Thursday, October 30, 2008

'महिकावती'ची हिराडोंगरी गवसली


तालुका पालघर.. पश्चिमेला वैतरणा नदी आणि पूवेर्ला अथांग समुद. याच किनाऱ्यावर वसलेलं दातिवरे गाव. इथला दातिवरे किल्ला तसा माहितीतलाच. याच किल्ल्यापासून केवळ १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेली दीडशे फूट उंचीची दुर्लक्षित डोंगरी. किल्ले वसई मोहिमेच्या गटाने औत्सुक्यापोटी या डोंगरीवर पाऊल ठेवलं अन महिकावतीच्या बखरीमध्ये असलेली हिराडोंगरी हीच असा साक्षात्कार या गटाला झाला. किल्ले वसई मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या तरुणांकडून गेल्या पाच-सहा वर्षांपासून ठाण्यातील किल्ल्यांचा अभ्यास सुरू आहे. वसईच्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि लोकांमध्ये या विषयावर रुची तयार करण्यासाठी हे सर्व तरुण आपला वेळ देतात. या मोहिमेचे श्रीदत्त राऊत म्हणाले, ठाणे जिल्ह्यात असलेल्या किल्ल्यांची अधिकृत संख्या ५५ आहे. गढी वा किल्ले याबाबत मतमतांतरं असली, तरी इतिहास संशोधक आप्पा परब यांच्यामते मात्र हा आकडा ७० च्या घरात जातो. तसे संदर्भही त्यांनी दिले होते. हे लक्षात घेऊन, दुर्लक्षित किल्ले शोधण्यावर मोहिमेचा भर होता.

याच दरम्यान महिकावतीच्या बखरीमध्ये वैतरणा नदी आणि हिराडोंगरीचा नामोल्लेख असल्याचं आढळलं. या डोंगरीला दांडामित्रियं असंही नाव दिलेलं आढळतं. राऊत म्हणाले, दातिवरे किल्ला पोर्तुगीजकालीन असल्यामुळे किल्ल्याच्या आसपास इतरही गढीवजा किल्ले असण्याची शक्यता होती. कारण पोर्तुगीज किल्ल्याच्या रक्षणार्थ खाडीच्या आसपासच्या प्रत्येक मुखावर, पाच-सहा ठिकाणी अशा गढ्या ते बांधत. म्हणूनच गेल्या दोन वर्षांपासून या किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर पिंजायला सुरूवात झाली. चिमाजी अप्पांनी वसई ताब्यात घेताना दातिवऱ्याचा उल्लेख केला. हे सैन्य माहीमच्या खाडीतून वसईत आलं. त्यावेळी त्यांनी दातिवऱ्याच्या खाडीलगत थांबा घेतला. इथे मराठ्यांचं सैन्य तब्बल ३८ हजार इतकं होतं. य.न. केळकर यांच्या लिखाणात हा संदर्भ आढळतो. केवळ किल्ल्यावर इतके लोक राहणं शक्य नाही. त्यासाठी या डोंगरीचा आश्रय घेतला गेल्याचं राऊत म्हणतात. या डोंगरीवर सहा पायऱ्यांसह एक पाण्याचं टाकं, विवरं आणि तीन गुहाही आहेत.

दीडशे फुटांच्या या डोंगरीवरून अर्नाळ्याचा बुरूज थेट दिसतोच. शिवाय जीवधन किल्ला, भवानगड, अशेरीची रांगही दिसते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, वैतरणा नदीचं संपूर्ण पात्र इथून दिसतं. त्यामुळे ब्रिटिशकालीन व्यापारावर नजर ठेवता येत असे, अशी माहिती राऊत यांनी दिली. याबाबत मुंबई पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता, याबाबत आपल्याकडे अद्यापि माहिती आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. या डोंगरीवरच्या दगडामध्येही किमान पाच रंग दिसतात. त्यामुळे बांधकामासाठी इथले दगड नेले जात असल्याचंही ते म्हणाले. पुरातत्त्व अभ्यासकांना इथे येऊन त्याचे संदर्भ मिळवता येतील. तसंच, ही डोंगरी एक उत्तम आणि महत्त्वाचं ऐतिहासिक स्थळ बनेल. या डोंगरीच्या अधिक माहितीसाठी श्रीदत्त राऊत यांच्याशी ९८१९७९९९४७ इथे संपर्क साधता येईल

No comments: