Sunday, February 1, 2009

दत्तोपासनेतील सर्वोच्च स्थान-गाणगापूर


हे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे। श्रीनरसिंह सरस्वती येथे वाडीहून आले आणि सुमारें तेवीस वर्षे येथें राहून येथूनच श्रीशैलाकडे त्यांनी गमन केले. त्यांच्या दोन तपाएवढ्या प्रदीर्घ सन्निध्यामुळे हे स्थान दत्तोपासनेच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावलें आहे. श्रीगुरु जेव्हां येथे आले, तेव्हा प्रथम ते संगमरावरच राहत. नंतर ते गांवांत बांधलेल्या मठात राहू लागले. या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुका आहेत.

वाडीच्या पादुकांना 'मनोहर पादुका' म्हणतात, तर तेथील पादुकांना 'निर्गुण पादुका' अशी संज्ञा आहे। जणू वाडी येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ति कळसास पोचली होती - 'मनोहर बनली होती, तर येथें ते देहातीत- गुणरुपातीत होऊन 'निर्गुण' स्वरूप पावले होते. गुरूवार हा इथला पालखीचा वार. नित्योपासना दररोज पहाटेपासूनच सुरू होते. येथील पादुकांना जलस्पर्श करीत नाहीत, केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. येथील 'निर्गुण पादुका' चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत 'उदक' सोडतात.

पादुका असलेला मठ गांवाच्या मध्यभागी आहे। मठाच्या पूर्वेस महादेवाचें स्थान आहे. दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव-पार्वती यांच्या मूर्ती ‍आहेत, पश्चिमेस अश्वत्थानचें झाड आहे. अश्वत्थाच्या पराभोंवती नागनाथ, मारुती यांची स्थाने व तुळशीवृंदावन आहे. मठांतील पादुकांच्या गाभार्‍याला द्वार नाही. दर्शनार्थ एक चांदीनें मढविलेला लहानसा झरोका आहे. या झरोक्यांतून दर्शनार्थींनी श्रीगुरूंच्या त्या चिरस्मरणीय 'निर्गुण पादुकां'चे दर्शन घ्यावयाचें असतें. अनेक साधकांना या पादुकांच्या ठायींच श्रीगुरूंचें दिव्य दर्शन झालें, असें सांगतात.

गावापासून एक मैल अंतरावर भीमा-अरमजा-संगम आहे। संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. संगमावरील संगमेश्वराच्या देवालयापुढें श्रीगुरूंची तपोभूती आहे. गाणगापूरच्या परिसरांत षट्‍कुलतीर्थ, नरसिंहतीर्थ, भागीरथीतीर्थ, पापविनाशीतीर्थ, कोटितीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथतीर्थ अशीं अष्टतीर्थे आहेत

गाणगापूरच्या उत्सव-संभारांत दत्तजयंती आरि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्व आहे. श्रीगुरूंचें सर्व जीवनकार्य गाणगापूर येथेंच घडलें आणि आपल्या दिव्योदात्त विभूतिमत्त्वाचें सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूंत संक्रमित केलें. त्याचमुळें गेली पांच शतकें हे स्थान दत्तोपासकांच्या हृदयांत असीम श्रद्धेचा विषय बनले आहे.

1 comment:

Anonymous said...

The Information given is very usful for us. First time I saw this type of information about Shree Dattaguru, Gangapur on Net. Thanks you very much.
Regards.
Anagha Supekar.