Monday, December 1, 2008

परशुरामाचे जन्मस्थळ-जलालाबाद

उत्तरप्रदेशातील शाहजहानपूरपासून तीस किलोमीटरवर असलेल्या जलालाबाद येथे भगवान परशुरामाचे जन्मस्थळ आहे। हजारो वर्षापासून परशुरामपुरी’ म्हणूनच ते ख्यातनाम आहे. मुगल काळात रोहिल्यांचा सरदार नजीब खॉं याचा मुलगा रहमत खॉंच्या धाकट्या मुलाच्या (जलालुद्दीन) नावावरून जलालाबाद असे नाव ठेवले होते. मात्र अजूनही अनेक ठिकाणी परशुरामपुरी असेच लिहिलेले आढळते. परशुरामांचा जन्म येथेचे झाला होता, असा येथील लोकांचा ठाम विश्वास आहे. त्रेतायुगात हे ठिकाण कान्यकुंज राज्यात होते. इतिहास काळात रोहिला सरदार नजीब खॉंचा मुलगा हाफिज खॉं याने या भागात एक किल्ला बांधला होता. याच किल्ल्याच्या ठिकाणी सध्या तहसील कार्यालयाची इमारत आहे. हाफीज खॉंने धाकटा मुलगा जलालुद्दीनचा विवाह येथील अफगाणी कबिल्यात केला होता. त्यांनी हा भाग आपल्या मुलीला हुंड्याच्या स्वरूपात दिला होता. तेव्हापासून नगरीचे नाव परशुरामपुरी बदलून जलालाबाद असे ठेवले होते.
येथे भगवान परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे। मंदिराच्या गाभार्‍यात शिवलिंग आहे. समोरच भगवान परशुरामाची प्राचीन मूर्ती आहे. परशुरामाने येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यानंतर भाविकांनी या मंदिराचे बांधकाम केले होते, असे मानले जाते. मंदिर 30 फूट उंचीवर बांधण्यात आले असून मंदिराची उंची हे प्राचीनतेचे उदाहरण आहे. अनेक वेळा हे मंदिर तोडण्यात आले आणि भक्तांनी पु्न्हा या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धारावेळी ढिगार्‍याखाली परशुरामाशी संबंधित अनेक वस्तू सापडल्या.
एकदा मंदिराच्या ढिगार्‍याखाली आठ फूट उंच आणि अडीच फूट रूंदीचा परशू सापडला होता. तो आजही मंदिराच्या उजव्या बाजूला आहे. सत्ययुगाच्या शेवटी परशुरामाने अवतार घेतला होता असे मानण्यात येते. रोहिणी नक्षत्रात परशुराम याच भागात जन्मले होते. त्यांचे वडील मदग्नी यांचा जन्म येथेच झाला होता असे सांगितले जाते. परशुरामाची आई रेणुका दक्षिण देशाची राजकुमारी होती.

No comments: