Friday, March 20, 2009

तिकोना


तिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। पवना धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० फुट उंच आहे। तुंग किल्ला ३-४ कि.मी अंतरावर दिसतो.किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले।

इतिहास-

इ.स.१५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. नेताजी पालकर कडे काही दिवस किल्ल्याची जबाबदारी होती।

गडावरील ठिकाणे-

गडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळी व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात। बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे. वरच्या बाजुस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा-

तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरुन थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात.
मार्ग
पुणे - कोळवण बस घेउन गडाच्या पायथ्या्च्या थोडे जवळ जाता येते किंवा कामशेतहून
काळे कॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते.

कोरीगड


कोरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फुट उंच आहे. गडाला चहूबाजुंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजाची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान,मोरगड,राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो।

इतिहास-

११ मार्च १८१८ रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली। तीन दिवस लढुन यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेले दारुकोठार व गडावरील प्राणहानी मुळे शरणागती पत्करली.

गडावरील ठिकाणे-

कोराई देवीचे मंदिर -

गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुजी, शस्त्रसज्ज आहे. देवीची मूर्ति दीड मीटर ऊंच आहे.
गडावरील एकुण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे।

गणेश टाके -

गडावर दोन मोठी तळी आहेत। गडाच्या पश्चिम कडयाच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात.

गडावर जाण्याच्या वाटा-

गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पुर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघई गुहा व श्री गणेशाची मुर्ती आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात.
लोण्यावळ्या पासून २५ कि. मी. वर शहापुरला खाजगी वाहनाने जाता येते.

तोरणा


तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. शिवाजी महाराजांनी घेतलेल्या पहिल्या काही किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रिच्या रांगेतून दोन पदर निघुन पुर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत तर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात।

इतिहास-

शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा होय. गडावर तोरणा जातीची भरपुर झाडी असल्याने गडाचे नांव तोरणा पडले. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव 'प्रचंडगड' असे ठेवले.
पुण्याच्या नैऋत्येस पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पुर्व रेखांशावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस वेळवंडी नदी तर उत्तरेस कानद नदिचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेस कानद खिंड तर पुर्वेस बामण व खरीव खिंडी आहेत.
हा किल्ला कधी व कोणी बांधला याचा पुरावा उपलब्ध नाही। येथील लेण्यांच्या व मंदिरांच्या अवशेशावरुन हा शैवपंथांचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीत मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहित गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व त्याचे नांव प्रचंडगड असे ठेवले.

स्वारगेट बसस्थानकावरुन जाणार्‍या रा.प. मंडळाच्या गाड्या किंवा खाजगी वाहन. गडावर जाणारी वाटः कठीण - राजगड - तोरणा मार्गे.

Tuesday, March 17, 2009

अवचितगड


अवचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजुला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो। महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेला पिंगळसई गावापासून गडाची उंची ३०० मी. भरते. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजुंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा होता.

गडावरील ठिकाणे-

गडावर पाहण्यासारखे काही नाही. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दुसर्‍या दरवाज्यात पाण्याने भरलेला तलाव आहे. कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मुर्ती आहे। पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते। इथल्या रानात रानडुकरे, माकड, बिबळ्या, कोल्हे, इ। प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती,सुधागड, सरसगड, धनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इ। परिसर न्याहळता येतो.

गडावर जाण्याच्या वाटा-

पिंगळसई मार्गः अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी / पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथुन दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर अंदाजे ५ कि.मी. आहे. येथुन गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते.
वेळः पिंगळसई मार्गे १ तास. [पडम मार्गे २ तास]

जीवधन


जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.घाटघरच्या परिसरात असलेला हा पुर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता। नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय!

इतिहास-

शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणार्‍या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय. १७ जुन १६६३ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवुन संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणुन घोषित केले व स्वतः वजीर बनले.गडाचा दरवाजा हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे।

गडावरील ठिकाणे-

पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला "कोठी" म्हणतात. दक्षिण दिशेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. आसपास पाण्याची टाकी आहेत. गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धाता या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते.
आयताकार असणार्‍या या गडाच्या टोकाला सुमारे २००० फुट उंचीचा "वानरलिंगी" नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे।

गडावर जाण्याच्या वाटा-

१.कल्याण-अहमदनगर मार्गे नाणेघाट चढुन गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या उजव्या बाजुला जाणारी वाट व वानरलिंगी नजरेसमोर ठेऊन चालत रहावे. वाटेत दोन ओढे लागतात व त्यानंतर उभी कातळभिंत. या भिंतीला चिटकुन उजव्या हाताला असणारी वाट गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाते. इ.स. १८१८च्या युद्धात इंग्रजांनी ही वाट चिणुन काढली व पश्चिम दरवाजाची वाट बंद केली। वानरलिंगीची ही वाट नावाप्रमाणे वानरयुक्त्या करुनच पार करावी लागेते. ही वाट अवघड आहे, त्यामुळे जरा जपुनच चढावे.

२. जुन्नर - घाटघर मार्गे असणारी ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयिस्कर वाट असली तरी, एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायर्‍या पार कराव्या लागतात, त्यामुळे सोबत एखादा दोर जरुर ठेवावा.
राहण्याची सोयः नाही.
जेवणाची - पाण्याची सोयः जेवणाची स्वतःच करावी, पाण्याची बारमाही टाकी आहेत.
गडावर चढण्यासाठी लागणारा वेळः जुन्नर - घाटघर मार्गे - अंदाजे २ तास.

भुलेश्वर


भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे। हे ठीकाण महादेवांच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिध्द आहे. मुळतः हे ठीकाण "मंगलगड" असे होते. मंदिराचे बांधकाम १३व्या शतकातले असुन भिंतीवरील कोरीवकाम व मुर्तीकाम अद्वीतीय आहे. लढाईच्या काळात बर्‍याच मूर्त्याची तोडफ़ोड करण्यात आली. स्त्री रुपातील गणपतीची मुर्ती मी पहिल्यांदाच या मंदिरात पाहिली. गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पुजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरातत्रीला येथे खास गर्दी होते.

पुण्यापासून अंदाजे ५० कि।मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते.

Monday, March 16, 2009

आळंदी


महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधी स्थान आहे। संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. आळंदी हे "देवाची आळंदी" असे देखील ओळखले जाते.

आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे। संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे।

समाधी मंदिर अतिशय सुंदर आहे। हे मंदिर १५७० मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव भेटीस जाण्याकरता वापरलेली भिंत आपण येथे पाहू शकता।

आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाणारी ज्ञानेश्वरांची पालखी प्रसिद्ध आहे। या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे १५० किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात।

आळंदीतील इतर प्रेक्षणीय स्थळे -

मुक्ताई मंदिर

राम मंदिर

कृष्ण मंदिर

स्वामी हरिहरेंद्र मठ

विठ्ठल रखुमाई मंदिर

Sunday, February 1, 2009

श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान- कारंजे


श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेले हे गाव आज लाड कारंजे या नांवाने ओळखले जाते। शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले हे गाव वर्‍हाडांतील अकोला जिल्ह्यात आहे. हे स्थानच श्रीगुरुंचे जन्मस्थान होय, हे प्रथम श्रीवासुदेवानंद सरस्वतींनी प्रकट केले. येथील काळे उपनावाच्या घराण्यांत श्रीगुरूंनी जन्म घेतला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणीं आहेत.

श्रीगुरूंचें जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारें साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्याचे मुनीम श्री। घुडे यांना विकला गेला. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती श्रीब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ श्रीलीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र व. 1, श. 1856 या दिवशी श्रीगुरूंच्या पादुकांची स्थपना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. श्रीलीलादत्तांच्या निष्ठेने आरि कर्तृत्वानें प्रसिद्धीस आलेले हे स्थान आज हजारों दत्तोपासकांच्या नित्य-नैमित्तिक गर्दीने गाजते-जागते बनलें आहे.

या स्थानाचें प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्रीकरंजमाहात्म्य' नांवाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचें नाव वशिष्ठ ऋषीचे शिष्य करंजमुनी यांच्याशी निगडित आहे. कारंजे येथें जैनांचे हस्तलिखित ग्रंथांचें मोठें भांडार आहे.

दत्तोपासनेचे प्राचीन स्थान- गिरनार


सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे। नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे.

गिरनारवर जैन मंदिर, एका पीराचा दर्गा, गोरखनाथ मंदिर, शिवमंदिर, दोन देवीचीं मंदिरें व दत्तमंदिर अशी मंदिरे आहेत। हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरु गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायर्‍या आहेत. दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायर्‍यांची चढ-उतार करावी लागते.

दत्तोपासनेच्या इतिहासांत गिरनारचा महिमा विशेष आहे। त्या तपोभूमीत दत्त दर्शनाचा घ्यास घेऊन तप आचरणारे अनेक ज्ञाताज्ञात महात्मे होऊन गेले. निरंजन रघुनाथ, किनाराम अघोरील नारायणमहाराज जालवणकर इत्यादी दत्तोपासकांना गिरनारवरच दत्तसाक्षात्कार झाला आहे. अनंतसुत विठ्ठलाने 'दत्तप्रबोधां' त गिरनारचें माहात्म्य असें वर्णिलेलें आहे :

एक शृंगावरी गोरक्षनाथ । दुसरे शृंगावरी हिंगळजादेवी असत ।

तिसरे शृंगावरी स्वयें अवधूत । विश्रांती घेत हिंडतां ।।

नवनाथ चौर्‍यांशी सिद्ध। येथें वसती गा प्रसिद्ध ।

दत्त अविनाश तूं स्वतां सिद्ध । अद्वय अभेद्य सर्वातीत।

हिंदु आणि मुसलमान । यांसाठीं रूपें दोन ।

दत्त दातार अभिमान । द्वयस्थान शोभविलें।।

दत्तोपासनेतील सर्वोच्च स्थान-गाणगापूर


हे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे। श्रीनरसिंह सरस्वती येथे वाडीहून आले आणि सुमारें तेवीस वर्षे येथें राहून येथूनच श्रीशैलाकडे त्यांनी गमन केले. त्यांच्या दोन तपाएवढ्या प्रदीर्घ सन्निध्यामुळे हे स्थान दत्तोपासनेच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावलें आहे. श्रीगुरु जेव्हां येथे आले, तेव्हा प्रथम ते संगमरावरच राहत. नंतर ते गांवांत बांधलेल्या मठात राहू लागले. या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुका आहेत.

वाडीच्या पादुकांना 'मनोहर पादुका' म्हणतात, तर तेथील पादुकांना 'निर्गुण पादुका' अशी संज्ञा आहे। जणू वाडी येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ति कळसास पोचली होती - 'मनोहर बनली होती, तर येथें ते देहातीत- गुणरुपातीत होऊन 'निर्गुण' स्वरूप पावले होते. गुरूवार हा इथला पालखीचा वार. नित्योपासना दररोज पहाटेपासूनच सुरू होते. येथील पादुकांना जलस्पर्श करीत नाहीत, केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. येथील 'निर्गुण पादुका' चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत 'उदक' सोडतात.

पादुका असलेला मठ गांवाच्या मध्यभागी आहे। मठाच्या पूर्वेस महादेवाचें स्थान आहे. दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव-पार्वती यांच्या मूर्ती ‍आहेत, पश्चिमेस अश्वत्थानचें झाड आहे. अश्वत्थाच्या पराभोंवती नागनाथ, मारुती यांची स्थाने व तुळशीवृंदावन आहे. मठांतील पादुकांच्या गाभार्‍याला द्वार नाही. दर्शनार्थ एक चांदीनें मढविलेला लहानसा झरोका आहे. या झरोक्यांतून दर्शनार्थींनी श्रीगुरूंच्या त्या चिरस्मरणीय 'निर्गुण पादुकां'चे दर्शन घ्यावयाचें असतें. अनेक साधकांना या पादुकांच्या ठायींच श्रीगुरूंचें दिव्य दर्शन झालें, असें सांगतात.

गावापासून एक मैल अंतरावर भीमा-अरमजा-संगम आहे। संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. संगमावरील संगमेश्वराच्या देवालयापुढें श्रीगुरूंची तपोभूती आहे. गाणगापूरच्या परिसरांत षट्‍कुलतीर्थ, नरसिंहतीर्थ, भागीरथीतीर्थ, पापविनाशीतीर्थ, कोटितीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथतीर्थ अशीं अष्टतीर्थे आहेत

गाणगापूरच्या उत्सव-संभारांत दत्तजयंती आरि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्व आहे. श्रीगुरूंचें सर्व जीवनकार्य गाणगापूर येथेंच घडलें आणि आपल्या दिव्योदात्त विभूतिमत्त्वाचें सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूंत संक्रमित केलें. त्याचमुळें गेली पांच शतकें हे स्थान दत्तोपासकांच्या हृदयांत असीम श्रद्धेचा विषय बनले आहे.

Sunday, January 25, 2009

कृष्णाकाठचे औंदुंबर


श्रीनरसिंह सरस्वतींच्या चातुर्मास-निवासामुळे हे क्षेत्र निर्माण झाले आहे। पुण्याहून हुबळीकडे जाणार्‍या दक्षिण लोहमार्गावर किर्लोस्कर वाडीच्या पलीकडे भिलवडी स्टेशनपासून चार मैलांवर कृष्णेच्या काठी हे ठिकाण आहे. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे आणि पैलतीरावर औदुंबर आहे. भिलवडीजवळ भुवनेश्वरीचे प्राचीन शक्तिपीठ आहे. त्यामुळे या स्थानी तपस्वी जनांची वर्दळ नेहमी असे. कृष्णेच्या तीरावरील वृक्षांच्या दाटीमुळे येथे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झालेले होते. त्यामुळें या निसर्गसिद्ध तपोवनांत, औंदुंबरांच्या दाट शीतल छायेंत शके 1344 च्या सुमारास श्रीनरसिंह सरस्वतींनी चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिलें. येथील कृष्णेचा घाट प्रशांत आणि प्रशस्त आहे. या घाटावरच दत्तपादुकांचें मंदिर आहे. ज्या घाटावर दत्त पादुकामंदिर आहे, तो घाट येथील ब्रह्मानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी बांधविला आहे.

पावसाळ्यांत श्रींच्या पादुका कृष्णेच्या महापुरांत बुडून जातात आणि त्यामुळें नित्योपासना व दर्शन अशक्य होऊन बसते. ही अडचण दूर करण्यासाठीं सन.1926 मध्ये उंच जागीं एक देवघर बांधले आहे. पावसाळ्यांत देव तेथे नेतात आणि तेथेच पूजा-अर्चा होते. श्रेत्रांतील नित्यनैमित्तिक उपासनेसाठी अनेक सरदार-संस्‍थानिकांकडून दाने व इनामे मिळाली आहेत. मंदिराच्या परिसरांत औदुंबर वृक्षांची घनदाट छाया आहे. आकाशांत सूर्य तळपत असतांना भूमीवर छाया-प्रकाशाची रांगोळी तळपत राहते. या क्षेत्रांत ब्रह्मानंदस्वामींचा मठ आहे. हे सत्यपुरुष 1826 च्या सुमारास गिरनारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. येथील शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणांत त्यांच्या तपाला सिद्धीचें यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. कोल्हापूरच्या मंदबुद्धी ब्राह्मणाला श्रीगुरूंनी ज्ञानदान केल्याची गुरुचरित्रांतील कथा याच स्थानांत घडलेली आहे.

श्रीगुरूंची नरसोबाची वाडी


मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर या पहिल्याच स्टेशनवर उतरून आठ मैलावर कृष्णा-पंचगंगा-संगमावर हे ठिकाण लागते। वाडी हे नावाप्रमाणेच एक खेडेगाव आहे. सर्व वस्ती कृष्णेच्या काठावर एकवटली आहे. कृष्णेच्या घाटावरच दत्त पादुका मंदिर आहे. वाडीचा कृष्णाघाट प्रशस्त आहे. श्रीनरसिंह सरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून इथे आले आणि बारा वर्षें इथे राहून पुढे गाणगापूरला गेले. श्रीगुरुंच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या तीरावरील भूमीला आवेगाने मिठी देण्याची तिलाही जणू ओढ असावी. पादुकांच्या समोरून कृष्णा वाहत चालली आहे आणि जवळूनच उजव्या बाजूने पंचगंगा धावत आली आहे. दत्त दर्शनाचा आनंद पंचगंगेच्या हृदयी रिचवण्याची जणू कृष्णेला घाई झाली आहे आणि जवळच, एक फर्लाग अंतरावर, तिनें पंचगंगेशी मिळणी साधली आहे.

इथे बारा वर्षे राहून, अनेक दीनदलितांच्या जीवनांत समाधानाचे नि सुखाचे मळे फुलवून, अनेकांची संकटें दूर सारून ते पुढें गाणगापूरला गेले। कृष्णेच्या पैलतीरावर औरवाड आणि गौरवाड या नांवाची दोन गांवे आहेत. ही गांवे विजापूरच्या आदिलशहाने वाडीच्या दत्तपूजेसाठी इनाम दिलेली होती. यांपैकी औरवाड म्हणजेच गुरुचरित्रांतील अमरापूर. या अमरापुरांत अमरेश्वर नांवाचे शिवस्थान आहे. या अमरापुराचा आणि त्याच्या कृष्णापंचगंगा-संगमाचा महिमा गुरुचरित्रांत असा वर्णिला आहे :

पंचगंगा नदीतार। प्रख्यात असे पुराणांतर।

पांच नामें आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें।।

शिवा भद्रा भोगावती । कुंभी नदी सरस्वती।

पंचगंगा ऐसी ख्याति । महापातक संहारी।।

ऐसी प्रख्यात पंचगंगा। आली कृष्णेचिया संगा।

प्रायगाहूनि असे चांगा। संगमस्थान मनोहर।।

अमरापुर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम।

जैसा प्रयाग संगम। तैसें स्थान मनोहर।।

वृक्ष असे औदुंबरु । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु।

देव असे अमरेश्वरु । तया संगमा षट्‍कूळीं ।।

नदीच्या बाजूने घाटाच्या पहिल्या टप्प्यावरच लहानसे दत्त पादुकामंदिर आहे। या पादुकांना 'मनोहर पादुका' अशी संज्ञा आहे. मंदिराच्या मागे औदुंबराचा पार आहे. दुपारी बारा वाजता या मनोहर पादुकांची महापूजा होते. महापूजेच्या वेळी पुजारी पादुकांवर लोटीभर दूध ओततात आणि त्यानंतर त्या अमृताच्या अभिषेकानें मनोहर पादुका दर्शनेच्छूंच्या डोळ्यात भरतात.घाटाच्या अखेरच्या टप्प्यावर श्रीवासुदेवानंद सरस्वतींचें स्मृतिमंदिर आहे. वाडीचें दत्तस्थान हेंच वासुदेवानंदाचें प्रेरणास्थान होय. त्यांच्या स्मृतिमंदिरामागें श्रीगुरूंशीं समकालीन असलेले श्रीरामचंद्रयोगी यांचें स्मृतिस्थान आहे आणि उजव्या हाताला ओळीने नारायणस्वामी, काशीकरस्वामी, गोपाळस्वामी, मौनीस्वामी या तपोनिधींची स्मारकें आहेत. त्यांच्या तपानें आणि चिरविश्रांतीनें कृष्णाकांठ पुनीत झाला आहे. मुक्तेश्वरानें भावार्थ रामायणाचें उत्तरकांड याच पवित्र स्थानीं रचले.

Monday, January 12, 2009

इंदूरचे श्रीदत्त मंदीर


श्री गुरूदत्ताला ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तीन रूपात मानले जाते। दत्तामध्ये गुरू आणि ईश्वर या दोन रूपांचा समावेश असल्यामुळे त्यांना श्रीगुरूदेवदत्त म्हणूनही ओळखले जाते. दत्तात्रयाचे हे मंदिर सुमारे 700 वर्ष जुने असून कृष्णपुराच्या ऐतिहासिक छत्रीजवळ आहे. इंदुर शहर होळकर राजघराण्यांची राजधानी आहे. होळकर राजघराण्याचे संस्थापक सुबेदार मल्हारराव होळकर यांच्या आगमनापूर्वीच अनेक वर्षापासून येथे दत्त मंदिर आहे. जगतगुरू शंकराचार्यांसह अनेक साधू-संत पुण्यनगरी अवंतिकाला (सध्याचे उज्जैन) जाताना आपल्या आखाड्यांसह या मंदिर परिसरात मुक्काम करत असत. श्री गुरूनानकजी मध्यप्रदेशाच्या दौर्‍यावर होते. तेव्हा ते इमली साहब नावाच्या पवित्र ठिकाणी तीन महिन्यापर्यंत मुक्कामास होते. दरम्यान, दररोज नदीच्या या संगमावर येत असल्यामुळे मंदिर परिसरातील साधू-संतांबरोबर त्यांची धर्माबाबत चर्चा होत असे.

भगवान दत्ताची निर्मिती हा भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील अद्भूत चमत्कार आहे। भक्ताद्वारे अचानक मदत करणार्‍या शक्तीला दत्ताच्या रूपात मानले जाते. तसेच, मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. गुरूदेवाने भक्तांच्या प्रार्थनेत गुरूचरित्र पाठाला विशेष महत्त्व दिले आहे. गुरूचरित्राच्या एकूण 52 अध्यायात 7491 ओळी आहेत. काही लोक वर्षातून एकदा, तर काही जण एक दिवस किंवा तीन दिवस गुरू चरित्राचे वाचन करतात. मात्र, अधिकांश लोक दत्त जयंत्तीनिमित्त मार्गशीर्ष शुद्ध 7 पासून मार्गशीर्ष 14 पर्यंत वाचन पूर्ण करतात. त्यांचे भक्त 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या महामंत्राचा जप करत भक्तीत मग्न असतात. दत्तमूर्तीबरोबर नेहमी एक गाय किंवा त्यांच्यापुढील चार श्‍वान दिसतात. पुराणानुसार भगवान दत्ताने पृथ्वी आणि चार वेदांच्या संरक्षणासाठी‍ अवतार घेतला होता. त्यामध्ये गाय आणि चार श्‍वान हे वेदाचे प्रतिक होते. औदुंबराच्‍या वृक्षांखालीही दत्ताचा वास असल्याचे मानले जाते. म्हणूनच प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी आपल्याला औदुंबराचे झाड दिसून येते. शैव, वैष्णव आणि शाक्त या तीनही संप्रदायाला एकजूट करणा-या श्रीदत्तांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभर पसरलेला आहे. गुरूदेव दत्तात्रय यांच्यामध्ये नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायांची अगाध श्रद्धा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दत्त संप्रदायातील हिंदूबरोबर मुसलमानांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

कसे पोहचाल-

हवाईमार्ग: - इंदूरला मध्यप्रदेशाची व्यावसायिक राजधानी असे मानले जाते। येथे अहिल्याबाई होळकर नावाचे विमानतळ आहे.

रेल्वे मार्ग:- इंदुर जंक्शन असल्यामुळे कोठूनही येथे रेल्वेने पोहचणे सहज सोपे आहे।

रस्ता मार्ग:- इंदुरमधून देशातील सर्वात प्रमुख महामार्ग (आग्रा-मुंबई) जात आहे. देशातील कोणत्याही कानाकोपर्‍यात रस्ता मार्गाने सहजपणे पोहचल्यानंतर रिक्षाने भगवान दत्त मंदिरापर्यंत सहज पोचता येते.

Tuesday, January 6, 2009

डोळे दिपवून टाकणारे 'भेडाघाट'


मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वताच्या अंगाखांद्यावरून हिंदोळे घेत नर्मदा नदी प्रवास करत आहे. नर्मदेवर असलेल्या घाटामध्ये 'भेडाघाट' त्याच्या अद्वितीय लावण्यामुळे डोळे दिपवून टाकतो. चहुबाजुंनी उभे असलेले पांढरे शुभ्र डोंगर आणि नर्मदेचा शांत निळा प्रवाह आजही पर्यटकांना खुणावतो आहे.सरत्या हिवाळ्यात नर्मदा उत्सव साजरा केला जातो तर उन्हाळ्याच्या प्रारंभी येणार्‍या पोर्णिमेला धमाल असते. त्यावेळी तर भेडाघाटवर मुंगीला देखील 'एन्ट्री' मिळत नाही इतकी गर्दी असते. नर्मदा नदी अमरकंटक येथून धावत येते आणि या ठिकाणी जवळपास 50 ते 60 फुटांवरून उडी घेते. येथे निर्माण झालेला दुधाळ धबधबा पर्यटकांचा प्रवासातील शीण क्षणात नाहीसा करतो. उंचावरून उडी घेऊन दम भरलेली नर्मदा पंचवटी येथे पुन्हा शांत होते. तेथील संगमरवरी अलौंकिक सौंदर्य पर्यटकांना दाखविण्यासाठी जुन्या बनावटीच्या होड्या सज्ज असतात. मात्र, नाविक पर्यटकांना होडीत बसवून प्रत्येक ठिकाणाची वैशिष्टयपूर्ण अशी माहिती देतात.
गिर्यारोहकांसाठी तर अदभूत सौंदर्याचा नजारा निसर्गाने येथे पेश केला आहे। अलिकडच्या काळात भेडाघाटचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याने तेथील उंच उंच पर्वतरांगा 'रोप वे' ने जोडण्यात आल्या आहेत. भेडाघाड परिसरात अनेक देवीदेवतांची मंदिरे आहेत. ही सगळी मंदिरे प्रा‍चीन असून मंदिरातील मूर्ती संगमरवरी आहेत. येथे प्राचीन चौसष्ठ योगिनी मंदिर गोलाकार असून प्राकृतिक सौंदर्याने नटलेले आहे. मातेचे दर्शन घेण्यासाठी कमरेत वाकून जावे लागते. मंदिर परिसरात असलेल्या पहाडावर प्राचीन कोरलेल्या मुर्ती आहेत तर भलीमोठी शंकराची पिंड आहे.

कसे पोहोचाल-

हवाई मार्ग-

'भेडाघाट' पासून जबलपूर विमानतळ सगळ्यात जवळचे आहे। भोपाळ व दिल्ली येथे जाण्यासाठी येथून नियमित सेवा सुरु आहे.

रेल्वे मार्ग-

व्हाया इलाहबाद मुंबई-हावडा मुख्य रेल्वे मार्गावर जबलपूर हे मोठे रेल्वे स्थानक आहे। सर्व एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांना येथे थांबा आहे.

महामार्ग-

भेडाघाट हे जबलपूरपासून अवघ्या 23 किलोमीटरवर आहे. जबलपूरहून बस व खाजगी वाहन भेडाघाटला जाण्यासाठी सहज मिळतात.

निसर्गांनं नटलेलं केरळ


केरळचे समुद्रकिनारे -

केरळमध्ये चुआरा बीच, बेकल बीच, कोवलम बीच, मरूदेश्वर बीच, वर्कला बीच, शांघमुघम आदीं बीच आहेत।

कोवलम बीच -

हा केरळमधील आकर्षक समुद्रकिना-यांपैकी एक आहे। मालाबार या छोट्याशा गावात हा बीच आहे. अर्धचंद्राकर आकारामुळे हा बीच अधिकच आकर्षित वाटतो. याची दक्षिण बाजू 'लाइट हाउस' या नावाने प्रसिद्ध आहे. कोवलम बीचवर आपल्याला आपल्या बजेटमध्ये रहाण्याची सोय होऊ शकते. समुद्रकिना-यावरील नारळआणि ताडाची झाडे सायंकाळ आठवणीतील बनवतात. हा बीच योग आणि स्वास्थ्य केंद्र म्हणूनही परीचित आहे. आयुर्वेदिक तेल मालिश व एरोमा बॉथची सोय याठिकाणी आहे.

वर्कला पापानासम बीच -

याठिकाणी पर्यटकांची संख्या कमी असते। येथे सूर्यास्तावेळचे दृश्य मनमोहक दिसते. येथून केवळ 42 किमीवर तिरुअनंतपुरम आहे. येथील जर्नादन व अय्यपा मंदिरात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

केरळ नॅशनलपार्क -

निसर्गसौदर्यांने नटलेले आणि केरळमधील वन्यप्राणी पाहण्यासाठी नॅशनलपार्क पाहण्याजोगा आहे। हिरव्यागार जंगलामध्ये आपल्याला अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन होते. काही दुर्मिळ प्राणीही याठिकाणी आहेत. केरळमध्ये इर्रावीकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, साईलेन्ट वॅली नॅशनल पार्क असेही पार्क आहेत.

इर्रावीकुलम नॅशनल पार्क -

'नीलगाय तराह' च्या संरक्षणासाठी या नॅशनल पार्कची स्थापना करण्यात आली आहे। हा केरळ आणि तमिळनाडूच्या सीमेवर आहे. हिमालयाच्या थंड वातावरणात रहाणारा नीलगाय हा दुर्मिळ प्राणी आहे. फुलापानांनी बहरलेल्या या पार्कला 1978 मध्ये नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला आहे.

पेरियार नॅशनल पार्क -

हा पाकँ पश्चिमेला आहे। वाघाच्या संरक्षणासाठी याची निर्मिती करण्यात आली. आता हा पार्क जगभरात प्रसिध्द आहे. 1895 मध्ये इंग्रजांनी या पार्कची सुरूवात केली. त्यावेळी यांठिकाणी कृत्रिम तलाव आणि बांध बांधण्यात आला होता.

साईलेन्ट व्हॅली नॅशनल पार्क -

कुंडलई टेकडीवर हा पार्क आहे। औषधी आणि झाडांच्या दुर्मिळ जाती याठिकाणी मिळतात. वाघ, सिंह, माकड असे प्राणी याठिकाणी आहेत. हा पार्क लहान आहे पण, नदी, डोंकर असे प्राण्यांसाठी अनुकूल वातावरण आहे.

वयनाड वाइल्ड लाईफ सेन्च्युरी -

ही सेन्च्युरी वाघ आणि बिबट्यांसाठी प्रसिध्द आहे। बॉदीपुर नॅशनल पार्कचाच हा एक भाग आहे.

केरळमध्ये पाहण्याजोगे -

मुन्नार, इड्डुकी, लक्कडी, मंगलम बांध, पेरीमेड, देवीकुलम आदीं हिल्सस्टेशन। बोलघट्टी पॅलेस, कोईक्कल पॅलेस, कृष्णापुरम महाल, कुथिरामलिका, द चित्रा आर्ट गॅलेरी, सेंट फ्रांन्सिस चर्च, टाउन हॉल आदीं केरळमधील प्रमुख स्मारक आहेत.

केरळमध्ये कधी जाल -

सप्टेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत याठिकाणचे हवामान उत्तम असते. यावेळी केरळमध्ये हजारो पर्यटक असतात. मात्र, पावसाळ्यात गर्दी कमी असते.