Friday, November 14, 2008

तीर्थक्षेत्र आणि कलानगरी - कोल्हापूर


खिद्रापूर, आंबा घाट, पन्हाळा, ज्योतिबा...चटकदार मिसळ, झणझणीत तांबडा-पांढरा... कोल्हापुरातली भटकंती म्हटली की या साऱ्या गोष्टी आपसूकच आल्या!कोल्हापूरला एखादा माणूस आला आणि तो कोल्हापूरच्या प्रेमात पडला नाही असं होतच नाही. कला, संस्कृती, धार्मिक परंपरा, साहित्य परंपरा, मर्दानी खेळ आणि कुस्तीची परंपरा या सगळ्यांनी कोल्हापूर ओतप्रोत आहे. कोल्हापूरचा समृद्ध वारसा पाहायचा, समजून घ्यायचा आणि त्याचबरोबर दूध कट्ट्यावर उभं राहून काळ्याभोर म्हशीचं निरसं दूध प्यायचं, निव्वळ झणझणीत नव्हे तर वेगळ्याच, काळजात रुतणाऱ्या चवीची मिसळ खायची किंवा मनसोक्त तांबडा पांढरा रस्सा ओरपायचा तर आधुनिक नव्हे; गावरान कोल्हापूरशी दोस्ती करायला हवी. सहकाराचा अभ्यास करायचा किंवा वस्त्रोद्योगाचं गमक समजून घ्यायचं तरी कोल्हापूरला यायला हवं. कारण सहकारी तत्त्वावरचा पहिला बंधारा देशात शेतकऱ्यांनी पहिल्यांदा उभारला तो कोल्हापुरातील सांगरुळमध्ये आणि इचलकरंजीला तर महाराष्ट्रातील मॅंचेस्टर म्हणूनच ओळखलं जातं. चांदीच्या दागिन्यांची कलाकुसर पाहायची तर चांदीनगरी हुपरीमध्ये आणि आता आशियातील सर्वोत्कृष्ट हरितगृह पाहायचं तर त्यासाठीही शिरोळ तालुक्‍यातल्या कोंडीग्रे इथे जायला हवं नि श्रीवर्धन बायोटेक पाहायला हवं. भारतातील समतेच्या लढ्याविषयी बोलताना कोल्हापूर आणि राजर्षी शाहू महाराज यांची नावं घेतल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. काय काय पाहणार? काय काय समजून घेणार? आणि "कोल्हापुरीपण' किती स्वत:त भिनवणार हे तुम्हीच ठरवायचं! ऐतिहासिक शहर कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा हा केवळ राजर्षी शाहू महाराजांपासून किंवा 1000 च्या सुमारास कोल्हापूरवर राज्य करणाऱ्या शिलाहार राजांपासूनचा नाही, तर त्याही आधीपासूनचा आहे. कोल्हापूर शहराजवळून जी पंचगंगा नदी वाहते तिच्या काठावर 2000 वर्षांपूर्वी एक समृद्ध गाव होते याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. नदीकाठच्या टेकडीला ब्रह्मपुरी टेकडी म्हणून ओळखण्यात येतं. कालांतराने हा परिसर एका मोठ्या भूकंपात खचला आणि या परिसरातील सारी वसाहत जमिनीत गाडली गेली. इ. स. 106 ते 130 या कालावधीत सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी म्हणजे सातवाहनाचं राज्य दक्षिणेत असताना पंचगंगा नदीच्या काठावर विटांच्या सुंदर बांधणीचं एक गाव होतं. व्यापार व संस्कृतीच्या दृष्टीने या गावाचा रोमन जगाशी चांगला संबंध होता. रोममधून आणलेल्या काही वस्तू, नाणी तसंच धातूच्या भांड्यांचं अनुकरण केलेल्या काही वस्तू आणि समुद्रदेवतेचा एक पुतळाही या टेकडीच्या उत्खननात आढळला. या वस्तू अजूनही कोल्हापुरातील "टाऊन हॉल' येथील पुरातत्त्व वस्तू संग्रहालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कोल्हापुरात न्यू पॅलेस इथेही एक म्युझियम आहे. तिथे कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास, त्यांची राहण्याची शैली, त्यांनी केलेल्या शिकारी, कोल्हापुरातील चित्रकारांच्या कलाकृती असं खूप काही पाहायला मिळू शकतं. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कोल्हापूरचं अत्यंत महत्त्वाचं असं योगदान राहिलं आहे पण ते दुर्लक्षित आहे, विशेषत: कोल्हापुरात फिरंगोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 1857 मध्ये झालेलं स्वातंत्र्ययुद्ध आणि त्याला चिमासाहेब महाराजांकडून मिळालेली प्रेरणा! कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि भवानी मंडप पाहाताना हा इतिहास समजून घ्यायला हवा, मनात जागवायला हवा. चित्रनगरी कोल्हापूरला "समतेची पंढरी' म्हणून महत्त्व आलं ते राजर्षी शाहू महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजामुळे. राजर्षी शाहूंनी जशा शेतिक्षेत्रात सुधारणा घडविल्या, राधानगरीसारखं धरण उभारलं, सर्व जाती-जमातींसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आणि कोल्हापूर "कलापूर' बनावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले; त्याचप्रमाणे सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी देशात सर्वप्रथम आरक्षण विषयक कायदा आपल्या राज्यात लागू केला. क्रीडापरंपरेच्या जोपासनेसाठी राजर्षी शाहूंनी थेट परदेशातून मल्ल खेळाडूंना निमंत्रित केलं होतं. राजर्षी शाहूंनी राधानगरीसारखं जे धरण उभारलं ते आजही कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक वरदान आहे. 30-40 वर्षांपूर्वी उभारल्या गेलेल्या दूधगंगा नदीवरच्या काळम्मावाडी धरणाला आत्ताच गळती लागली आहे,पण राधानगरी भक्कम! याच राधानगरीला लागून आहे पूर्वीचं दाजीपूर आणि आताचं राधानगरी अभयारण्य. कोल्हापूरने भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया भक्कम करण्याचं काम केलं. भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, पहिला मराठी बोलपट, पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट, देशातील पहिला रंगीत चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न, पहिल्या भारतीय बोलपटाचा नायक हे सारं कोल्हापूरकरांनी चित्रपटसृष्टीला दिलं. कोल्हापुरात अगदी काल-परवापर्यंत शालिनी व जयप्रभा हे दोन स्टुडिओ दिमाखात उभे होते; आता मात्र त्या स्टुडिओंच्या परिसराने आपलं मूळ रूप हरवलंय आणि स्टुडिओही घटका-पळं मोजताहेत असं असलं तरी राजारामपुरीतील चंद्रकांत मांडरे कलादालन, महावीर उद्यानाच्या मागील बाजूस असणारं भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र अशा ठिकाणी भेट देऊन कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासाविषयी काही प्रमाणात जाणून घेता येऊ शकतं. दक्षिण काशी महालक्ष्मीचं स्थान म्हणून कोल्हापूर भाविकांना प्रिय आहे. दक्षिणेत तिरुपतीचं दर्शन घेतलं की लगेचच कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रेचं पुण्य मिळत नाही, अशी भाविकांची समजूत आहे. इ.स.च्या 6 व्या-7 व्या शतकात बांधणी झालेल्या महालक्ष्मी मंदिरात काळाच्या ओघात अनेक बदल झाले. त्यामुळे वेगवेगळ्या काळातील वास्तुशैली मंदिर आणि मंदिराच्या परिसरात पहायला मिळतात. नवरात्रोत्सवाच्या काळात महालक्ष्मी मंदिरात उत्सव असतो. कोल्हापूरपासून 12-15 किलोमीटरच्या अंतरात वाडी रत्नागिरी येथील केदारलिंग म्हणजेच जोतिबाचं देवस्थान. हेही महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचं श्रध्दास्थान आहे. कोल्हापुरातून बाहेर पडून जुन्या पुणे-बंगळूरु मार्गावरुन कागलच्या दिशेने निघालं की लगेचच उजव्या हाताला कणेरी हे ठिकाण आहे. या ठिकाणी शिवमंदिर आणि अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराजांचा मठ आहे. शिवरात्रीला कणेरी मठावर मोठी यात्रा भरते. अलीकडे ग्रामसंस्कृती, ग्रामीण जीवनशैली यांची पुढच्या पिढ्यांना ओळख व्हावी म्हणून कणेरी मठातर्फे एक वेगळा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जुन्या शैलीतील घरं व ग्रामीण शैलीचं दर्शन घडवणारं एक वेगळं गावच वसवण्यात आलं आहे. याखेरीज शिरोळ तालुक्‍यातील नृसिंहवाडी हे कोल्हापूरपासून 35 कि.मी. अंतरावर असणारं दत्ताचं देवस्थान हे दत्तभक्तांसाठीचं तीर्थस्थान आहे. नृसिंहवाडीपासून जवळच खिद्रापूर हे गाव आहे. येथील कोपेश्‍वर मंदिर हे "महाराष्ट्राचं खजुराहो' म्हणून ओळखण्यात येतं. हे मंदिर म्हणजे भारतातील वास्तुशिल्पाचा एक जबरदस्त नमुना आहे. शिलाहार वंशाचा राजा गंडरादित्य याच्या काळात कोपेश्‍वराच्या या मंदिराची उभारणी सुरू झाली असावी असं म्हणतात. खिद्रापूरसारख्या ठिकाणी असं मंदिर कोणी, कसं आणि का उभारलं असे प्रश्‍न मंदिर पाहणाऱ्याच्या मनात उभे राहतात. या मंदिराच्या रचनेत एक वेगळी भारून टाकणारी गूढता आहे. या मंदिराचं महत्त्व जाणून केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने ही वास्तू आपल्या ताब्यात घेतलेली आहे. जुलै, ऑगस्ट हे पावसाळ्याचे महिने वगळता एरवीच्या महिन्यात खिद्रापूरला भेट देऊन खिद्रापूरचं सौंदर्य अनुभवायलाच हवं! डोंगर दऱ्यांतून भटकंती कोल्हापुरातून सांगली-नृसिंहवाडीला जाण्याच्या रस्त्यावरच हातकणंगले हे तालुक्‍याचं ठिकाण आहे. हातकणंगले गावात पोहोचण्यापूर्वी 3 कि.मी. आधी डाव्या बाजूला एक रस्ता जातो. तो रस्ता आळते गावाच्या शेजारी असणाऱ्या डोंगराकडे जाणारा आहे आणि इथेच डोंगराच्या कुशीत रामलिंग हे स्थान आहे. बाहेर कितीही उन्हाळा असो येथील गुहेत सतत पाणी पाझरत असतं आणि त्या पाण्याचा गुहेतील शिवलिंगावर अभिषेक होत असतो. हातकणंगले बसस्थानकापासून उत्तरेला जाणारा रस्ता म्हणजे कुंभोजगिरीसारख्या जैनांच्या तीर्थस्थानाकडे जाणारा रस्ता. कुंभोजगिरी या तीर्थस्थानाला बाहुबली म्हणूनही ओळखतात. या ठिकाणी नव्याने तीर्थस्थळही विकसित करण्यात आलं आहे. गडकिल्ल्यांवर भटकंती करण्याची आवड असणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड, विशाळगड, गगनगड, सामानगड असे विविध किल्ले खुणावत असतात. पन्हाळा आणि गगनबावडा ही जशी गडाची ठिकाणं आहेत त्याचप्रमाणे थंड हवेची ठिकाणं म्हणूनही ती ओळखली जातात. कोल्हापूर जिल्ह्यात आंबोली, आंबा यासारखे परिसरही निसर्गरम्य आणि थंड हवेची ठिकाणं म्हणून प्रसिध्द आहेत. बेफाम पाऊस आणि भन्नाट वारा यांचा आगळा आनंद घ्यायचा तो पावसाळ्यात गगनबावडा, आंबोली, आंबा अशा ठिकाणीच! कोल्हापूर जिल्ह्यात चांदोली आणि राधानगरी या दोन अभयारण्यांचं क्षेत्र येतं. यापैकी राधानगरी अभयारण्य हे गव्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात गव्यांचं दर्शन तर घडतंच पण पट्टेरी वाघ व काळ्या वाघाचं अस्तित्त्वही अधूनमधून जाणवतं. पश्‍चिम घाट हा जैविक विविधतेने समृद्ध असा परिसर मानला जातो आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्यांचं क्षेत्र हे पश्‍चिम घाटाशी जोडलं गेलं आहे हे लक्षात घेतलं म्हणजे तेथील जैविक विविधतेचा अंदाज येतो. सहाजिकच वनस्पतींच्या अभ्यासकांच्या दृष्टीने देखील कोल्हापूरचं पर्यटन महत्त्वाचं ठरतं. धर्मशास्त्राच्या अभ्यासकांना देखील कोल्हापूरचं वेगळं आकर्षण वाटू शकतं कारण जुन्या कोल्हापूरमध्ये बौद्ध स्तूप होता अशी नोंद आहे. पन्हाळगडानजीकच्या मसाई पठार परिसरात असणारी पांडव लेणी ही देखील बौद्धकालीन लेणी आहेत असे अभ्यासकांचं मत आहे. कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिराच्या आवारात असणाऱ्या काही मंदिरांच्या छतावर जैन तीर्थंकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि छतावरचं नक्षीकामही जैन मंदिरांची आठवण करून देतं. महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यावर असणाऱ्या मातृलिंगाच्या ठिकाणी एक पर्शियन भाषेतील शिलालेख आहे. हा शिलालेख तिथे कसा आला हे कोणालाच माहिती नाही. अशा विविध बाबींबाबत संशोधन झाल्यास बौद्ध व जैन धर्माचा प्रसार तसंच कोल्हापूरचा इतिहास यावर खूपच नवा प्रकाशझोत पडू शकतो. वैद्यकीयदृष्ट्याही कोल्हापूरचा पर्यटनासाठी विचार होऊ शकतो. कारण टेस्ट ट्यूब बेबी संदर्भातील वेगवेगळे प्रयोग यशस्वी करणारे डॉ.सतीश पत्की हे कोल्हापूरचेच आहेत. थेट परदेशातून उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे दांपत्यं येत असतात. शस्त्रक्रियेसाठी स्वत:च यंत्रमानव बनविण्याचा प्रयत्न कोल्हापूरच्या डॉ. सुरेश देशपांडे यांनी केला आहे. थोडक्‍यात काय, तर कोल्हापूरचा पर्यटनासाठी अनेक अंगांनी विचार केला जाऊ शकतो. मात्र त्या दृष्टीने नियोजनबद्ध विचार करायला हवा, एवढं मात्र नक्की!

1 comment:

Yuvraj said...

jabaradast bhava!!! jinkalais tu