Sunday, February 1, 2009

श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान- कारंजे


श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेले हे गाव आज लाड कारंजे या नांवाने ओळखले जाते। शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले हे गाव वर्‍हाडांतील अकोला जिल्ह्यात आहे. हे स्थानच श्रीगुरुंचे जन्मस्थान होय, हे प्रथम श्रीवासुदेवानंद सरस्वतींनी प्रकट केले. येथील काळे उपनावाच्या घराण्यांत श्रीगुरूंनी जन्म घेतला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणीं आहेत.

श्रीगुरूंचें जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारें साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्याचे मुनीम श्री। घुडे यांना विकला गेला. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती श्रीब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ श्रीलीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र व. 1, श. 1856 या दिवशी श्रीगुरूंच्या पादुकांची स्थपना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. श्रीलीलादत्तांच्या निष्ठेने आरि कर्तृत्वानें प्रसिद्धीस आलेले हे स्थान आज हजारों दत्तोपासकांच्या नित्य-नैमित्तिक गर्दीने गाजते-जागते बनलें आहे.

या स्थानाचें प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्रीकरंजमाहात्म्य' नांवाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचें नाव वशिष्ठ ऋषीचे शिष्य करंजमुनी यांच्याशी निगडित आहे. कारंजे येथें जैनांचे हस्तलिखित ग्रंथांचें मोठें भांडार आहे.

दत्तोपासनेचे प्राचीन स्थान- गिरनार


सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे। नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे.

गिरनारवर जैन मंदिर, एका पीराचा दर्गा, गोरखनाथ मंदिर, शिवमंदिर, दोन देवीचीं मंदिरें व दत्तमंदिर अशी मंदिरे आहेत। हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरु गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायर्‍या आहेत. दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायर्‍यांची चढ-उतार करावी लागते.

दत्तोपासनेच्या इतिहासांत गिरनारचा महिमा विशेष आहे। त्या तपोभूमीत दत्त दर्शनाचा घ्यास घेऊन तप आचरणारे अनेक ज्ञाताज्ञात महात्मे होऊन गेले. निरंजन रघुनाथ, किनाराम अघोरील नारायणमहाराज जालवणकर इत्यादी दत्तोपासकांना गिरनारवरच दत्तसाक्षात्कार झाला आहे. अनंतसुत विठ्ठलाने 'दत्तप्रबोधां' त गिरनारचें माहात्म्य असें वर्णिलेलें आहे :

एक शृंगावरी गोरक्षनाथ । दुसरे शृंगावरी हिंगळजादेवी असत ।

तिसरे शृंगावरी स्वयें अवधूत । विश्रांती घेत हिंडतां ।।

नवनाथ चौर्‍यांशी सिद्ध। येथें वसती गा प्रसिद्ध ।

दत्त अविनाश तूं स्वतां सिद्ध । अद्वय अभेद्य सर्वातीत।

हिंदु आणि मुसलमान । यांसाठीं रूपें दोन ।

दत्त दातार अभिमान । द्वयस्थान शोभविलें।।

दत्तोपासनेतील सर्वोच्च स्थान-गाणगापूर


हे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे। श्रीनरसिंह सरस्वती येथे वाडीहून आले आणि सुमारें तेवीस वर्षे येथें राहून येथूनच श्रीशैलाकडे त्यांनी गमन केले. त्यांच्या दोन तपाएवढ्या प्रदीर्घ सन्निध्यामुळे हे स्थान दत्तोपासनेच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावलें आहे. श्रीगुरु जेव्हां येथे आले, तेव्हा प्रथम ते संगमरावरच राहत. नंतर ते गांवांत बांधलेल्या मठात राहू लागले. या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुका आहेत.

वाडीच्या पादुकांना 'मनोहर पादुका' म्हणतात, तर तेथील पादुकांना 'निर्गुण पादुका' अशी संज्ञा आहे। जणू वाडी येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ति कळसास पोचली होती - 'मनोहर बनली होती, तर येथें ते देहातीत- गुणरुपातीत होऊन 'निर्गुण' स्वरूप पावले होते. गुरूवार हा इथला पालखीचा वार. नित्योपासना दररोज पहाटेपासूनच सुरू होते. येथील पादुकांना जलस्पर्श करीत नाहीत, केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. येथील 'निर्गुण पादुका' चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत 'उदक' सोडतात.

पादुका असलेला मठ गांवाच्या मध्यभागी आहे। मठाच्या पूर्वेस महादेवाचें स्थान आहे. दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव-पार्वती यांच्या मूर्ती ‍आहेत, पश्चिमेस अश्वत्थानचें झाड आहे. अश्वत्थाच्या पराभोंवती नागनाथ, मारुती यांची स्थाने व तुळशीवृंदावन आहे. मठांतील पादुकांच्या गाभार्‍याला द्वार नाही. दर्शनार्थ एक चांदीनें मढविलेला लहानसा झरोका आहे. या झरोक्यांतून दर्शनार्थींनी श्रीगुरूंच्या त्या चिरस्मरणीय 'निर्गुण पादुकां'चे दर्शन घ्यावयाचें असतें. अनेक साधकांना या पादुकांच्या ठायींच श्रीगुरूंचें दिव्य दर्शन झालें, असें सांगतात.

गावापासून एक मैल अंतरावर भीमा-अरमजा-संगम आहे। संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. संगमावरील संगमेश्वराच्या देवालयापुढें श्रीगुरूंची तपोभूती आहे. गाणगापूरच्या परिसरांत षट्‍कुलतीर्थ, नरसिंहतीर्थ, भागीरथीतीर्थ, पापविनाशीतीर्थ, कोटितीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथतीर्थ अशीं अष्टतीर्थे आहेत

गाणगापूरच्या उत्सव-संभारांत दत्तजयंती आरि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्व आहे. श्रीगुरूंचें सर्व जीवनकार्य गाणगापूर येथेंच घडलें आणि आपल्या दिव्योदात्त विभूतिमत्त्वाचें सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूंत संक्रमित केलें. त्याचमुळें गेली पांच शतकें हे स्थान दत्तोपासकांच्या हृदयांत असीम श्रद्धेचा विषय बनले आहे.