Thursday, October 30, 2008

वनातील काळदुर्ग


झिम्माड पाऊस अनुभवायचा असेल तर श्रावण महिन्यासारखा दुसरा उत्तम काळ नाही. श्रावण महिन्यात साऱ्या चराचराला नुसता बहार आलेला असतो. अशा वेळी आमच्या सारख्या निसर्गवेड्या माणसांना या काँक्रीटच्या जंगलात थांबणं कठीण होतं आणि आमची पावलं आपसूकच निसर्गाकडे ओढली जातात. पावसाळी रविवार म्हटलं की पावसात भिजायला बाहेर पडलेली बेधुंद तरुणाई, एखादं धबधब्याचं ठिकाण, त्या ठिकाणी भिजण्यासाठी कुंभमेळ्याप्रमाणे जमलेले शेकडो पर्यटक... अशा वेळी पावसाची खरी मजा लुटता येत नाही. म्हणूनच आम्ही जरा हटकेच ठिकाण निवडले आणि आमचा मोर्चा काळदुर्गाकडे वळवला. भटक्यांच्या यादीत दुय्यम स्थान असलेल्या काळदुर्गाला पोहोचण्यासाठी पहाटे विरारहून सुटणारी ६.२० ची शटल पकडायची आणि पालघरला उतरायचं. पालघर एस.टी. स्थानकातून मनोरकडे जाणारी एस.टी. बस पकडायची आणि वाघोबाच्या खिंडीत दाखल व्हायचं.

काळदुर्गाला जायला आम्ही थोडा आरामदायी मार्ग निवडला. मंुबई-अहमदाबाद महामार्ग असलेल्या मस्तान नाक्यावरून आमची कार मनोर-पालघर रस्त्यावर वळली आणि आतापर्यंत दडी मारून बसलेल्या पावसाने आमचं जोरदार स्वागत केलं. साधारण दहा किमी अंतर पार केल्यावर सुर्या नदीवरचा पूल ओलांडून वळणावळणाच्या घाट रस्त्यावरून आम्ही वाघोबाच्या खिंडीत पोहोचलो. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे घाटात धबधब्याचं कोसळणं सुरू झालं होतं. तर वरच्या बाजूला ढगांचा पडदा बाजूला सारून काळदुर्ग आम्हाला खुणावत होता. खिंडीत असलेल्या आदिवासींच्या वाघदेवामुळे या खिंडीला 'वाघोबाची खिंड' असं नाव पडलं आहे. पालघर-मनोर रस्त्यावरून जाणारे बरेच पर्यटक इथे देवदर्शनासाठी थांबतात पण हाकेच्या अंतरावर असलेला काळदुर्ग त्यांना माहीत नसतो.

पाऊस थांबला होता. आम्ही गाडीतून उतरलो. देवाला नमस्कार केला व देवळाच्या मागून चढणीच्या वाटेला लागलो. कारवीच्या दाट जंगलातून जाणारी वाट आपल्याला वर घेऊन जाते. इथून गडावर पोहोचायला साधारण दीडतास पुरेसा होतो. खरं तर वाट चुकायची शक्यताच नाही. परंतु यंदा फुललेली कारवी न्याहाळण्यात, वाटेत दिसणारे वेगवेगळे किटक पाहण्यात, त्यांची छायाचित्रं काढण्यात आम्ही मुख्य रस्ता केव्हा सोडला ते कळलंच नाही. वाटेत आलेली झाडंझुडपं बाजूला सारत, दमवणारा उभा चढ चढत आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. समोरच कातळाचं पठार दिसत होतं. स्थानिक लोक या पठाराला नंदीमाळ म्हणतात. इथून प्रथमच काळदुर्गाचं व्यवस्थित दर्शन घडलं. इथून पुढे जंगलात शिरलेली वाट आपल्याला एका घळीत घेऊन जाते. बाजूला वाढलेल्या कारवीमुळे उतार जाणवत नाही. काळदुर्गाला वळसा घालून शेवटचा उभा टप्पा पार करून आम्ही माथ्यावर पोहोचलो आणि श्रावण खेळाला सुरुवात झाली. झिम्माड पाऊस आणि बेभान वारा यांची जणू जुगलबंदीच सुरू होती. संपूर्ण दरी ढगांनी भरलेली पाहून जणू स्वर्गातच पोहोचल्याचा भास होत होता. माथ्यावर गडाच्या काहीच खुणा नाहीत.

कातळात खोदलेली पाण्याची तीन टाकी मात्र आहेत. शेवटचा टप्पा चढण्याअगोदर एक शंकराची पिंड, मंदिराचे मोडके अवशेष व नंदी आहे. गडाच्या माथ्यावरून चौफेर नजर टाकली असता उत्तर पूवेर्ला असलेला कोहोजचा किल्ला, उत्तरेला असलेला अशेरीगडमधूनच वाहणारी सुर्या नदी, पुढे वैतरणा नदीशी झालेला तिचा संगम, जवळच उत्तरेला असलेला आसावा दुर्ग व त्याच्या पायथ्याशी असलेला देवकोपाचा तलाव. पश्चिमेला दिसणारी सातपाटी, केळदे माहिमची किनारपट्टी आणि पालघरचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. सभोवार पसरलेला हा नजारा, बेभान झालेला वारा मनाच्या कप्प्यात बंदिस्त करून आम्ही गड उतरू लागलो. तेव्हा मनाशी एक निश्चय केला, पुढच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा काळदुर्गला यायचंच!

No comments: