Friday, November 28, 2008

दक्षिण काशी अर्थात श्रीकालहस्ती


आंध्र प्रदेशातील तिरूपती शहराजवळ श्रीकालहस्ती नावाचे गाव आहे। शिवभक्तांसाठी ते महत्त्वाचे आहे. पेन्नार नदीची शाखा असलेल्या स्वर्णमुखी नदीच्या तटावर वसलेले हे स्थान कालहस्ती या नावानेही ओळखले जाते. दक्षिण भारतातील शंकराच्या तीर्थस्थानांमध्ये या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. नदीच्या काठापासून पर्वताच्या पायथ्यापर्यंत पसरलेल्या या जागेला दक्षिण कैलास व दक्षिण काशी या नावानेसुद्धा ओळखले जाते. या मंदिराचे तीन विशाल गोपूर आणि शंभर स्तंभांचा मंडप म्हणजे स्थापत्याचे उत्तम उदाहरण आहे.

या स्थळाचे नाव तीन पशूंच्या नावांवर आधारीत आहे। 'श्री' म्हणजे माकडीण, 'काल' म्हणजे साप आणि 'हस्ती' म्हणजे हत्ती. या तिन्ही प्राण्यांनी शिवाची आराधना करून आपला उद्धार घडवून आणला होता. एका लोककथेनुसार, एका माकडीने शिवलिंगावर तपस्या केली होती. सापाने लिंगाभोवती वेटोळे घालून शिवाची आराधना केली होती आणि हत्तीने शिवलिंगावर अभिषेक केला होता. त्यांच्या या भक्तीमुळेच या स्थळाळा श्रीकालहस्ती असे नाव पडले. या प्राण्यांच्या मूर्ती येथे आहेत.

स्कंद पुराण, शिव पुराण आणि लिंग पुराणातही श्रीकालहस्तीचे उल्लेख आहेत। स्कंद पुराणानुसार एकदा या जागेवर अर्जुन आला होता. त्याने प्रभू कालाहस्तीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर पर्वतावर जाऊन भारद्वाज मुनींचे सुद्धा दर्शन घेतले होते. कणप्पा नावाच्या एका आदिवासीने येथे शिवाची आराधना केली होती, असाही एक उल्लेख आहे. हे मंदिर राहू काल पूजेसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे

अन्य आकर्षण - या क्षेत्राजवळ बरीच धार्मिक स्थळे आहेत। विश्वनाथ मंदिर, कणप्पा मंदिर, मणिकर्णिका मंदिर, सूर्यनारायण मंदिर, भारद्वाज तीर्थ, कृष्णदेव मंडप, श्री सुकब्रह्माश्रम, वैय्यालिंगाकोण, पर्वतावरील दुर्गम मंदिर आणि दक्षिण कालीचे मंदिर आदी प्रमुख मंदिरे आहेत.

कसे पोहोचाल? या स्थानापासून सर्वांत जवळचे विमानतळ तिरूपती आहे. ते येथून फक्त वीस किलोमीटरवर आहे. मद्रास-विजयवाडा रेल्वे लाइनवर हे स्थान आहे. त्यामुळे गुंटूर वा चेन्नईहून सुद्धा येथे जाता येते. विजयवाडापासून तिरूपतीला जाणार्‍या सर्व गाड्या कालहस्तीत थांबतात. आंध्र प्रदेश परिवहन मंडळाची बस सेवा तिरूपतीपासून प्रत्येक 10 मिनिटाने या स्थळासाठी उपलब्ध आहे. रहाण्याची सोयः चितूर आणि तिरूपतीत हॉटेलच्या रूपाने रहाण्याची उत्तम सोय आहे.

श्री लक्ष्मी नरसिंह चंदनोत्सव


अक्षय तृतीयेच्या पवित्र दिनी सिंहाचल पर्वताचा थाट काही आगळाच असतो। या दिवशी या पर्वतावर विराजमान झालेल्या श्री लक्ष्मीनरसिंहाच्या मूर्तीला चंदनाचा लेप चढविला जातो. या देवाची मूर्ती नेमकी कशी आहे, हे या दिवशी कळते. अकराव्या शतकात बांधलेले हे मंदिर देशातील काही मोजक्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. सिंहाचल म्हणजे सिंहाचा पर्वत. विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंहाचे हे निवासस्थान आहे. भक्त प्रल्हादाला पर्वतावरून ढकलून समुद्रात फेकले जात असताना भगवान नरसिंह रूपाने येथे धावून आले होते, अशी कथा आहे.

प्रल्हादाने याच ठिकाणी नरसिंहाचे पहिले मंदिर बांधल्याचे सांगितले जाते। प्रल्हादाच्या विष्णूभक्तीने संतप्त झालेल्या पित्याने कुठे आहे तुझा भगवान असे विचारले असता प्रल्हादाने या खांबातही भगवान आहे, असे सांगितले होते. त्यावर त्याच्या पित्याने त्या खांबालाच लाथ मारली आणि तिथून नरसिंह प्रकटले आणि त्यांनी प्रल्हादाच्या पित्याचा संहार केला. त्यानंतर मग प्रल्हादाने नरसिंहाचे मंदिर बांधले. परंतु, कृतयुगानंतर या मंदिराची उपेक्षा झाली. मग लुनार वंशातील पुररवाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

पुरूरवा ऋषी एकदा पत्नी उर्वशीबरोबर हवाई मार्गे चालले होते। त्यावेळी त्यांचे विमान आपोआप दक्षिणेतील सिंहाचल क्षेत्रात गेले. तेथे त्यांनी नरसिंहाची मूर्ती जमिनीत गाडली गेल्याचे पाहिले. मग त्यांनी मूर्ती काढून तिची साफसफाई केली. त्याचवेळी या मूर्तीला साफ करण्याऐवजी तिला चंदनाचा लेप लावावा अशी आकाशवाणी झाली. या मूर्तीवरील चंदनाचा लेप वैशाखातील तिसर्‍या दिवशी काढावा असेही आकाशवाणीत सांगण्यात आले. त्यानंतर मग आकाशवाणीप्रमाणे या मूर्तीला चंदनाचे लेप चढविण्यात आला. मग वर्षातून एकदा हा लेप काढण्यात येऊ लागला. तेव्हापासून नरसिंहाच्या मूर्तीची सिंहाचलावरच प्रतिष्ठापना करण्यात आली.

मंदिराचे महत्त्व- हे मंदिर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणपासून सोळा किलोमीटरवर आहे। जगातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून आठशे फूट उंचीवर ते वसले आहे.मंदिरापर्यंत जाण्याचा मार्गही रम्य आहे. अननस, आंबा आदी फळझाडांच्या गर्द सावलीतून हा मार्ग जातो. रस्त्यातून जाताना या सावलीत बसण्यासाठी मोठे दगड आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायर्‍या आहेत. शनिवार व रविवारी भाविक मोठ्या प्रमाणावर या मंदिरात येतात. एप्रिल व जून हा काळ दर्शनासाठी उत्तम मानला जातो. चैत्र शुद्ध एकादशीला वार्षिक कल्याणम व वैशाखात तिसर्‍या दिवशी होणारी चंदन यात्रा हे प्रमुख सण आहेत.

कसे जाल

रस्ता मार्ग- विशाखापट्टणम हैदराबादपासून ६५० किलोमीटर व विजयवाडापासून ३५० किलोमीटर आहे. येथे येण्यासाठी हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, चेन्नई व तिरूपतीहून नियमित बससेवा आहेत. रेल्वेमार्ग- विशाखापट्टण हे चेन्नई-कोलकता या रेल्वे लाईनवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. शिवाय नवी दिल्ली, चेन्नई, कोलकता व हैदराबादशी ते जोडले गेलेल आहे. हवाई मार्ग- हैदराबाद, चेन्नई, कोलकता, नवी दिल्ली व भुवनेश्वरहून येथे येण्यासाठी विमानसेवा आहे. चेन्नई, नवी दिल्ली व कोलकताहून इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट आठवड्यातून पाच दिवस उपलब्ध आहे.

संत सिंगाजीचे समाधी स्थळ


संत कबीरांच्या समकालीन असलेल्या संत सिंगाजी महाराजांची समाधी मध्यप्रदेशातील खंडव्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'पीपल्या' गावात आहे। येथील गवळी समाजात जन्मलेले सिंगाजी एक सर्वसामान्य व्यक्ती होते. परंतु, मनरंग स्वामीचे प्रवचने आणि त्यांच्या सानिध्यात आल्यामुळे सिंगाजीचे ह्दय परिवर्तन होऊन त्यांनी धर्माचा मार्ग स्विकारला. मालवा-निमाडमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेले सिंगाजी महाराज गृहस्थ असूनही त्यांनी आपल्या जीवनात निर्गुण उपासना केली. तिर्थ, व्रत इत्यादींवर त्यांचा विश्वास नव्हता. सर्व प्रकारचे तिर्थ मनुष्याच्या मनात असून जो आपल्या अंर्तमनात झाकून बघतो, त्याला सर्व तिर्थांचा लाभ होतो असे ते म्हणत असत. आपल्या मधुर वाणीच्या माध्यमातून तत्कालीन समाजात त्यांनी व्यापक बदल घडवून आणले होते.

एकदा त्यांना ओंकारेश्वर ज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी चला असे म्हटले असता त्यांनी जेथे पाणी आणि दगड आहे, तेच तिर्थस्थान असल्याचे सांगून पीपल्या गावाजवळ वाहत असलेल्या एका नाल्याच्या पाण्याला गंगेचे पवित्र पाणी समजून त्यात स्नान केले होते। ईश्वराची पूजा करण्यासाठी सिंगाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे मंदिर बनविले नाही. संत सिंगाजी महाराजांना साक्षात परमेश्वराने दर्शन दिले होते, असे सांगितले जाते। आपल्या गुरूच्या सल्ल्यानुसार, श्रावण शुक्ल नवमीच्या दिवशी ईश्वराचे नामस्मरण करत त्यांनी समाधी घेतली होती. आपली शेवटची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे सहा महिन्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांच्या स्वप्नात जाऊन आपल्या देहाला बैठकीच्या स्वरूपात समाधी देण्याचे सांगितले होते. त्यानुसार पुन्हा त्यांच्या देह उकरून त्यांना बैठ्या रूपात समाधी देण्यात आली.

सिंगाजी महाराजांचे समाधी स्थळ इंदिरा सागर परियोजनेच्या पाण्याखाली येत असल्यामुळे समाधी स्थळाच्या आजूबाजूला 50 ते 60 फूट उंचीचा ओटा तयार करून त्यावर मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे। मंदिराचे बांधकाम सुरू असल्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराजांच्या चरण पादुका तात्पुरत्या स्वरूपात जवळील परिसरात स्थलांतरीत केल्या आहेत.

या समाधी स्थळावर दर्शनासाठी‍ आलेले भाविक उलटा स्वस्तिक काढून आपली मनोकामना मागतात. आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविक सिंगाजींच्या दरबारात सरळ स्वस्तिक तयार करून अर्पण करतात. महाराजांच्या निर्वाणानंतर आजही त्यांची आठवण म्हणून शरद पोर्णिमेच्या दिवशी येथे जत्रा भरते. हजारो भक्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. कसे पोहचाल: रस्तामार्ग- या ठिकणी पोहचण्यासाठी खंडव्यापासून प्रत्येक अर्ध्या तासाला एक बस मिळते. रेल्वेमार्ग- खंडवा ते बीड रेल्वेस्टेशनपर्यंतच्या प्रवासानंतर, येथून पीपल्या गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी शटल रेल्वेचीदेखील सुविधा आहे.

धुनीवाले दादाजी


धुनीवाले दादाजी यांची गणना भारतातील महान संतांमध्ये केली जाते। शिर्डीच्या साईबाबांना ज्याप्रमाणे लोक मानतात, तसेच दादाजींच्या बाबतीतही त्यांचे भक्तांचे आहे. दादाजी (स्वामी केशवानंदजी महाराज) हे एक फार मोठे संत होते. देशाटन करता करता धर्मजागृती करणे हे त्यांनी जीवीतकार्य मानले होते. ते रोज पवित्र अग्नीसमोर (धुनी) ध्यानमग्न बसून राहत., म्हणून त्यांना लोक धुनीवाले दादाजी या नावाने ओळखतात.

दादाजींचे चरित्र उपलब्ध नाही। पण त्यांच्याविषयीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. दादाजींचा दरबार त्यांच्या समाधी स्थळी आहे. देश-परदेशात त्यांचे असंख्य भक्त आहेत. दादाजींच्या नावावर भारत व परदेशात 27 आश्रम आहेत. त्या सगळीकडे अग्निहोत्र अजूनही सुरू आहे. सन 1930 मध्ये दादाजींनी मध्य प्रदेशातील खांडवा शहरात समाधी घेतली होती. ही समाधी रेल्वे स्थानकापासून 3 किलोमीटरवर आहे.

छोटे दादाजी (स्वामी ‍हरिहरानंदजी)

राजस्थानच्या डिडवाना गावातील एका समृद्ध परिवारातील सदस्य भँवरलाल दादाजींना एकदा भेटायला आले होते। भेटीनंतर त्यांनी स्वतः:ला धुनीवाले दादाजींच्या चरणी समर्पित केले. भँवरलाल शांत प्रवृत्तीचे होते आणि दादाजीच्या सेवेत आपला वेळ घालवत होते. दादाजींनी त्यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्यांचे नाव ‍हरिहरानंद ठेवले.

हरिहरानंदजींना भक्त छोटे दादाजी या नावाने हाक मारू लागले। धुनीवाले दादाजींनी समाधी घेतल्यानंतर हरिहरानंदजींना त्यांचे उत्तराधिकारी मानण्यात आले. हरिहरानंदजींचे आजारपणामुळे सन 1942 मध्ये महानिर्वाण झाले. छोट्या दादाजींची समाधी मोठ्या दादाजींच्या समाधीला लागून आहे.

कसे जायचे :

रेल्वे : खांडवा मध्य आणि पश्चिम रेल्वेचे एक प्रमुख स्थानक आहे व भारताच्या प्रत्येक भागातून येथे पोहचण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. रस्ता मार्ग : खांडवा इंदूरहून 135 किलोमीटरवर अंतरावर आहे येथे रेल्वे व रस्ता मार्गेद्वारे जाता येते. हवाई मार्ग : येथून सर्वांत नजीकचे विमानतळ देवी अहिल्या एअरपोर्ट, इंदूर आहे.

योगेंद्र शीलनाथ बाबा


मध्यप्रदेशातील देवास येथे श्रीगुरु योगेंद्र शीलनाथ बाबांची अखंड धुनी (ज्योत) आहे। सुमारे शंभर वर्षापूर्वीची त्यांची खडाऊ आणि पलंग आजही तसाच असून त्यांच्या शयनगृहाखाली असलेल्या तळघराच्या विहीरीतील गुहा कायम आहे. इंदूर व उज्जैन येथे असलेल्या त्यांच्या तपोभूमीचे दर्शन घेण्यासाठी आजही भाविक येतात. तपोभूमीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना शांती अनुभवाला म‍िळते. बाबाच्या दरबारात आलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा त्यांच्यामध्ये आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक कार्यात त्याला यश प्राप्त होते. अशा प्रकारच्या चमत्कारीक कार्यामुळे संपूर्ण देवास शहर बाबांच्या चरणी पडलेले दिसते. बाबाला अपवित्रता अजिबात सहन होत नसल्याचे स्थानिक रहीवाश्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. मल्हार धुनी एक तपोभूमी असून येथे बाबांच्या शिष्यांची समाधी स्थळे अधिक आहेत.

विहीरीतील गुहेतून बाबा सरळ हरिद्वारला जात असत आणि स्नान करून पुन्हा त्याच गुहेतून येत होते, असे सांगितले जाते। शहरातील अनेक प्रतिष्‍ठीत लोकांनी त्यांना हरिद्वारमध्ये स्नान करताना पाहिले होते. कारण, ते नेहमी स्नान करायला हरिद्वारला जायचे. धुनी फिरवत असताना बाबाजवळ जंगलातील वाघ, सिंह आणि इतर प्राणी येऊन बसत असत.सिंहाला राहण्यासाठी त्यांनी एक पिंजरा बनविला होता. बाबा एका पायरीद्वारे पिंजर्‍यात उतरून सिंहाला जेवण देत असत. भारतीय संत परंपरेतील गुरू गोरखनाथ हे एक आहेत. त्यांचा नेपाळशी घनिष्ट संबंध होता. नेपाळ नरेश महेंद्रदेव त्यांचे शिष्य होते. त्या काळात गोरखनाथाने नेपाळच्या एका भागात आपला डेरा टाकल्यामुळे त्या भागाला 'गोरखा राज्य' असे म्हटले जात होते. त्यानंतर येथील लोक गोरखा म्हणून ओळखले जाऊ लागले. गोरखनाथांच्या धुनीचे येथील हजारो शिष्यांनी जगभरात प्रसार केला.

नवनाथांच्या परंपरेत अनेक सिद्ध महायोगी पुरूष जन्माला आले होते. आसाम, अरूणाचल, अफगाणिस्तानच्या हिंदू कुश पर्वतापर्यंत त्यांचे अस्तित्व पसरलेले होते. ज्या ठिकाणी नवनाथांची धुनी पेटली होती त्या ठिकाणी योगपीठे निर्माण झाले असल्याचे मानले जाते. त्यापैकी एक पंजाबच्या हिसार जिल्ह्यातील सुलतानपूर गावात होते. येथील पीठाधीपती इलायचीनाथ महाराज होते. पंजाब, काश्मीर, सिंध, क्वेटा, काबूल, कंदहार, चमन, महाराष्ट्र आणि मालवा इत्यादी ठिकाणी त्यांच्या शिष्यांच्या शाखा विखुरलेल्या होत्या. याच योगपीठातून बाबा शीलनाथ यांनी दीक्षा ग्रहण केली होती.

खांडव्याचे भवानीमाता मंदिर


या मंदिराला तुळजा भवानी मंदिर या नावानेही ओळखले जाते। प्रभू श्री राम वनवासात असताना येथे आले होते आणि त्यांनी येथे नऊ दिवस तपस्या केली होती, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे नवरात्रात येथे जत्रा भरते यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक येतात.

मंदिराच्या गर्भगृहात चांदीची सुंदर कलाकुसर केलेली आहे। मातेचे मुकुट आणि छत्रसुद्धा चांदीने मढविलेले आहे. आधी भवानी मातेला वेगळ्या नावाने ओळखले जात होते. परंतु, नंतर भवानी मातेचे मंदिर म्हणूनच ती प्रसिद्धीला आली॥मंदिराचा परिसर रम्य आहे. मंदिराचे प्रवेशद्वार शंखाच्या आकृतीचे आहे. परिसरात एक मोठी दीपमाळ आहे. त्यावर शंखाच्या आकृतीत दिवे आहेत.भवानीमातेच्या मंदिराजवळच श्रीराम मंदिर, तुळजेश्वर हनुमान मंदिर आणि तुळजेश्वर महादेव मंदिर आहेत. या मंदिरातील मूर्ती देखण्या आहेत. कुठलाही नवस न करता आपल्या इच्छा पूर्ण करणारी तुळजा भवानी माता भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे.

कसे जायचे :

इंदूर पासून हे मंदिर किमान 140 किलोमीटरवर आहे. खांडवा हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. इंदूरचाच विमानतळ सर्वांत जवळ आहे.

तमिळनाडूतील वैद्यनाथस्वामी मंदिर


देशात भगवान शिवशंकराची जी श्रध्दास्थाने आहेत, त्यात वैथिस्वरन कोईलला विशेष महत्त्व आहे। स्वतः: भगवान शंकर येथे वैदियंतर स्वरूपात भक्तांचे रक्षण करतात. वैदियंतर अर्थ रोगांवर उपचार करणारा डॉक्टर किंवा वैद्य. येथे एक- दोन नव्हे तर 4 हजार 480 रोगांवर इलाज केला जातो. रामायणातील उल्लेख असलेल्या जटायू आणि रावण युद्धानंतर जटायूचे दोन पंख येथेच पडले होते, अशी लोकांची धारणा आहे. सीतेचा शोध घेत प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण येथे आले होते. सीतेचे अपहरण झाल्याचे जटायूने रामाला येथे सांगितले आणि प्राण सोडला. प्रभू रामांनी त्याच्यावर येथेच अंत्यसंस्कार केले. जटायूला जेथे भडाग्नी देण्यात आला ती जागा जटायू कुंड म्हणून ओळखली जाते. अनेक जण या कुंडातील विभूती प्रसाद म्हणून भक्षण करतात.

रावणाचा वध करून परतताना प्रभू श्रीराम आणि सीता यांनी येथेच शिवाची आराधना केली होती, असा उल्लेख कथांमध्ये आहे। देवीच्या शक्तीमुळे भगवान मुरुगन यांना भालारूपी शस्त्र येथेच प्राप्त झाले होते. याच शस्त्राने त्यांनी पद्मासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. साधू- संतांनीही या देवस्थानी देवाची आराधना केली असून विश्वामित्र, वशिष्ठ, तिरूवानाकुरसर, तिरूगनंसबंदर, अरूनागीरीनाथर हे साधू संतही येथेच वास्तव्याला होते.अंगकरणने (तामिळ भाषेत मंगळ ग्रहाचे नाव ) आपला कुष्ठरोग बरा व्हावा यासाठी येथेच देवाची करूणा भाकली होती. ज्यांच्या पत्रिकेत मंगळदोष आहे, ते येथे येऊन अंगकरण पूजा करतात.

येथील सिद्धामिरथा कुंडातील पाण्याचा वापर करून विशिष्ट औषध तयार केले जाते। त्याने रोग बरे होत असल्याने लाखो भाविक दरवर्षी येथे भेट देतात. येथील औषध घेतल्यानंतर पाच जन्मापर्यंत कुठलाही रोग औषध घेणार्‍याला होत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. भगवान वैद्यनाथस्वामी यांच्या नावाने वैईथीस्वरन कोइल असे नाव या शहराला देण्यात आले आहे. ज्योतीधाम या नावानेही हे स्थान प्रसिद्ध आहे. खजुराच्या झाडावर बोटांच्या ठशांच्या साहाय्याने येथे भविष्य सांगितले जाते.

कसे जाल?

रेल्वेमार्ग- चेन्नईच्या थानजावर मार्गावरून वैथीस्वरन रेल्वे स्टेशन गाठता येऊ शकते. रस्ता मार्ग- वैथीस्वरन कोईल चिदंबरम शहराजवळ आहे. हे शहर चेन्नईपासून 235 किलोमीटरवर आहे. चिदंबरमपासून 26 किलोमीटरवर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हवाई मार्ग : चेन्नई विमानतळापासून हे तीर्थक्षेत्र जवळ आहे.

श्री जगदंबा देवी


नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराची ख्याती आहे। अहमदनगर जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर पाथर्डी तालुक्यातील मोहटे या गावी देवीचे स्वयंभू मंदिर असून हे एक जागृत देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे.मोहटे गावातील दहिफळे घराण्यातील बन्सी दहिफळे हे माहुरच्या देवीचे भक्त होते. त्यांनी आपल्या भक्तीच्या जोरावर देवीला गावाजवळ येऊन दर्शन देण्याची प्रार्थना केली. तेव्हा देवीने स्वप्नदृष्टांत देऊन गावाजवळील डोंगरावर प्रकट होणार असल्याचे आपल्या भक्ताला सांगितले. त्यानुसार 'तांदळा' सापडेपर्यंत भाविकांमध्ये ती गायीच्या रुपात वावरली आणि प्रकट झाल्यानंतर ग्रामस्थांना गाय पुन्हा दिसली नाही अशी अख्यायिका आहे.

देवीचा तांदळा ज्या दिवशी प्रकट झाला तो दिवस आश्र्विन शुद्ध एकादशीचा होता म्हणून या दिवशी देवीचा यात्रा उत्सव साजरा केला जातो। हा तांदळा अत्यंत सुंदर व आकर्षक असून पूर्वाभिमूख म्हणजे माहूरगडाच्या दिशेने आहे. मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर देवीची न्हाणी व शिवमंदरी आहे. या न्हाणीत आंघोळ केल्यानंतर शरीर रोगमुक्त होते असा गावकर्‍यांचा समज आहे.

पाथर्डी तालुका हा राज्यात उसतोडणी कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. या मजुरांचे आराध्यदैवत आणि लोककलाकरांचे (तमाशा मंडळ) श्रद्धास्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. कारण, राज्यात लोक कलेचा पहिला नारळ मोहटादेवीच्या यात्रेत फोडला जातो आणि त्यानंतर राज्यभर रंगारंग कार्यक्रम आयोजित केली जातो. निजामकाळात चरत चरत भरकटलेल्या काही म्हशी गावकर्‍यांनी आपल्या गोठ्यात बांधल्या होत्या. ही बातमी निजामला मिळताच त्याने म्हशी सोडून आणण्यास आणि गावकर्‍यांना बंदी करण्याचा हुकूम आपल्या सैनिकांना दिला. तेव्हा गावकर्‍यांनी देवीला नवस केला, की आमच्यावर लावलेला आरोप खोटा असून यातून आमची सुटका कर. आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकूण देवीने एका रात्रीतून काळ्या म्हशीचा रंग 'भुरका' केला होता, असे गावकर्‍यांनी सांगितले. तेव्हापासून या गावात दूध आणि दूग्धजन्य पदार्थांची विक्री आजपर्यंत केली जात नाही. कोणत्याही प्रकारचे दुध न विकणारे बहुधा हे भारतातील एकमेव गाव असावं.

मुंबईचे महालक्ष्मी मंदिर


मुंबईतील सर्वाधिक प्राचीन धार्मिक स्थळांमध्ये महालक्ष्मी मंदिर एक आहे। समुद्राच्या किनारी बी. ए. देसाई मार्गावर हे मंदिर आहे. ही महालक्ष्मी नवसाला पावणारी असल्याने भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते. महालक्ष्मी म्हणजे अर्थातच धनाची देवता. तिची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि समाधान लाभते, अशी श्रद्धा आहे. या मंदिराच्या मुख्य द्वारावर आकर्षक नक्षी आहे. मंदिराच्या परिसरात देव-देवतांच्या आकर्षक मूर्ती आहेत.

मंदिराचा इतिहास अत्यंत रोचक आहे। इंग्रजांनी महालक्ष्मी भाग वरळी क्षेत्राची योजना आखली होती. त्यासाठी ब्रीच कॅंडी मार्ग बनविण्यात येणार होता. पण समुद्राच्या तुफानी लाटांनी ही योजनाच बासनात गुंडाळली जाते की काय असे वाटत होते. त्यावेळी देवीने एक ठेकेदार रामजी शिवाजीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि समुद्रातून देवीच्या तीन मूर्ती काढून त्यांची प्रतिष्ठापना करण्याचा आदेश दिला. रामजीने तसेच केले आणि त्यानंतर ब्रीच कॅंडी मार्ग विनासंकट साकारला. मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत. तिन्ही देवतांना सोने व मोत्याच्या आभूषणांनी सुशोभित केले आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते, असा भाविकांचा विश्वास आहे.

कसे जाल?

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक भागातून येथे येण्यास रेल्वे, रस्ता व हवाई मार्गाने सेवा उपलब्ध आहे.

श्री नटराज मंदिर चिदंबरम


देवाधिदेव भगवान शंकराचे सर्वोच्च देवतेच्या रूपात पूजन करणा-या भक्तांसाठी तमिळनाडूतील चिदंबरम येथील नटराज मंदिर भक्तीच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे। आपल्यातील सर्व पवित्र शक्तींनी महादेव शंकराने या ठिकाणाला पावन केले असल्याची भक्तांचा समज आहे।पुराणांमध्ये असलेल्या उल्लेखानुसार प्रभू शिव येथे 'ॐ'कारच्या प्रणव मंत्र रूपात विराजमान आहेत. याचमुळे भक्तांसाठी या मंदिराचे स्थान महत्त्वाचे आहे. हे मंदिर भक्तांसाठी प्रचंड महत्त्वाचे आहे. भगवान शिवाच्या पाच भक्ती स्थळांपैकी चिदंबरम एक असून हे स्थान शंकराचे आकाश क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नटराज मंदिराला अग्नी मूल म्हणूनही ओळखले जाते. भोलेनाथ येथे ज्योती रूपात विराजमान असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे.


इतर चार क्षेत्रांमध्ये कालाहस्ती (आंध्रप्रदेश) किंवा वायू, कांचीपुरमचे पृथ्वी, तिरुवनिका- जल आणि अरुणाचलेश्वर (तिरुवनामलाई) म्हणजेच अग्नी यांचा समावेश आहे। हिंदू धर्मातील मान्यतेनुसार याच पंचतत्त्वांनी (पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश) मानवी शरीराची निर्मिती झाली आहे. नटराज मंदिराला अग्नी मूळ या नावानेही ओळखले जाते.मंदिराची रचना अत्यंत सुबक व आकर्षक असून वैशिष्ट्यपूर्ण आहे. चार सुंदर आणि मोठ्या घुमटांमुळे मंदिर भव्य वाटते. मंदिराची अंतर्गत रचना, सजावट, शिल्पकारी आणि मंदिराचे व्यापक क्षेत्रफळ यामुळे ते सहज डोळ्यात भरते.


शिवाच्या नटराज स्वरूपातील मूर्तीमुळे भरतनाट्यम कलावंतांचेही हे श्रध्दास्थान आहे। मंदिराच्या प्रत्येक खांबावर भरतनाट्यम नृत्याच्या वेगवेगळ्या शैली दाखविणा-या मूर्ती आहेत. मंदिराच्या गाभा-यात भगवान शिवकाम सुंदरी (पार्वती) सह स्थापित आहेत. मंदिराची देखरेख आणि पूजाविधी पारंपरिक पुजारींकडून केली जाते. मंदिराला भक्तांकडून दिल्या जाणा-या देणगीतूनच मंदिराचे कामकाज चालविले जाते.शिव क्षेत्रम म्हणूनही मंदिर ओळखले जाते. भगवान गोविंदाराज यांची मूर्तीही मंदिरात शिवशंकराजवळच स्थापन करण्यात आली आहे. मंदिर परिसरात अत्यंत सुंदर तलाव आणि नृत्य परिसर आहे. येथे दरवर्षी होणा-या नृत्य कार्यक्रमासाठी दूरवरून कलावंत सहभागी होत असतात.


कसे जाणार


रेल्वे मार्ग : चिदंबरम चेन्नई-तंजावर मार्गावर चेन्नईपासून 245 किमी अंतरावर मंदिर आहे. चिदंबरम नावानेच रेलवे स्टेशन ओळखले जाते. रस्त्याने : चेन्नईहून कुठल्याही वाहनाने 4-5 तासांत चिदंबरमला पोचता येते. विमान सेवा : चिदंबरम जाण्यासाठी सर्वाधिक जवळचे विमानतळ चेन्नई आहे. तेथून रस्त्याने किंवा रेल्वे मार्गे चिदंबरम जाता येईल.

जागृत देवस्थानः उलटे हनुमान


रामभक्त हनुमानाच्या एका अशा मंदिरात जिथे हनुमानाच्या मूर्तीची स्थापना उलटी करण्यात आली आहे। आणि म्हणूनच संपूर्ण मालवा क्षेत्रात हे मंदिर उलटे हनुमानाच्या नावाने प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक नगरी असलेल्या उज्जैनपासून केवळ 15 किमी अंतरावर असलेल्या या मंदिराचा इतिहास रामायणकाळातील असल्याचे मानले जाते. मंदिरात शेदूरजडीत हनुमान मूर्तीचा चेहरा उलटा आहे.

एका पौराणिक कथेच्या आधारे सांगतात की जेव्हा अहिरावणाने प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांचे अपहरण करून त्यांना पाताळात घेऊन गेला तेव्हा हनुमानाने पाताळात जाऊन अहिरावणाचा वध केला आणि श्रीराम-लक्ष्मणाची सुटका केली। भक्तांचा असा समज आहे, की पृथ्वीवरून पाताळात जाण्यासाठी हनुमानाने याच जागेतून प्रवेश केला. असे म्हणतात, की भक्तीला कुठल्याही तर्काची आवश्यकता नसते आणि म्हणूनच भक्तांनी या मंदिराची येथे स्थापना केली. मंदिरातील मूर्ती अत्यंत जागृत असल्याचे मानले जाते. मंदिर परिसरात अनेक साधू-संतांच्या समाधी आहेत. मंदिराच्या परिसरात इ. स. 1200 पर्यंतचा इतिहास स्पष्ट लक्षात येतो.

उलटे हनुमान मंदिर परिसरात पिंपळ, निंब, पारिजात, तुळस, वड आदी अनेक वृक्ष आहेत। अनेक वर्ष जुने दोन पारिजातकाची झाडेही येथे आहेत. पारिजातकाच्या झाडात हनुमानाचा वास असतो असतो असा सामान्य समज आहे. मंदिर परिसरातील झाडांवर पोपटाची दाट वस्ती आहे. पोपट हा पक्षी ब्राह्मणाचा अवतार असल्याचा समज आहे. हनुमानानेही संत तुलसीदास यांच्यासाठी पोपटाचे रूप घेऊन त्यांना श्रीरामाचे दर्शन घडवून आणले होते.

सांवेरच्या उलटे हनुमान मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण, शिव-पार्वती यांच्या मूर्ती आहेत। मंगळवारी हनुमानाला नवी वेषभूषा चढविली जाते. सलग तीन किंवा पाच मंगळवारी इथे येऊन हनुमानाचे दर्शन घेतल्यास आयुष्यातील कुठल्याही संकटांपासून मुक्ती मिळते अशी भक्तांची श्रद्धा असल्याने येथे भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

कसे जालः

रस्ता: उज्जैनपासून 15 किमी तर इंदूरहून 30 किमी अंतरावर आहे. येथे येण्यासाठी बस व टॅक्सी सहज उपलब्ध होते. विमान मार्गे: इंदूर हे जवळचे विमानतळ असून तेथून मंदिर 30 कि. मी. अंतरावर आहे.

Thursday, November 20, 2008

अविस्मरणीय केदारनाथ

चार धामच्या यात्रेतील एक प्रमुख तीर्थ केदारनाथ. पायथ्यापासून देवळापर्यंत १४ कि. मी. चालत जावे लागते. तिथपर्यंत जायला डोली, घोडे, खेचरे इत्यादी व्यवस्था पायथ्याशी आहे. तरीही त्या वर्षी थ्रिल अनुभवण्यासाठी मी व माझा मित्र पार्सेकर यांनी हे अंतर पायी चालत जायचा निश्‍चय केला. कुणी म्हणू लागले १२ तास लागतील, तर कुणी सांगितले १० तास चालावे लागेल. कुणाच्याच अंदाजात एकवाक्‍यता नव्हती. चालतच जायचे असे आम्ही ठरविले खरे. परंतु प्रोत्साहन, पाठिंब्याऐवजी कुत्सित, नकारार्थी बोलणीच ऐकू येऊ लागली. कुणी म्हणाले, "आठदिवसांपूर्वी एक डॉक्‍टर चालत जात होता. मध्येच ऍटॅक येऊन खलास झाला.' असे आणखीन दोन-तीन किस्से आम्ही पुढे ऐकले. तरीसुद्धा आमचा निश्‍चय तसू भर ही ढळला नाही. त्यात भर म्हणून आमची चालण्याची चिकाटी पाहून घोडेवाले "आनेका है क्‍या साब ? रास्ता बहुत लंबा है! सवारी कम ही लेंगे' असे वारंवार म्हणत आम्हाला खिजवत होते. एक डोंगर ओलांडला की दुसरा. सगळी डोंगर-टेकड्यांमधून पायपीट. तशी पावलोपावली विश्रामगृहे, त्यातील खाद्यपदार्थ प्रवाशांना मोहवतात. परंतु होणाऱ्या दमछाकीने जिवाला काहीही नकोसे वाटायचे. तासा मागोमाग तास गेले. घोड्यावरून, डोली मधून जाणारे लोक आमची कीव करत होते, की आदरभाव व्यक्‍त करीत होते, हा विचार करण्याइतपत आम्ही स्थिर नव्हतो. परंतु कसली तरी प्रेरणा, किंवा स्थानाचे नावीन्य एकापाठोपाठ दुसरा डोंगर ओलांडण्याचे काम आमच्याकडून करवून घेत होते हे निश्‍चित. पार्सेकरांचे विनोद, किस्से सांगणे चालू होते. पुढे ते ही थांबले. उगाच हे धाडस अंगावर घेतले. बोलल्याविनाही एकमेकांचे चेहरे जणू हेच सांगत होते. पुढे पावसाची रीप-रीप सुरू झाली. नजर पोहोचत नाही, इतक्‍या खोल दऱ्या एका बाजूला तर पुढे जणू जीवनाच्या अंतापर्यंत न संपणारी वाट! दोघांच्याही खांद्यावर एक-एक बॅग आणि आधारासाठी हातात काठ्या. अर्धी वाट संपल्याचा बोर्ड दिसला आणि मेटाकुटीला आलेला जीव त्यातल्या त्यात सुखावला. कुणी तरी पाठीवरचे ओझे कमी केले, तर चालणे सुसह्य होईल, अन्यथा आहे तिथेच बसकण मारावी लागेल, असा विचार मनात येतो ना येतो तोच एक पोरसवदा तरुण जवळ आला. ना ओळख ना पाळख. त्याच्या लाघवी, हसऱ्या चेहऱ्यामुळे आम्ही खूश! त्याच मूडमध्ये त्याने आमच्या बॅगा आपल्या हाती घेत म्हटलं "मै पकडता हूँ साब! आप आराम से चलिये'! त्याच्या गप्पांचा ओघ वाट संपेपर्यंत सुरू होता. शेवटी नऊ तासांच्या पायपिटीनंतर की तंगडतोडीनंतर देवळालगतच्या सपाटीला आम्ही पोहोचलो. आमच्या आधी घोड्यावरून गेलेल्या अन्य साथीदारांनी आम्हाला पाहून मिठ्याच मारल्या. सगळ्यांशी गळाभेट होताना आमच्या धैर्याचे कौतुक चालले होते. जवळपास उचलूनच सगळ्यांनी आम्हा दोघांना विश्रामगृहात नेले. थोडावेळ गेला आणि वाटेत भेटलेल्या त्या वाटसरूची बॅगांमुळे आठवण झाली. त्या सुखरूप होत्या... परंतु तो अनामिक साथीदार कितीतरी वेळ शोधूनही पुन्हा दिसलाच नाही.

गोव्यातील हिरवीगार सृष्टी!

वर्षाची पहिली पर्जन्याची धारा, न्हाणूनिया गेली भूमिभाग हासध्या बरसणाऱ्या पावसाने सारी सृष्टी हिरवीकंच झाली आहे. खरे तर ज्येष्ठाच्या सुरवातीलाच पाऊस पडला आणि आसुसलेल्या धरतीला नवचैतन्य प्राप्त झाले. "वर्षाची पहिली पर्जन्याची धारा, न्हाणूनिया गेली भूमिभाग हा सारा, लागली खुलाया अन तिजवरती, या तृणांकुरांची हिरवी, कवळी नवती' असे स्वरूप सगळीकडे दिसू लागले आहे. पावसाळ्यातल्या निसर्गाने सगळ्यांनाच मोहिनी घातली आहे. त्यात कवींवर तर त्याने जादूच केली आहे. बालकवी, ना. धो. महानोर, ग्रेस, डॉ. वसंत सावंत, शांता शेळके, बा. भ. बोरकर यांनी या निसर्गाचे चित्रण करणाऱ्या अनेक कविता लिहिल्या आहेत. बोरकर हे तर गोव्याचेच. त्यांनी चितारलेला निसर्ग इथे हुबेहूब आपल्याला दिसेलच, पण शांता शेळके यांनी चितारलेल्या निसर्गाचीही अनुभूती आपल्याला येऊ लागली आहे. शांता शेळके एकीकडे म्हणतात, "पलीकडे कुरणात बाळे खेळती गोजिरी, सूर त्यांचे उल्लासाचे चढतात वाऱ्यावरी.' अशाच प्रकारे कुरणात खेळणाऱ्या लेकरांचे चित्रण बोरकरांनीही आपल्या एका कवितेत केले आहे. "फुलती पत्री सुख सर्वत्री जीवन गात्री स कुरणांतुनि जल तुडवीत उडवित बागडती लेकरे.'

फ्युजन


जपानमध्ये राहायला येऊन साधारण तीन वर्ष झाली. तसं बघायला गेलं तर ३ वर्ष हा कालखंड मला माझ्यासाठी मोठा वाटत असला, तरी इथे बरीच मंडळी १०-१५ वर्षांपासून आहेत.
त्यांच्या मानाने तसा मी नवखाच. गेली काही वर्ष जपानमधल्या घडामोडी तिकडच्या मराठी मंडळींपर्यंत पोहोचवण्याचे काम श्रीकांत अत्रे करत आलेले आहेत. त्यात, आपण थोडीशी भर घालावी या हेतूने करत असलेला हा पहिलाच प्रयोग.
टोकियोजवळ असलेल्या शिवमाता शहरामधल्या "ताईसाकुतेन' या प्रसिद्ध ओतेरा (देऊळ) मध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम झाला। त्याबद्दल सांगायच्या आधी, या ओतेराबद्दल थोडंसं. हे देऊळ तीनशे वर्ष जुनं आहे आणि त्यात असलेली ८५० वर्ष पुरातन मूर्ती देवाधिदेव इंद्राची आहे. हे ऐकून माझा विश्‍वासच बसला नाही. इतकेच नाही, तर इंद्राच्या व्यक्तिरेखेवर आधारित ऍनिमेशन सिरीजसुद्धा आहे. असो. त्याबद्दल लिहायचे तर एक वेगळाच लेख लिहावा लागेल.

जूनला भरतनाट्य्‌म आणि बॉलीवूड-टॉलिवूड डान्सचा एक कार्यक्रम झाला. क्‍योको नोवी या जपानी सेन्सेईनी (शिक्षिका) हा कार्यक्रम बसवला होता. २५ वर्षांपूर्वी नोवी सेन्सेई भारतात राहून भरतनाट्य्‌म शिकल्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या नृत्यांची आवड आहे.
भरतनाट्य्‌मसारखा अवघड न्यृत्यप्रकार त्यांनी आत्मसात केला आहे. गेली काही वर्ष त्या इथे भरतनाट्य्‌म शिकवत आहेत. त्यांच्याकडे १२० मुली भरतनाट्य्‌म शिकत आहेत.

भारतीय मुली तर आहेतच पण जपानी मुलींची संख्याही लक्षणीय आहे। या मुली नुसतंच शिकत नाहीत तर त्यांनी ही कला चांगलीच अवगत केली आहे. गेली काही वर्ष इथे होत असलेल्या "नमस्ते इंडिया' सारख्या कार्यक्रमातून त्या आपली कला सादर करत आल्या आहेत. कोणी जपानी, भारतीय कलेबद्दल एवढे काही करते आहे हे बघून आनंद वाटला.

नोवी सेन्सेई वेगवेगळ्या ठिकाणी चालवत असलेल्या वर्गातील मुलींनी नृत्य सादर केले. यामध्ये अगदी लहान मुलींपासून मोठ्या मुलींपर्यंत सर्वांचाच सहभाग होता. स्वराली पारसनीस, इंदिरा पिंपळखरे, ईशा विसाळ, भैरवी देसाई अशा मराठी मुलींनीदेखील नृत्य सादर केले. या सर्वांमध्ये एँजेला नावाच्या जपानी मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिचे नृत्य अतिशय उत्तम आणि चेहऱ्यावरचे हावभावदेखील अतिशय सुंदर होते.
भरतनाट्य्‌मनंतर सादर झाला तो बॉलिवडू-टॉलिवूड डान्स।

जपानमध्ये सध्या बॉलिवूड, टॉलिवूडची क्रेझ आहे. रजनीकांत बऱ्याच जणांना माहीत आहे पण सध्या शाहरुख खान (जपानी लोकांच्या भाषेत किंग खान) ची चलती आहे. सध्याच्या नवीन ठेकेदार गाण्यांवर नृत्य झाले. जब वुई मेटमधल्या नगाडा नगाडा पासून ते ओम शांती ओममधल्या दर्दे डिस्कोपर्यंत सर्व गाणी झाली. "डोला रे...' या देवदासमधील गाण्यावर भरतनाट्य्‌म असा काहीसा जरा न जमलेला प्रयोगही बघायला मिळाला. या सर्वांमध्ये उठून दिसली ती प्राची ही छोटी मुलगी. तिने "फना' मधील "देश रंगीला रंगीला' या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य केले.
असं हे आगळंवेगळं फ्युजन... जपानी आणि भारतीय मुलींनी एकत्र येऊन केलेल्या भरतनाट्य्‌म आणि बॉलिवूड डान्सचं

निसर्गरम्य अरिझोना


एकीकडे कोलोरॅडो नदी, दुसरीकडे सोन्होरा वाळवंट, आणि तिसरीकडे रॉकी माऊंटन अशा निराळ्याच भौगोलिक विभागात अमेरिकेच्या पश्‍चिमी भागात "अरिझोना' आहे।

फिनीक्‍स शहर ही या राज्याची राजधानी। इथे खूप मोठी जनवस्ती आहे.

सुमारे ४१ लाख लोक फिनिक्स मधे राहतात आणि जवळ पास २० हज़ार भारतीय व भारतीय मूळ असलेल्या लोकांनी अरिझोनाला आपले निवासस्थान बनविले आहे. अरिझोना मधील उन्हाळा हा नागपुरी गर्मी सारखा आहे पण इकडे वातावरण कोरडे असल्यामुले कड़क उन्हाने हे राज्य ७ ते ८ महीने तप्त असते. १०० दिवस ४० अंश सेल्सिउस याहून अधिक तापमान इकडे असते. नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यात छान (उत्तर भरता सारखा) हवामान असल्याने बरेच लोक इकडे हिवाळ्यात अमेरिकेच्या थंड बर्फदार राज्यातून रहायला येतात. येथील "ग्रैंड कैनियन" ही जगातील सर्वात मोठी व सर्वात खोल नदीच्या पात्राने बनवलेली नैसर्गिक दरी आहे. बरोबरच डोंगर व दऱ्यांनी भरलेली रम्य जंगले आणि उन्हाने तापलेले वाळवंट तुम्हाला इकडे बघायला मिळेल.

Friday, November 14, 2008

अजंठा



अजंठा-वेरूळ लेणी म्हणूनच जगप्रसिद्ध झालेली आहेत. परंतु आश्चर्य असे की, जगविख्यात झालेल्या अजंठा येथील गुंफा गेल्या शतकात योगायोगानेच प्रकाशात आल्या. एरवी त्या शेकडो वर्षे अज्ञातवासातच होत्या आणि पुढेही त्या अंधारातच राहिल्या असत्या.
इ। स. १८१९ मध्ये एक ब्रिटीश क्रॅप्टन जॉन स्मिथ या परिसरातील गर्द जंगलात शिकार खेळण्यासाठी आला असताना जंगलाने व्यापलेल्या या गुंफा अचानक त्याच्या नजरेस आल्या आणि त्यानंतर मात्र तेथील रान मोकळं करून या गुंफाचा शोध घेण्यात आला.

सह्याद्री पर्वताच्या सातमाळा डोंगर रांगेतील नालेचा आकार असलेल्या एका डोंगर उतारावर या गुंफा खोदण्यात आल्या आहेत। या ठिकाणी एकूण ३० लेणी असून ती इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापासून इ. स. नंतरचे पाचवे शतक अशा सुमारे ८०० वर्षांच्या काळात खोदण्यात आली आहेत. या लेण्यांमध्ये मुख्यत: चैत्य, प्रार्थना मंदिरं, सभागार, विहार आणि मठांची व्यवस्था आहे. या ठिकाणी धार्मिक स्वरूपाची नित्यकर्मे व कर्मकांड पार पाडली जात असावीत.


ज्या डोंगरात ही लेणी खोदण्यात आली आहेत. त्यांच्या माथ्यावर एक जलौघ असून त्याचे पाणी एका नैसर्गिक कुंडात साठवले जाते.
या कुंडास सप्तकुंड असे म्हणतात. क्र. ९ व १० च्या लेण्यात चैत्यगृहे आहेत. ८, १२, १३ व १५ क्रमाकांच्या लेण्यांचाही मठ किंवा प्रवचने यासारख्या धार्मिक कर्मासाठी उपयोग होत असावा. लेणी क्र. १, २, १६, १७, १९ व २६ या सुद्धा अशाच कार्यासाठी तयार करण्यात आली असावीत. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध आणि बुद्ध जीवन शिल्प व चित्रकलेद्वारे चितारण्यात आले आहे. लेण्यांमध्ये चितारण्यात आलेली रंगीत चित्रे तर अतिशय अप्रतिम आहेत. शेकडो वर्षे उलटूनही त्यातील रंग मात्र अजूनही उबदार आहेत. बुद्धावतार, जातककथा असे बुद्धजीवनाशी निगडित प्रसंग येथे कलात्मकतेने चित्रित केलेले आहेत. बोधीसत्व पद्मपाणी, आकाशगामी अप्सरा, बुद्धाचे सहस्त्रावतार, नृत्यगायन करणाऱ्या अप्सरा, पत्नीकडे भिक्षेची याचना करणारा बुद्ध, राजसभा आदि चित्रे खरोखरीज अद्वितीय आहेत. गुंफांमध्ये चितारलेली रंगीत चित्रे आणि शिल्पचित्रे भव्य तर आहेतच पण त्यातील भाव, नाट्य, बांधेसूदपणा, लय आणि गति यामुळे सर्व कलाकृतींना कमालीचा जिवंतपणा आलेला आहे.

पन्हाळा


कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला शिव छत्रपतींचा आणि संभाजीराजांचा आवडता किल्ला. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना येतात.आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.हा किल्ला छत्रपती शिवरायांनी प्रथम तारीख २८ नोव्हेंबर १६५९ रोजी घेतला. नंतर पुन्हा विजापूर अदिलशहाच्या ताब्यात गेला. पण लगेच २ मार्च १६६४ रोजी शिवरायांनी घेतला. याचवेळी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता. याचवेळी शिवराय जोहरच्या हातावर तुरी देऊन विशाळगडी राजदिंडीतून गेले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. पुढे इ. स. १७१० मध्ये पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली ती १७७२ पर्यंत येथेच होती. कविवर्य मोरोपंतांचा जन्म येथेच झाला.

रायगड

छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे त्यांनी या गडावरूनच स्वराज्याचा कारभार पाहिला. तत्पूर्वीच्या इतिहासकाळात हा गड `रायरी' या नावाने ओळखला जात असे.
मराठी दौलतीतील अत्यंत अवघड आणि म्हणूनच सुरक्षित असलेला हा किल्ला होय. संपर्काच्या दृष्टीने व कारभाराच्या दृष्टीने तो शिवरायांना इतर किल्ल्यांपेक्षा अधिक सोयीचा वाटला. रायगड येथे राजधानी असल्याने या किल्ल्यात सर्व सोयीसुविधा होत्या. एक नगरीच तेथे वसवण्यात आली होती. समुद्र सपाटीपासून जवळजवळ ८५५ मीटर उंच असलेल्या रायगडावर जाण्यासाठी पायऱ्या असून त्याशिवाय असलेले अन्य मार्ग अतिशय कठिण आणि अवघड आहेत.रायगड जिल्ह्यातील महाड या गावापासून उत्तरेला सुमारे २६ कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या माथ्यावर हा किल्ला उभा आहे. सभोवताली पर्वतराई, खोल दऱ्या आणि भुरळ घालणारी निसर्ग यामुळे हा किल्ला शोभिवंत दिसतो. या किल्ल्याचा भक्कमपणा, त्याची उंची, अवघड जागा आणि अजिंक्यतारा पाहून युरोपियन लोक त्यास `पूर्वेकडील जिब्रॉल्टर' म्हणतात.किल्ल्यावर आजही गंगासागर तलाव, बालेकिल्ला, नगारखाना, राज दरबार, रंगमहाल, जगदीश्वर मंदिर या वास्तू आपल्याला पहायला मिळतात. महाराजांचे समाधीस्थळ ही तर रायगडावरील एक पवित्र निशाणी होय.

सिंधुदुर्ग



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.
मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण कि.मी. अंतरावर असलेल्या खडकाळ बेटावर हा किल्ला बांधण्यात आला आहे.
इ.स. १६६५ मध्ये हा किल्ला शिवाजी महारांजी स्वत:च्या देखरेखीखाली बांधला. या बांधकामासाठी त्यांनी १०० पोर्तुगीज तज्ज्ञांचे सहाय्य घेतले होते. असं म्हणतात की, सुमारे ४८ एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या या जलदुर्गासाठी शेकडो कारागीर व कष्टकरी तीन वर्षे अहोरात्र झटत होते.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सभोवती सुमारे ९ मीटर उंच, ३.६ मीटर रूंद व सुमारे २ मैल परिघाचा कोट बांधण्यात आला आहे. किल्ल्यावर अनेक टेहळणी बुरूज असून तटाला लागून पन्नासहून अधिक विस्तृत बुरूज आहेत. शत्रुपक्षावर तोफांचा भडीमार करण्यासाठी या बुरूजांचा उपयोग केला जात असे. आजही या बुरूजांवर जुन्या तोफा पहायला मिळतात. पुढे इ. स. १८१२ मध्ये हा अजिंक्य किल्ला ब्रिटिशांनी हस्तगत केला.
किल्ल्यात शिवाजी महाराजांची वीरासनात बसलेली मूर्ती असलेले मंदिर असून आजही त्या मूर्तीची लोक पूजा करतात. हे मंदिर शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांनी बांधले.

सज्जनगड

परळीचा किल्ला' म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला समर्थ रामदास यांच्या वास्तव्यानंतर `सज्जनगड' या नावाने ओळखला जाऊ लागला. शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ च्या सुमारास तो विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. आयुष्याच्या अखेरपावेतो समर्थ रामदास स्वामी याच गडावर निवास करीत. इ.स. १६८२ मध्ये ते या ठिकाणी समाधिस्त झाले.साताऱ्यापासून हा किल्ला अवघ्या १५ कि. मी. अंतरावर आहे. पूर्वी हा किल्ला चढून जावे लागत असे. पण अलिकडे अगदी थेटपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. किल्ल्याला दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. अंतर्भागात श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिराखाली श्री समर्थांची समाधी आहे. मंदिरानजिकच समर्थांचा मठ आहे. मठात समर्थ ज्या वस्तूंचा दैनंदिन वापर करीत त्या सर्व वस्तू उदा. पलंग, पिण्याच्या पाण्याच्या तांब्या, पिकदान, कुबड्या या वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. शिवाजी महाराजांनी समर्थांना या वस्तू भेटीदाखल दिल्या होत्या. गडाच्या एका टोकाला एक मारूतीचे मंदिरही आहे. मंदिराजवळच एक तलाव आहे.सज्जनगड समुद्रसपाटीपासून सुमारे ९०९ मीटर उंचीवर आहे.

तुळजापूर


देवीच्या शक्तीपीठापैकी हे आद्यपीठ. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता असून रामदास स्वामी हे देखील उपासक होते.

पावनखिंड



कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी म्हणजे १७११ फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या दोन डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून सात मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदी उगम पावली आहे. पन्हाळा, म्हाळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, घोडखिंड असा हा मार्ग आहे.शिवरायांचे विश्वासू सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांनी मावळयांच्या मदतीने सिद्दी मसूदच्या सैन्याला या खिंडीतच थोपवून धरले आणि राजांना विशाळगडी जाण्याची संधी मिळाली. पावनखिंडीतील संग्रामाचे मूळ कारण पन्हाळगड ! सिद्दी जौहरने पन्हाळयाला करकचून वेढा घातलेला. महाराज किल्ल्यावर अडकलेले. अखेर एक योजना आखून राजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले. सिद्दीची छावणी आनंदात मशगूल झाली आणि वेढा ढिला पडला.

इकडे शिवराजांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले आणि बरोबर ६०० हत्यारबंद पायदळ, बाजीप्रभूंसह महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळयावरून निसटले. १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा, गुरूवार, रात्रीचे सुमारे १० ची वेळ. विजा चमकत होत्या पाऊस कोसळत होता आणि एवढ्यात सिद्दीच्या एका पहारेकऱ्याने हे पाहिले आणि तो ओरडला, `दगा दगा!' ही चाहूल लागताच राजांनी दोन पालख्या केल्या. एका पालखीत ते स्वत: तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी (शिवा काशीद) बसला. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोहोचविली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवराजासाठी शिवा काशीदने समर्पण केले.इकडे मसूद एक हजार पायदळासह घोडखिंडीच्या दिशेने दौडत होता. १३ जुलैची ती पहाट! राजे आणि बाजी खिंडीशी आले आणि मसूदच्या सैन्याची आरोळी ऐकू आली. प्रसंग मोठा बाका. बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितले, विशाळगडी जावे, गनीम अफाट आहे, गनीम दावा साधील, मी इथे खिंड रोखून धरतो. एकालाही खिंड चढून देत नाही. मात्र गडावर पोहचल्याची खूण म्हणून तोफांचे आवाज द्या.
बाजींनी गनिमीकावा साधला. आपली मोजकी माणसे झाडांवर बसवून मसूदचे हशम येताच त्यांच्यावर दगडांचा मारा सुरू केला. नारळ फुटावा तशी हशमांची डोकी फुटू लागली. खिंडीच्या तोंडाशी अडसरासारखे राहून बाजींनी दिवसभर त्वेषाने खिंड लढविली. अनेक घाव बसले, देह घायाळ झाला, मावळे मरून पडले. बाजींचे लक्ष होते विशाळगडाकडे ! अखेर सायंकाळी सहा वाजता तोफांचे आवाज आले. याचवेळी बाजींच्या वर्मी घाव बसला आणि ते कोसळले. शेवटच्या क्षणी ते म्हणाले, `महाराज माझे काम मी केले, येतो.'
विशाळगडावर महाराज वाट पहात होते, जिवंत बाजीची. पण महत्प्रयासाने मावळयांनी बाजींचे प्रेत गडावर नेले. महाराज अत्यंत कष्टी झाले. रायाजी नाईक, बादल यांनी राजांच्या आज्ञेने बाजींच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले. ती समाधी दुर्लक्षित आहे. आजही या खिंडीत पोहोचताच १३ जुलै १९६० च्या रणसंग्रामाची आठवण होते. खिंडीचाही गळा दाटून येतो. रक्ताचा सडा शिंपून स्वामीनिष्ठेपायी, स्वराज्यासाठी बाजीने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी, पुरोगामी व इतिहासभिमानी म्हणवणाऱ्या शासनाने त्यांच्या समाधीची देखरेख ठेवली तरच आपला इतिहासभिमान सार्थ ठरणार आहे.

अक्कलकोट



सोलापूरपासून ४० कि. मी. अंतरावर हे स्थान असून श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.अक्कलकोट हे पूर्वी संस्थान होते व ते राजधानीचे नगर होते. येथील राजे मालोजीराजे भोसले श्री स्वामी समर्थांचे अनन्य भक्त होते. अक्कलकोटच्या परिसरात श्री स्वामी समर्थांनी अनंत चमत्कार केले. विदेही अवस्था व संपूर्णतया मुक्त संचार यामुळे श्री स्वामी समर्थांच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारची गूढता असे. असे असूनही हजारो भक्त त्यांच्या दर्शनार्थ अक्कलकोटला गर्दी करीत असत.अक्कलकोटला येण्यांपूर्वी श्री स्वामी समर्थांनी अनेक ठिकाणी भ्रमंती केलेली असल्यामुळे त्यांचा जन्म आणि पूर्वायुष्याबद्दल अनेक तर्क आहेत.
इ.स. १८७८ मध्ये त्यांनी अक्कलकोट येथेच समाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय ५०० वर्षाहूनही अधिक होते असं मानलं जातं.नंतरच्या काळात सिद्धपुरूष म्हणून परिचित असलेले श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्यामुळेही अक्कलकोट हे भाविकांचं श्रद्धास्थान झालं आहे. अलिकडेच श्रीगजानन महाराजांनी समाधी घेतली. अक्कलकोट हे या दोन तपस्वी पुरूषांच्या वास्तव्याने पुनीत झालेले शहर आहे.

आळंदी


वारकरी संप्रदायात पंढरपूर इतकेच आळंदी या तीर्थस्थानासही मोठे महत्त्व आहे. पुणे शहरापासून अवघ्या २२ कि. मी. अंतरावर हे स्थान असून ते देवाची आळंदी या नावानेही प्रसिद्ध आहे.इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या या गावी संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली (इ.स. १२९६). त्यामुळेच आळंदीचं महत्व फार मोठं आहे. महाराष्ट्रात विठ्ठलभक्तीचा सुकाळ करून वारकरी संप्रदाय निर्माण करणारे लोकोत्तर संत म्हणून सातशे वर्षे अवघ्या महाराष्ट्राने ज्ञानेश्वरांना आपल्या हृदयात जपले आहे. `ज्ञानदेवे रचिला पाया । कळस तुकयाने चढविला' या ओळीनुसार भागवत धर्माची धुरा खांद्यावर वाहणारे हे दोन थोर संत महाराष्ट्राच्या लोकजीवनात अखंड विराजमान झाले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान, विठ्ठल-रखुमाईचे मंदिर, सोन्याचा पिंपळ अशी अनेक स्थाने या तीर्थस्थानी भक्तिभावाने पाहण्यासारखी आहेत. याठिकाणी आषाढी-कार्तिकी एकादशीला यात्रा भरते तसेच ज्ञानेश्वर समाधी दिनी कार्तिक कृ. त्रयोदशीला येथे उत्सव असतो.

अंबेजोगाई

मराठवाड्यातील सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे हे शहर परळी वैजनाथपासून अवघ्या ३५ कि. मी. अंतरावर आहे. अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना हेमाडपंती शैलीची असून मंदिर उत्तराभिमुख आहे. देवळास चहू दिशेस महाद्वार आहे. मंदिराचे बांधकाम व त्यावरील शिल्पाकृती पाहून मन थक्क होते. दगडी खांब व तुळयांवरील बारीक नक्षीकाम अतिशय रेखीव आहे. उत्तर महाद्वाराच्या बाहेर लगोलग सर्वेश्वर तीर्थ आहे. मंदिराच्या परिसरात काही सत्पुरूषांच्या समाध्या आहेत. पश्चिम दरवाजाला लागूनही अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. नवरात्रात येथे महोत्सव असतो. मार्गशीर्ष महिन्यातही येथे उत्सव असतो.शहरापासून २-३ कि. मी. अंतरावर बालाघाटातील एका डोंगरात मराठीतील आद्यकवी मकुंदराजांची समाधी आहे. हा संपूर्ण परिसर शांत व सुंदर आहे. जवळच जयंती नदी डोंगराच्या कड्यावरून खाली दरीत कोसळते. या दरीस अश्वदरी असे म्हणतात.संतकवी दासोपंत यांनी अंबेजोगाईस वास्तव्य करून आपली साहित्य रचना केली. त्यांचे निवासस्थान एकमुखी दत्तात्रेयाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष महिन्यात येथे दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. अमलेश्वर, सकलेश्वर ही मंदिरे जांभुळवेट व अनेक सिद्ध पुरूषांची साधनास्थाने या परिसरात आहेत.

गिरीजात्मक


लेण्याद्री हे पुणे जिल्ह्यातच असून येथील श्रीगणेशास `गिरिजात्मक' या नावाने संबोधले जाते. येथील मूर्ती इतर स्थानी असलेल्या गणपतींप्रमाणे रेखीव नाही. मंदिरही छोटेखानी आहे.
पुणे-जुन्नर मार्गावर जुन्नरपासून अवघ्या ५-६ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या परिसरात हे स्थान डोंगरावर आहे. हा डोंगर लेण्याद्री डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बौद्धकालीन गुंफा असून या गुंफातच हा गणपती आहे.
मूर्तीच्या दोन्ही बाजूस हनुमान, शंकर अशा काही देवांच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी गुंफा असल्याने मंदिराच्या उजव्या बाजूला डोंगरात कोरून काढलेल्या काही ओवऱ्या आहेत. कुकडी नदी ओलांडल्यानंतर मंदिर डोंगरात असल्याने जवळपास २८३ पायऱ्या

बल्लाळेश्वर


रायगड जिल्ह्यातील खोपोली या शहरापासून हे स्थान जवळ आहे. येथील गणपती `बल्लाळेश्वर' या नावाने प्रसिध्द आहे. देवस्थानातील डाव्या सोंडेची गणेशमूर्ती तीन फूट उंच आहे. तिचा आकार थोडा रुंद असून मस्तकाचा भाग थोडासा घोलगट आहे.
मंदिराची बांधणी रेखीव असून ते पूर्वाभिमुख आहे. या देवस्थानाच्या मागेच एक स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. व तेथील गणपती धुंडीविनायक म्हणून ओळखला जातो. कल्याण श्रेष्ठींचा मुलगा बल्लाळ याच्या उपासनेतूनच प्रगट झालेला हा गणपती म्हणून त्यास बल्लाळेश्वर असे नाव पडले.

महागणपती

हे देवस्थानही पुणे जिल्ह्यातच असून पुणे-नगर रस्त्यावर आहे. येथील गणपती `श्रीमहागणपती' या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे.
मंदिर पूर्वाभिमुख असून त्यास इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे. गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदि सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे सहाय्य दिले आहे.

चिंतामणी

पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरापासून अगदी नजिक असलेल्या या देवस्थानी असलेला गणपती `श्रीचिंतामणी' या नावाने ओळखला जातो.
थेऊर येथील गणेशमूर्ती स्वयंभू व उजव्या सोंडेची आहे. मंदिराचे महाद्वार उत्तरभिमुख आहे पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभामंडपही मोठा आहे. देवळाच्या तिन्ही बाजूंना मुळा व मुठा या दोन नद्यांचा वेढा आहे.
पुणे नजिकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी या तपस्वी पुरूषाने या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली होती, असा ऐतिहासिक दाखला असून थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामणी देव यांनी बांधले आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांना या गणेशस्थानाबद्दल अखेरपावेतो प्रेम वाटत होते. त्यांचा मृत्यूही या मंदिराच्या आसमंतातच झाला.

बाहुबली



जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील बाहुबली (कुंभोज) हे स्थान शतकापासून प्रसिद्ध आहे . कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्याच्या उत्तरेस सात कि. मी. अंतरावर हे स्थान वसले आंहे.बाहुबलीचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या आळत्याच्या शिलालेखात आसपासच्या डोंगराचे वर्णन आहे. ते वर्णन बाहुबली डोंगराला पूर्णपणे लागू आहे.
त्यावेळी या डोंगराचे नांव बाहुबली डोंगर नव्हते पण डोंगरावरील जिनप्रतिमा, चैत्यालये यांच्या वर्णनावरून तोच असावा असे दिसते. प्राचीन काळापासून बाहुबलीचा डोंगर जैन मुनींची तपस्याभूमी म्हणून ओळखला जात असल्याचे दिसते. आजही या ठिकाणी आठशे वर्षापूर्वीची ६० फूट उंचीची १००८ भगवान बाहुबलींची अतिशय सुंदर, कलापूर्ण मूर्ती व प्राचीन सहस्त्र जिनबिंब आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहेत. ही बाहुबलीची मूर्ती इ.स. ११५६ मध्ये शके १०७८ च्या वैशाख शुध्द दशमीस श्री १०८ श्रृतसागर मुनिराज यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्याचा उल्लेख दिगंबर चैन तीथक्षेत्र डिरेक्टरीमध्ये मिळतो. सुमारे ३०० वर्षापूर्वी नांद्रे येथील बाहुबली मुनींनी येथे केलेली तपश्चर्या, १९२६ मध्ये तेथे झालेला चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराज यांचा चातुर्मास, धर्मप्रेमी श्री कल्लाप्पा निखे यांनी घातलेला रत्नत्रय मंदिराचा पाया व त्यासाठी बांधलेली दुमजली चिरेबंदी भव्य इमारत या सर्व गोष्टीमुळे या भागात या पहाडाला जैन धर्मियांच्या दृष्टीने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

देहू

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महारांजाचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदैव वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच नजिक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते.देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर आदि स्थाने दर्शनीय आहेत. तुकारामबीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो.

गणपतीपुळे



रत्नागिरी जिल्ह्यातील हे ठिकाण जसे निर्मळ समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते तेथील स्वयंभू गणपतीसाठी ही भाविक पर्यटकात खूप प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे येथील सागर किनारा खरोखरीच अप्रतिम आहे. सलग १२ कि. मी. लांबीचा हा किनारा स्वच्छ व सुंदर आहे.
येथील वाळू सुद्धा फिकट पांढरी आणि मऊ मुलायम आहे. सकाळच्या कोवळया उन्हात आणि चांदण्या रात्रीच्या चंद्र प्रकाशात तिला वेगळीच लकाकी प्राप्त होते. किनाऱ्यालगत नारळांच्या तसेच फुला-फळांच्या बागा असल्याने समुद्र किनारा सदैव उल्हसित वाटतो. गणपतीपुळे येथील चारशे वर्षीपूर्वीचे गणपतीचे पुरातन देवालय सागर किनाऱ्यालगत असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आहे. हा गणपती स्वयंभू असून भाविक लोक संपूर्ण टेकडीलाच गणेश स्वरूप मानून या टेकडीला प्रदक्षिणा घालतात.

जेजुरी

पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर असलेले हे तीर्थक्षेत्र खंडोबाचे जागृत स्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. धनगर कोळी तसेच इतर वर्गातील ज्ञातींचेही हे कुलदैवत असल्याने येथील खंडोबाच्या दूरदर्शनाठी दूरदूरहून भक्त येत असतात.एका लहानशा पठारावर सुमारे तीनशे मीटर उंचीवर डोंगराच्या कडे पठारावर हे खंडोबाचे मुख्य देऊळ आहे. प्रवेश द्वाराशीच नगारखाना आहे. देऊळ पूर्वाभिमुख असून ते विस्तृत आहे. देवळासमोर भले मोठे पितळी पत्र्याने मढवलेले कासव आहे. त्यावर भंडाऱ्याची उधळण केली जाते. चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध १२ ते वद्य १ असे पाच दिवस तर मार्गशीर्षात शुद्ध १ ते ६ असे सहा दिवस आणि नवरात्रात दसऱ्यापर्यंत दहा दिवस खंडोबाची यात्रा असते.

ज्योतिबा



वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबादेवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिध्द आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भोतिक व ऐहिक ऎश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि. मी. वर आहे.
सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे. त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच ज्योतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेले हे ज्योतिबाबाचे पुरातन मंदिर आहे. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा !

महालक्ष्मी



कोल्हापूरात सर्वोच्च स्थान या मातेला, महालक्ष्मीला व देवालयाला आहे. श्री महालक्ष्मीची आशीर्वादानेच श्री. शाहू छत्रपती व श्री राजाराम महाराजांच्यासारखे सुपुत्र जन्माला येऊन या शहराची वाढ व विकासाकरिता त्यांनी प्रयत्न केले. आजच्या शहराच्या सद्यस्थितीचा पाया श्री महालक्ष्मीच्या देवालयाने घातला. त्याच्या वाढीस महाराजांचे प्रयत्न कारणीभूत झाले. श्री महालक्ष्मीचे देवालय शहराच्या मध्यवस्तीत, जुन्या राजवाड्यानजीक आहे.
भव्य व सुंदर हेमाडपंथी पद्धतीचे हे देवालय म्हणजे प्राचीन शिल्प कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या देवालयाचा आकार ताऱ्यासारखा असून ते दोन मजली आहे. देवालयात श्री महालक्ष्मीखेरीज दक्षिणेला महासरस्वती, उत्तरेला महाकाली वरच्या मजल्यावर गणपतीच्या मूर्ती आहेत. या देवालयाला असंख्य खांब असून ते मोजता येत नाही असा भाविकांचा समज आहे. मुख्य देवालयासमोर एक प्रवेश मंडप आहे. याला गरूड मंडप असे म्हणतात. नवरात्रात येथे उत्सव साजरा केला जातो. इतर वेळी कीर्तन, प्रवचन, भजन, ग्रंथवाचन वा प्रदर्शनासाठी देखील याचा उपयोग केला जातो. महालक्ष्मीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी असलेला मार्ग मंदिराच्या आतल्या बाजूसच असून अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
मुख्य देवालयाच्या सुरवातीलाच प्रवेश करताना मुख्य मंडप लागतो। त्याच्या दोन्ही बाजूला भिंतीवर भरत आणि शत्रुघ्न यांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. पुढे गेल्यावर मणिमंडप लागतो. कलात्मक कोरीव काम आणि जय विजय या द्वारपालांच्या मूर्ती मनमोहक आहेत. मूळ स्थान म्हणजे देवीची स्थापना केलीली जागा; सन १७२२ पर्यंत श्री महालक्ष्मीची मूर्ती मुस्लिम हल्ल्यापासून बचाव करण्याकरिता म्हणून सुमारे दोनशे वर्षे झाकून ठेवण्यात आली होती.

मुख्य देवालयाच्या बाहेरील बाजूस चौसष्ट नृत्य करणाऱ्या योगिनी व इतर कोरीवकाम केलेले दिसते. श्री. महालक्ष्मी देवालयाच्या भोवती आवारामध्ये सर्व बाजूंना अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. त्यामध्ये शेषशायी व नवगृह किंवा अष्टदिक्पाळ मंडप यांचा समावेश आहे. शेषशायीची मूर्ती तितकीशी आकर्षक नसली तरी त्या समोरील मंडपातील नाजुक व सुंदर कोरीव काम आणि जैन तीर्थंकर पाहण्यासारखे आहे. नवग्रह मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना. या व्यतिरिक्त देवालयाच्या आवारातील लहान लहान मंदिरापैकी मुख्य म्हणजे दत्तात्रय, हरिहरेश्वर, मुक्तेश्वरी, विठोबा, काशीविश्वेश्वर, राम, राधाकृष्ण, शनी, तुळजाभवानी, महादेव इत्यादी मंदिरे.
श्री महालक्ष्मी देवालयात येण्यासाठी चार प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी मुख्य प्रवेशद्वार महाद्वार पश्चिमेला असून त्याच्यावर नगारखाना आहे. देवालयाच्या उत्तरेला काशी व मणिकर्णिका ही दोन तीर्थे आहेत. आवारात बाजूला दीपमाळांचा छोटा समूह असून दोन आधुनिक प्रकारची पाण्याची कारंजी आहेत. उत्तरेकडील प्रवेश द्वारावर एक मोठी घंटा वाजविली जाते. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या व मोठ्या घंटांमध्ये या घंटेचा समावेश होतो. या घंटेचा निनाद चार पाच मैलाच्या परिसरात घुमतो. दर पौष महिन्यामध्ये सायंसूर्यकिरणोत्सव साजरा केला जातो. या तीन दिवसाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी ठराविक वेळ सूर्यकिरण हे मंदिरात शिरुन श्री महालक्ष्मीचे मुखावर पडतात व काही वेळातच नाहीसे होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य देवालय व त्या समोरील गरुड मंडप दोन्ही मिळून महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुमारे १५० फूट आच्छादित बांधकाम आहे. मंदिरा सभोवती व पश्चिमेला अनेक घरे आहेत. या तीन दिवसाखेरीज वर्षात केव्हाही देवीच्या मुखावर सूर्यकिरणे पडत नाहीत.

नृसिंहवाडी



कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. नृसिंहवाडी म्हणजे दत्तसंप्रदायची राजधानीच. कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावर कृष्णा आणि पंचगंगेच्या पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे.
श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून, त्यांच्या स्वयंभू पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते. श्री दत्तगुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व त्यांनीच हा परिसर सुफल करून सोडला.
नृसिंहवाडीचे क्षेत्र कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरले आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजारापर्यंत आहे. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम असे मंदिर आहे. मंदिरातच स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
सांप्रत उभे असलेले मंदिर विजापूरला अदिलशहा या मुसलमान बादशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून बादशहा नृसिंहवाडीस आला. त्याने श्री गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते. सध्या उभे असलेले श्री गुरुमंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही, तर लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट व कृष्णा नदी संथ वाहत आहे.मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यात पादुकांचे पूजन करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी येथे आसनस्थ होऊन पूर्जा-अर्चा करतात, त्यांच्या एका बाजूला श्रीगणेशाची भव्य मूर्ती स्थापिली असून तिचीही पूजा होते.
या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंनी उंच व विस्तृत खांब आहेत.

पंढरपूर


गेली शेकडो वर्षे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या हृदयात अनेक पिढ्या सर्वोच्च श्रद्धास्थान बनून असलेलं हे तीर्थस्थान वारकरी संप्रदायाचं आणि संत महंतांचं आदिदैवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक संतकवीने पंढरपूर आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचा अगाध महिमा मोठ्या भक्तीभावाने वर्णन केला आहे. `माझे माहेर पंढरी', `तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल' अशा समर्पित भावनेने लिहिलेले असंख्य अभंग म्हणजे मराठी भाषेतील उत्कट भावकाव्य होय.चंद्रभागेकाठी असलेल्या या तीर्थस्थानी विठ्ठल व रूक्मिणीची भव्य प्राचीन मंदिरे आहेत. अलिकडे भक्तांची वर्दळ लक्षात घेऊन मंदिरात दर्शनार्थीसाठी अनेक सोयी केल्या आहेत. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे फार मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र व कर्नाटकातील लक्षावधी वारकरी दिंड्या व पालख्या घेऊन या यात्रेस पायी येतात.मोठं तीर्थस्थान असल्याने या क्षेत्री असंख्य देवालये व मठ आहेत. लक्ष्मी, पुंडलिक, विष्णुपद, त्र्यंबकेश्वर, मल्लिकार्जून, श्रीराम, अंबाबाई, नामदेव यांची प्रेक्षणीय मंदिरे आहेत. अनेक संत सत्पुरूषांच्या समाध्या पंढरपूरच्या परिसरात विराजमान आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच नामदेवाची पायरी आहे. संत जनाबाईचं घर असलेलं गोपाळपुरा हे स्थानही प्रेक्षणीय आहे.पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान असून या स्थानाचे महात्म्य महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात दूरवर पसरलेले आहे

शनि-शिंगणापूर


अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्नला परिचित आहे. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे.या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचिलित आहेत. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे ३००० असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते.अगदी जगावेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दुरून दर्शन घेता येते. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. शनि अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनि जयंतीस (वैशाळी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो.

शेगाव

शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा व अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे संत महाराष्ट्राच्या घराघरातून पूजिले जातात. अक्कलकोट स्वामींप्रमाणेच श्री गजानन महाराजांचा पूर्वेतिहास अजून पूर्णतया ज्ञात नाही. १८७८ च्या सुमारास ते वऱ्हाडातील शेगाव नावाच्या एका लहानशा गावात प्रगटले व इ.स. १९१० ला त्यांनी शेगाव येथेच समाधी घेतली.श्री गजानन महाराज हे विदेही, दिगंबर वृत्तीचे आणि सिद्धकोटीला पोहचलेले संत होते. त्यांच्या वास्तव्याने व चमत्कारांमुळे शेगाव व त्या भोवतालच्या परिसरातसर्वसामान्य भक्तजनांचे कल्याण झाले. श्री गजानन महाराजांनी ज्या ठिकाणी देह ठेवला तेथेच त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले असून या ठिकाणी भक्तांची सदैव ओघ वाहतो.जवळपास ३२ वर्षे श्री गजानन महाराजांचे वास्तव्य शेगाव येथे होते. येथील समाधीस्थानाची सर्व व्यवस्था ट्र्स्टतर्फे पाहिली जाते. या ट्न्स्टतर्फेच येथे अनेक लोकोपयोगी व शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात. भक्तांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही केली जाते.
समाधी मंदिराशिवाय श्री गजानन महाराजांच्या जिवितकार्याशी निगडित अनेक दर्शनीय स्थाने शेगावच्या परिसरात आहेत.

शिर्डी


संतश्रेष्ठ श्रीसाईबाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात कोपरगावपासून सुमारे १५ कि. मी. अंतरावर आहे. संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यांचे नाव सदैव घेतले जाते असे लोकप्रिय संत सिद्ध साक्षात्कारी आणि विदेही होते. विशेष म्हणजे सर्व धर्मातील लोक श्रीसाईबाबा यांना पूजनीय व वंदनीय मानतात. श्रीसाईबाबांचे पूर्वायुष्यही फारसे ज्ञात नाही. तर्कानेच ते वर्णन करून सांगितले जाते. नाव, जात, धर्म यांचा थांग नसलेले हे संत एक चमत्कारी सत्पुरूष होते व त्यांच्या मनुष्यप्रेमी स्वभावामुळे ते लोकप्रिय ठरले.
शिर्डीला भक्तांची रोजच हजारोंच्या संख्येने गर्दी लोटते. शिर्डी इतकी लोकप्रियता इतर अन्य कोणत्याही स्थानाला क्वचितच असावी. गुरूवारच्या दिवशी तसेच रामनवमी व गुरू पौर्णिमा या दिवशी शिर्डीला भक्तमंडळीची दूरदूरहून गर्दी लोटते

महाबळेश्वर


सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील सदाबहार निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंर्टस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंर्ट, आर्थर सीट पॉइंर्ट, लॉडनिग पॉइंर्ट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.महाबळेश्वराच्या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.येथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.

पेच प्रकल्प-पं. नेहरू नॅशनल पार्क

नागपूर जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी जणू आनंदाची पर्वणीच आहे. पेच नदीच्या दुतर्फा पसरलेले हे अभयारण्य म्हणजे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील अभयारण्याचे क्षेत्र २५८ चौ. कि. मी. आहे तर संयुक्त प्रकल्पाचे क्षेत्र मात्र खूपच विस्तृत म्हणजे सुमारे १००० चौ. कि. मी. आहे.
पेच अभायरण्याचा विस्तार प्रचंड असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांची संख्याही मोठी असून त्यांच्या संचारक्षेत्राची व्याप्तीही मोठी आहे. या अभयारण्यातील तोतला डोह, राणी डोह, सिल्लारी याठिकाणी वनखात्याचे विश्रामधाम आहेत. प्रवासाठी पक्के रस्ते आहेत. अभयारण्यातील प्रदेश पहाडी आहे. सातपुडा पर्वताचे डोंगर या अभयारण्यात येतात. नयनरम्य निसर्ग, विपुल वृक्षसंपदा मुबलक वन्यप्राणी व पर्यटकांना फेरफटका मारण्यासाठी उत्तम रस्ते हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. वाघ, बिबटे, गवे, सांबर, चितळ आदि वन्य प्राण्यांचे सहज दर्शन या ठिकाणी जागोजाग असलेल्या पाणवठ्यांच्या काठी होते.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून सुमारे ६० कि. मी. अंतरावर या अभयारण्याची हद्द सुरू होते.

सागरेश्वर

कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. याठिकाणी सुमारे सात-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात अदमासे ५१ मंदिरं असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. याशिवाय इतरही अन्य देवदवतांची मंदिरं आहेत.
सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ५-६ चौ. कि. मी. इतकाच असला तरी हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटते. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे.सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.

ताडोबा


विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील हे अतिशय मशहूर पर्यटन स्थळ आहे. राज्यातील हे सर्वात जुने अभयारण्य असून त्याचा विस्तार सुमारे ११६ चौ. कि. मी. जंगलात आहे. हे जंगल पुन्हा अतिशय विस्तृत अशा अंधारी या सुमारे ५०० चौ. कि. मी. क्षेत्र असलेल्या या अभयारण्यास जोडलेले आहे.
या अभयारण्याच्या मधोमध अतिशय सुंदर भव्य तलाव आहे. या तलावाभोवती लहानमोठ्या टेकड्या असून त्यावर घनदाट जंगल आहे. गवा आणि मगर हे या अभयारण्याचे मुख्य आकर्षण आहे. उन्हाळयाच्या दिवसात मध्यवर्ती तलावाभोवती रान गव्यांचे कळप जमा झालेले दिसतात. त्याखेरीज वाघ, बिबटे, चितळ, सांबर, कोल्हे, अस्वल, रानडुक्करं आदि वन्यप्राणीही या जंगलात आढळतात. माकडं, रानमांजरं, नीलगाय आदि प्राणीही येथे मुक्तपणे संचार करतात.वन्यप्राणी जवळून पाहता यावेत म्हणून अभयारण्यात जागोजाग उंच मचाण बांधण्यात आले आहेत. विविध जातीचे पक्षी आणि वृक्षांची येथे रेलचेल आहे.

वेरूळ

औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावर ही जगप्रसिद्ध लेणी आहेत. या परिसरात एकूण ३४ गुंफा आहेत. सह्याद्रीच्या सातमळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात कोरलेल्या या लेण्यांचे खोदकाम पाचव्या ते आठव्या शतकात पूर्ण झाले असावे तसा तज्ज्ञांचा अंदाज आहे. येथील प्रमुख ३४ गुंफापैकी १७ गुंफा हिंदु शैलीच्या आहेत, १२ बौद्ध पंथाच्या तर ५ जैन पंथिंयाचा प्रभाव असलेल्या आहेत. अलिकडच्या काळात आणखी २२ गुंफांचा शोध लागला असून त्यावर शैव संपद्रायाचा प्रभाव आहे.

या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसच होय. `आधी कळस, मग माया' ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे.
भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारं इतकं अप्रतिम आणि जिवंत आहे की ही लेणी पाहताना माणूस हतबद्ध होतो. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. हे लेणं इतकं विस्तृत आहे की ते पाहतानाच वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.
दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य, विहार आणि स्तूप असून स्तुपात बैठी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा जैन पंथियांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे. एम. टी. डी. सी. नेहमी मार्च महिन्याच्या सुमारास येथे एलोरा समारोह आयोजित करते. त्यात देशातील प्रसिद्ध कलावंतांचे संगीत-नृत्याच्या मैफिली आयोजल्या जातात. पर्यटकांच्या दृष्टीने हा एक आनंदमेळाच असतो.

पावस



सोहम साधनेचा पुरस्कार करून लोकोद्धार करणारे स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून अवघ्या २० कि. मी. अंतरावर आहे. या ठिकाणी स्वामीजींचे समाधी मंदिर आहे. स्वामी स्वरूपानंदांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार भक्तांपर्यन्त सुबोधणे पोहचविला. त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या हिताबद्दलची तळमळ आणि साधेपणा यामुळे त्यांचा भक्त परिवार फार मोठा आहे. त्यांच्या भक्तमंडळींनी `स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ' हा ट्र्स्ट स्थापन करून स्वामीजींच्या विचार व कार्याचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले आहे.
पावस येथे येणाऱ्या भक्तांसाठी मंडळातर्फे अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. श्री स्वामी मंदिर, उत्सव मंडप, भक्त निवास, आध्यात्मिक मंदिर आदि प्रकल्प या मंडळाने प्रत्यक्षात आणले आहेत. स्वामीजींनी लिहिलेल्या ग्रंथांचं प्रकाशनही मंडळातर्फे केले जाते. ज्या निवासात स्वामीजींनी सतत चाळीस वर्षे वास्तव्य केले ते अनंत निवास भक्त मंडळाने श्रद्धापूर्वक जतन करून ठेवलेले आहे. मंडळातर्फे ग्रंथ पारायण, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत तसेच भक्तांना भोजन व प्रसाद असे उपक्रम राबविले जातात. मंदिराच्या आवारात एका आवळीच्या झाडातून एक स्वयंभू गणपतीही प्रकट झाला आहे. येथे विश्वेश्वर व सोमेश्वर मंदिरे आहेत.

रम्य समुद्रकिनारे आणि अपूर्व खाद्ययात्रा- रत्नागिरी


थिबा पॅलेस, राजापूरची गंगा, हेदवीचं गणेशमंदिर, हर्णे-गणपतीपुळे-वेळणेश्वरचे किनारे... असं सारं रत्नागिरी जिल्ह्यात भटकताना पाहायलाच हवं.रत्नागिरी म्हणजे कोकणचं वेगळं वैभव. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांशी रत्नागिरीचं नाव कायमचं जोडलं गेलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातच अनेकांचं श्रद्धास्थान असणारं गणपतीपुळ्याचं गणेशमंदिर आहे. हेदवी इथला दशभुज लक्ष्मीगणेश आणि चिपळूणपासून 13 किलोमीटरवर असणारा परशुराम गणेश तसंच आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती यांना मानणाऱ्या भाविकांची संख्याही कमी नाही. राजापूरची गंगा पाहायची तर त्यासाठीही रत्नागिरी जिल्ह्यात भटकंती करायला हवी. याखेरीज डेरवणची शिवसृष्टी, गुहागर, दिवेआगर यांसारखे समुद्रकिनारे यांनीही रत्नागिरी जिल्हा समृद्ध केलेला आहे. श्री.ना.पेंडसे, चि.त्र्यं.खानोलकर यांच्यासारख्या लेखकांनी शब्दरुपातून मांडलेला कोकणचा हा परिसर म्हणजे "थकल्या मनांना ताजवा देणारी, हिमाचल प्रदेश आणि केरळ इतकंच निसर्गसौंदर्य असणारी देवभूमी' आहे. हिचा उल्लेख "परशुरामभूमी' असाही केला जातो. रत्नागिरीपासून अगदी जवळ म्हणजे अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर रत्नदुर्ग हा किल्ला आहे. रत्नदुर्ग हा जलदुर्गात मोडणारा किल्ला. पूर्वी हा किल्ला पूर्णपणे पाण्यात होता. आता हा किल्ला रत्नागिरी शहराशी जोडला गेलेला आहे. बहामनी काळात उभारल्या गेलेल्या या किल्ल्याला एकूण 27 बुरूज होते. आता त्यापैकी 7 बुरुज आणि तटबंदी शिल्लक आहे. सध्या या किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर, दीपगृह आणि काही घरं आहेत. या किल्ल्यावर जिचं मंदिर आहे ती भगवती म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची बहीण आणि तिने महालक्ष्मीच्या सूचनेवरून रत्नासुराचा पाडाव केला व ती कायमस्वरुपी रत्नदुर्ग किल्ल्यावर राहाण्यासाठी आली, अशी आख्यायिका आहे. या देवीची स्वयंभू मूर्ती अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र, ढाल, तलवार अशी आयुधं आहेत आणि देवी महिषासुरावर बसलेली आहे. दरवर्षी नवरात्र आणि शिमगा यावेळी मंदिरात उत्सव असतो. रत्नागिरी शहराला भेट देत असताना लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पतितपावन मंदिर आणि थिबा पॅलेसला भेट द्यावी. थिबा पॅलेसची बांधणी 1910-11 मध्ये करण्यात आली. आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रम्हदेशच्या थिबा नावाच्या राजासाठी बांधण्यात आलेला राजवाडा म्हणून या राजवाड्याला "थिबा पॅलेस' या नावाने ओळखण्यात येतं. 1916 पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं आणि अगदी अलीकडेपर्यंत त्यांची मुलगीही राहात होती. आता मात्र हा राजवाडा एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय किंवा "हेरीटेज हॉटेल' बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सागरी जीव संशोधनात रस असणाऱ्यांनी रत्नागिरीतील "मरीन बायॉलॉजिकल रिसर्च स्टेशन'ला भेट द्यावी. सध्या हे केंद्र दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाशी जोडलेलं आहे. या ठिकाणी एक छान मत्स्यालय/संग्रहालय पाहायला मिळू शकतं. गणेशभक्तांचं श्रद्धास्थान गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून 40 कि.मी. अंतरावर असलेलं श्रीगणेशाचं स्वयंभू स्थान. या ठिकाणच्या 300 फूट उंचीच्या संपूर्ण टेकडीलाच गणपती मानण्यात येतं. येथील मंदिर सुमारे 400 वर्षांपूर्वीचं आहे. देवळाला प्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण टेकडीला प्रदक्षिणा घालावी लागते. गणपतीपुळे येथील देवतेला पश्‍चिमद्वार देवता म्हणून ओळखण्यात येतं. इथे दर संकष्टीला आणि अंगारकी संकष्टीलाही मोठी गर्दी असते. इथला समुद्रकिनारा रमणीय तसंच राहण्याची वेगवेगळ्या प्रकारची सोयही इथे उपलब्ध आहे. गणपतीपुळ्यापासून अवघ्या 1 कि.मी. अंतरावर असणारं मालगुंड म्हणजे ख्यातनाम मराठी कवी केशवसुत यांचं जन्मस्थान. मालगुंड येथील केशवसुतांच्या घरी आता त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. गणपतीपुळ्यापासून साधारण 35 कि.मी. अंतरावर जयगड हा किल्ला आहे. 17 व्या शतकात या किल्ल्याची उभारणी करण्यात आलेली आहे. गणपतीपुळ्याप्रमाणेच रत्नागिरीपासून 22 कि.मी. अंतरावर असणाऱ्या पावस गावाजवळ गणपतीगुळे हे गणेशाचं स्थान आहे. पावस येथे स्वामी स्वरुपानंदांचा आश्रम आहे आणि तिथे कायम भाविकांची गर्दी असते; तर गणपतीगुळे येथील गणपतीला गलबतवाल्यांचा गणपती म्हणूनही ओळखलं जातं. संकटाच्यावेळी 11 फूट उंचीची शिळा जहाजातील कर्मचाऱ्यांनी गणपती म्हणून पूजली आणि त्यांच्यावरचं संकट दूर झालं, तेव्हापासून गलबतवाल्यांच्या स्वयंभू दक्षिणाभिमुख गणेशावर अनेकांची श्रद्धा निर्माण झाली, असं सांगतात. प्राचीन मंदिरांनी समृद्ध भाग रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण या गावाला पूर्वी स्वत:ची अशी ओळख नव्हती. पण या गावातील विठ्ठलराव गणेश जोशी तथा दिगंबरदास महाराज यांनी या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. जोशी यांनीच समर्थ रामदास यांचं स्मारकही उभारलं आहे. डेरवणमध्ये उभारण्यात आलेल्या शिवसमर्थगडाची रचना एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणेच करण्यात आली आहे. चिपळूणपासून अवघ्या 3 किलोमीटरवर आहे परशुरामाचं मंदिर. डोंगरात असलेल्या या मंदिरामध्ये काम - परशुराम आणि काळ यांच्या मूर्ती आहेत. काहीजण त्यांना ब्रह्मा- विष्णू-महेश यांचे अवतार मानतात. भगवान विष्णूंचा सहावा अवतार म्हणून भगवान परशुराम यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनीच कोकणाची निर्मिती समुद्रात एकेठिकाणी बाण मारून केली, असं सांगितलं जातं. हे हिंदू मंदिर असलं तरी त्यासाठी पैसे जंजिऱ्याच्या सिद्धीने दिले होते आणि पोर्तुगीज कारागीरांनी मंदिर बांधलं असं सांगतात. त्यामुळे या मंदिराचा घुमट चर्चसारखा आहे तर गिलावा मुस्लिम पद्धतीने केलेला आहे. परशुराम मंदिरापासून जवळच रेणुकामंदिर आणि बाणगंगा तीर्थकुंड आहे. अक्षयतृतीयेला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. खुद्द चिपळूण शहराच्या रावतळे भागात विंध्यवासिनीची अष्टभूजा मूर्ती असणारं मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात सहा मुखांच्या कार्तिकेयाचीही मूर्ती आहे. चिपळूणच्याच उत्तरेला नागेश्‍वर लेणी आहेत. चिपळूणला गेलेला माणूस संगमेश्‍वरला गेला नाही, असं होत नाही. संगमेश्‍वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. याच ठिकाणी मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केलं होतं. कसबा संगमेश्‍वर या गावातील मंदिरं कलात्मक शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. शास्त्री व अलकनंदा नद्यांच्या संगमावर संगमेश्‍वराचं मंदिर आहे. याखेरीज याच परिसरातल्या आरवली, बोळीवली व राजवाडीमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. गुहागर हे रायगड जिल्ह्यात असलं तरी चिपळूणपासून आहे अवघ्या 44 कि.मी. अंतरावर. इथे प्रसिद्ध व्याडेश्‍वर मंदिर आहे. पायी भटकत फिरण्याची आवड असलेल्या मंडळींनी येथून अंजनवेलपर्यंत बसने जाऊन गोपाळगड परिसरात पदभ्रमंती करायला हरकत नाही. गुहागरच्याच दक्षिणेला 25 कि.मी. अंतरावर वेळणेश्‍वर हे शास्त्री नदीच्या तीरावरचं गाव आहे. येथील प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. गुहागरपासून 18 किलोमीटरवर "हेदवी' हे गणेशाचं स्थान. इथल्या मंदिरात गणपतीची संगमरवरी दशभुज मूर्ती आहे. गळ्यात नाग असलेल्या या दशभुज गणेशाची स्थापना केळकर स्वामींनी केली आहे. या मंदिरात माघी चतुर्थीला उत्सव असतो. हेदवीच्या किनाऱ्यावर उमामहेश्‍वरचं एक मंदिरही आहे. दर तीन वर्षांनी प्रकटणारी गंगा हे राजापूरचं वेगळं आकर्षण असल्याचं सांगतात. राजापूरपासून जवळच उन्हाळे या गावी कायमस्वरुपी गरम पाण्याचे झरे आहेत. आणि हो, राजापुरातलं धूतपापेश्वराचं मंदिर तर अगदी वेळ काढून, आवर्जून पाहण्याजोगं आहे. लोभस निसर्ग आणि ताजे मासेही... दापोली तालुक्‍यात हर्णे हे निसर्गरम्य बंदर आणि सुंदर समुद्रकिनारा असणारं गाव आहे. इथला निसर्ग नि निवांतपणा अनुभवण्यासाठी राहावंसं वाटतं. इथे स्थानिक लोकांनी सुपारीच्या बागांमध्ये छोट्या झोपड्या बांधून ही हौस भागवायची सोय केली आहे. येथून जवळच आहे सुवर्णदुर्ग हा भुईकोट कम जलदुर्ग. इथून "तरी'ने जोग नदी ओलांडली की आंजर्ले हे गाव लागतं. इथे कड्यावरती चढून गणपती मंदिराला भेट द्यावी लागते. पन्हाळी काजीच्या लेण्यांना भेट द्यायची असली किंवा केळशी गावातील गणेशमंदिर, वेळासमधील रामेश्‍वर मंदिर, हिम्मतगड पाहायचा असेल तर त्यासाठी हर्णे येथून जाता येतं. इथून जवळच आहे मुरुड. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं जन्मस्थळ. इथे त्यांचं स्मारकही आहे. या ठिकाणाला लाभलेल्या स्वच्छ, सुंदर किनाऱ्यामुळे, नारळी-पोफळींनी सजलेल्या सृष्टीमुळे इथे भटकायला मजा येते. या ठिकाणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचं काम चालू आहे. लाकडावरील अप्रतीम कोरीव काम असलेल्या इथल्या पुरातन दुर्गा मंदिरात शारदोत्सव, वसंतोत्सव साजरे केले जातात. कोकणात मिळतात माशांचे विविध प्रकार... पण शाकाहारी माणसांनाही सोलकढी, भाजणीचं थालीपीठ व वडे, घावन, हळदीच्या पानावरचे पातोळे, सांजणं, डाळिंब्यांची उसळ, मौसमानुसार गेलात तर ओल्या काजुगराची उसळ, उकडीचे मोदक अशा प्रकारचे पदार्थ चाखता येतात. समुद्रकिनारी बसून भरलेली पापलेटं, खेकडे, शिंपले (तिसऱ्या) खाणं याचा एक वेगळा आनंद असतो. याखेरीज गोडसर शेवकांडं तसंच कोकम, आंब्यांचा त्या-त्या हंगामात पर्यटक आस्वाद घेऊ शकतात. घरचा पाहुणचार अनुभवताना कोलंबीचं भुजणं, तांदळाची भाकरी आणि खूपसा भात हे कॉंबिनेशन एकदा खाल्लं की चोखंदळ पर्यटकांना तृप्तीची अशी काही ढेकर येते की......बस्स्‌!

लालमाती, गडदुर्ग, सागराची गाज, मासेही- सिंधुदुर्ग


सिंधुदुर्ग जिल्ह्यात भटकायचं तर आंबोली, कणकवली, कुणकेश्‍वर, तारकर्ली, पत्रादेवी, परुळे, पोंभुर्ले, बांदा, माणगाव, मालवण, मोचेमाड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, शिरोडा, सावंतवाडी अशी अनेक ठिकाणं खुणावायला लागतात.महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटला भेट दिली की महाभ्रमण योजनेंतर्गत महामंडळाने तयार केलेली पर्यटनाची 51 पॅकेजेस समोर येतात. खाजगी टूर ऑपरेटर्सना बरोबर घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटनाचेही वेगवेगळे प्रकार आहेत. पर्यावरणाशी मैत्री करणारं पर्यटन, साहसी पर्यटन, ग्रामीण, कृषी पर्यटन, गडकिल्ल्यांचं पर्यटन, सागरी किनाऱ्यांचं पर्यटन अशा वेगवेगळ्या पॅकेजेसपैकी झटकन लक्ष वेधून घेतात त्या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील पर्यटनासाठीच्या वेगवेगळ्या योजना. लाल दगडाची कौलारू घरं, सडा टाकून स्वच्छ व टापटीप ठेवलेलं अंगण, घरांमधूनच वाट काढणारी, लाल मातीने न्हालेली पायवाट, सतत ऐकू येणारी समुद्राची गाज, समुद्राच्या लाटा अंगावर झेलत दिमाखात उभे असणारे जलदुर्ग, नाखव्यांच्या लाटांवर हेलकावणाऱ्या होड्या आणि सोलकढीसोबत माशांचे निरनिराळे खाद्यपदार्थ... या गोष्टींचा मोह पडणार नाही असा माणूस विरळाच! सिंधुदुर्ग जिल्ह्यात भटकायचं तर आंबोली, कणकवली, कुणकेश्‍वर, तारकर्ली, पत्रादेवी, परुळे, पोंभुर्ले, बांदा, माणगाव, मालवण, मोचेमाड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, शिरोडा, सावंतवाडी अशी अनेक ठिकाणं खुणावायला लागतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय पूर्वी ओरोस इथे होतं, आता सिडकोने सिंधुदुर्गनगरी या वसाहतीचा विकास केला आहे. सिंधुदुर्गनगरीच्या मध्यभागी 7 हेक्‍टरमध्ये पसरलेलं एक उद्यान आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयं सिंधुदुर्गनगरीमध्येच आहेत. भव्य किल्ला महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर सावंतवाडीपासून 37 कि.मी. अंतरावर तेरेखोल इथे एक किल्ला आहे. किल्ला गोवा राज्यात असला तरी तिथे जाण्याचा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातो. तेरेखोल किल्ल्याची बांधणी 18 व्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांनी केली. महाराष्ट्रातील किल्ल्यांपेक्षा दिसायला थोड्याशा वेगळ्या असणाऱ्या या किल्ल्यातून गोव्याच्या निसर्गसमृद्ध किनाऱ्याचं छान दर्शन घडतं. या किल्ल्यात सध्या एक रिसॉर्ट उभारण्यात आलं आहे. सावंतवाडीतून तेरेखोलला जायला बसेस आहेत आणि किल्ल्यातच रिसॉर्ट असल्यामुळे खाण्यापिण्याची अडचण येण्याचाही प्रश्‍न नाही. साहजिकच सिंधुदुर्ग किल्ला पहायला येणाऱ्यांनी रेडीतील गणपती मंदिर पाहावं, लोहखनिज म्हणून रेडी बंदरातून वर्षानुवर्ष निर्यात होत असलेल्या मौल्यवान खनिजाविषयी जाणून घ्यावं आणि तेरेखोललाही भेट द्यावी. सावंतवाडी हे मूळचं संस्थान. सावंतवाडीत मोती तलाव, नरेंद्र डोंगर, पुरातन विठ्ठल मंदिर अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहाण्यासारख्या आहेत. विशेष म्हणजे सावंतवाडीत रंगीत लाकडी खेळणी चांगली मिळतात. सिंधुदुर्ग हा मालवणच्या परिसरात छत्रपती शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग. 48 एकर इतकं क्षेत्र व्यापलेल्या या किल्ल्यात छत्रपती शिवरायांच्या हाताचे व पावलांचे ठसे आहेत, असं सांगण्यात येतं. या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेलं शिवरायांचं मंदिरही आहे. सिंधुदुर्गला भेट देणारे मालवणच्या काजू कारखान्याला व देवबाग येथील समुद्रकिनाऱ्यालाही भेट देऊ शकतात. देवबागच्या किनाऱ्यावर असणारं खारफुटीचं जंगल कमी झालं आणि गेल्या काही वर्षांपासून समुद्र देवबागच्या किनाऱ्यावर आक्रमण करतो आहे. त्यामुळे येथील लोक चिंतेत आहेत. पुण्यापासून या परिसराचं अंतर साधारण 400 कि.मी. आहे तर कोल्हापूरपासून 150 ते 160 कि.मी. निळ्याशार समुद्राची अनुभूती मालवणपासून दक्षिणेला 6 कि.मी. अंतरावर आहे तारकर्ली हा समुद्रकिनारा. अतिशय लांब- रुंद असा हा किनारा आणि स्वच्छ पाणी. अगदी 20 फुटांपर्यंतचा सागरतळही या किनाऱ्यावरून स्वच्छ दिसू शकतो. कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांची भेट तारकर्ली परिसरात होते. फेसाळणाऱ्या निळ्या पाण्याचा नितळ समुद्रकिनारा ही तारकर्लीची खरी ओळख. या किनाऱ्याला खेटून असणाऱ्या सुरुच्या उंच झाडांमध्येच राज्य पर्यटन विकास महामंडळाने निवासव्यवस्था केली आहे. तिथे नव्याने उभारण्यात आलेली बांबू हाऊस हे बोटीच्या आकाराची आहेत. याखेरीज या ठिकाणी वातानुकुलीत हाऊसबोटही उपलब्ध आहेत. स्कूबा ड्रायव्हिगंचा आनंद लुटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्नॉर्कलिंग व स्कूबा ड्रायव्हिंगमुळे पर्यटक समुद्रात एक-दोन मीटर खोल जाऊन तेथील जैवविविधता पाहू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि प्रवाळ यांच्या जवळून दर्शनाने वेगळाच थरार अनुभवता येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मरीन पार्क करण्याची शासनाची कल्पना आहे. मालवण परिसरात असलेल्या सागरी अभयारण्यात सागरी कासव, कोरल, डॉल्फिन मासे, स्टारफिश, बटरप्लाय फिश असे जवळपास 350 प्रकारचे जलचर आढळतात. या परिसरात सागरी द्राक्षं, समुद्रकमळ, शेवाळ, प्रवाळ, गेलीडेरिला, ग्रॅसिलेरिया अशा जलवनस्पतींचं दर्शन घडू शकतं. तारकर्लीचं एक्‍सटेंन्शन म्हणजेच देवबागचा किनारा. मालवणपासून साधारण 20 कि.मी. अंतरावर धामापूर तलाव आहे. या तळ्यामध्ये जलक्रीडेची आणि नौकानयनाची वेगवेगळी साधनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मालवणपासूनच 15 कि. मी. अंतरावर आहे. वालावल हे कर्ली नदीच्या काठावरचं ठिकाण. तिन्ही बाजूला वनश्री आणि एका बाजूला कर्ली नदीची खाडी असं वालावल ठिकाण लक्ष्मी नारायणाच्या देवस्थानासाठीही प्रसिद्ध आहे. श्रीदेव रामेश्‍वराच्या भक्तांना आचरा हे गाव खुणावतं. येथील समुद्रकिनाराही खूप मोठा आणि आकर्षक आहे. मालवणपासून 15 कि.मी. अंतरावरती मसूरे इथे भराडीदेवीचं मंदिर आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी यात्रा भरते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मोचेमाड हे निसर्गसौंदर्याची उधळण असणारं गाव. या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर केवड्याची बनं आहेत. या किनाऱ्यावर स्टारफिश मोठ्या प्रमाणावर आढळतात. सावंतवाडीपासून 35 कि.मी.वर असलेल्या मोचेमाड येथील दशावतारी या लोककलेचे कलाकार प्रसिद्ध आहेत. दशावतार पाहायला आणि समजून घ्यायला मोचेमाडला जायला हवं. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आणखी एक किल्ला. 27 बुरुज आणि तिहेरी तटबंदी असलेल्या या दुर्गाला पूर्वी "घेरीचा' असं म्हणत असत. पेशवाईच्या काळात कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराच्या दृष्टीने विजयदुर्ग हा एक महत्त्वाचा किल्ला होता. इ.स. 1897 मध्ये खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी लॉकिअर नावाच्या शास्त्रज्ञाने हेलिअम या वायूचा शोध विजयदुर्ग किल्ल्यावरच लावला. वाहोटणे खाडीतून विजयदुर्ग किल्ल्यावर जाता येतं किंवा मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण इथून तळेरे मार्गे बसने विजयदुर्गवर जाता येतं. शिरोडा या गावाला महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहामुळे आणि दिवंगत साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या 18 वर्ष वास्तव्यामुळे वेगळं महत्त्व प्राप्त झालं. येथील शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असतानाच खांडेकरांनी अनेक कथा- कादंबऱ्या लिहिल्या. शिरोड्यापासून जवळच असलेलं आरवली म्हणजे जयवंत दळवी यांचं मूळ गाव. वेंगुर्ला परिसरात भुईकोट किल्ला आहे तसंच फळ संशोधन केंद्रही आहे. रत्नागिरीचा आंबा इथेच विकसित करण्यात आला. दुसरीकडे कर्ली नदीच्या काठाने परुळे या गावी गेलं तर तिथे रवळनाथ, वेतोबा, आदिनारायण, गौरीनारायण अशा अनेक देखणी देवळं पहायला मिळतात. कोकणातलं पहिलं सूर्यमंदिर परुळे इथं उभारलं गेलं असं सांगण्यात येतं. लाटांचा ध्वनी ऐकावा इथेच! चि.त्र्यं. खानोलकरांच्या एका पुस्तकाचं नाव आहे "कोंडुरा.' खरं तर कोंडूरा हे वेंगुर्ल्याहून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या एका ठिकाणाचं नाव आहे. वेंगुर्ला ते मालवण या सागरी मार्गापासून 3-4 कि.मी. बाजूला असणारा कोंडुरा येथील समुद्रकिनारा नारळी पोफळीच्या बागांमध्ये लपलेला आहे. या समुद्रकिनाऱ्याला थोडीशी गूढपणाची छटा आहे. समुद्राच्या लाटांच्या धडकांनी खडकांमध्ये येथील किनाऱ्यावर काही विवरं निर्माण केली आहेत आणि लाटांच्या त्या विवरांवर आपटण्याने एक वेगळा आवाज येथे सतत कानावर पडत राहातो. सावंतवाडी तालुक्‍यात येतं आंबोली हे थंड हवेचं ठिकाण. याच परिसरात हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान आहे. हिवाळ्यात तसंच पावसाळ्यात येथील अद्‌भुत निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. याच सावंतवाडी तालुक्‍यातच पत्रादेवी इथे गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांचं स्मारक आहे तर इथून जवळच बांदा या ठिकाणी बांदेश्‍वर व रामेश्‍वराची मंदिरं आहेत. संत सोहिरोबानाथांचं स्थान अशीही बांद्याची ओळख आहे. पारगड हा किल्ला पाहायचा असेल तर तो बांद्यातून जवळ पडतो. पोंभुर्ले हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचं जन्मगाव तर देवगड तालुक्‍यातील कुणकेश्‍वर हे महादेवाचं मंदिर यादव राजांनी बांधलेलं. देवगडपासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या कुणकेश्‍वर मंदिराचा छत्रपती शिवरायांनी जीणोद्धार केला होता. पांडवही आपल्या अज्ञातवासाच्या काळात इथे येऊन राहिले होते अशी आख्यायिका आहे. कुणकेश्‍वर इथे येणारे पर्यटक लक्षात घेऊन पर्यटन विकास महामंडळाने तिथेही एक प्रकल्प हाती घेतला आहे. कोकण पर्यटन करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने जसे दरवर्षी वेगवेगळे महोत्सव आयोजित करण्यात येतात तशाच नवनव्या पॅकेज टूर आयोजित करण्यात येतात. स्थानिक माणसाला पर्यटकांकडून लाभ मिळावा, या दृष्टीने महामंडळाने मध्यंतरी निवास- न्याहारी योजना सुरू केली. या योजनेमुळे पर्यटकांना कमी खर्चात गावातील छान कौलारु घरांमध्ये राहता येतं आणि पर्यटकांच्या तिथे राहाण्या-जेवण्याने स्थानिक माणसाच्या खिशातही काही पैसे पडतात. कोकणात आणि विशेषत: सिंधुदुर्गात जायचं तर खाण्यापिण्यामध्ये वेगळे माशांचे विविध प्रकार असू शकतातच; पण शाकाहारी माणसांनाही सोलकढी, थालीपीठ ,घावन, उकडीचे मोदक अशा प्रकारचे पदार्थ चाखता येतात. या मालवणी खाद्याचा आस्वाद घेत कोकण अजूनच यादगार होतो हे नक्की.