Thursday, October 30, 2008

सहयाद्रिचि स्वप्नभुमि ताम्हिणी

बरसत्या पावसाची मजा आपण नेहमीच घेत असतो. पण सह्यादीच्या बेलाग डोंगररांगेतल्या पावसाचा सळसळता अविष्कार आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, एवढा वेगळा असतो. गेल्या काही वर्षांत यातल्या काही काही ठिकाणी घाट रस्ते झाल्याने आता सर्वसामान्यांना ही मजा सहज लुटता येते. रायगड जिल्ह्यातल्या कोलाड-इंदापूरला पुण्याशी जोडणारा असाच एक जबरदस्त घाट आहे 'ताम्हिणी'. ............. कोकण आणि घाट यांच्यामधल्या पट्ट्यातला बराच प्रदेश दुर्गम आणि घनदाट अरण्याचा असल्याने तिथली खोरी आजही आपल्याला परिचित नाहीत. त्यातले बरेचसे प्रदेश रुंद व खूप विस्तृत आहेत. रायगड जिल्ह्यातल्या सुधागड-पालीपासून ते पार सावंतवाडीपर्यंत आजही घाटाला जोडणारे दुर्गम डोंगरी मार्ग आहेत व स्थानिक लोक पायीच या वाटांवरून जात असतात. ताम्हिणी घाटाचा चाळीस-पन्नास मैलांमधला परिसर काही वर्षांपूवीर् असाच कोणाच्या माहितीचा नव्हता.
पाच-सात वर्षांपूवीर् घाट बांधल्यापासून मात्र इथल्या भन्नाट निसर्गाची ओळख सर्वसामान्यांना व्हायला लागली. मंुबई-ठाण्याच्या बऱ्याचशा लोकांना आजही हा प्रदेश अनभिज्ञ आहे. पावसाळ्याच्या मौसमात घाटात आपण जसजसे उंची गाठायला लागतो, तसंतसं मुसळधार पावसाचा, भन्नाट, वाऱ्याचा, अगणित धबधब्यांचा आणि ढगांचा कधीही न अनुभवलेला धमाल खेळ आपल्याला दिसायला लागतो. त्यात घाटमाथ्यावर पोहोचल्यावरही पंधरा-वीस किमीपर्यंत गदीर्चा मागमूस नसल्याने आपण चक्क वेगळ्या जगात असल्यासारखंच वाटतं. जवळजवळ सगळेच धबधबे रस्त्याच्या निकट असल्याने कुटुंबातल्या वृद्धांनाही यात डुंबता येतं व पावसाळ्यातल्या सह्यादीचे ढगांनी वेढलेले डोंगर-कडे जवळून बघता येतात. मात्र खाण्याच्या काहीही सोयी नसल्याने बरोबर सगळं न्यावं लागतं. इथल्या निसर्गाची खरी मजा अनुभवायची असेल तर गोवा रस्त्यावरच्या कोलाड-भिरा-ताम्हिणी-मुळशी-पिरंगूट-पुणे ही एक दिवसाची ट्रीप करायला हवी.
मंुबईहून हे अंतर सहज साडेतीनशे किमीच्या आसपास होतं. जाताना कोकणातल्या मार्गाने गेलं तर सतत आपल्या अगदी नजरेसमोर निसर्गाचा हा खजिना दिसत राहतो आणि संध्याकाळी एक्स्प्रेस वे वरून मंुबई गाठणं, सोयिस्कर जातं. घाट पार केल्यावर वाटेतल्या विंझाईदेवीचं दर्शनही होतं. मुळशी जलाशय पार करून पुण्याकडे सरळ गेलं की एक्सप्रेस वे लागतो. पहाटे लवकर निघालं तर ही सहल एका दिवसात करता येते. अगदी इथे थांबायचं असेल, तर ताम्हिणी गावातल्या विझाई देवस्थानच्या धर्मशाळेत, मुळशीला किंवा घाटाखाली कोलाड-भिऱ्याला एक मुक्काम करायला हवा, या सगळ्या ठिकाणी राहण्याच्या अगदी साध्या सोयी आहेत. एवढं मात्र निश्चित आहे की सह्यादीतल्या निसर्गाविषयी मनापासून प्रेम असणाऱ्यांना ताम्हिणी घाटाचा हा प्रदेश स्वप्नभूमीच आहे.

No comments: