Friday, November 14, 2008

रम्य समुद्रकिनारे आणि अपूर्व खाद्ययात्रा- रत्नागिरी


थिबा पॅलेस, राजापूरची गंगा, हेदवीचं गणेशमंदिर, हर्णे-गणपतीपुळे-वेळणेश्वरचे किनारे... असं सारं रत्नागिरी जिल्ह्यात भटकताना पाहायलाच हवं.रत्नागिरी म्हणजे कोकणचं वेगळं वैभव. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांशी रत्नागिरीचं नाव कायमचं जोडलं गेलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातच अनेकांचं श्रद्धास्थान असणारं गणपतीपुळ्याचं गणेशमंदिर आहे. हेदवी इथला दशभुज लक्ष्मीगणेश आणि चिपळूणपासून 13 किलोमीटरवर असणारा परशुराम गणेश तसंच आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती यांना मानणाऱ्या भाविकांची संख्याही कमी नाही. राजापूरची गंगा पाहायची तर त्यासाठीही रत्नागिरी जिल्ह्यात भटकंती करायला हवी. याखेरीज डेरवणची शिवसृष्टी, गुहागर, दिवेआगर यांसारखे समुद्रकिनारे यांनीही रत्नागिरी जिल्हा समृद्ध केलेला आहे. श्री.ना.पेंडसे, चि.त्र्यं.खानोलकर यांच्यासारख्या लेखकांनी शब्दरुपातून मांडलेला कोकणचा हा परिसर म्हणजे "थकल्या मनांना ताजवा देणारी, हिमाचल प्रदेश आणि केरळ इतकंच निसर्गसौंदर्य असणारी देवभूमी' आहे. हिचा उल्लेख "परशुरामभूमी' असाही केला जातो. रत्नागिरीपासून अगदी जवळ म्हणजे अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर रत्नदुर्ग हा किल्ला आहे. रत्नदुर्ग हा जलदुर्गात मोडणारा किल्ला. पूर्वी हा किल्ला पूर्णपणे पाण्यात होता. आता हा किल्ला रत्नागिरी शहराशी जोडला गेलेला आहे. बहामनी काळात उभारल्या गेलेल्या या किल्ल्याला एकूण 27 बुरूज होते. आता त्यापैकी 7 बुरुज आणि तटबंदी शिल्लक आहे. सध्या या किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर, दीपगृह आणि काही घरं आहेत. या किल्ल्यावर जिचं मंदिर आहे ती भगवती म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची बहीण आणि तिने महालक्ष्मीच्या सूचनेवरून रत्नासुराचा पाडाव केला व ती कायमस्वरुपी रत्नदुर्ग किल्ल्यावर राहाण्यासाठी आली, अशी आख्यायिका आहे. या देवीची स्वयंभू मूर्ती अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र, ढाल, तलवार अशी आयुधं आहेत आणि देवी महिषासुरावर बसलेली आहे. दरवर्षी नवरात्र आणि शिमगा यावेळी मंदिरात उत्सव असतो. रत्नागिरी शहराला भेट देत असताना लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पतितपावन मंदिर आणि थिबा पॅलेसला भेट द्यावी. थिबा पॅलेसची बांधणी 1910-11 मध्ये करण्यात आली. आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रम्हदेशच्या थिबा नावाच्या राजासाठी बांधण्यात आलेला राजवाडा म्हणून या राजवाड्याला "थिबा पॅलेस' या नावाने ओळखण्यात येतं. 1916 पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं आणि अगदी अलीकडेपर्यंत त्यांची मुलगीही राहात होती. आता मात्र हा राजवाडा एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय किंवा "हेरीटेज हॉटेल' बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सागरी जीव संशोधनात रस असणाऱ्यांनी रत्नागिरीतील "मरीन बायॉलॉजिकल रिसर्च स्टेशन'ला भेट द्यावी. सध्या हे केंद्र दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाशी जोडलेलं आहे. या ठिकाणी एक छान मत्स्यालय/संग्रहालय पाहायला मिळू शकतं. गणेशभक्तांचं श्रद्धास्थान गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून 40 कि.मी. अंतरावर असलेलं श्रीगणेशाचं स्वयंभू स्थान. या ठिकाणच्या 300 फूट उंचीच्या संपूर्ण टेकडीलाच गणपती मानण्यात येतं. येथील मंदिर सुमारे 400 वर्षांपूर्वीचं आहे. देवळाला प्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण टेकडीला प्रदक्षिणा घालावी लागते. गणपतीपुळे येथील देवतेला पश्‍चिमद्वार देवता म्हणून ओळखण्यात येतं. इथे दर संकष्टीला आणि अंगारकी संकष्टीलाही मोठी गर्दी असते. इथला समुद्रकिनारा रमणीय तसंच राहण्याची वेगवेगळ्या प्रकारची सोयही इथे उपलब्ध आहे. गणपतीपुळ्यापासून अवघ्या 1 कि.मी. अंतरावर असणारं मालगुंड म्हणजे ख्यातनाम मराठी कवी केशवसुत यांचं जन्मस्थान. मालगुंड येथील केशवसुतांच्या घरी आता त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. गणपतीपुळ्यापासून साधारण 35 कि.मी. अंतरावर जयगड हा किल्ला आहे. 17 व्या शतकात या किल्ल्याची उभारणी करण्यात आलेली आहे. गणपतीपुळ्याप्रमाणेच रत्नागिरीपासून 22 कि.मी. अंतरावर असणाऱ्या पावस गावाजवळ गणपतीगुळे हे गणेशाचं स्थान आहे. पावस येथे स्वामी स्वरुपानंदांचा आश्रम आहे आणि तिथे कायम भाविकांची गर्दी असते; तर गणपतीगुळे येथील गणपतीला गलबतवाल्यांचा गणपती म्हणूनही ओळखलं जातं. संकटाच्यावेळी 11 फूट उंचीची शिळा जहाजातील कर्मचाऱ्यांनी गणपती म्हणून पूजली आणि त्यांच्यावरचं संकट दूर झालं, तेव्हापासून गलबतवाल्यांच्या स्वयंभू दक्षिणाभिमुख गणेशावर अनेकांची श्रद्धा निर्माण झाली, असं सांगतात. प्राचीन मंदिरांनी समृद्ध भाग रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण या गावाला पूर्वी स्वत:ची अशी ओळख नव्हती. पण या गावातील विठ्ठलराव गणेश जोशी तथा दिगंबरदास महाराज यांनी या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. जोशी यांनीच समर्थ रामदास यांचं स्मारकही उभारलं आहे. डेरवणमध्ये उभारण्यात आलेल्या शिवसमर्थगडाची रचना एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणेच करण्यात आली आहे. चिपळूणपासून अवघ्या 3 किलोमीटरवर आहे परशुरामाचं मंदिर. डोंगरात असलेल्या या मंदिरामध्ये काम - परशुराम आणि काळ यांच्या मूर्ती आहेत. काहीजण त्यांना ब्रह्मा- विष्णू-महेश यांचे अवतार मानतात. भगवान विष्णूंचा सहावा अवतार म्हणून भगवान परशुराम यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनीच कोकणाची निर्मिती समुद्रात एकेठिकाणी बाण मारून केली, असं सांगितलं जातं. हे हिंदू मंदिर असलं तरी त्यासाठी पैसे जंजिऱ्याच्या सिद्धीने दिले होते आणि पोर्तुगीज कारागीरांनी मंदिर बांधलं असं सांगतात. त्यामुळे या मंदिराचा घुमट चर्चसारखा आहे तर गिलावा मुस्लिम पद्धतीने केलेला आहे. परशुराम मंदिरापासून जवळच रेणुकामंदिर आणि बाणगंगा तीर्थकुंड आहे. अक्षयतृतीयेला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. खुद्द चिपळूण शहराच्या रावतळे भागात विंध्यवासिनीची अष्टभूजा मूर्ती असणारं मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात सहा मुखांच्या कार्तिकेयाचीही मूर्ती आहे. चिपळूणच्याच उत्तरेला नागेश्‍वर लेणी आहेत. चिपळूणला गेलेला माणूस संगमेश्‍वरला गेला नाही, असं होत नाही. संगमेश्‍वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. याच ठिकाणी मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केलं होतं. कसबा संगमेश्‍वर या गावातील मंदिरं कलात्मक शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. शास्त्री व अलकनंदा नद्यांच्या संगमावर संगमेश्‍वराचं मंदिर आहे. याखेरीज याच परिसरातल्या आरवली, बोळीवली व राजवाडीमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. गुहागर हे रायगड जिल्ह्यात असलं तरी चिपळूणपासून आहे अवघ्या 44 कि.मी. अंतरावर. इथे प्रसिद्ध व्याडेश्‍वर मंदिर आहे. पायी भटकत फिरण्याची आवड असलेल्या मंडळींनी येथून अंजनवेलपर्यंत बसने जाऊन गोपाळगड परिसरात पदभ्रमंती करायला हरकत नाही. गुहागरच्याच दक्षिणेला 25 कि.मी. अंतरावर वेळणेश्‍वर हे शास्त्री नदीच्या तीरावरचं गाव आहे. येथील प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. गुहागरपासून 18 किलोमीटरवर "हेदवी' हे गणेशाचं स्थान. इथल्या मंदिरात गणपतीची संगमरवरी दशभुज मूर्ती आहे. गळ्यात नाग असलेल्या या दशभुज गणेशाची स्थापना केळकर स्वामींनी केली आहे. या मंदिरात माघी चतुर्थीला उत्सव असतो. हेदवीच्या किनाऱ्यावर उमामहेश्‍वरचं एक मंदिरही आहे. दर तीन वर्षांनी प्रकटणारी गंगा हे राजापूरचं वेगळं आकर्षण असल्याचं सांगतात. राजापूरपासून जवळच उन्हाळे या गावी कायमस्वरुपी गरम पाण्याचे झरे आहेत. आणि हो, राजापुरातलं धूतपापेश्वराचं मंदिर तर अगदी वेळ काढून, आवर्जून पाहण्याजोगं आहे. लोभस निसर्ग आणि ताजे मासेही... दापोली तालुक्‍यात हर्णे हे निसर्गरम्य बंदर आणि सुंदर समुद्रकिनारा असणारं गाव आहे. इथला निसर्ग नि निवांतपणा अनुभवण्यासाठी राहावंसं वाटतं. इथे स्थानिक लोकांनी सुपारीच्या बागांमध्ये छोट्या झोपड्या बांधून ही हौस भागवायची सोय केली आहे. येथून जवळच आहे सुवर्णदुर्ग हा भुईकोट कम जलदुर्ग. इथून "तरी'ने जोग नदी ओलांडली की आंजर्ले हे गाव लागतं. इथे कड्यावरती चढून गणपती मंदिराला भेट द्यावी लागते. पन्हाळी काजीच्या लेण्यांना भेट द्यायची असली किंवा केळशी गावातील गणेशमंदिर, वेळासमधील रामेश्‍वर मंदिर, हिम्मतगड पाहायचा असेल तर त्यासाठी हर्णे येथून जाता येतं. इथून जवळच आहे मुरुड. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं जन्मस्थळ. इथे त्यांचं स्मारकही आहे. या ठिकाणाला लाभलेल्या स्वच्छ, सुंदर किनाऱ्यामुळे, नारळी-पोफळींनी सजलेल्या सृष्टीमुळे इथे भटकायला मजा येते. या ठिकाणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचं काम चालू आहे. लाकडावरील अप्रतीम कोरीव काम असलेल्या इथल्या पुरातन दुर्गा मंदिरात शारदोत्सव, वसंतोत्सव साजरे केले जातात. कोकणात मिळतात माशांचे विविध प्रकार... पण शाकाहारी माणसांनाही सोलकढी, भाजणीचं थालीपीठ व वडे, घावन, हळदीच्या पानावरचे पातोळे, सांजणं, डाळिंब्यांची उसळ, मौसमानुसार गेलात तर ओल्या काजुगराची उसळ, उकडीचे मोदक अशा प्रकारचे पदार्थ चाखता येतात. समुद्रकिनारी बसून भरलेली पापलेटं, खेकडे, शिंपले (तिसऱ्या) खाणं याचा एक वेगळा आनंद असतो. याखेरीज गोडसर शेवकांडं तसंच कोकम, आंब्यांचा त्या-त्या हंगामात पर्यटक आस्वाद घेऊ शकतात. घरचा पाहुणचार अनुभवताना कोलंबीचं भुजणं, तांदळाची भाकरी आणि खूपसा भात हे कॉंबिनेशन एकदा खाल्लं की चोखंदळ पर्यटकांना तृप्तीची अशी काही ढेकर येते की......बस्स्‌!

लालमाती, गडदुर्ग, सागराची गाज, मासेही- सिंधुदुर्ग


सिंधुदुर्ग जिल्ह्यात भटकायचं तर आंबोली, कणकवली, कुणकेश्‍वर, तारकर्ली, पत्रादेवी, परुळे, पोंभुर्ले, बांदा, माणगाव, मालवण, मोचेमाड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, शिरोडा, सावंतवाडी अशी अनेक ठिकाणं खुणावायला लागतात.महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटला भेट दिली की महाभ्रमण योजनेंतर्गत महामंडळाने तयार केलेली पर्यटनाची 51 पॅकेजेस समोर येतात. खाजगी टूर ऑपरेटर्सना बरोबर घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटनाचेही वेगवेगळे प्रकार आहेत. पर्यावरणाशी मैत्री करणारं पर्यटन, साहसी पर्यटन, ग्रामीण, कृषी पर्यटन, गडकिल्ल्यांचं पर्यटन, सागरी किनाऱ्यांचं पर्यटन अशा वेगवेगळ्या पॅकेजेसपैकी झटकन लक्ष वेधून घेतात त्या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील पर्यटनासाठीच्या वेगवेगळ्या योजना. लाल दगडाची कौलारू घरं, सडा टाकून स्वच्छ व टापटीप ठेवलेलं अंगण, घरांमधूनच वाट काढणारी, लाल मातीने न्हालेली पायवाट, सतत ऐकू येणारी समुद्राची गाज, समुद्राच्या लाटा अंगावर झेलत दिमाखात उभे असणारे जलदुर्ग, नाखव्यांच्या लाटांवर हेलकावणाऱ्या होड्या आणि सोलकढीसोबत माशांचे निरनिराळे खाद्यपदार्थ... या गोष्टींचा मोह पडणार नाही असा माणूस विरळाच! सिंधुदुर्ग जिल्ह्यात भटकायचं तर आंबोली, कणकवली, कुणकेश्‍वर, तारकर्ली, पत्रादेवी, परुळे, पोंभुर्ले, बांदा, माणगाव, मालवण, मोचेमाड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, शिरोडा, सावंतवाडी अशी अनेक ठिकाणं खुणावायला लागतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय पूर्वी ओरोस इथे होतं, आता सिडकोने सिंधुदुर्गनगरी या वसाहतीचा विकास केला आहे. सिंधुदुर्गनगरीच्या मध्यभागी 7 हेक्‍टरमध्ये पसरलेलं एक उद्यान आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयं सिंधुदुर्गनगरीमध्येच आहेत. भव्य किल्ला महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर सावंतवाडीपासून 37 कि.मी. अंतरावर तेरेखोल इथे एक किल्ला आहे. किल्ला गोवा राज्यात असला तरी तिथे जाण्याचा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातो. तेरेखोल किल्ल्याची बांधणी 18 व्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांनी केली. महाराष्ट्रातील किल्ल्यांपेक्षा दिसायला थोड्याशा वेगळ्या असणाऱ्या या किल्ल्यातून गोव्याच्या निसर्गसमृद्ध किनाऱ्याचं छान दर्शन घडतं. या किल्ल्यात सध्या एक रिसॉर्ट उभारण्यात आलं आहे. सावंतवाडीतून तेरेखोलला जायला बसेस आहेत आणि किल्ल्यातच रिसॉर्ट असल्यामुळे खाण्यापिण्याची अडचण येण्याचाही प्रश्‍न नाही. साहजिकच सिंधुदुर्ग किल्ला पहायला येणाऱ्यांनी रेडीतील गणपती मंदिर पाहावं, लोहखनिज म्हणून रेडी बंदरातून वर्षानुवर्ष निर्यात होत असलेल्या मौल्यवान खनिजाविषयी जाणून घ्यावं आणि तेरेखोललाही भेट द्यावी. सावंतवाडी हे मूळचं संस्थान. सावंतवाडीत मोती तलाव, नरेंद्र डोंगर, पुरातन विठ्ठल मंदिर अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहाण्यासारख्या आहेत. विशेष म्हणजे सावंतवाडीत रंगीत लाकडी खेळणी चांगली मिळतात. सिंधुदुर्ग हा मालवणच्या परिसरात छत्रपती शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग. 48 एकर इतकं क्षेत्र व्यापलेल्या या किल्ल्यात छत्रपती शिवरायांच्या हाताचे व पावलांचे ठसे आहेत, असं सांगण्यात येतं. या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेलं शिवरायांचं मंदिरही आहे. सिंधुदुर्गला भेट देणारे मालवणच्या काजू कारखान्याला व देवबाग येथील समुद्रकिनाऱ्यालाही भेट देऊ शकतात. देवबागच्या किनाऱ्यावर असणारं खारफुटीचं जंगल कमी झालं आणि गेल्या काही वर्षांपासून समुद्र देवबागच्या किनाऱ्यावर आक्रमण करतो आहे. त्यामुळे येथील लोक चिंतेत आहेत. पुण्यापासून या परिसराचं अंतर साधारण 400 कि.मी. आहे तर कोल्हापूरपासून 150 ते 160 कि.मी. निळ्याशार समुद्राची अनुभूती मालवणपासून दक्षिणेला 6 कि.मी. अंतरावर आहे तारकर्ली हा समुद्रकिनारा. अतिशय लांब- रुंद असा हा किनारा आणि स्वच्छ पाणी. अगदी 20 फुटांपर्यंतचा सागरतळही या किनाऱ्यावरून स्वच्छ दिसू शकतो. कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांची भेट तारकर्ली परिसरात होते. फेसाळणाऱ्या निळ्या पाण्याचा नितळ समुद्रकिनारा ही तारकर्लीची खरी ओळख. या किनाऱ्याला खेटून असणाऱ्या सुरुच्या उंच झाडांमध्येच राज्य पर्यटन विकास महामंडळाने निवासव्यवस्था केली आहे. तिथे नव्याने उभारण्यात आलेली बांबू हाऊस हे बोटीच्या आकाराची आहेत. याखेरीज या ठिकाणी वातानुकुलीत हाऊसबोटही उपलब्ध आहेत. स्कूबा ड्रायव्हिगंचा आनंद लुटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्नॉर्कलिंग व स्कूबा ड्रायव्हिंगमुळे पर्यटक समुद्रात एक-दोन मीटर खोल जाऊन तेथील जैवविविधता पाहू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि प्रवाळ यांच्या जवळून दर्शनाने वेगळाच थरार अनुभवता येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मरीन पार्क करण्याची शासनाची कल्पना आहे. मालवण परिसरात असलेल्या सागरी अभयारण्यात सागरी कासव, कोरल, डॉल्फिन मासे, स्टारफिश, बटरप्लाय फिश असे जवळपास 350 प्रकारचे जलचर आढळतात. या परिसरात सागरी द्राक्षं, समुद्रकमळ, शेवाळ, प्रवाळ, गेलीडेरिला, ग्रॅसिलेरिया अशा जलवनस्पतींचं दर्शन घडू शकतं. तारकर्लीचं एक्‍सटेंन्शन म्हणजेच देवबागचा किनारा. मालवणपासून साधारण 20 कि.मी. अंतरावर धामापूर तलाव आहे. या तळ्यामध्ये जलक्रीडेची आणि नौकानयनाची वेगवेगळी साधनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मालवणपासूनच 15 कि. मी. अंतरावर आहे. वालावल हे कर्ली नदीच्या काठावरचं ठिकाण. तिन्ही बाजूला वनश्री आणि एका बाजूला कर्ली नदीची खाडी असं वालावल ठिकाण लक्ष्मी नारायणाच्या देवस्थानासाठीही प्रसिद्ध आहे. श्रीदेव रामेश्‍वराच्या भक्तांना आचरा हे गाव खुणावतं. येथील समुद्रकिनाराही खूप मोठा आणि आकर्षक आहे. मालवणपासून 15 कि.मी. अंतरावरती मसूरे इथे भराडीदेवीचं मंदिर आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी यात्रा भरते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मोचेमाड हे निसर्गसौंदर्याची उधळण असणारं गाव. या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर केवड्याची बनं आहेत. या किनाऱ्यावर स्टारफिश मोठ्या प्रमाणावर आढळतात. सावंतवाडीपासून 35 कि.मी.वर असलेल्या मोचेमाड येथील दशावतारी या लोककलेचे कलाकार प्रसिद्ध आहेत. दशावतार पाहायला आणि समजून घ्यायला मोचेमाडला जायला हवं. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आणखी एक किल्ला. 27 बुरुज आणि तिहेरी तटबंदी असलेल्या या दुर्गाला पूर्वी "घेरीचा' असं म्हणत असत. पेशवाईच्या काळात कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराच्या दृष्टीने विजयदुर्ग हा एक महत्त्वाचा किल्ला होता. इ.स. 1897 मध्ये खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी लॉकिअर नावाच्या शास्त्रज्ञाने हेलिअम या वायूचा शोध विजयदुर्ग किल्ल्यावरच लावला. वाहोटणे खाडीतून विजयदुर्ग किल्ल्यावर जाता येतं किंवा मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण इथून तळेरे मार्गे बसने विजयदुर्गवर जाता येतं. शिरोडा या गावाला महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहामुळे आणि दिवंगत साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या 18 वर्ष वास्तव्यामुळे वेगळं महत्त्व प्राप्त झालं. येथील शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असतानाच खांडेकरांनी अनेक कथा- कादंबऱ्या लिहिल्या. शिरोड्यापासून जवळच असलेलं आरवली म्हणजे जयवंत दळवी यांचं मूळ गाव. वेंगुर्ला परिसरात भुईकोट किल्ला आहे तसंच फळ संशोधन केंद्रही आहे. रत्नागिरीचा आंबा इथेच विकसित करण्यात आला. दुसरीकडे कर्ली नदीच्या काठाने परुळे या गावी गेलं तर तिथे रवळनाथ, वेतोबा, आदिनारायण, गौरीनारायण अशा अनेक देखणी देवळं पहायला मिळतात. कोकणातलं पहिलं सूर्यमंदिर परुळे इथं उभारलं गेलं असं सांगण्यात येतं. लाटांचा ध्वनी ऐकावा इथेच! चि.त्र्यं. खानोलकरांच्या एका पुस्तकाचं नाव आहे "कोंडुरा.' खरं तर कोंडूरा हे वेंगुर्ल्याहून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या एका ठिकाणाचं नाव आहे. वेंगुर्ला ते मालवण या सागरी मार्गापासून 3-4 कि.मी. बाजूला असणारा कोंडुरा येथील समुद्रकिनारा नारळी पोफळीच्या बागांमध्ये लपलेला आहे. या समुद्रकिनाऱ्याला थोडीशी गूढपणाची छटा आहे. समुद्राच्या लाटांच्या धडकांनी खडकांमध्ये येथील किनाऱ्यावर काही विवरं निर्माण केली आहेत आणि लाटांच्या त्या विवरांवर आपटण्याने एक वेगळा आवाज येथे सतत कानावर पडत राहातो. सावंतवाडी तालुक्‍यात येतं आंबोली हे थंड हवेचं ठिकाण. याच परिसरात हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान आहे. हिवाळ्यात तसंच पावसाळ्यात येथील अद्‌भुत निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. याच सावंतवाडी तालुक्‍यातच पत्रादेवी इथे गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांचं स्मारक आहे तर इथून जवळच बांदा या ठिकाणी बांदेश्‍वर व रामेश्‍वराची मंदिरं आहेत. संत सोहिरोबानाथांचं स्थान अशीही बांद्याची ओळख आहे. पारगड हा किल्ला पाहायचा असेल तर तो बांद्यातून जवळ पडतो. पोंभुर्ले हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचं जन्मगाव तर देवगड तालुक्‍यातील कुणकेश्‍वर हे महादेवाचं मंदिर यादव राजांनी बांधलेलं. देवगडपासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या कुणकेश्‍वर मंदिराचा छत्रपती शिवरायांनी जीणोद्धार केला होता. पांडवही आपल्या अज्ञातवासाच्या काळात इथे येऊन राहिले होते अशी आख्यायिका आहे. कुणकेश्‍वर इथे येणारे पर्यटक लक्षात घेऊन पर्यटन विकास महामंडळाने तिथेही एक प्रकल्प हाती घेतला आहे. कोकण पर्यटन करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने जसे दरवर्षी वेगवेगळे महोत्सव आयोजित करण्यात येतात तशाच नवनव्या पॅकेज टूर आयोजित करण्यात येतात. स्थानिक माणसाला पर्यटकांकडून लाभ मिळावा, या दृष्टीने महामंडळाने मध्यंतरी निवास- न्याहारी योजना सुरू केली. या योजनेमुळे पर्यटकांना कमी खर्चात गावातील छान कौलारु घरांमध्ये राहता येतं आणि पर्यटकांच्या तिथे राहाण्या-जेवण्याने स्थानिक माणसाच्या खिशातही काही पैसे पडतात. कोकणात आणि विशेषत: सिंधुदुर्गात जायचं तर खाण्यापिण्यामध्ये वेगळे माशांचे विविध प्रकार असू शकतातच; पण शाकाहारी माणसांनाही सोलकढी, थालीपीठ ,घावन, उकडीचे मोदक अशा प्रकारचे पदार्थ चाखता येतात. या मालवणी खाद्याचा आस्वाद घेत कोकण अजूनच यादगार होतो हे नक्की.

पर्यटकांना खुणावणारे रामलिंग बेट


संथ वाहणार्‍या कृष्णामाईच्या छायेत अनेकजण सुखी समाधानाचं जीवन जगत आहेत.हीच कृष्णा नदी अनेकांचे जीवन फुलवीत पुढे जाते. कृष्णाकाठाला महत्त्व असण्याचे इतरही कारणे आहेत. सांगलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांची तर कराड येथे प्रितीसंगमावर भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची स्मारके उभी आहेत. याच ठिकाणी असलेल्या रामलिंग बेटाचा पर्यटनाच्यादृष्टिने विकास करण्यात आला आहे. सुशोभिकरणामुळे हा परिसर पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण बनला आहे. या स्थानाला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्यादेखील वाढली आहे.सांगली, सातारा जिल्ह्याला वरदान ठरलेली जीवनदायिनी कृष्णामाईच्या तीरावर वाळवा तालुक्यात बहे येथे रामलिंग बेटाला भेट म्हणजे पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी असते. रमणीय व निसर्गसौंदर्याने नटलेलं हे ठिकाण आज राज्याच्या पर्यटनाच्या नकाशावर झळकू लागले आहे. मुंबई - बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर इस्लामपूर शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर विकसित होत असलेल्या बहे रामलिंग बेट पर्यटन विकासासाठी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. बहे रामलिंग बेट पर्यटन विकासासाठी शासनाने गेल्या तीन वर्षापूर्वी सहा कोटी ८१ लाख ३४ हजाराचा निधी मंजूर करुन या पर्यटन स्थळाच्या विकासाला चालना दिली. या बेटावर प्राचीन श्रीराम मंदिर व अन्य छोटी मंदिरे आहेत. राम मंदिरासमोर आकर्षक भव्य मंडप असून भव्य नदीपात्र हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती असून बाजूला मठामागे समर्थ रामदासांनी स्थापन केलेली श्री हनुमानाची मूर्ती आहे. मध्यभागी शिवलिंग आहे.रामलिंग बेटाच्या उत्तर बाजूने कृष्णानदी काशीमधल्या गंगा नदीसारखी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाटते.या बेटावर प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग स्थापन केल्याची आख्यायिका आहे. तसेच प्रभू रामचंद्र आपल्या चौदा वर्षाचा वनवास भोगून लंकेवरुन परत येत असता स्थानास या ठिकाणी थांबले, व सीतामाई जवळच्याच शिरटे गावी थांबल्या. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी स्थान करुन वाळूचे शिवलिंग स्थापन केले व त्याची पूजा करु लागले. त्यावेळी कृष्णामाईस खूपच आनंद झाला व ती आनंदाने गर्जना करु लागली. तेव्हा प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे मारुतीराया उभे होते त्यांनी 'हा आवाज कसला' म्हणून पाठीमागे वळून राहिले तर नदीस महापूर येत असल्याचे त्यांना दिसले व त्याच क्षणी मारुतीरायांनी आपले बलवान बाहू बाजूस केले व नदीचे पाणी थोपवून धरले. त्यामुळे नदीचे दोन वेगवेगळे प्रवास वाहू लागले आणि आपोआपच बेट तयार झाले. मारुतीरायाच्या बाहूमुळे या गावचे नाव 'बाहे' असे पडले. काळाच्या ओघात त्यांचाअपभ्रंश होवून बहे नाव रुढ झाले, अशी आख्यायिका आहे. या बेटावर प्राचीन श्रीराम मंदिर व अन्य छोटी मंदिरे आहेत. राम मंदिरासमोर आकर्षक भव्य मंडप असून भव्य नदीपात्र हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती असून बाजूला मठामागे समर्थ रामदासांनी स्थापन केलेली श्री हनुमानाची मूर्ती व आहे. मध्यभागी शिवलिंग आहे.रामलिंग बेटाच्या उत्तर बाजूने कृष्णानदी काशीमधल्या गंगा नदीसारखी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाटते.या बेटावर प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग स्थापन केल्याची आख्यायिका आहे. तसेच प्रभू रामचंद्र आपल्या चौदा वर्षाचा वनवास भोगून लंकेवरुन परत येत असता स्थानास या ठिकाणी थांबले, व सीतामाई जवळच्याच शिरटे गावी थांबल्या. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी स्थान करुन वाळूचे शिवलिंग स्थापन केले व त्याची पूजा करु लागले. त्यावेळी कृष्णामाईस खूपच आनंद झाला व ती आनंदाने गर्जना करु लागली. तेव्हा प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे मारुतीराया उभे होते त्यांनी 'हा आवाज कसला' म्हणून पाठीमागे वळून राहिले तर नदीस महापूर येत असल्याचे त्यांना दिसले व त्याच क्षणी मारुतीरायांनी आपले बलवान बाहू बाजूस केले व नदीचे पाणी थोपवून धरले. त्यामुळे नदीचे दोन वेगवेगळे प्रवास वाहू लागले आणि आपोआपच बेट तयार झाले. मारुतीरायाच्या बाहूमुळे या गावचे नाव 'बाहे' असे पडले. काळाच्या ओघात त्यांचाअपभ्रंश होवून बहे नाव रुढ झाले, अशी आख्यायिका आहे.जवळपास अर्धा किलोमीटर रुंदीचे कृष्णा नदीचे विस्तीर्ण नदीपात्र, याच नदीपात्राचे पडलेले दोन भाग आणि त्यामध्ये निर्माण झालेले रामलिंग बेट पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. हीच निसर्गसंपदा डोळ्यासमोर ठेऊन बहे रामलिंग बेट पर्यटनास चालना देण्यात आली. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून हे पर्यटन स्थळ विकसित होत असून यामध्ये रामलिंग परिसर, बोटिंग धक्का, पदपथ, उपहारगृह, घाट व संरक्षक भिंत, खुला रंगमंच, तलाव, वाहनतळ, भक्तनिवास, पुजारी निवास, स्वच्छतागहे तसेच प्रभू राम व श्री हनुमान मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात येत आहे. मंदिराच्या अंतर्गत आणि बाह्य सुधारणाबरोबरच सभोवताली आकर्षक घाट, बेटाला संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता यावा यासाठी नौका तैनात असून यासाठी कृष्णानदीकाठी धक्का बांधण्यात आला आहे. तसेच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी रामलिंग बेट परिसरात कृष्णानदीच्या पात्रात खुला रंगमंच तयार करण्यात आला आहे.बेटाच्या दोन्ही बाजूंनी खळखळणारे कृष्णामाईचे पाणी आणि नदीपात्रातील वृक्षवल्ली पर्यटकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. रामलिंग बेट पर्यटन स्थळ विकसित होत असल्याने सांगली जिल्ह्याच्या पर्यटनास नवी दिशा मिळणार असून, यातूनच जिल्ह्यातील तरुणांना पर्यटन रोजगाराचं नवं दालन उपलब्ध झालं आहे.निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेले आणि पौराणिक पाश्वभूमी असलेल्या बहे रामलिंग बेट परिसरात पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विविध सुविध निर्माण करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे हे बेट जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्टातील पर्यटकांना खुणावते आहे.
संपर्कासाठी पत्ता:श्री. विठ्ठल पाटीलसरपंच ग्रामपंचायत बहे,ता. वाळवा, जि. सांगली

तीर्थक्षेत्र आणि कलानगरी - कोल्हापूर


खिद्रापूर, आंबा घाट, पन्हाळा, ज्योतिबा...चटकदार मिसळ, झणझणीत तांबडा-पांढरा... कोल्हापुरातली भटकंती म्हटली की या साऱ्या गोष्टी आपसूकच आल्या!कोल्हापूरला एखादा माणूस आला आणि तो कोल्हापूरच्या प्रेमात पडला नाही असं होतच नाही. कला, संस्कृती, धार्मिक परंपरा, साहित्य परंपरा, मर्दानी खेळ आणि कुस्तीची परंपरा या सगळ्यांनी कोल्हापूर ओतप्रोत आहे. कोल्हापूरचा समृद्ध वारसा पाहायचा, समजून घ्यायचा आणि त्याचबरोबर दूध कट्ट्यावर उभं राहून काळ्याभोर म्हशीचं निरसं दूध प्यायचं, निव्वळ झणझणीत नव्हे तर वेगळ्याच, काळजात रुतणाऱ्या चवीची मिसळ खायची किंवा मनसोक्त तांबडा पांढरा रस्सा ओरपायचा तर आधुनिक नव्हे; गावरान कोल्हापूरशी दोस्ती करायला हवी. सहकाराचा अभ्यास करायचा किंवा वस्त्रोद्योगाचं गमक समजून घ्यायचं तरी कोल्हापूरला यायला हवं. कारण सहकारी तत्त्वावरचा पहिला बंधारा देशात शेतकऱ्यांनी पहिल्यांदा उभारला तो कोल्हापुरातील सांगरुळमध्ये आणि इचलकरंजीला तर महाराष्ट्रातील मॅंचेस्टर म्हणूनच ओळखलं जातं. चांदीच्या दागिन्यांची कलाकुसर पाहायची तर चांदीनगरी हुपरीमध्ये आणि आता आशियातील सर्वोत्कृष्ट हरितगृह पाहायचं तर त्यासाठीही शिरोळ तालुक्‍यातल्या कोंडीग्रे इथे जायला हवं नि श्रीवर्धन बायोटेक पाहायला हवं. भारतातील समतेच्या लढ्याविषयी बोलताना कोल्हापूर आणि राजर्षी शाहू महाराज यांची नावं घेतल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. काय काय पाहणार? काय काय समजून घेणार? आणि "कोल्हापुरीपण' किती स्वत:त भिनवणार हे तुम्हीच ठरवायचं! ऐतिहासिक शहर कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा हा केवळ राजर्षी शाहू महाराजांपासून किंवा 1000 च्या सुमारास कोल्हापूरवर राज्य करणाऱ्या शिलाहार राजांपासूनचा नाही, तर त्याही आधीपासूनचा आहे. कोल्हापूर शहराजवळून जी पंचगंगा नदी वाहते तिच्या काठावर 2000 वर्षांपूर्वी एक समृद्ध गाव होते याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. नदीकाठच्या टेकडीला ब्रह्मपुरी टेकडी म्हणून ओळखण्यात येतं. कालांतराने हा परिसर एका मोठ्या भूकंपात खचला आणि या परिसरातील सारी वसाहत जमिनीत गाडली गेली. इ. स. 106 ते 130 या कालावधीत सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी म्हणजे सातवाहनाचं राज्य दक्षिणेत असताना पंचगंगा नदीच्या काठावर विटांच्या सुंदर बांधणीचं एक गाव होतं. व्यापार व संस्कृतीच्या दृष्टीने या गावाचा रोमन जगाशी चांगला संबंध होता. रोममधून आणलेल्या काही वस्तू, नाणी तसंच धातूच्या भांड्यांचं अनुकरण केलेल्या काही वस्तू आणि समुद्रदेवतेचा एक पुतळाही या टेकडीच्या उत्खननात आढळला. या वस्तू अजूनही कोल्हापुरातील "टाऊन हॉल' येथील पुरातत्त्व वस्तू संग्रहालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कोल्हापुरात न्यू पॅलेस इथेही एक म्युझियम आहे. तिथे कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास, त्यांची राहण्याची शैली, त्यांनी केलेल्या शिकारी, कोल्हापुरातील चित्रकारांच्या कलाकृती असं खूप काही पाहायला मिळू शकतं. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कोल्हापूरचं अत्यंत महत्त्वाचं असं योगदान राहिलं आहे पण ते दुर्लक्षित आहे, विशेषत: कोल्हापुरात फिरंगोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 1857 मध्ये झालेलं स्वातंत्र्ययुद्ध आणि त्याला चिमासाहेब महाराजांकडून मिळालेली प्रेरणा! कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि भवानी मंडप पाहाताना हा इतिहास समजून घ्यायला हवा, मनात जागवायला हवा. चित्रनगरी कोल्हापूरला "समतेची पंढरी' म्हणून महत्त्व आलं ते राजर्षी शाहू महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजामुळे. राजर्षी शाहूंनी जशा शेतिक्षेत्रात सुधारणा घडविल्या, राधानगरीसारखं धरण उभारलं, सर्व जाती-जमातींसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आणि कोल्हापूर "कलापूर' बनावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले; त्याचप्रमाणे सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी देशात सर्वप्रथम आरक्षण विषयक कायदा आपल्या राज्यात लागू केला. क्रीडापरंपरेच्या जोपासनेसाठी राजर्षी शाहूंनी थेट परदेशातून मल्ल खेळाडूंना निमंत्रित केलं होतं. राजर्षी शाहूंनी राधानगरीसारखं जे धरण उभारलं ते आजही कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक वरदान आहे. 30-40 वर्षांपूर्वी उभारल्या गेलेल्या दूधगंगा नदीवरच्या काळम्मावाडी धरणाला आत्ताच गळती लागली आहे,पण राधानगरी भक्कम! याच राधानगरीला लागून आहे पूर्वीचं दाजीपूर आणि आताचं राधानगरी अभयारण्य. कोल्हापूरने भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया भक्कम करण्याचं काम केलं. भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, पहिला मराठी बोलपट, पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट, देशातील पहिला रंगीत चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न, पहिल्या भारतीय बोलपटाचा नायक हे सारं कोल्हापूरकरांनी चित्रपटसृष्टीला दिलं. कोल्हापुरात अगदी काल-परवापर्यंत शालिनी व जयप्रभा हे दोन स्टुडिओ दिमाखात उभे होते; आता मात्र त्या स्टुडिओंच्या परिसराने आपलं मूळ रूप हरवलंय आणि स्टुडिओही घटका-पळं मोजताहेत असं असलं तरी राजारामपुरीतील चंद्रकांत मांडरे कलादालन, महावीर उद्यानाच्या मागील बाजूस असणारं भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र अशा ठिकाणी भेट देऊन कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासाविषयी काही प्रमाणात जाणून घेता येऊ शकतं. दक्षिण काशी महालक्ष्मीचं स्थान म्हणून कोल्हापूर भाविकांना प्रिय आहे. दक्षिणेत तिरुपतीचं दर्शन घेतलं की लगेचच कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रेचं पुण्य मिळत नाही, अशी भाविकांची समजूत आहे. इ.स.च्या 6 व्या-7 व्या शतकात बांधणी झालेल्या महालक्ष्मी मंदिरात काळाच्या ओघात अनेक बदल झाले. त्यामुळे वेगवेगळ्या काळातील वास्तुशैली मंदिर आणि मंदिराच्या परिसरात पहायला मिळतात. नवरात्रोत्सवाच्या काळात महालक्ष्मी मंदिरात उत्सव असतो. कोल्हापूरपासून 12-15 किलोमीटरच्या अंतरात वाडी रत्नागिरी येथील केदारलिंग म्हणजेच जोतिबाचं देवस्थान. हेही महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांचं श्रध्दास्थान आहे. कोल्हापुरातून बाहेर पडून जुन्या पुणे-बंगळूरु मार्गावरुन कागलच्या दिशेने निघालं की लगेचच उजव्या हाताला कणेरी हे ठिकाण आहे. या ठिकाणी शिवमंदिर आणि अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराजांचा मठ आहे. शिवरात्रीला कणेरी मठावर मोठी यात्रा भरते. अलीकडे ग्रामसंस्कृती, ग्रामीण जीवनशैली यांची पुढच्या पिढ्यांना ओळख व्हावी म्हणून कणेरी मठातर्फे एक वेगळा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जुन्या शैलीतील घरं व ग्रामीण शैलीचं दर्शन घडवणारं एक वेगळं गावच वसवण्यात आलं आहे. याखेरीज शिरोळ तालुक्‍यातील नृसिंहवाडी हे कोल्हापूरपासून 35 कि.मी. अंतरावर असणारं दत्ताचं देवस्थान हे दत्तभक्तांसाठीचं तीर्थस्थान आहे. नृसिंहवाडीपासून जवळच खिद्रापूर हे गाव आहे. येथील कोपेश्‍वर मंदिर हे "महाराष्ट्राचं खजुराहो' म्हणून ओळखण्यात येतं. हे मंदिर म्हणजे भारतातील वास्तुशिल्पाचा एक जबरदस्त नमुना आहे. शिलाहार वंशाचा राजा गंडरादित्य याच्या काळात कोपेश्‍वराच्या या मंदिराची उभारणी सुरू झाली असावी असं म्हणतात. खिद्रापूरसारख्या ठिकाणी असं मंदिर कोणी, कसं आणि का उभारलं असे प्रश्‍न मंदिर पाहणाऱ्याच्या मनात उभे राहतात. या मंदिराच्या रचनेत एक वेगळी भारून टाकणारी गूढता आहे. या मंदिराचं महत्त्व जाणून केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने ही वास्तू आपल्या ताब्यात घेतलेली आहे. जुलै, ऑगस्ट हे पावसाळ्याचे महिने वगळता एरवीच्या महिन्यात खिद्रापूरला भेट देऊन खिद्रापूरचं सौंदर्य अनुभवायलाच हवं! डोंगर दऱ्यांतून भटकंती कोल्हापुरातून सांगली-नृसिंहवाडीला जाण्याच्या रस्त्यावरच हातकणंगले हे तालुक्‍याचं ठिकाण आहे. हातकणंगले गावात पोहोचण्यापूर्वी 3 कि.मी. आधी डाव्या बाजूला एक रस्ता जातो. तो रस्ता आळते गावाच्या शेजारी असणाऱ्या डोंगराकडे जाणारा आहे आणि इथेच डोंगराच्या कुशीत रामलिंग हे स्थान आहे. बाहेर कितीही उन्हाळा असो येथील गुहेत सतत पाणी पाझरत असतं आणि त्या पाण्याचा गुहेतील शिवलिंगावर अभिषेक होत असतो. हातकणंगले बसस्थानकापासून उत्तरेला जाणारा रस्ता म्हणजे कुंभोजगिरीसारख्या जैनांच्या तीर्थस्थानाकडे जाणारा रस्ता. कुंभोजगिरी या तीर्थस्थानाला बाहुबली म्हणूनही ओळखतात. या ठिकाणी नव्याने तीर्थस्थळही विकसित करण्यात आलं आहे. गडकिल्ल्यांवर भटकंती करण्याची आवड असणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड, विशाळगड, गगनगड, सामानगड असे विविध किल्ले खुणावत असतात. पन्हाळा आणि गगनबावडा ही जशी गडाची ठिकाणं आहेत त्याचप्रमाणे थंड हवेची ठिकाणं म्हणूनही ती ओळखली जातात. कोल्हापूर जिल्ह्यात आंबोली, आंबा यासारखे परिसरही निसर्गरम्य आणि थंड हवेची ठिकाणं म्हणून प्रसिध्द आहेत. बेफाम पाऊस आणि भन्नाट वारा यांचा आगळा आनंद घ्यायचा तो पावसाळ्यात गगनबावडा, आंबोली, आंबा अशा ठिकाणीच! कोल्हापूर जिल्ह्यात चांदोली आणि राधानगरी या दोन अभयारण्यांचं क्षेत्र येतं. यापैकी राधानगरी अभयारण्य हे गव्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात गव्यांचं दर्शन तर घडतंच पण पट्टेरी वाघ व काळ्या वाघाचं अस्तित्त्वही अधूनमधून जाणवतं. पश्‍चिम घाट हा जैविक विविधतेने समृद्ध असा परिसर मानला जातो आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्यांचं क्षेत्र हे पश्‍चिम घाटाशी जोडलं गेलं आहे हे लक्षात घेतलं म्हणजे तेथील जैविक विविधतेचा अंदाज येतो. सहाजिकच वनस्पतींच्या अभ्यासकांच्या दृष्टीने देखील कोल्हापूरचं पर्यटन महत्त्वाचं ठरतं. धर्मशास्त्राच्या अभ्यासकांना देखील कोल्हापूरचं वेगळं आकर्षण वाटू शकतं कारण जुन्या कोल्हापूरमध्ये बौद्ध स्तूप होता अशी नोंद आहे. पन्हाळगडानजीकच्या मसाई पठार परिसरात असणारी पांडव लेणी ही देखील बौद्धकालीन लेणी आहेत असे अभ्यासकांचं मत आहे. कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिराच्या आवारात असणाऱ्या काही मंदिरांच्या छतावर जैन तीर्थंकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि छतावरचं नक्षीकामही जैन मंदिरांची आठवण करून देतं. महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यावर असणाऱ्या मातृलिंगाच्या ठिकाणी एक पर्शियन भाषेतील शिलालेख आहे. हा शिलालेख तिथे कसा आला हे कोणालाच माहिती नाही. अशा विविध बाबींबाबत संशोधन झाल्यास बौद्ध व जैन धर्माचा प्रसार तसंच कोल्हापूरचा इतिहास यावर खूपच नवा प्रकाशझोत पडू शकतो. वैद्यकीयदृष्ट्याही कोल्हापूरचा पर्यटनासाठी विचार होऊ शकतो. कारण टेस्ट ट्यूब बेबी संदर्भातील वेगवेगळे प्रयोग यशस्वी करणारे डॉ.सतीश पत्की हे कोल्हापूरचेच आहेत. थेट परदेशातून उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे दांपत्यं येत असतात. शस्त्रक्रियेसाठी स्वत:च यंत्रमानव बनविण्याचा प्रयत्न कोल्हापूरच्या डॉ. सुरेश देशपांडे यांनी केला आहे. थोडक्‍यात काय, तर कोल्हापूरचा पर्यटनासाठी अनेक अंगांनी विचार केला जाऊ शकतो. मात्र त्या दृष्टीने नियोजनबद्ध विचार करायला हवा, एवढं मात्र नक्की!

महाबळेश्वर, कास, तापोळा - सातारा


सातारा जिल्ह्यात केवळ पाचगणी-महाबळेश्वरसारखी "थंड' ठिकाणंच नाहीत; तर इथे "पाहण्याजोगी' वस्तुसंग्रहालयं, मंदिरं नि लेणीही आहेत. तुम्ही "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' पाहिलीय? त्यासाठी हिमालयाच्या कुशीतच जाण्याची गरज नाही. साताऱ्याच्या पश्‍चिमेला असणारं "कासचं पठार' तुम्हाला निसर्गाच्या अगदी अशाच सौंदर्याचं दर्शन घडवेल. साधारण ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत या पठारावर वर्षातील 15 ते 20 दिवसांचंच आयुष्य असणाऱ्या असंख्य वनस्पती फुलत असतात. दर दोन- तीन दिवसांनी वेगळ्या रंगांची फुलं फुलतात आणि साऱ्या पठारावर फुलांचा गालिचा पसरल्यासारखं चित्र पहायला मिळतं. दर दोन दिवसांनी पठाराचं नवं रुपडं. जगात अन्यत्र कुठेच आढळत नाही अशीही एक वनस्पती या पठारावर आहे, असं वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर सांगतात. कासचं पठार, कास तलाव, तापोळे, बामणोली, वासोटा, ठोसेघर ही सगळी पर्यावरणावर मनापासून प्रेम करणाऱ्या मंडळींनी पहायलाच हवीत अशी सातारा जिल्ह्यातील ठिकाणं! सातारा जिल्ह्यात केवळ निसर्गसौंदर्य किंवा पाचगणी, महाबळेश्‍वरसारखी थंड हवेची ठिकाणं आहेत असंही नाही. सज्जनगड, प्रतापगड यांसारखे ऐतिहासिक किल्ले या परिसरात आहेत. यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांपासून ते डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारख्या चळवळ्यांपर्यंत आणि रामशास्त्री प्रभुण्यांसारख्या न्यायाधीशापासून औंध संस्थानच्या गुणग्राहक व वेगळे प्रयोग करणाऱ्या राजापर्यंत, विविध नामवंत साहित्यिक - कलाकारांपर्यंत अनेक माणसं या जिल्ह्याने आपल्याला दिली आहेत. याचीही नोंद साताऱ्यात फिरताना मनात ठेवायला हवी. आता आपण प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांकडे एक नजर टाकू. निसर्गसौंदर्य आणि निवांतपणाही वाई : पुण्याहून पाचगणी-महाबळेश्‍वरकडे जाताना 88 कि.मी. अंतरावर वाई हे गाव लागतं. कृष्णा नदीच्या काठावरच अनेक देवळं आणि घाट यांनी आपले वेगळंपण ठसवणारं वाई गणपती आळीच्या घाटावरच्या ढोल्या गणपतीच्या मंदिरासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इ.स. 1762 मध्ये या मंदिराची स्थापना झाली. वाईमध्येच "मराठी विश्‍वकोश मंडळा'चं विशेष कार्यालय आहे. वाईतच मुक्काम करून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी "विश्‍वकोश निर्मिती मंडळ' नावारूपाला आणलं. वाईपासून अवघ्या 6 कि.मी. अंतरावर उत्तरेला पालपेश्‍वर गुहा आहेत. 8 गुहांचा समूह इथे पहायला मिळतो. अश्‍विन महिन्यात मोहोरणारा आंबा पहायचा असेल तर वाई-महाबळेश्‍वर रस्त्यावरील दांडेघर गावी केदारेश्‍वर शिवालयाला भेट द्यायला हवी. वाई ते भोर रस्त्यावर अंबाडखिंडी जवळ मांढरदेवी इथे काळुबाईचं देवस्थान आहे. तिथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. वाईच्या पश्‍चिमेला 4 कि.मी. अंतरावर असलेलं मेणवली म्हणजे पेशवाईच्या काळातील नाना फडणवीसांचं गाव. कवी वामन पंडित यांची समाधी मेणवलीपासून काही अंतरावर असलेल्या भोगावमध्ये कृष्णेच्या काठी आहे. पाचगणीतलं टेबललॅंड, टेबललॅंडवर आढळणारी वेगवेगळ्या प्रकारची ऑर्किडस्‌ तसंच ड्रॉसेराची फुलं, टेबललॅंडच्या दक्षिण बाजूस पायथ्याशी असणारं घाटजाईचं मंदिर, शिवपूर्व काळापासून सर्वज्ञात असलेलं श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर हे उंचावरील देवस्थान ही सर्वांनाच आकर्षून घेणारी स्थळं. श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर इथे छत्रपती शिवरायांनी आपल्या आईची सुवर्णतुला केली होती. इ.स. 1824 मध्ये जनरल लॉडविक यांनी महाबळेश्‍वरला भेट दिली आणि त्यानंतर आताचं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्‍वर नवं रुप घेऊन अवतरलं. कृष्णा-वेण्णा-कोयना-गायत्री आणि सावित्री या पाच नद्या महाबळेश्‍वर परिसरातूनच उगम पावतात. महाबळेश्‍वरमधून मोटारबोटने बामणोली तसंच वासोट्याला जाता येतं. तापोळा इथूनही वासोटा म्हणजे व्याघ्रगडाला भेट देता येते. महाबळेश्‍वर ते तापोळा आणि तापोळा ते महाबळेश्‍वर अशी एस.टी सेवाही उपलब्ध आहे. साताऱ्यातून कासमार्गे बामणोलीला जाऊन तिथूनही वासोटा किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी लॉंच उपलब्ध आहे. कोयना आणि सोळशी या नद्या एकत्र होऊन शिवसागर या कोयना धरणाच्या जलाशयाला तापोळ्याजवळ येऊन मिळतात. हा साराच परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे हे वेगळं सांगण्याचं कारण नाही. अजिंक्‍यतारा हा अगदी सातारा शहराला लागून असलेला गड. या किल्ल्यावरुन सातारा शहर न्याहाळता येतं, पण किल्ल्याचं सौंदर्य पहायचं तर ते शेजारच्या येवतेश्‍वराच्या डोंगरावरून पहायला हवं. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यातला आणखी एक गड. महाबळेश्‍वरला गेल्यानंतर प्रतापगडपर्यंत पर्यटक गेला नाही असं घडत नाही. शिवछत्रपतींनी इ.स. 1657 मध्ये मोरोपंत पिंगळ्यांना हा किल्ला बांधायला सांगितला होता. महाबळेश्‍वरहून सुमारे तासाभरात प्रतापगडावर पोहोचता येतं. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झालेला सज्जनगड साताऱ्यापासून अवघ्या 15 कि.मी. अंतरावर आहे. एस.टी. सेवेबरोबरच साताऱ्यातून सज्जनगडावर जायला टॅक्‍सी व रिक्षाही मिळू शकते. इथे आल्यावर शिवथरघळीचाही "अनुभव' घेता येईल. इतिहासाच्या खाणाखुणा माण तालुक्‍यातील गोंदवले हे श्रीगोंदवलेकर महाराजांचं जन्म व समाधीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सातारा-पंढरपूर मार्गावरील दहीवडीजवळ गोंदवले आहे तर, माण तालुक्‍यामध्येच शिखरशिंगणापूर हे शंभू महादेवाचं स्थान आहे. सातारा जिल्ह्यातील औंधमध्ये श्री यमाईदेवीचं मंदिर आणि राजवाडा तर पाहण्यासारखा आहे; पण त्याहून पाहण्यासारखं आहे ते येथील वस्तुसंग्रहालय आणि कलादालन. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्‍यात असणारं कण्हेरखेड इथे श्रीमंत महादजी शिंदे यांचं स्मारक आहे तर कराडजवळच्या जखीणवाडी इथे 54 बौद्धलेणी आहेत. खंडोबा हे ज्यांचं देवस्थान आहे त्यांच्यासाठीचं सातारा जिल्ह्यातलं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे पाली. इथं नदीच्या वाळवंटात दरवर्षी पौष महिन्यात 8 दिवस खंडोबाची यात्रा भरते. थोडक्‍यात इतिहासावर, गड-किल्ल्यांवर आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांना खुणावेल असं खूप काही सातारा आणि परिसरात आहे. गढ्या वगळता प्रमुख 27 किल्ले असल्याची माहिती उपलब्ध आहे. काही ठिकाणी बुरुज, जुनी मंदिरं, शिलालेख यातून इतिहासाचा प्रत्यय येत राहतो. सगळीकडेच पोहोचायला गाड्या उपयोगी पडत नाहीत. तेव्हा मनात "पाहण्याचं वेड' व पायांची त्यानुसार "धावायची तयारी' हे जमून आलं की मग "क्‍या बात है!' गरज आहे ती थोडा अधिक मोकळा वेळ हाताशी ठेऊन भटकायला निघण्याची, अस्सल मराठमोळं जेवण जिथं मिळेल तिथं ते घेण्याची तयारी ठेवण्याची आणि प्रवासासाठी योग्य नियोजन करण्याची! सातारा परिसरातील निवासासाठी शासकीय विश्रामगृहं अथवा वनखात्यामार्फत उपलब्ध सोयींचा लाभ घेता येऊ शकतो. शिवाय महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाशीही आपण संपर्क साधू शकतो. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, महाबळेश्‍वर, जि. सातारा. फोन : 02168-260318/261318

Saturday, November 1, 2008

हिमालयाच्या कुशीतले मसुरी


उत्तर प्रदेशातून वेगळे करण्यात आलेल्या उत्तरांचलला नैसर्गिक सौंदर्याची जणू भेटच मिळाली आहे. हे राज्य दोन भागात आहे. एक गढवाल मंडल व कुमाऊ मंडल. गढवाल मंडलमध्ये दहा पर्यटन स्थळे येतात. त्यातले प्रमुख आहे मसूरी. मसूरी म्हणजे निसर्गाचा अप्रतिम अविष्कार. म्हणूनच या भागात मसूरीला 'पहाडों की रानी' असे म्हणतात. हिमालयाच्या कुशीत २००५ मीटर उंचीवर हे गाव वसले आहे. हे गाव ज्या टेकडीवर बसले त्याचा आकारही 'सी' अक्षरासारखा आहे. याच्या उत्तर भागातून पाहिल्यास हिमाच्छादीत हिमालय दिसतो, तर दक्षिणेत द्रोणस्थली दिसते. पूर्वेला टिहरी-गढवाल व पश्चिमेला चकराता दिसते. कॅप्टन यंगने १८२७ मध्ये हे पर्यटन स्थळ शोधून काढले असे म्हणतात. मसूराची रोपे इथे बर्‍याच प्रमाणात होती, म्हणूनच त्याला मसूरी हे नाव पडले. डेहराडूनचे छत ही सुद्धा मसूरीची ओळख आहे.

इतर हिल स्टेशनपेक्षा मसूरी वेगळे आहे. मसुरीत पहिल्यांदा लंढोर बाजार वसविला गेला. त्यानंतर त्याचा इतरत्र विस्तार झाला. उन्हाळ्यात तिकडे मैदानी प्रदेशात उन्हाच्या चटक्यांनी लोग भाजून निघालेले असताना इथले वातावरण मात्र थंड असते

मसूरी परिसरातील पर्यटनस्थळे-

मनहिल- या डोंगरावर म्हणे इंग्रजांनी एक तोफ ठेवली होती. ती रोज बारा वाजता डागली जायची. म्हणून या टेकडीचे नाव गनहिल पडले. खरे तर तिची उंची पाहिल्यानंतर तिला टेकडी म्हणण्याचे धाडस होणार नाही. तिची उंची आहे ७२०० फूट. येथे मालरोडवर असलेल्या रोपे वेनेही जाता येते. पायीसुद्धा येथे जाता येते. गनहिलवरून दुनघाटी, जौनपूर घाटी, ऋषिकेशसह चकराता डोंगररांगा व हिमाच्छादीत शिखरांचे दर्शन घेता येते.

कॅंप टी फॉल- मसूरी-यमनोत्री मार्गावर मसूरीपासून पंधरा किलोमीटरवर असलेला हा धबधबा पाच धारांमधून कोसळतो. त्यामुळे हा धबधबा पहाण्यासारखा आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची चार हजार पाचशे फूट आहे. त्याच्या चहू बाजूंनी डोंगररांगा दिसतात. इंग्रजांची 'चहा पार्टी' म्हणे इथेच व्हायची. म्हणूनच या धबधब्याला कॅप टी असे म्हणतात.

लेकमिस्ट- कॅप टी धबधब्याहून परतताना लेकमिस्टला येता येते.

म्युन्सिपल गार्डन- पूर्वी या उद्यानाला बोटॅनिकल गार्डन म्हणून संबोधले जात असे. प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. एच. फाकनार लोगी यांनी त्याची निर्मिती केली होती. १८४२ च्या सुमारास या भागाल एका सुंदर उद्यानात परावर्तित केले. त्यानंतर याची देखभाल कंपनी प्रशासनाकडून व्हायला लागली. म्हणून आता त्याला कंपनी गार्डन किंवा म्युन्सिपल गार्डन असे म्हटले जाते.

तिबेटी मंदिर- बौद्ध संस्कृतीचे प्रतीक असणारे हे मंदिर पर्यटकांचे मन मोहून घेणारे आहे. या मंदिराच्या मागे ड्रम लावले आहेत. ते वाजविले असता आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे.

ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार किल्ले धारूर


घाटावर वसलेलं हे शहर असल्यामुळे गावाचं आरोग्य चांगलं आहे. खवा आणि सीताफळाची ही महत्त्वाची बाजारपेठ असून मुंबई, पुणे, नाशिकपर्यंत या मालाची निर्यत केली जाते. या गावाच्या नावात त्याची भौगोलिक वैशिष्टे सामावली आहेत. धारेवरील स्थान म्हणून धारकर, धारौर, धारूर अशी नावे रूढ झाली असावीत. धार या शब्दाचे दोन अर्थ होतात. डोंगराच्या काठावर आणि अखंड वाहणार्‍या पाण्याच्या धारेवर हे गाव वसलेलं आहे. तसेच गावाजवळच धारेश्वराचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. मोगल राजवटीत अहमद नगरच्या निजामशाहीने या गावाचे नाव बदलून फतेहाबाद असे ठेवले. पण मध्ययुगीन कागदपत्रात किल्ले धारूर अशीच नोंद आढळते. मजबूत आणि प्रशस्त किल्ल्यामुळे मोगल काळात या शहराला विशेष महत्त्व होते. राजा धारसिंहामुळे या गावचे नाव धारूर पडले. अशी माहिती अनेक जण सांगतात. पण प्रत्यक्षात तशी नोंद कुठे सापडत नाही.

या स्थानाचा विकास काळाच्या ओघात होत गेला. आज मध्यम वाटणारे हे गाव मध्य युगामध्ये राजकीय दृष्टा स्वतःचे वेगळे अस्तित्त्व टिकवून होते. उत्तर मध्ययुगीन कालखंडात चंदीप्रसादजी मिश्रा, नगराध्यक्ष स्वरुपसिंह जहारी, रामचंद्र शंकर शेटे, प्रमोद माधवराव शेटे, सद्दिवाले यांचे पूर्वज इथे आले आणि त्यांनी स्वतंत्र वसाहती वसवल्या. धारूरच्या वाढत्या विस्ताराबरोबरच नगररचनेत आवश्यक त्या वास्तुंची निर्मिती होत होती. पाणी पुरवठ्यासाठी ज्या बारवाची निर्मिती करण्यात आली त्यात २ हरिणपीर बावडी, रंगारोनी बावडी यांचा उल्लेख करावा लागतो. यापैकी काही विहीरीवर शिलालेख कोरलेले आढळतात. उत्तर मध्ययुगामध्ये बांधण्यात आलेला एक महाल कलावंतिणीचा महाल म्हणून ओळखला जातो. गावाच्या बाहेर एक स्वतंत्र वास्तू चेकपोस्ट स्वरूपात उभारण्यात आली होती. आज गावात उभे असलेले प्रमुख प्रवेशद्वार आणि मशीद तत्कालिन कला वैभवाची साक्ष आहे. गावाला संपूर्ण दगडी तटबंदी होती. कधीकाळी हातमाग हा व्यवसाय इथे खूपच जोरात होता. धारूरचे शेले, साडा, धोतरजोडे प्रसिद्ध होते. पण आज हा व्यवसाय संपूष्टात आला आहे.

किश्वरखानने महादुर्गाची उभारणी केल्यानंतर त्यांनी धारूर शहराची अत्यंत योजनापूर्वक वसाहत केली. व्यापारी, उद्योगपती, विद्वान ब्राह्मण, सरदार आदींना निमंत्रित करून धारूर शहराचा नियोजनपूर्वक विकास केला. सन १६५८ साली सोनपेठ येथील प्रसिद्ध व्यापारी पापय्या शेटे यांना सन्मानाने निमंत्रित करून त्यांना रोअगिरी दिली. पापय्यांनी आपल्या बरोबर आणखी काही व्यापार्‍यांना बोलावून धारूरची बाजारपेठ वसवली, वाढवली. त्याकाळी या शहराचा लौकिक सर्वदूर पसरला होता. आजही मराठवाडातील एक महत्त्वाची विश्वसनीय बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दूरवरून सोनं, चांदी खरेदीसाठी लोक इथे येतात. सुवर्णकारांची संख्याही इथे फार मोठी आहे. आज कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, औरंगाबाद, अंबाजोगाई इत्यादी शहरात सुवर्ण काम करणारे कारागिर धारूर शहरातीलच आहेत.

धारूर ही एक श्रीमंत बाजारपेठ असल्यामुळे दातृत्व हा या गावचा धर्म आहे. अनेक मंदिराच्या उभारणीसाठी तलाव, विहिरीच्या बांधकामासाठी सढळ हाताने देणगी दिल्याच्या नोंदी कागदपत्रातून सापडतात. यादवांच्या काळात धारूर हे एक देश विभागाचे केंद्र म्हणून उदयास आले. या विषयी नोंद करणारा शिलालेख अंबाजोगाई येथे आहे. सकलेश्वर देवस्थानच्या निर्मितीसाठी दिलेल्या दानपत्रात या स्थानाची नोंद सिंघन यादवाचा सेनापती खोलेश्वर (शके ११३२ ते ११६९) हा करतो. या दान लेखात प्रासादह्न सकलेश्वरस्य रचितो धारो देश अशी नोंद आहे.

किल्ल्यामुळे धारूर शहराचे वैभव वाढले. लोकांचा राबता वाढला. अदिलशाहीचा सिपाह सालार किश्वरखान याने मूळ राष्ट्रकूट कालीन महादूर्ग असलेल्या जागेवर नव्याने अत्यंत मजबूत असा दूर्ग बांधला. सन १५६७-६८ साली हा दूर्ग बांधून पूर्ण केला. किल्ल्यावर शस्त्रसाठा भरपूर गोळा केला. किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पाणी (खंदक) आणि चौथ्या बाजूला खोल दरी त्यामुळे शत्रूला किल्ला हस्तगत करणे सोपे नव्हते. धारूरच्या व्यवस्थित नियोजनाची नोंद जशी बुसा तीज-उस-सलातीन या ग्रंथात फकीर अहमद झुबेरी यांनी करून ठेवली आहे. तसेच अब्दुल हमीद लाहरी याने आपल्या बादशहानाम्यात केली आहे. हा किल्ला सहजा सहजी जिंकणे अशक्य असल्याचीही नोंद त्यांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात ज्यांनी किल्ला बांधला तोच किश्वरखान फितुरीमुळे मारला गेला. किल्ला बांधत असताना अंकुश खान याने किश्वर खानला अंधारात ठेऊन किल्ल्याचा काही भाग जाणीवपूर्वक पोकळ ठेवला व याच मार्गाने निजामशाही सैन्याने किल्ल्यात प्रवेश करून किश्वर खानचा वध केला.

मुर्तजा निजामशहाला धारूर किल्ल्यात अलोट संपत्ती मिळाली. हत्ती, घोडे, जड जवाहिर, राहुटाचे सामान, शस्त्रास्त्रे, बंदूका मिळाल्या. या किल्ल्यात काही काळ अहमदनगरच्या निजामशहचा मुक्काम होता. त्यानेच विजयाचे प्रतीक म्हणून या गावाचे नाव बदलून फतेहाबाद ठेवले. हे नाव बदलण्यासाठी स्वातंत्र्यानंतर धारूरच्या जनतेनी खूप प्रयत्न केला व अखेर ५ मे १९७२ रोजी पुन्हा फतेहाबादचे धारूर असे नामकरण झाले. त्यांनतर याच किल्ल्यात काही काळ विठोजी राजे भोसले थांबले होते. तर राजे शिवबाचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा नेताजी पालकर याच किल्ल्यात मुक्कामास होता. शिवरायांबरोबर मतभेद झाल्यावर नेताजी पालकर आदिलशहीस जाऊन मिळाला. मोगलांनी नेताजीस आपल्याकडे वळवून घेतला. त्यास पाच हजाराची मनसब, पन्नास हजार रुपये रोख तसेच जहागिरी दिली. पण राजे शिवबा आग्रा किल्ल्यातून निसटताच औरंगजेबाने एका आदेशान्वये नेताजीस कैद करून दिल्लीस घेऊन या असा आदेश दिला.

दर्शन द्वारकाधीशाचे आणि सोमनाथाचे


सोळा कलांनी परिपूर्ण असलेल्या द्वारकाधीशाचे दर्शन घेण्याची माझी फार दिवसाची इच्छा होती. माझे मानस माझ्या मुलाने जाणले होते. अखेर द्वारकाधीशानेही माझी हाक ऐकली. जवळ जवळ 10-15 वर्षापासून मी त्याच्या दर्शनाची आस धरली होती. पण त्या राजाधीराजाला माझ्या हांके कडे लक्ष देण्यास वेळच नसावा किंवा --- असो! काही ना काही अडचणी येत होत्या आणि जाणे जमत नव्हते. भगवंताने जेव्हां माझी हाक ऐकली तेव्हा त्याने मला त्याच्या चरणाकमळापाशी येण्याची परवानगी दिली.

त्याच्याच आदेशानुसार आम्ही दोघे, चि. अमोलकडे मुंबईला पोहोचलो. चि. अमोलने 31 डिसेंबरपर्यंत सर्व कार्यक्रम आखून ठेवला होता. आरक्षण करून ठेवले होते. मग आम्ही मुलगा सून व नातवासोबत मुंबईहून अहमदाबाद एक्सप्रेसने निघालो. अहमदाबादला सकाळी पोहोचलो. गांधीनगर येथील 'केन्द्रीय सुरक्षाबल' ह्याच्या केंद्रीय सरकारी विश्रामगृहात थांबलो. स्नान, नाश्ता आटोपून गांधीनगरला असलेले स्वामी नारायण मंदिर पाहायला गेलो. या मंदिराला 'अक्षरधाम' असे म्हणतात. मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आहे.

आम्ही ह्या पवित्र परिसरात शिरलो आणि जादूची कांडी फिरावी त्या प्रमाणे काहीसे मनाचे झाले. मन दिपून गेले. डोळे आश्चर्यचकीत झाले. देवळातल्या प्रथमदर्शनी भागात दुतर्फा कारंजाची सजावट आहे. ती पाहिली आणि 'ताजमहल'ची आठवण झाली. दुपारी सुद्धा कारंजावर दिवे लागले होते आजूबाजूला सुंदर हिरवळ आणि बाग आहे. ते दृष्य पाहात पाहात आम्ही मंदिरात प्रवेश केला तेथील भारदस्त लाकडी खांब्याचे कोरीव काम पाहून मन भारावून गेले. वास्तुशास्त्राच्या कल्पनेचे कौतुक वाटले. जवळ जवळ 15 फूट उंचीचे नारायण स्वामींची पिवळी पिवळी धम्म मूर्ती मनाचा ताबा घेते. ही मंगलमय मूर्ती तांब्याची असून त्यावर सोन्याचे पॉलिश आहे. मूर्ति अत्यंत रेखीव आहे. त्याच प्रमाणे सजीव वाटते.

देव्हार्‍यातून बाहेर पडून डाव्या बाजूने वळले की खाली उतरण्यास पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरून गेलो की मोठी मोठी दालने आहेत. पहिल्या दालनात एक मोठा संगमरवरी दगड आहे. त्यात एक सुंदर मूर्ती कोरली आहे, त्या मूर्तीच्या एका हातात हातोडा व दुसर्‍या हातात छन्नी आहे. ते पाहून ती मूर्ती आपल्याला संदेश देते असे वाटते. कोणता संदेश? मानव हा एक र्निर्विकार दगड आहे. विवेक आणि वैराग्य ह्या छन्नी-हातोड्याने माणसाने स्वत:चे आयुष्य स्वत: घडवावे, असा संदेश आपल्याला मिळतो.

हा संदेश घेऊन आम्ही वाट चालू लागलो तर दर्शन घडले ते आकाशाचे. निळे काळे आकाश! आकाशातील नक्षत्र ग्रह तारे तारे यांचा खेळ पाहात पाहात पुढे चालावे तर दाट जंगल दिसू लागले, किर्र झाडी. त्यात पशुपक्षी वावरतांना दाखविले आहेत. हे सारे दगडांचे बनविले असून तेथील दृश्य मनोहर आहे. ह्या जंगलात स्वामी नारायणांची पांढर्‍या दगडाची मूर्ती आहे. स्वामी तपाला बसलेले आहेत ते पाहून वाटले की निर्जीवाला सजीवत्व प्राप्त झाले आहे. चालताना पुढल्या दालनात केव्हा प्रवेश केला कळलेच नाही. या दालनात सर्वत्र अंधार. पडद्यावर चार खाणीतील चार प्राणी दाखविले आहेत ते पाहून 'पृथ्वीवरील विविध प्राण्यांच्या देहांचे वैज्ञानिक पृथ:करण करून एक पेशीय देह उत्क्रांत होत होत मानवी देहाची निर्मिती झाल्याची, उत्क्रान्तीवादाची नवीन दृष्टी जगाला देणार्‍या, डार्विनच्या सिद्धान्ताची आठवण झाली. मानवी जीवनांत जगण्याची चाललेली धडपड, विज्ञानाची होत असलेली प्रगती, त्यापासून होणारे फायदे तोटे, त्यावर उपाय म्हणून अध्यात्मिक जीवनाची दिशा दाखविणारे संत, मानवी जीवनाचे ध्येय सांगणारे योगी, सोंगी भोगी सार्‍यांची जीव जगण्याची धडपड, निसर्गाचा प्रकोप, एक न दोन अनेक चित्र आपल्याला त्या पडद्यावर दाखविले जातात.

श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखविलेले 'विश्वरूप' आपण पाहात आहोत असे वाटते. त्यागुरुशिष्याच्या स्मृतिला आपण नतमस्तक होतो. मला तरी तसे काहीस वाटले. पुढे पाउले चालत होती एकदम महाभारत काळात पोहोचल्याचा भास झाला चौंसराचा डाव मांडून बसलेले कौरव पांडव, द्रौपदी वस्त्र-हरणाचा प्रसंग, सर्व सजीव मूर्तीच्या माध्यमातून दाखविले आहे. पुढे रामायणातील प्रसंग रंगविले आहेत. शेवटचा देखावा तर अतिशय बोलका आपले देहभान हरविणारा! स्वामी नारायण स्वत: सिंहासनावर विराजमान झाले आहेत त्यांच्या डाव्या बाजूला त्यांचे खास दरबारी सरदार आसनस्थ झाले आहेत, उजव्या बाजुला गाणार्‍यांचा संघ बसला आहे ह्या सार्‍यामूर्ती प्रत्यक्ष हावभाव करीत गात आहेत.

राजे नारायण स्वामी त्यांच्या गाण्याला दाद देत आहेत. एक सरदार नम्रपणे हात जोडून राजांना प्रश्नविचारीत आहे. महाराज हातातील फुलाचा सुवास घेऊन उत्तर देत आहेत. ह्या सार्‍या मूर्ती निर्जीव आहेत हे आपण विसरूनच जातो. भारावलेल्या मनाने आपण जेव्हां बाहेर पडतो, तेव्हां वेगळेच काही भव्य दिव्य पाहिल्याचा आनंद मिळतो व आनंदाची जाणिव होते. कोणी म्हणेल हे का द्वारकेचे दर्शन? पर सर्वाभूती असलेल्या त्या द्वारकाधीशाचेच हे दर्शन नाही का?

माळशेज घाट (पावसाळी पर्यटन) - डोंगरदर्‍यात हरवून जाण्यासाठी

माळशेज घाट सह्याद्री पर्वताच्या नैर्सगिक वैविध्याने नटलेला परिसर पुणे व मुंबईवरून सारख्याच म्हणजे 150 किलोमीटरवर आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा लागून सुट्ट्या आल्यात की माळशेज घाट पर्यटकांनी ओसंडून वाहतो. या घाटाचे सौंदर्यच तसे आहे. सर्वांना मोहवून टाकणारे. उंच पर्वरांगातून निघालेल्या चिंचोळ्या वाटा, खळाळत कोसळणारे धबधबे, लांबच लांब पसरलेला दर्‍यांयांमधील प्रदेश आणि चोहोबाजूंनी पसरलेल्या हिरव्यागार रांगांमध्ये पसरलेली टेबल लँड. या टेबल लँडच्या चोहीकडून वारे प्रचंड वेगाने वाहतात. माळशेज घाटात गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे.
पर्यावरणं अभ्यासकांची तर ही प्रयोगशाळा आहे. पावसाळ्यात ढगासोबत चालत व दवबिंदूंच्या धुक्यात खोल दर्‍यात कोसळणार्‍या धबधब्यांचा थरार अनुभवणे म्हणजे निव्वळ अप्रतिम. मान्सून संपल्यावर गुलाबी थंडी‍त मोकळ्या आभाळाखाली तळ्याच्या काठी मस्त तंबू ठोकूनं शेकोटी पेटवायची अन रात्रीचं सौंदर्य न्याहाळत, चांदण्यांशी गूजगोष्टी करत रात्र घालवण्याचा कार्यक्रमही भन्नाटच. येथूनच जवळच सात किलोमीटरवर हरिश्चंद्र गड आहे. येथील कोकण कडा गिर्यारोहकांना आव्हान आहे. या कड्याची उची आहे 1424 मीटर. मग पझल पाँईट जवळ करायचा.
बघायच आपण जंगला‍त वाट चुकतो की आपल्या ठिकाणावर परत येतो. येथील जैवविविधतेने समृद्ध जंगला‍त अनेक पक्षी आणि प्राणी सुरक्षित वातावरणात शांतपणे वाढतात. त्यांचे निरिक्षण करता येणे शक्य आहे. माळशेज रांगांमध्येच तिसर्‍या शतकातील बौद्ध गुहा आहेत. अष्टविनायकातील ओझर व लेण्याद्री ही ठिकाणे येथून जवळ आहेत. ज्योतिर्लिंग भीमाशंकरही येथून जवळच आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान येथून 35 किलोमीटरवर शिवनेरी आहे. घाटात आल्यास या ठिकाणीही जाता येईल.
जाण्याचा मार्ग ः माळशेज घाटात जाण्यासाठी पुणे व मुंबईहून बस आहेत. मित्रांसोबत मौज करत जायचे असेल तर गाडी करून जाणे सोयीस्कर. जवळचे रेल्वे स्टेशन कल्याण आहे.

नवेगांव बांध अभयारण्य - प्राणी, पक्ष्यांच्या सानिध्यात

नवेगाव येथील अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यात जगभरातील स्थलांतरित पक्षी भेट देतात. संपूर्ण महाराष्ट्रात आढळणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी निम्म्याअधिक प्रजाती नवेगांव बांध परिसरात आढळतात. नवेगावच्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेला आहे. नवेगाव तलाव येथील निवांत व नीरव शांततेत पक्षी निरिक्षणाचा आनंद अवर्णनीय आहे. आपली दुर्बिण घेऊन तलावाच्या नजीक असलेल्या मनोर्‍यावर टेहळणी करता येते. सभोवतालचा परिसर न्याहाळत, विविध पक्ष्यांचे निरिक्षण करताना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. पक्ष्यांच्या हालचाली, सवयी, वैशिष्ट्ये टिपत नोंदी घेता येतात. जराही खळबळ केली की चाहूल लागून प्राण्यांनी पळ काढलाच म्हणून समजा. हे दुर्मिळ क्षण कॅमेर्‍यात टिपल्यास आठवणींच्या देशात कधीही जाता येते.
या तलावास एकीकडून मोठी भिंत बांधण्यात आली आहे. भितीच्या पलिकडे बघितल्यास प्रचंड जलाशयाचा साठा दृष्टीस पडतो. क्षितिजापर्यत निळेशार पाणी. धरणास सभोवताली टेकड्यांनी वेढले असून हिरव्यागार वनश्रीने त्या नटलेल्या आहेत. येथील जंगलात अस्वल, सांबर, चितळ, चित्ता यासारखे प्राणी आढळतात. प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ सलिम अली पक्षी अभयारण्य, हरणांचा पार्क व सुंदर बगिचे येथे आहेत. अभयारण्यात रात्रीचा प्रवेश दिला जात नाही, तेव्हा सकाळीचे गेलेले बरे. येथे येण्यासाठी आधी येथील अभयारण्य व्यवस्थापनाशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. साहसी पर्यटकांसाठी तलावातून नौकानयन करण्याची सुविधाही आहे. सगळीकडे हिरवाईने नटलेल्या टेकड्यांच्या मध्यभागी शांत निळ्याशार पाण्यावरून वाहणारा थंडगार वार्‍याचा स्पर्श अनुभवत वल्हवत रहाणे यासारखे सुख नाही.
जाण्याचा मार्ग ः नवेगाव बांध येथे जाण्यासाठी विमानाने जवळच्याच नागपुर विमानतळावर उतरावे लागेल. तेथून हे अभयारण्य 150 किलोमीटरवर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास देऊळगांव रेल्वे स्टेशन येथून अवघ्या दोन किलोमीटरवर आहे. नवेगावपासून अभयारण्य 10 किलोमीटर आहे.