ठिकाणाची वैशिष्टयपूर्ण अशी माहिती देतात.
गिर्यारोहकांसाठी तर अदभूत सौंदर्याचा नजारा निसर्गाने येथे पेश केला आहे। अलिकडच्या काळात भेडाघाटचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याने तेथील उंच उंच पर्वतरांगा 'रोप वे' ने जोडण्यात आल्या आहेत. भेडाघाड परिसरात अनेक देवीदेवतांची मंदिरे आहेत. ही सगळी मंदिरे प्रा‍चीन असून मंदिरातील मूर्ती संगमरवरी आहेत. येथे प्राचीन चौसष्ठ योगिनी मंदिर गोलाकार असून प्राकृतिक सौंदर्याने नटलेले आहे. मातेचे दर्शन घेण्यासाठी कमरेत वाकून जावे लागते. मंदिर परिसरात असलेल्या पहाडावर प्राचीन कोरलेल्या मुर्ती आहेत तर भलीमोठी शंकराची पिंड आहे.

कसे पोहोचाल-

हवाई मार्ग-

'भेडाघाट' पासून जबलपूर विमानतळ सगळ्यात जवळचे आहे। भोपाळ व दिल्ली येथे जाण्यासाठी येथून नियमित सेवा सुरु आहे.

रेल्वे मार्ग-

व्हाया इलाहबाद मुंबई-हावडा मुख्य रेल्वे मार्गावर जबलपूर हे मोठे रेल्वे स्थानक आहे। सर्व एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांना येथे थांबा आहे.

महामार्ग-

भेडाघाट हे जबलपूरपासून अवघ्या 23 किलोमीटरवर आहे. जबलपूरहून बस व खाजगी वाहन भेडाघाटला जाण्यासाठी सहज मिळतात.

निसर्गांनं नटलेलं केरळ


केरळचे समुद्रकिनारे -

केरळमध्ये चुआरा बीच, बेकल बीच, कोवलम बीच, मरूदेश्वर बीच, वर्कला बीच, शांघमुघम आदीं बीच आहेत।

कोवलम बीच -

हा केरळमधील आकर्षक समुद्रकिना-यांपैकी एक आहे। मालाबार या छोट्याशा गावात हा बीच आहे. अर्धचंद्राकर आकारामुळे हा बीच अधिकच आकर्षित वाटतो. याची दक्षिण बाजू 'लाइट हाउस' या नावाने प्रसिद्ध आहे. कोवलम बीचवर आपल्याला आपल्या बजेटमध्ये रहाण्याची सोय होऊ शकते. समुद्रकिना-यावरील नारळआणि ताडाची झाडे सायंकाळ आठवणीतील बनवतात. हा बीच योग आणि स्वास्थ्य केंद्र म्हणूनही परीचित आहे. आयुर्वेदिक तेल मालिश व एरोमा बॉथची सोय याठिकाणी आहे.

वर्कला पापानासम बीच -

याठिकाणी पर्यटकांची संख्या कमी असते। येथे सूर्यास्तावेळचे दृश्य मनमोहक दिसते. येथून केवळ 42 किमीवर तिरुअनंतपुरम आहे. येथील जर्नादन व अय्यपा मंदिरात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

केरळ नॅशनलपार्क -

निसर्गसौदर्यांने नटलेले आणि केरळमधील वन्यप्राणी पाहण्यासाठी नॅशनलपार्क पाहण्याजोगा आहे। हिरव्यागार जंगलामध्ये आपल्याला अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन होते. काही दुर्मिळ प्राणीही याठिकाणी आहेत. केरळमध्ये इर्रावीकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, साईलेन्ट वॅली नॅशनल पार्क असेही पार्क आहेत.

इर्रावीकुलम नॅशनल पार्क -

'नीलगाय तराह' च्या संरक्षणासाठी या नॅशनल पार्कची स्थापना करण्यात आली आहे। हा केरळ आणि तमिळनाडूच्या सीमेवर आहे. हिमालयाच्या थंड वातावरणात रहाणारा नीलगाय हा दुर्मिळ प्राणी आहे. फुलापानांनी बहरलेल्या या पार्कला 1978 मध्ये नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला आहे.

पेरियार नॅशनल पार्क -

हा पाकँ पश्चिमेला आहे। वाघाच्या संरक्षणासाठी याची निर्मिती करण्यात आली. आता हा पार्क जगभरात प्रसिध्द आहे. 1895 मध्ये इंग्रजांनी या पार्कची सुरूवात केली. त्यावेळी यांठिकाणी कृत्रिम तलाव आणि बांध बांधण्यात आला होता.

साईलेन्ट व्हॅली नॅशनल पार्क -

कुंडलई टेकडीवर हा पार्क आहे। औषधी आणि झाडांच्या दुर्मिळ जाती याठिकाणी मिळतात. वाघ, सिंह, माकड असे प्राणी याठिकाणी आहेत. हा पार्क लहान आहे पण, नदी, डोंकर असे प्राण्यांसाठी अनुकूल वातावरण आहे.

वयनाड वाइल्ड लाईफ सेन्च्युरी -

ही सेन्च्युरी वाघ आणि बिबट्यांसाठी प्रसिध्द आहे। बॉदीपुर नॅशनल पार्कचाच हा एक भाग आहे.

केरळमध्ये पाहण्याजोगे -

मुन्नार, इड्डुकी, लक्कडी, मंगलम बांध, पेरीमेड, देवीकुलम आदीं हिल्सस्टेशन। बोलघट्टी पॅलेस, कोईक्कल पॅलेस, कृष्णापुरम महाल, कुथिरामलिका, द चित्रा आर्ट गॅलेरी, सेंट फ्रांन्सिस चर्च, टाउन हॉल आदीं केरळमधील प्रमुख स्मारक आहेत.

केरळमध्ये कधी जाल -

सप्टेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत याठिकाणचे हवामान उत्तम असते. यावेळी केरळमध्ये हजारो पर्यटक असतात. मात्र, पावसाळ्यात गर्दी कमी असते.