Monday, October 27, 2008

सैर प्राणी पक्ष्यांच्या देशातली... पेंच राष्ट्रीय उद्यान


सातपुडा पर्वरांगेच्या दक्षिण पायथ्याशी असलेले पेंच राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेस समांतर पसरलेला आहे. अडीचशे चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जंगल क्षेत्रात त्याची व्याप्ती आहे. एकोणविसशे पंचाहत्तर साली अस्तित्वात आलेलं हे अभयारण्य महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. पेंच नदीने त्याची उत्तर-दक्षिण अशी विभागणी झालेली आहे. उत्तर भाग आपल्याकडे तर दक्षिण भाग मध्यप्रदेशात. सातपुड्यातून उगम पावून पेंच नदी या राष्ट्रीय उद्यानातून वाहत वृक्षवेली व वन्यजीवांना आपल्या अमृतधारेने तृप्त करते. जैवविविधतेने समृद्ध भाग नद्या, खोरे, व उंच-सखल पर्वतरांगांनी सजलेला आहे. यामुळे येथे प्राणी, पक्षी व जैववनस्पतींची मुक्त उधळणं झाली आहे. येथील अद्वितीय सृष्टीसौंदर्याने साहित्यिकांनाही आपली
लेखनी उचलून सृष्टीच्या अविष्कारास शब्दांचे बळ दिले आहे.

कालिदासासही येथील मनमोहक सृष्टीसौंदर्याने भुरळ घातली आहे. 'मेघदुतम' व 'शाकुंतल' या महाकाव्यातही येथील सौंदर्याचे रसभरित वर्णने आली आहेत. निळ्या आभाळाच्या कॅनव्हासखाली येथील विस्तीर्ण परसलेले गवताचे पट्टे, दाट झाडी, झुडपं व पर्वताची आकाशाला भिडणारी उंच सुळके विधात्याने रेखाटलेल्या कल्पनेतील चित्राप्रमाणे भासतात.
चार विविध वनक्षेत्रांचा संयोग झालेल्या या राष्ट्रीय उद्यानात 33 प्रकारची प्राणीसंपदा, पक्षांच्या एकशे चौसष्ट जाती, तीस प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळून येतात. सातपुड्रयाच्या पायथ्याशी परसलेल्या या उद्यान प्रदेशात वाघ, चितळ, अस्वल, जंगली कुत्रे, हरिण, काळवीट, कोल्हे, नीलगाय, माकड यासारखी समृद्ध प्राणीसंपदा वास्तव्य करते. माशांच्या जवळपास पन्नास प्रजाती येथे आढळतात. येथील पक्षीजीवनही तेवढेच समृद्ध. आपल्याकडील पक्षांसोबतच सातासमुद्रापार करून आलेले स्थलांतरित पक्षांच्याही विविध जाती येथे बघायला मिळतात. पेंचला भेट दिल्यास समृद्ध प्राणीजीवन, पक्षी विविधता, अप्रतिम र्नै‍सगिक सौंदर्याची विधात्याने केलेली उधळणं अनुभवून आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याच्या स्मृती कायम रेंगाळत राहतील याची खात्री आहे.

जाण्याचा मार्ग : पेंच राष्ट्रीय उद्यानास भेट द्यायला आपणासाठी विमान, रेल्वे व रस्ते वाहतूक व्यवस्था सज्ज आहे. नागपूर विमानतळ येथून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास जवळचे स्टेशन आहे नागपूर. बसने जायचे झाल्यास रामटेक जवळ करावे लागेल. येथून नियमित बससेवा उपलब्ध आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानापासून नागपूरचे अंतर आहे जवळपास 65 किलोमीटर.

No comments: