Sunday, December 28, 2008

सर्वधर्मभावाचे प्रतीकः अजमेर शरीफ दर्गा


अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हे भारतातील मुस्लिमांचे सर्वांत पवित्र स्थळ आहेच। पण मुस्लिमांशिवाय इतर धर्मातील लोकही या दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे एका अर्थी हे स्थळ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. हा दर्गा म्हणजे प्रसिद्ध मुस्लिम संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी आहे. भारतात इस्लामच्या आगमनाबरोबरच सुफी पंथाचीही सुरवात झाली. सूफी संत एकेश्वरवादावर विश्वास ठेवतो.

पण या पंथाचा भारतातील प्रसार सहिष्णू पद्धतीने झाला। सहिष्णुता, उदारमतवाद, मानवप्रेम आणि बंधूभाव हा या पंथाचा आधार होता. या पंथातील एक होते हजरत मोईनुद्दीन चिश्ती.

त्यांचा जन्म इराणमध्ये झाला होता। तेथे काही वर्षे व्यतीत केल्यानंतर ते भारतात आले. ख्वाजा साहेब ईश्वरभक्तीत अखंड बुडालेले होते. लोकांच्या सुखासाठी ते सर्वशक्तीमान अल्लाकडे प्रार्थना करत. मानवसेवा हाच ख्वाजासाहेबांचा धर्म होता. बादशाह अकबराने एकदा पुत्रप्राप्तीसाठी या दर्ग्यात येऊन प्रार्थना केली होती. त्यानंतर अकबराला मुलगा झाला. या आनंदाप्रित्यर्थ ख्वाजा साहबसमोर माथा टेकण्यासाठी अकबर आमेरपासून अजमेर शरीफपर्यंत चालत आला होता.

तारागढ डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा दर्गा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे। इराणी व भारतीय वास्तुकलेचा संगम याच्या बांधणीत दिसतो. दर्ग्याचे प्रवेशद्वार व घुमट अतिशय सुंदर आहे. याचा काही भाग बादशाह अकबर आणि शहाजहानने बांधला होता. दर्ग्याचे पक्के बांधकाम मांडूचा सुलताना ग्यासुद्दीन खिलजीने केले होते.

दर्ग्याच्या आत अतिशय सुंदर नक्षी असणारा चांदीचा पिंजरा आहे। त्यात ख्वाजा साहेबांची मजार आहे. हा पिंजरा जयपूरचे महाराजा जयसिंह यांनी बनविला होता. दर्ग्यात मैफिलीसाठीची खास खोलीसुद्धा आहे. तेथे कव्वाल ख्वाजाच्या स्तुतीप्रित्यर्थ कव्वाली गातात. दर्ग्याच्या आजूबाजूला अनेक ऐतिहासिक इमारतीही आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक- धर्माच्या नावावर एकीकडे दंगली होत असताना येथे मात्र हिंदू, मुस्लिमांसह इतर धर्माचे लोक येऊन ख्वाजासाहेबांवर चादर चढवतात. डोके टेकवतात आणि मनःशांतीचा अनुभव घेतात. येथील उरूस इस्लामी दिनदर्शिकेनुसार रजब महिन्याच्या एक ते सहा तारखेपर्यंत साजरा केला जातो. उरसाची सुरवात ख्वाजासाहेबांच्या मजारवर हिंदू कुटुंबाद्वारे चादर चढवूनच होते.

डेंग- दर्ग्याच्या समोरच मोठी डेंग (भले मोठे पातेले) ठेवले आहे। बादशाह अकबर व जहांगीरने ते दिल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून आजपर्यंत त्यात काजू, बदाम, इलायची, केशर टाकून भात केला जातो व गरीबांना वाटला जातो.

कसे जावे- अजमेर शरीफ दर्गा राजस्थानातील अजमेर शहरात आहे. हे शहर रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गाने जोडले आहे. परदेशात रहात असाल तर दरगाह अजमेर डॉट कॉम किंवा राजस्थान पर्यटन विभागाकडून आपल्याला अधिक माहिती मिळू शकते.

No comments: