Monday, October 27, 2008

ताडोबा राष्ट्रीय उद्यान- जंगलसफरीचा अविस्मरणीय आनंद



ताडोबा राष्ट्रीय उद्यान पूर्व विदर्भातील शुष्क पानझडी वनांच्या पट्ट्यात चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ताडोबा व अंधारी राष्ट्रीय उद्यान राज्यातील जुन्या उद्यानांपैकी एक आहे. साधारणता: सातशे चौरस किलोमीटर संरक्षित जंगलक्षेत्रात ही उद्यान वसलेली आहेत. ताडोबा व अंधारी व्याघ्र प्रकल्पही तितकाच जुना. ताडोबा अभयारण्य नैसर्गिक वनस्पती आणि जीवसृष्टीने समृद्ध आहे. येथे वाघ, बिबटे, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, चिंकारा, काळवीट, ससे, रानमांजर यासारख्या प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो. ताडोबा अभयारण्यात जागोजागी पाणवठे आहेत. पाणवठ्यानजीकच मचाणाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याने जीवसृष्टी अनुभवण्याचा अपूर्व आनंद येथे मिळतो. ताडोबा अभयारण्यात पर्यटन निवासस्थानांचीही व्यवस्था असल्याने निर्सगाच्या सानिध्यात राहण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. या भागातील जंगलात बांबूची वने मोठ्या प्रमाणात आहेत. मोहाची वृक्षेही भरपूर आहेत. आदिवासींचा जीवनव्यवहार हा जंगलाशी जुळलेला असतो. अन्नापासून तर पेयापर्यंत सर्व जंगलाचं देणं. आदिवासी लोक मोहांच्या फुलापासून दारू काढून प्रसंगानुरूप मद्यपानाचा आनंद घेतात. या वनक्षेत्राचे ताडोबा नांवही आदिवासी संस्कृतीशीच जुळलेले आहे. त्यांचा देव 'तरू' यावरून ताडोबा नांव पडल्याचे मानण्यात येते. विस्तीर्ण वनांचे पट्टे व जैवविविधता या भागाचे वैशिष्ट्य आहे.
ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प एकोणविसशे पच्चावन साली अस्तित्वात आला. यामधील ताडोबा राष्ट्रीय उद्यान पच्चावन साली तर अंधेरी वन्यजीव अभयारण्याची ‍निर्मिती झाली एकोणविसशे अठ्ठ्यांऐंशी या वर्षी. एकोणविसशे अठ्ठ्यान्यवच्या वन्यजीव गणनेनुसार येथे चाळिसहून अधिक वाघ असल्याची नोंद आहे. पर्यटकांसाठी येथे विश्रांतीगृह व 36 खाटांचे हॉस्टेलही आहे. त्यासाठी आपणांस तेथील फील्ड डिरेक्टरशी संपर्क साधावा लागेल.
व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्यात गेलो म्हणजे जंगलसफारी ओघानेच आली. येथे प्रक्षिशित गाईड्सी उपलब्ध आहेत. जंगलसफारीसाठी जवळपास दहा बारा जण बसतील अशी मिनिबसही आहे. ताडोबात निर्सगाच्या सानिध्यात वन्यजीव, पक्षी व सृष्टीचा अविष्कार अनुभवायचा असल्यास बायनालर, टॉर्च, उन्हाच्या टोप्या, गॉगल्स यासारखी आवश्यक साधने घ्यायला विसरू नका. ताडोबा तळ्याकाठी महाकाय वृक्षाछायेत आदिवासींचे दैवत आहे. येते दरवर्षी पौष महिन्यात यात्रा भरते. येथूनच जवळ म्हणजे पाच किलोमीटरवर पंचधारा स्थळही भेट देण्याजोगे आहे. निसर्गातून, विस्तीर्ण पसरलेल्या गवताळ प्रदेशातून फिरतानाच दाट जंगलातून चालण्याचा थरार अनुभवायचा असल्यास येथून फार दूर नसलेल्या जामुनबादी पर्यंतची वाट तुडवायला हरकत नाही. जाण्याचा मार्ग : ताडोबास आपणं रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाने जोडले असल्याने आपल्या पसंतीनुसार प्रवास करून येथे सहज पोहचू शकता. नागपूर विमानतळाचे अंतर आहे येथून अवघे दीडशे किलोमीटर. रेल्वेने जायचे झाल्यास रेल्वेने चंद्रपुरला उतरायचे. चंद्रपुराहून येथील अंतर आहे फक्त चाळीस किलोमीटर. चंद्रपूर किंवा चिमूर येथून आपण बसं गाठून येथे पोहचू शकता.

No comments: