Monday, December 1, 2008

जागृत देवस्थान चंद्रिका देवी मंदिर


लखनौ नवी दिल्ली महामार्गावर बक्षी तलाव या छोट्याशा गावाजवळ चंद्रिका देवीचे मंदिर आहे। या देवीचा महिमा मोठा आहे. गोमती नदीजवळील महीसागर संगम तीर्थावर प्राचीन मानल्या जाणाऱ्या लिंबाच्या झाडात नऊ देवींसोबत त्यांच्या ऋचा अनंत काळापासून सुरक्षित ठेवल्या आहेत. 18 व्या शतकानंतर येथे चंद्रिका देवीचे भव्य मंदिर बांधण्यात आले. उंच पर्वतावर एका मठात देवीची आराधना करत अमावास्येला येथे यात्रा भरवण्याची प्रथा आजही कायम आहे.

इथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात। देवीवर त्यांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळेच देवीकडे नवसही केले जातात. नवसाची अभिनव पद्धत आहे. देवीकडे नवस केल्यानंतर मंदिरात ओढणी बांधली जाते. नवस पूर्ण झाल्यानंतर देवीला प्रसाद आणि ओढणी चढवली जाते.

यज्ञकुंडात ऋचा टाकण्याची परवानगी वगळता, देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचा बळी देणे किंवा साधा नारळ फोडण्यासही येथे मनाई असल्याने मंदिराचा परिसर स्वच्छ आहे। देवाच्या दारी सारेच समान या तत्वानुसार येथे कोणताही भेदभाव केला जात नाही. आलेल्या प्रत्येकाला केवळ भाविक म्हणूनच ओळखले जाते.येथे भरणाऱ्या यात्रेचे सारे नियोजन स्वर्गीय ठाकूर बेनीसिंह चौहान यांचे वंशज अखिलेश सिंह करतात. ते कठवारा या गावाचे सरपंच आहेत. महीसागर संगम तीर्थाचे मुख्य पुरोहित आचार्यही आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पददलित समाज बांधवांकडूनच भैरवनाथाची पूजा केली जाते.

या मंदिराचा पुराणातही उल्लेख आहे। स्कंद पुराणानुसार घटोत्कचाचा मुलगा आणि भीमाचा नातू बर्बरिक याने येथे तपश्चर्या केली होती. चंद्रिका देवीच्या उत्तर,पश्चिम, आणि दक्षिण भागातून गोमती नदी वाहते. पूर्वेस महिसागर तीर्थ आहे.या तीर्थाचा प्रत्यक्ष संबंध पाताळाशी असल्याने येथे कधीही पाण्याची कमतरता जाणवत नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

येथे भाविक चंद्रिका देवीसह बर्बरिकचीही पूजा करतात। दक्षाच्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने याच महिसागर तीर्थात स्नान केले होते. त्रेता युगात लक्ष्मणपुरीचे (लखनौ) अधिपती उर्मिला पुत्र चंद्रकेतूला येथील जंगलाची भीती वाटली. तेव्हा त्याने येथील नवदुर्गेची आराधना केली. चंद्रिका देवीच्या कृपेने तो भयमुक्त झाला. महाभारत काळात पांडव द्रौपदीला घेऊन या संगमावर आले होते. युधिष्ठिराने सोडलेला अश्वमेध यज्ञाचा घोडा येथील हंसध्वज राजाने रोखल्यानंतर त्याला पांडवांशी युद्ध करावे लागले होते. यात हंसध्वज राजाचा मोठा मुलगा सूरथ याने युद्धात सहभाग घेतला होता, तर दुसरा मुलगा सुधन्वा चंद्रिका देवीची आराधना करत होता.

युद्धात सहभागी होण्या ऐवजी पूजेत रमल्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला गरम तेलात टाकण्यात आले, पण त्याला कोणतीही इजा न झाल्याने येथील कुंडाला सुधन्वा कुंड संबोधले जाते. तसेच युधिष्ठिराची सेना अर्थात कटक येथे वास्तव्यास असल्याने याला कठहारा असेही म्हणतात.येथील चंद्रिका देवी मंदिरात एक विशाल यज्ञकुंड, देवीचा दरबार, बर्बरिक दरवाजा, सुधन्वा कुंड, महिसागर तीर्थ अशी अनेक पवित्र स्थळे आहेत. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक स्वर्गीय अमृतलाल नागर यांनी आपल्या 'करवट' या पुस्तकात चंद्रिका देवीचा महिमा वर्णन केला आहे. या पुस्तकाच्या कथेतील नायक बंसीधर हा नियमित चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी येत असे असा त्याचा उल्लेख आहे.

No comments: