Sunday, December 28, 2008

अंबाजी येथील अंबा माता


गुजरातमधील धार्मिक स्थळांमध्ये अंबा देवीचे स्थान प्रमुख आहे। उत्तर गुजरातमध्ये अहमदाबादपासून १८० किलोमीटरवर अंबाजी या गावात या देवाचे स्थान आहे. या देवीला आरासुरी असेही म्हणतात. आरासुरी म्हणजे डोंगरावर असलेली देवी. हे मंदिर खूप प्राचीन आहे. त्याच्या गर्भगृहात प्रत्यक्षात देवीची मूर्ती नाही. तेथे देवीचे आसन आहे. त्यावर देवीचे दागदागिने आणि वस्त्रे अशा पद्धतीने ठेवली आहेत, की ते पाहून असे वाटते, देवीच तेथे बसली आहे. येथे देवी रोज वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते, अशी श्रद्धा आहे.

गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर पालनपूरपासून ६५ किलोमीटवरवर आणि माऊंट अबूपासून ४५ किलोमीटरवर अंबाजी हे गाव आहे। येथेच अंबामातेचे हे मंदिर आहे. गुजरातमधील बड्या मंदिरात याचा समावेश होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत असल्यामुळे राज्यातील श्रीमंत मंदिरापैकी हे एक आहे. अंबेचे मूळ स्थान मात्र या मंदिरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या गब्बर नावाच्या डोंगरावर आहे. देवीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या ठिकाणी दुर्गामातेचे ह्रदय पडले होते, असे मानले जाते.

गब्बर येथील अंबेचे मंदिर प्राचीन आहे. आर्यांच्या अस्तित्वापूर्वीपासून अंबामातेची पूजा केली जाते असे मानले जाते. आर्यांनी ही देवी स्वीकारून तिची आराधना पुढे सुरू ठेवली. गब्बर डोंगरावर असलेली पदचिन्हे व रथाच्या चाकाचीही चिन्हे मातेचीच आहेत, अशी श्रद्धा आहे. येथेच श्रीकृष्णाचे मुंडन करण्यात आल्याचे सांगितले जाते. येथे सुवर्ण यंत्र कोरण्यात आले असून त्यात ५१ श्लोक आहेत.

No comments: