Saturday, November 1, 2008

ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार किल्ले धारूर


घाटावर वसलेलं हे शहर असल्यामुळे गावाचं आरोग्य चांगलं आहे. खवा आणि सीताफळाची ही महत्त्वाची बाजारपेठ असून मुंबई, पुणे, नाशिकपर्यंत या मालाची निर्यत केली जाते. या गावाच्या नावात त्याची भौगोलिक वैशिष्टे सामावली आहेत. धारेवरील स्थान म्हणून धारकर, धारौर, धारूर अशी नावे रूढ झाली असावीत. धार या शब्दाचे दोन अर्थ होतात. डोंगराच्या काठावर आणि अखंड वाहणार्‍या पाण्याच्या धारेवर हे गाव वसलेलं आहे. तसेच गावाजवळच धारेश्वराचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. मोगल राजवटीत अहमद नगरच्या निजामशाहीने या गावाचे नाव बदलून फतेहाबाद असे ठेवले. पण मध्ययुगीन कागदपत्रात किल्ले धारूर अशीच नोंद आढळते. मजबूत आणि प्रशस्त किल्ल्यामुळे मोगल काळात या शहराला विशेष महत्त्व होते. राजा धारसिंहामुळे या गावचे नाव धारूर पडले. अशी माहिती अनेक जण सांगतात. पण प्रत्यक्षात तशी नोंद कुठे सापडत नाही.

या स्थानाचा विकास काळाच्या ओघात होत गेला. आज मध्यम वाटणारे हे गाव मध्य युगामध्ये राजकीय दृष्टा स्वतःचे वेगळे अस्तित्त्व टिकवून होते. उत्तर मध्ययुगीन कालखंडात चंदीप्रसादजी मिश्रा, नगराध्यक्ष स्वरुपसिंह जहारी, रामचंद्र शंकर शेटे, प्रमोद माधवराव शेटे, सद्दिवाले यांचे पूर्वज इथे आले आणि त्यांनी स्वतंत्र वसाहती वसवल्या. धारूरच्या वाढत्या विस्ताराबरोबरच नगररचनेत आवश्यक त्या वास्तुंची निर्मिती होत होती. पाणी पुरवठ्यासाठी ज्या बारवाची निर्मिती करण्यात आली त्यात २ हरिणपीर बावडी, रंगारोनी बावडी यांचा उल्लेख करावा लागतो. यापैकी काही विहीरीवर शिलालेख कोरलेले आढळतात. उत्तर मध्ययुगामध्ये बांधण्यात आलेला एक महाल कलावंतिणीचा महाल म्हणून ओळखला जातो. गावाच्या बाहेर एक स्वतंत्र वास्तू चेकपोस्ट स्वरूपात उभारण्यात आली होती. आज गावात उभे असलेले प्रमुख प्रवेशद्वार आणि मशीद तत्कालिन कला वैभवाची साक्ष आहे. गावाला संपूर्ण दगडी तटबंदी होती. कधीकाळी हातमाग हा व्यवसाय इथे खूपच जोरात होता. धारूरचे शेले, साडा, धोतरजोडे प्रसिद्ध होते. पण आज हा व्यवसाय संपूष्टात आला आहे.

किश्वरखानने महादुर्गाची उभारणी केल्यानंतर त्यांनी धारूर शहराची अत्यंत योजनापूर्वक वसाहत केली. व्यापारी, उद्योगपती, विद्वान ब्राह्मण, सरदार आदींना निमंत्रित करून धारूर शहराचा नियोजनपूर्वक विकास केला. सन १६५८ साली सोनपेठ येथील प्रसिद्ध व्यापारी पापय्या शेटे यांना सन्मानाने निमंत्रित करून त्यांना रोअगिरी दिली. पापय्यांनी आपल्या बरोबर आणखी काही व्यापार्‍यांना बोलावून धारूरची बाजारपेठ वसवली, वाढवली. त्याकाळी या शहराचा लौकिक सर्वदूर पसरला होता. आजही मराठवाडातील एक महत्त्वाची विश्वसनीय बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दूरवरून सोनं, चांदी खरेदीसाठी लोक इथे येतात. सुवर्णकारांची संख्याही इथे फार मोठी आहे. आज कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, औरंगाबाद, अंबाजोगाई इत्यादी शहरात सुवर्ण काम करणारे कारागिर धारूर शहरातीलच आहेत.

धारूर ही एक श्रीमंत बाजारपेठ असल्यामुळे दातृत्व हा या गावचा धर्म आहे. अनेक मंदिराच्या उभारणीसाठी तलाव, विहिरीच्या बांधकामासाठी सढळ हाताने देणगी दिल्याच्या नोंदी कागदपत्रातून सापडतात. यादवांच्या काळात धारूर हे एक देश विभागाचे केंद्र म्हणून उदयास आले. या विषयी नोंद करणारा शिलालेख अंबाजोगाई येथे आहे. सकलेश्वर देवस्थानच्या निर्मितीसाठी दिलेल्या दानपत्रात या स्थानाची नोंद सिंघन यादवाचा सेनापती खोलेश्वर (शके ११३२ ते ११६९) हा करतो. या दान लेखात प्रासादह्न सकलेश्वरस्य रचितो धारो देश अशी नोंद आहे.

किल्ल्यामुळे धारूर शहराचे वैभव वाढले. लोकांचा राबता वाढला. अदिलशाहीचा सिपाह सालार किश्वरखान याने मूळ राष्ट्रकूट कालीन महादूर्ग असलेल्या जागेवर नव्याने अत्यंत मजबूत असा दूर्ग बांधला. सन १५६७-६८ साली हा दूर्ग बांधून पूर्ण केला. किल्ल्यावर शस्त्रसाठा भरपूर गोळा केला. किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पाणी (खंदक) आणि चौथ्या बाजूला खोल दरी त्यामुळे शत्रूला किल्ला हस्तगत करणे सोपे नव्हते. धारूरच्या व्यवस्थित नियोजनाची नोंद जशी बुसा तीज-उस-सलातीन या ग्रंथात फकीर अहमद झुबेरी यांनी करून ठेवली आहे. तसेच अब्दुल हमीद लाहरी याने आपल्या बादशहानाम्यात केली आहे. हा किल्ला सहजा सहजी जिंकणे अशक्य असल्याचीही नोंद त्यांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात ज्यांनी किल्ला बांधला तोच किश्वरखान फितुरीमुळे मारला गेला. किल्ला बांधत असताना अंकुश खान याने किश्वर खानला अंधारात ठेऊन किल्ल्याचा काही भाग जाणीवपूर्वक पोकळ ठेवला व याच मार्गाने निजामशाही सैन्याने किल्ल्यात प्रवेश करून किश्वर खानचा वध केला.

मुर्तजा निजामशहाला धारूर किल्ल्यात अलोट संपत्ती मिळाली. हत्ती, घोडे, जड जवाहिर, राहुटाचे सामान, शस्त्रास्त्रे, बंदूका मिळाल्या. या किल्ल्यात काही काळ अहमदनगरच्या निजामशहचा मुक्काम होता. त्यानेच विजयाचे प्रतीक म्हणून या गावाचे नाव बदलून फतेहाबाद ठेवले. हे नाव बदलण्यासाठी स्वातंत्र्यानंतर धारूरच्या जनतेनी खूप प्रयत्न केला व अखेर ५ मे १९७२ रोजी पुन्हा फतेहाबादचे धारूर असे नामकरण झाले. त्यांनतर याच किल्ल्यात काही काळ विठोजी राजे भोसले थांबले होते. तर राजे शिवबाचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा नेताजी पालकर याच किल्ल्यात मुक्कामास होता. शिवरायांबरोबर मतभेद झाल्यावर नेताजी पालकर आदिलशहीस जाऊन मिळाला. मोगलांनी नेताजीस आपल्याकडे वळवून घेतला. त्यास पाच हजाराची मनसब, पन्नास हजार रुपये रोख तसेच जहागिरी दिली. पण राजे शिवबा आग्रा किल्ल्यातून निसटताच औरंगजेबाने एका आदेशान्वये नेताजीस कैद करून दिल्लीस घेऊन या असा आदेश दिला.

1 comment:

Ashok Jawkar said...

Detail ,correct & rare information about "Kille Dharur".Really great. I like It !...Ashok Jawkar, Mumbai (born At Dharur)