नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराची ख्याती आहे। अहमदनगर जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर पाथर्डी तालुक्यातील मोहटे या गावी देवीचे स्वयंभू मंदिर असून हे एक जागृत देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे.मोहटे गावातील दहिफळे घराण्यातील बन्सी दहिफळे हे माहुरच्या देवीचे भक्त होते. त्यांनी आपल्या भक्तीच्या जोरावर देवीला गावाजवळ येऊन दर्शन देण्याची प्रार्थना केली. तेव्हा देवीने स्वप्नदृष्टांत देऊन गावाजवळील डोंगरावर प्रकट होणार असल्याचे आपल्या भक्ताला सांगितले. त्यानुसार 'तांदळा' सापडेपर्यंत भाविकांमध्ये ती गायीच्या रुपात वावरली आणि प्रकट झाल्यानंतर ग्रामस्थांना गाय पुन्हा दिसली नाही अशी अख्यायिका आहे.
देवीचा तांदळा ज्या दिवशी प्रकट झाला तो दिवस आश्र्विन शुद्ध एकादशीचा होता म्हणून या दिवशी देवीचा यात्रा उत्सव साजरा केला जातो। हा तांदळा अत्यंत सुंदर व आकर्षक असून पूर्वाभिमूख म्हणजे माहूरगडाच्या दिशेने आहे. मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर देवीची न्हाणी व शिवमंदरी आहे. या न्हाणीत आंघोळ केल्यानंतर शरीर रोगमुक्त होते असा गावकर्यांचा समज आहे.
पाथर्डी तालुका हा राज्यात उसतोडणी कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. या मजुरांचे आराध्यदैवत आणि लोककलाकरांचे (तमाशा मंडळ) श्रद्धास्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. कारण, राज्यात लोक कलेचा पहिला नारळ मोहटादेवीच्या यात्रेत फोडला जातो आणि त्यानंतर राज्यभर रंगारंग कार्यक्रम आयोजित केली जातो. निजामकाळात चरत चरत भरकटलेल्या काही म्हशी गावकर्यांनी आपल्या गोठ्यात बांधल्या होत्या. ही बातमी निजामला मिळताच त्याने म्हशी सोडून आणण्यास आणि गावकर्यांना बंदी करण्याचा हुकूम आपल्या सैनिकांना दिला. तेव्हा गावकर्यांनी देवीला नवस केला, की आमच्यावर लावलेला आरोप खोटा असून यातून आमची सुटका कर. आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकूण देवीने एका रात्रीतून काळ्या म्हशीचा रंग 'भुरका' केला होता, असे गावकर्यांनी सांगितले. तेव्हापासून या गावात दूध आणि दूग्धजन्य पदार्थांची विक्री आजपर्यंत केली जात नाही. कोणत्याही प्रकारचे दुध न विकणारे बहुधा हे भारतातील एकमेव गाव असावं.
No comments:
Post a Comment