Tuesday, December 30, 2008

ओंकारेश्वराची शाही स्वारी


नर्मदा नदीस मध्यप्रदेशची जीवनरेखा मानण्यात येते। या नदीवरच ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे. बारा ज्योर्तीर्लिगांपैकी ते एक आहे. येथील सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रम्य वातावरणात आल्यावर भाविक शिवभक्तीत तल्लीन होतात. वैशिष्ट्य म्हणजे मंदिर असलेल्या डोंगराचा आकारही ॐ असा आहे आणि या डोंगरावरून पाहिल्यास माता नर्मदाही ॐ आकारात वाहत असल्याचे दिसते. इतरत्र वेगात वाहणार्‍या नर्मदा नदीचे शांत रूप येथे बघायला मिळते.वैशिष्ट्य म्हणजे येथे एक नव्हे तर दोन शिवलिंग आहेत. ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर. दोन्ही शिवलिंग जागृत असल्याचे मानण्यात येते. संथपणे वाहणार्‍या नर्मदेच्या भिन्न किनार्‍यांवर ती वसली आहेत.

मंधाता नावांच्या दिव्य पुरूषाची अंबरिष व मुषुकुंद ही दोन मुले होती। त्यांनी कठोर तपस्या केल्याने येथे दोन शिवलिंग असल्याचे मानले जाते. यामुळेच येथील पर्वत मंधाता पर्वत म्हणून विख्यात आहे. शिव पुराणानुसार... ओंकार बाबा व ममलेश्वरजी ओंकारेश्वराचे अधिपती असल्याचे मानले जाते. प्रत्येक सोमवारी प्रजेचे सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी ते शहरात फिरत असतात. भगवान ओंकारास वाजत गाजत नावेत बसवून ममलेश्वर मंदिराच्या घाटावर आणण्यात येते. येथूनच दोन्ही देवता नगर भ्रमणासाठी निघतात.

दर सोमवारच्या या पालखीला श्रावण सोमवारी विशेष स्वरूप प्राप्त होते. आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी शहरभर भक्तांची गर्दी होते. शेवटचा श्रावणी सोमवार तर मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येतो.

मनोवांच्छित ते देणारा सिद्ध‍िविनायक


सध्या महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। कला आणि विद्येची देवता असलेल्या आणि विघ्नांचे हरण करणाऱ्या या गणेशाचा रूप प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणूनच या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी विविध गणपती मंदिरात भाविकांची गर्दी उसळलेली असते. अशीच गर्दी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरातही दिसून येते. हे मंदिर खूप प्रसिद्ध असून येथे मनोकामना पूर्ण करणारा सिद्ध‍िविनायक आहे.

या मंदिरातील गणेशाच्या मूर्तीचे रूप इतर मंदिरातील मूर्तींपेक्षा वेगळे आहे। ही मूर्ती काळ्या पाषाणापासून तयार केलेली असून अडीच फूट उंच व दोन फूट रूंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या गळ्यात भुजंग आहे. तसेच मूर्तीच्या कपाळावरील त्रिनेत्राचे चिन्ह शिवरूपाचे प्रत‍ीक दर्शविते। सिद्धिविनायकाचे हे शिवरूप विलक्षण आहे. या मूर्तीला रोज नारंगी रंगाचे वस्त्र चढविले जाते. त्यामुळे मूर्ती काळसर रंगाऐवजी लालसर दिसते. गणेशाच्या हातात मोदक आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत.रिद्धी-सिद्धीला विद्या आणि धनसंपत्तीची देवता मानले जाते. या दोन मूर्ती विराजमान असल्यामुळे या मंदिराला सिद्धिविनायक मंदिर असे म्हटले जाते.

साधारणत: गणपतीची सोंड हाताकडे उलट्या स्वरूपात वळलेली असते। परंतु या मुर्तीची सोंड सरळ हाताकडे अशा स्वरूपात वळलेली आहे. म्हणूनच या विघ्नहर्त्याचे रूप विलोभनीय आहे. मंदिराची निर्मिती 19 नोव्हेंबर 1801 रोजी झाली. मंदिराच्या परिसर नेहमी वर्दळीचा आणि रहदारीचा होता.मंदिर रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे धूळ आणि केरकचरा मोठ्या प्रमाणात जमत असे. नंतर मंदिराचा जीर्णाद्धार एका महिलेने केला. या जीर्णोद्धाराचीही एक कथा आहे. या परिसरातील काकासाहेब मार्ग आणि एस. के. बोले मार्ग नेहमी वाहतुकीने गजबजलेला असल्यामुळे वाहनांचा कर्कश आवाज ऐकू येत असे.

माटूंगा येथील आगरी समाजाच्या श्रीमती देऊबाई पाटील यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. श्रीमती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आर्थिक मदतीवर व्यावसायिक लक्ष्मण विठू पाटील यांनी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. श्रीमती पाटील यांच्याकडे संपत्ती मोठ्या प्रमाणात होती. पण त्यांना मूल नव्हते. त्या रात्रंदिवस पुत्रप्राप्तीसाठी गणपतीची पूजा करत असत.पुत्र झाल्यावर गणपतीचे एक भव्य मंदिर बांधेन असा नवस त्यांनी केला होता. गणपती पूजेवर त्यांचा खूप विश्वास होता. म्हणून त्यांनी एका मूर्तिकाराला घरातील दिनदर्शिकेवर असलेल्या गणपतीसारखीच हुबेहूब मूर्ती तयार करण्यास सांगितले. योगायोगाने ते चित्र मुंबईतील वाळकेश्वर येथे असलेल्या बाणगंगाचे होते आणि ती मूर्ती 500 वर्ष जुनी होती.

श्री अरूणाचलेश्वर (तिरूअन्नामलय्यर) मंदिर


अरूणाचलेश्वर मंदिर असलेल्या पवित्र टेकडीस प्रत्येक पौर्णिमेस जवळपास दोन ते तीन लाख भाविक अनवाणी पायांनी चौदा किलोमीटर प्रदक्षिणा घालतात। मंदिराच्या वार्षिक सोहळ्याच्या निमित्ताने या पवित्र टेकडीवर प्रज्वलित करण्यात आलेल्या ज्योतीचा 'याची देही याची डोळा' अनुभव घेण्यासाठी जवळपास पंधरा लाख भाविक जमतात. हिंदू धर्मांत महाशिवरात्र या पवित्र सणांची सुरवात या ठिकाणाहूनच झाली. दक्षिणेतील सुप्रसिद्ध श्री अरूणाचलेश्वर मंदिर तमिळ भाविकांमध्ये तिरू अन्नामलाईयार नावानेही प्रचलित आहे. साक्षात भगवान शंकराची ही टेकडी असल्याचे मानण्यात येते. टेकडीची उंची साधारणत: अडीच हजार फूट आहे.

धार्मिक, अध्यात्मिक महात्म्य लाभलेल्या या ठिकाणी एकदा तरी डोके टेकवून पुण्य पदरी पाडलेच पाहिजे। भगवान शिवशंकराच्या पंचमहाभूतांपैकी श्री अरूणाचलेश्वर एक आहे. (अरूणाचलेश्वर हे अग्नीक्षेत्र आहे. कांची व तिरूवरूर हे पृथ्वी, चिदंबरम आकाश, श्री कलाहस्ती वायू व तिरूवनायका जलक्षेत्र आहेत.)

महाशिवरात्र-

शिवपुराणानुसार भगवान शंकराने विराट अग्निरूप धारण करून ब्रह्मा व विष्णूस आपल्या श्रेष्ठत्वाची प्रचिती येथेच दिली होती। देवराज ब्रह्मा व विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वासाठी वाद झाला. श्रेष्ठ कोण यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ते भगवान शंकराकडे आले. शंकराने दोघांपैकी जो माझ्या डोक्याचे किवा पायांचे दर्शन घेऊ शकेल तो श्रेष्ठ, अशी अट घातली. भगवान शंकराने धरतीपासून आकाशापर्यंत पेटत्या ज्योतीचे रूप धारण करून दोघांनाही डोके व पाय शोधण्यास सांगितले. भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण केले व भगवान शिवाचे पाय शोधण्यासाठी जमीन खोदण्यास सुरूवात केली. ब्रह्मदेवाने हंसाचे रूप धारण करून महेश्वराचे डोके शोधण्यासाठी आकाशात भरारी घेतली. मह्त्प्रयायासानंतरही त्यांना महेश्वराचे डोके किवा पाय शोधण्यात यश आले नाही.

विष्णूंनी पराभव स्वीकारला. ब्रह्मदेवही दमले. त्यांनी आकाशातून फूल पडत असल्याचे पाहिले. ब्रह्मदेवाने त्याला विचारणा केली असता, भगवान शंकराच्या केसांच्या जटांमधून पृथ्वीवर पोहचण्यासाठी युगायुगाचा प्रवास करत असल्याचे उत्तर त्याने दिले. शिवाच्या अग्निरूपातून निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेत धरती तर होरपळून निघालीच, शिवाय स्वर्गही असहाय्य उष्णतेने उकळून निघाला.

Sunday, December 28, 2008

सर्वधर्मभावाचे प्रतीकः अजमेर शरीफ दर्गा


अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हे भारतातील मुस्लिमांचे सर्वांत पवित्र स्थळ आहेच। पण मुस्लिमांशिवाय इतर धर्मातील लोकही या दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे एका अर्थी हे स्थळ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. हा दर्गा म्हणजे प्रसिद्ध मुस्लिम संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी आहे. भारतात इस्लामच्या आगमनाबरोबरच सुफी पंथाचीही सुरवात झाली. सूफी संत एकेश्वरवादावर विश्वास ठेवतो.

पण या पंथाचा भारतातील प्रसार सहिष्णू पद्धतीने झाला। सहिष्णुता, उदारमतवाद, मानवप्रेम आणि बंधूभाव हा या पंथाचा आधार होता. या पंथातील एक होते हजरत मोईनुद्दीन चिश्ती.

त्यांचा जन्म इराणमध्ये झाला होता। तेथे काही वर्षे व्यतीत केल्यानंतर ते भारतात आले. ख्वाजा साहेब ईश्वरभक्तीत अखंड बुडालेले होते. लोकांच्या सुखासाठी ते सर्वशक्तीमान अल्लाकडे प्रार्थना करत. मानवसेवा हाच ख्वाजासाहेबांचा धर्म होता. बादशाह अकबराने एकदा पुत्रप्राप्तीसाठी या दर्ग्यात येऊन प्रार्थना केली होती. त्यानंतर अकबराला मुलगा झाला. या आनंदाप्रित्यर्थ ख्वाजा साहबसमोर माथा टेकण्यासाठी अकबर आमेरपासून अजमेर शरीफपर्यंत चालत आला होता.

तारागढ डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा दर्गा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे। इराणी व भारतीय वास्तुकलेचा संगम याच्या बांधणीत दिसतो. दर्ग्याचे प्रवेशद्वार व घुमट अतिशय सुंदर आहे. याचा काही भाग बादशाह अकबर आणि शहाजहानने बांधला होता. दर्ग्याचे पक्के बांधकाम मांडूचा सुलताना ग्यासुद्दीन खिलजीने केले होते.

दर्ग्याच्या आत अतिशय सुंदर नक्षी असणारा चांदीचा पिंजरा आहे। त्यात ख्वाजा साहेबांची मजार आहे. हा पिंजरा जयपूरचे महाराजा जयसिंह यांनी बनविला होता. दर्ग्यात मैफिलीसाठीची खास खोलीसुद्धा आहे. तेथे कव्वाल ख्वाजाच्या स्तुतीप्रित्यर्थ कव्वाली गातात. दर्ग्याच्या आजूबाजूला अनेक ऐतिहासिक इमारतीही आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक- धर्माच्या नावावर एकीकडे दंगली होत असताना येथे मात्र हिंदू, मुस्लिमांसह इतर धर्माचे लोक येऊन ख्वाजासाहेबांवर चादर चढवतात. डोके टेकवतात आणि मनःशांतीचा अनुभव घेतात. येथील उरूस इस्लामी दिनदर्शिकेनुसार रजब महिन्याच्या एक ते सहा तारखेपर्यंत साजरा केला जातो. उरसाची सुरवात ख्वाजासाहेबांच्या मजारवर हिंदू कुटुंबाद्वारे चादर चढवूनच होते.

डेंग- दर्ग्याच्या समोरच मोठी डेंग (भले मोठे पातेले) ठेवले आहे। बादशाह अकबर व जहांगीरने ते दिल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून आजपर्यंत त्यात काजू, बदाम, इलायची, केशर टाकून भात केला जातो व गरीबांना वाटला जातो.

कसे जावे- अजमेर शरीफ दर्गा राजस्थानातील अजमेर शहरात आहे. हे शहर रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गाने जोडले आहे. परदेशात रहात असाल तर दरगाह अजमेर डॉट कॉम किंवा राजस्थान पर्यटन विभागाकडून आपल्याला अधिक माहिती मिळू शकते.

अंबाजी येथील अंबा माता


गुजरातमधील धार्मिक स्थळांमध्ये अंबा देवीचे स्थान प्रमुख आहे। उत्तर गुजरातमध्ये अहमदाबादपासून १८० किलोमीटरवर अंबाजी या गावात या देवाचे स्थान आहे. या देवीला आरासुरी असेही म्हणतात. आरासुरी म्हणजे डोंगरावर असलेली देवी. हे मंदिर खूप प्राचीन आहे. त्याच्या गर्भगृहात प्रत्यक्षात देवीची मूर्ती नाही. तेथे देवीचे आसन आहे. त्यावर देवीचे दागदागिने आणि वस्त्रे अशा पद्धतीने ठेवली आहेत, की ते पाहून असे वाटते, देवीच तेथे बसली आहे. येथे देवी रोज वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते, अशी श्रद्धा आहे.

गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर पालनपूरपासून ६५ किलोमीटवरवर आणि माऊंट अबूपासून ४५ किलोमीटरवर अंबाजी हे गाव आहे। येथेच अंबामातेचे हे मंदिर आहे. गुजरातमधील बड्या मंदिरात याचा समावेश होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत असल्यामुळे राज्यातील श्रीमंत मंदिरापैकी हे एक आहे. अंबेचे मूळ स्थान मात्र या मंदिरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या गब्बर नावाच्या डोंगरावर आहे. देवीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या ठिकाणी दुर्गामातेचे ह्रदय पडले होते, असे मानले जाते.

गब्बर येथील अंबेचे मंदिर प्राचीन आहे. आर्यांच्या अस्तित्वापूर्वीपासून अंबामातेची पूजा केली जाते असे मानले जाते. आर्यांनी ही देवी स्वीकारून तिची आराधना पुढे सुरू ठेवली. गब्बर डोंगरावर असलेली पदचिन्हे व रथाच्या चाकाचीही चिन्हे मातेचीच आहेत, अशी श्रद्धा आहे. येथेच श्रीकृष्णाचे मुंडन करण्यात आल्याचे सांगितले जाते. येथे सुवर्ण यंत्र कोरण्यात आले असून त्यात ५१ श्लोक आहेत.

Saturday, December 6, 2008

तीन देवींचे त्रिशक्ती रूप


श्री कालीमाता अम्मावरी देवस्थान हे हे त्रिशक्ती पीठ णून प्रसिद्ध आहे। आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे ‍असलेले हे मंदिर कृष्णवेणी या नदीच्या काठी वसले आहे. येथे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत. त्या इच्छाशक्ती, क्रियाशक्ती व ज्ञानशक्ती आहेत असे मानले जाते. हे स्थान अष्टदश पीठात मोडते.

स्थळ पुराण-

नेल्लोरजवळील जंगलात एका लष्करी अभियंत्याला स्वयंभू श्री महाकालीची मूर्ती सापडली। ती त्याने विजयवाडा येथे आणली. शक्तीची उपासना करणारा गुंजा रामास्वामी याने 14 ऑक्टोबर 1947 ला कृष्णवेणी नदीच्या काठी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. 'कालिदास' अर्थात कालीचा शिष्य या नावाने ओळखल्या जाणार्‍या या उपासकाने 11 वर्षे या लहानशा मंदिरात या देवीची पूजा केली. त्यानंतर काही कारणांमुळे हे मंदिर बंद झाले. सन 1965 साली तुर्गा वेंकटेश्वरलू याने 15 वर्षांपासून बंद असलेल्या या मंदिराचे द्वार उघडले. द्वार उघडल्यानंतर त्याला व त्याच्यासोबत असणार्‍यांना मंदिरात ज्योतीचा प्रकाश पसरलेला दिसला. मूर्तीभोवती त्यांना आभा दिसली. महाकालीच्या शक्तीचा त्यांना प्रत्यय आला. त्यानंतर शास्त्राप्रमाणे नियमित वैदिक पध्दतीने पूजा केली जाऊ लागली. त्यानंतर येथे भाविकांच्या गर्दीत नवरात्र, दिवाळी व विविध उत्सव साजरे केले जात आहेत.

दशमुखी माहाकाली
या महाकालीला दहा तोंड व दहा पाय आहेत। ती निळ्याशार रंगाची आहे. तिच्या आठही हातात नक्षीदार आभुषणे व शस्त्रे आहेत. तिने तलवार, चक्र, धनुष्य, मानवी डोके, चक्र, कमान, शंख, गोफ, खण आदी आयुधे धारण केली आहेत. तिला योगनिद्रा असे संबोधले जाते. तिच्या प्रभावाखालीच भगवान विष्णूला निद्रेच्या आधीन झाले. म्हणून ब्रह्मदेवाने तिला विनंती केली, की मधू व कैटभ या राक्षसांचा निःपात करण्यासाठी विष्णूला निद्रेतून जागे कर.

अठरा हातांची महालक्ष्मी
महालक्ष्मी ही देवीचे राजस रूप आहे। ही महालक्ष्मी लाल रंगाची आहे. तिच्या अठरा हातांमध्ये तलवार, खण, धनुष्यबाण, पाण्याचे भांडे, कमळ, सुदर्शन चक्र, जपमाळ, वज्रास्त्र, गदा, घंटा, त्रिशूळ, ब्रम्हपाश आदी शस्त्रे आहेत. ही देवी शक्तीचे आणि त्याचवेळी आसुरी शक्तींविरूद्ध लढण्याच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा रंग रक्ताचा, युद्धाचा म्हणजे लाल आहे. तिने महिषासूरालाही संपविले आहे. म्हणूनच महिषासूर मर्दिनी म्हणूनही शक्ती उपासक तिची उपासना करतात.

अष्टहातांची सरस्वती
महासरस्वती ही देवीचे सात्विक रूप आहे। ती शिशिरातल्या चंद्रासारखी दिसते. तिच्या आठ हातांमध्ये घंटा, त्रिशूळ, धनुष्यबाण आदी शस्त्रास्त्रे आहेत. ही देवी शारीरिक शक्तीचे व सौंदर्याचे प्रतीक आहे. सरस्वतीने धुम्रलोचन, चंड, मुंड, निशुंभ, शुंभ या असुरांचा वध केला. माहेश्वरी किंवा राज राजेश्वरी ही या तिनही देवींच्या उर्जेचा स्त्रोत आहे. तिलाच 'ललिता त्रिपूरसुंदरी' असे तिला म्हणतात. ललिता म्हणजे सौंदर्य.

मंदिरापर्यंत कसे जाल

विजयवाडा शहराच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर वसले आहे. रेल्वे स्टेशनपासून किमान 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. विजयवाडा हे शहर हैदराबादपासून 275 किलोमीटरवर आहे. हे शहर रस्ता, रेल्वे, हवाई सेवेने पूर्ण देशाशी जोडले आहे.

मदर मेरीचे केरळमधील अनोखे चर्च


मदर मेरीने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिला तो दिवस सर्वत्र नाताळ म्हणून साजरा होतो। या पावन दिनी जगभरात मदर मेरीसोबत प्रभू येशूची प्रार्थना करण्यात येते. यानिमित्त प्रभू येशूची आई मदर मेरी यांच्या सन्मानार्थ केरळमध्ये बनवण्यात आलेल्या ऐतिहासिक चर्चची भेट आपणास घडवणार आहोत. नऊशे वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1023 मध्ये या चर्चची निर्मिती करण्यात आली होती. पोर्तुगाली वास्तुशैलीत चर्चचे बांधकाम करण्यात आले आहे. चर्चमध्ये स्थापन करण्यात आलेली मदर मेरी यांची मूर्ती फ्रान्सहून मागवण्यात आली होती. मूर्तीत मदर मेरीचे सुंदर रूप साकारण्यात आले आहे. चिरथल्ला मुट्टम सेंट मेरी फॅरोना नावाने हे चर्च प्रसिद्ध आहे. केरळच्या एलापुजा जिल्ह्यात चिरथल्ला हे छोटेसे गाव आहे. प्राचीन काळी हे शहर केरळमधील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते.

शहराची स्थापना ज्यू लोकांनी केली होती असे मानण्यात येते। संत थॉमस येशूच्या संदेशाच्या प्रचारासाठी सर्वप्रथम केरळात आले होते. येथे त्यांनीच सर्वप्रथम सात चर्चची स्थापना केली होती. यानंतर ख्रिश्चन धर्माच्या अनुयायात वाढ होऊन त्यांनी अनेक ठिकाणी चर्चेस स्थापन केली. चिरथला येथील मुट्टम चर्च त्यातीलच एक आहे. मुट्टम येथील चर्चमध्ये प्रत्येक धर्माचे भाविक प्रार्थनेसाठी येतात. येथे आल्यानंतर मनोकामना पूर्ण होण्यासोबतच दु:खाचे हरण होते, अशी श्रद्धा आहे. परिसरातील कोणत्याही धर्माची व्यक्ती नवकार्याच्या शुभारंभापूर्वी येथील मदर मेरीच्या चर्चमध्ये येऊन आशीर्वाद घेते. जीवनातील सुख-दु:ख वाटण्यासाठी ते येथेच येतात. मदर मेरी प्रभू येशू ख्रिस्त व भाविकांमधील दुवा असून ती भक्तांची इच्छा प्रभूपर्यंत पोहचवते, अशी श्रद्धा आहे. मदर मेरीस पवित्र माता मानण्यात येते. सहावे पोप यांनी ही बाब पहिल्यांदा सांगितली.

मुट्टम येथील चर्चमध्ये आठ डिसेंबरनंतरच्या पहिल्या रविवारी मदर मेरीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याशिवाय दुसरी मुख्‍य मेजवानी आठ जानेवारीस असते. यावेळी मदर मेरी व येशू ख्रिस्ताच्या मूर्तींची शोभायात्रा काढण्यात येते. मदर मेरीस मानवतेची देवी समजण्यात येते. आई मुलांचा सांभाळ करते त्याप्रमाणेच मदर मेरी सर्वांना आशीर्वाद देते, त्यांचे कल्याण करते, असे मानले जाते. म्हणूनच ‍फक्त ख्रिश्चनच नाही तर सर्व धर्मातील भाविक येथे भेट देतात.

शिवशंकराचे निवासस्थान- कैलास


भारतीय अध्यात्मात कैलास पर्वताचे स्थान अद्वितीय आहे। भगवान शंकराचे निवासस्थान म्हणून त्याची पौराणिक महती तर आहेच, पण अध्यात्म आणि दर्शनशास्त्रातही या पर्वताचे महत्त्व अलौकीक आहे. म्हणूनच तप, तपश्चर्या यासंदर्भात कैलास पर्वताचे उल्लेख वारंवार येत असतात. त्याच्या पवित्र स्थानामुळेच त्याच्याभोवती एक गूढ पण अध्यात्मिक वलयही आहे. कदाचित त्यामुळेच या पर्वताची यात्रा हा अतिशय दिव्य व तितकाच पवित्र अनुभव ठरतो.

कैलास पर्वतावर प्रकाश व ध्वनी यांचा संगम होऊन त्यातून ‘ॐ’ च्या आवाजाची निर्मिती होते, असे मानले जाते। भारतीय अध्यात्मात, दर्शनशास्र्त्रात या पर्वातचे स्थान ह्रदयाच्या जागी आहे. कल्पवृक्षाची कल्पना जी पुराणात आहे, तो येथेच असल्याचे मानण्यात येते. या पर्वताच्या चारही दिशांना चार रत्नांची नावे आहेत. उत्तर बाजू ही सोन्याची आहे. ऐश्वर्य ज्याच्या पायी लोळण घेते त्या कुबेराची राजधानीही कैलासावर असल्याचे मानले जाते. विष्णूच्या पायातून निघालेली गंगा कैलासावर अभिषेक करते आणि येथे शिवशंकर तिला आपल्या जटेत धारण करतात. त्यातूनच गंगा पुढे वाहत जाते.

कैलासाचे स्थान केवळ हिंदूधर्मियांसाठीच महत्त्वाचे आहे, असे नव्हे, तर इतर धर्मातही त्याला तेवढेच मह्त्व आहे। कैलासावरच बुद्धाचे डेमचौक हे रूप बौद्धधर्मियांसाठी तेवढेच पवित्र आहे. बुद्धाच्या या रूपाला धर्मपाल असेही संबोधतात. येथे आल्यानंतर निर्वाणाची प्राप्ती होते, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्याचवेळी जैन धर्माच्या पहिल्या तीर्थंकरानेही येथेच निर्वाणानुभव घेतला. गुरू नानक यांनीही निर्वाणासाठी कैलासाला येणेच पसंत केले होते, असे काहींचे म्हणणे आहे.

मानसरोवरामुळे कैलास पर्वताचे अध्यात्मिक महत्त्व खूपच वाढले आहे। विलक्षण सौंदर्य आणि उच्च कोटीचा धार्मिक, पवित्र भाव येथे आल्यानंतर निर्माण होतो. मनोव्याधी झडून जातात. सर्व शरीर व मनात असा एक भाव निर्माण होतो, जो आपण कधीही अनुभवलेला नसतो. कैलासाचे महत्त्व वारंवार सांगितले जाते ते कदाचित यामुळेच असावे.

मानसरोवर दर्शन-

राजा मानधाता यांनी मानसरोवर शोधून काढले असे मानले जाते। त्यांनी या सरोवराच्या किनाऱ्यावर बसून तपस्या केली होती. या सरोवरात असा एक औषधी वृक्ष आहे, ज्यामुळे सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक रोगांवर उपचार करता येतो, असे बौद्ध धर्मियांचे म्हणणे आहे. येथे जाण्यासाठी काही बाबींकडे मात्र लक्ष द्यावे लागते. या स्थानाची उंची साडेतीन हजार मीटरहून अधिक आहे. त्यामुळे ऑक्सिजन कमी आहे. परिणामी डोके दुखणे, श्वास घेण्यात अडचण, कसेनुसे वाटणे याचा अनुभव येऊ शकतो.

कैलास मानसरोवर येथे कसे जावे-

१। भारतातून रस्ता मार्गे- भारत सरकारतर्फे रस्तामार्गे या यात्रेचे आयोजन केले जाते. येथे पोहोचण्यासाठी २५-३० दिवस लागतात. त्यासाठी आगाऊ बुकींगही होते. ठरावीक संख्येतच लोकांना नेले जाते. त्याची निवड परराष्ट्र मंत्रालयातर्फे केली जाते.

२। हवाई मार्ग- काठमांडू येथे विमानाने जाऊन तेथून रस्तामार्गे मानसरोवर येथे जाता येते.

३। कैलासापर्यंत हेलिकॉप्टरनेही जाता येते. काठमांडूहून नेपालगंज व तेथून सिमीकोट येथे जाता येथे. तेथून हिलसापर्यंत हेलिकॉप्टरने जावे लागते. मानसरोवरापर्यंत जाण्यासाठी लॅंडक्रूझरचाही वापर करू शकता.

४. काठमांडूहून ल्हासा येथे चायना एअरची हवाई सेवा उपलब्ध आहे. तेथून तिबेटच्या शिंगोटे,ग्यांतसे, लहात्से, प्रयांग येथे जाऊन मानसरोवराला जाता येते.

जैन महातीर्थ मोहनखेडा


इतिहासप्रसिध्द धार जिल्ह्यातील सरदारपूर तालुक्यात मोहनखेडा येथे श्वेतांबर जैन समाजाचे एक तीर्थक्षेत्र आहे। हे तीर्थक्षेत्र केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. परमपूज्य दादा गुरूदेव श्रीमद् विजयराजेंद्र सूरीश्वरजी महाराजांचे वास्तव्य येथे आहे. दरवर्षी गुरूसप्तमीच्या दिवशी येथे भाविक चांगलीच गर्दी करतात. लाखो भाविक पूज्य गुरूदेवांचा जयघोष करत त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त करतात. या वर्षी 15 जानेवारीला गुरूसप्तमीचे पवित्र पर्व आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे.

पूजनीय दादा गुरूदेव श्रीमद् विजय राजेंद्र सूरीश्वरजी यांच्या दिव्य दृष्टीतून हे मंदिर बांधले गेले आहे। त्यांनी सन 1928 व 1934 मध्ये राजगड येथे चातुर्मास केला होता. 1938 मध्ये त्यांनी आलीराजपुरात चातुर्मास केला. त्यानंतर धार जिल्ह्यातील राजगड येथे त्यांचे पुनरागमन झाले. त्यावेळी त्यांनी शिष्य लुणाजी पोरवाल यांना सांगितले, की सकाळी उठून नदीवर जा आणि ज्या ठिकाणी कुंकूचे स्वस्तिक दिसेल तेथे खूण ठेवून त्याच जागी मंदिर बांधा. गुरूदेवांच्या आदेशावरून लुणाजी यांनी मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू केले. संवत 1940 मध्ये ते राजगड नगरीत राहीले. श्री गुरूदेवांनी या दरम्यान शुक्ल सप्तमीच्या शुभ दिवशी मूळ नायक ऋषमदेव भगवंत यांच्यासह 41 जैन साधूंची पूजा बांधली. हे तीर्थ आगामी काळात मोठे तीर्थ बनेल व ते मोहनखेडा या नावाने पुकारले जाईल, असे त्यांनी सांगितले. ते आता प्रत्यक्षात उतरले आहे.

मंदिराचे वर्तमान स्वरूप -

सध्या या परिसरात भव्य व तीन मजली मंदिर आहे। मंदिरात मूळ नायक आदिनाथ यांची 31 इंची सुदर्शन मूर्ती आहे. या मूर्तीची प्रतिष्ठापना गुरूदेवांनी केली आहे. श्री शंखेश्वर व श्री चिंतामणी यांच्याही मूर्ती येथे आहेत. तळघरात प्रवेश करण्यासाठी संगमरमरी तीन कलात्मक द्वार आहेत. त्या ‍जागी श्री अनंतनाथ, श्री सुमतीनाथ व अष्टधातू यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या वरील भागात अजून एक मंदिर आहे. ते श्री शांतीनाथ यांचे आहे. याशिवाय परिसरात श्री आदिनाथ मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. भगवान आदिनाथ यांची 16 फूट 1 इंच श्यामवर्ण कायोत्सर्ग मुखवटा असलेली मूर्ती आहे. ही प्रतिमा अष्टमंगल आसनावर स्थानापन्न आहे. मोहनखेड्यात मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूस तीन शिखरांनी युक्त पार्श्वनाथ मंदिराची स्थापना केली आहे. यात श्री पार्श्वनाथ यांच्या श्यामवर्णाच्या दोन पद्मासन प्रतिमा स्थापित आहेत. जैन परंपरांमध्ये तीर्थकार भगवान, आचार्य, व मुनी भगवंतांच्या चरण पादुकांची स्थापना करण्याची परंपरा आहे.

सुवर्णजडित समाधी मंदिर-

गुरूदेवांची पवित्र मूर्ती मोहनखेड्याला आहे। त्यांचे निर्वाण येथेच जाले. त्यांची मूर्ती सुवर्णजडित आहे. आजही मंदिराच्या भिंतींवर सुवर्ण जडवण्याचे काम सुरू आहे.

सामाजिक बांधिलकी-

गुरूदेवांच्या आशीर्वादामुळेच हे तीर्थक्षेत्र आज मानवसेवेचे मोठे तीर्थक्षेत्र बनले आहे। येथे श्री आदिनाथ राजेंद्र जैन गुरूकूल चालविले जाते. यात विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवण्याची व त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे शेकडो विद्यार्थी शिकत आहेत. मानवसेवेसारखा कोणताच धर्म नाही ही शिकवण प्रत्येक धर्म देतो. हीच शिकवण हे मंदिर देते. नेत्रसेवेसाठी देखील हे तीर्थ प्रसिध्द आहे. 1999 मध्ये याठिकाणी 5 हजार 427 लोकांचे ऑपरेशन केले गेले. याशिवाय शाकाहाराचा प्रचार व व्यसनमुक्तीसाठी शिबिरे आयोजित केली जातात. इतकेच नव्हे तर गोवंशासाठी मोठी गोशाळा बांधली आहे. यात सर्व सुविधांनी युक्त गो निवास बनविले आहेत. प्राण्यांसाठी 10 हजार वर्गफूटाचे भव्य कुरण आहे. ज्योतिष सम्राट श्री ऋषभचंद्र विजयजी यांच्या प्रेरणेने व त्यांच्या मेहनतीने साकार झाले आहे.

संशोधन संस्था-

श्री गुरू राजेंद्र विद्या संशोधन संस्थेची स्थापना मोहनखेडा तीर्थ येथे केली गेली। याचा मुख्य उद्देश जैन साहित्याची आवड असणार्‍यांना ग्रंथालय उपलब्ध करून देणे व संशोधन साहित्य प्रकाशित करणे हा होय.

कसे पोहचाल-

मोहनखेडा येथे जाण्यासाठी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील सरदारपुर तालुक्यातील राजगड येथे जावे लागते. तेथून मोहनखेडा 5 किमी दूर आहे. इंदूरहून राजगडला जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. धार जिल्हा मुख्यालयापासून प्रत्येक तासाला बससेवा उपलब्ध आहेत. मोहनखेडा येथून 60 किमी अंतरावर मेघनगर रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी यात्रेकरूंची राहण्यासाठी धर्मशाळांची व्यवस्था आहे.

Monday, December 1, 2008

भाविकांचे श्रध्दास्थान शिर्डीचे साईबाबा


अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील 'शिर्डी' हे आधुनिक भारतातील तीर्थक्षेत्र बनले आहे। साईबाबांच्या वास्तव्याने पुनित झालेले एकेकाळचे खेडेगाव आता शहर बनले आहे. बाबांचा आधार घेण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे येत असतात. मनमाड अहमदनगर या राज्य मार्गावर हे गाव वसलेले आहे.

अलौकिक विभूती असलेले सदगुरू श्री साईबाबा शिर्डीत प्रकटले व जवळपास 60 वर्षे आपले मानवी वेशातील अवतारकार्य पूर्ण करून येथेच समाधीस्थ झाले। शिर्डीस येणे, वास्तव्य करणे हीच मोठी साधना असल्याचा प्रत्यय स्वत: साईबाबांनी घेतला व तोच इतरांनाही येत असतो. श्री साईबाबांच्या पवित्र पदस्पर्शाने व अलौकिक अवतार कार्याने पावन झालेली ही पुण्यभूमी आज सर्वच जाती-धर्मातील पंथ, संप्रदायातील लोकांना मुक्त प्रवेश असणारे ठिकाण आहे.

श्री साईबाबांनी आपल्या अवतारकार्यात आपल्या भक्तांना आश्वासन दिलं होतं, ''माझ्या देहत्यागानंतर माझी हाडं माझ्या तुर्बतीतून बोलतील... मुंग्यांसारखी माणसांची रीघ लागेल।'' त्याचा प्रत्यय आज येतो आहे. शेकडो, हजारो, लाखो भाविक देशाच्या कानाकोपर्‍यातून, विदेशातून शिर्डीला गर्दी करीत आहेत. येथूनच बाबांनी संपूर्ण जगाला 'श्रध्दा-सबूरी' हा महामंत्र दिला. त्याचमुळे बाबांचे समाधीस्थळ लाखो भाविकांच्या मनाला उर्जा देणारे केंद्र बनले आहे. शिर्डीस आल्यावर श्री साईबाबांच्या दर्शनानंतर प्राप्त होणारी मन:शांती, मिळणारा आत्मविश्वास, परम् मन:शांतीचा येणारा प्रत्यय यामुळे शिर्डी हे जगातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.

श्री साईबाबांचे समाधी मंदिर -

हे मुख्य मंदिर आहे। मंदिराची ही इमारत नागपूरचे निस्सीम साईभक्त श्री. गोपाळराव बुट्टी यांनी बाबांच्या आशीर्वादाने बांधली होती. म्हणून 'बुट्टी वाडा' या नावानेही ती ओळखली जाते. १५ ऑक्टोबर १९१८ रोजी विजयादशमीच्या दिवशी बाबांनी आपल्या ऐहिक जीवनाचे सीमोल्लंघन केले आणि त्यांच्या व्यक्तव्यानुसार त्यांचा देह या वाड्यात ठेवण्यात आला, ते आजचे समाधी मंदिर होय. या ठिकाणी श्री साईबाबांची पवित्र समाधी व मूर्ती आहे. समाधी मंदिरात दररोज नित्य पूजा, अभिषेक व चार आरत्या होतात.

गुरूस्थान -

बाबा सोळा वर्षांचे असताना ज्या ठिकाणी प्रथम दृष्ट्रीस पडले ते हे समाधी मंदिर परिसरातील ठिकाण, त्यांच्या गुरूचे आहे, असे बाबा सांगत असत। श्री साईसच्चरितात उल्लेख असलेला प्रसिध्द निंब वृक्ष येथेच आहे. या ठिकाणी गुरूवारी व शुक्रवारी उद (लोबान, धूप) प्रज्वलित केल्यास भाविकांचा दु:ख परिहार होतो, असे श्री साईसच्चरितात म्हटले आहे.

द्वारकामाई(मशीद) -

बाबा शिर्डीस आल्यापासून समाधीस्थ होईपर्यंत त्यांचे वास्तव्य सलग 60 वर्षे समाधी मंदिर परिसरातील या ठिकाणी होते। असंख्य भक्तांना या ठिकाणी बाबांनी कृपाप्रसाद दिला. बाबा ज्या शिळेवर बसत असत, ती येथेच आहे. शिवाय बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी या ठिकाणी अखंडपणे प्रदीप्त आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाबा याच धुनीतून त्यांना उदी देत असत. आताही भक्तांना द‍िली जाणारी उदी याच धुनीतून प्राप्त होते. बाबा येथे अन्न शिजवून भक्तांना वाढीत असत.

चावडी -

एक दिवसाआड बाबा या ठिकाणी मिरवणूकीने द्वारकामाईतून येत असत व मुक्काम करीत असत। समाधी मंदिर परिसराच्या जवळच पूर्वेला चावडी आहे. आता प्रत्येक गुरूवारी रात्री 9:15 ते 10:00 या वेळी द्वारकामाईतून चावडीकडे पालखी मिरवणूक निघत असते. या पालखीतच बाबांची तसबीर, सटका व पादुका ठेवलेल्या असतात.

लेंडीबाग-

समाधी मंदिर परिसरातच असलेल्या या ठिकाणी बाबा फेरफटका मारावयास जात असत. बाबांनी स्वत: या ठिकाणी लावलेल्या पिंपळ वृक्षाशेजारी नंदादीप अखंडपणे तेवत ठेवलेला आहे. शिवाय या ठिकाणी दत्तमंदिर असून बाबांचा आवडता घोडा श्यामकर्ण (श्यामसुंदर) जवळच चिरनिद्रा घेत आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरीस 'बाबांची शिवडी' असे म्हटले जाते