Saturday, December 6, 2008

तीन देवींचे त्रिशक्ती रूप


श्री कालीमाता अम्मावरी देवस्थान हे हे त्रिशक्ती पीठ णून प्रसिद्ध आहे। आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे ‍असलेले हे मंदिर कृष्णवेणी या नदीच्या काठी वसले आहे. येथे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत. त्या इच्छाशक्ती, क्रियाशक्ती व ज्ञानशक्ती आहेत असे मानले जाते. हे स्थान अष्टदश पीठात मोडते.

स्थळ पुराण-

नेल्लोरजवळील जंगलात एका लष्करी अभियंत्याला स्वयंभू श्री महाकालीची मूर्ती सापडली। ती त्याने विजयवाडा येथे आणली. शक्तीची उपासना करणारा गुंजा रामास्वामी याने 14 ऑक्टोबर 1947 ला कृष्णवेणी नदीच्या काठी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. 'कालिदास' अर्थात कालीचा शिष्य या नावाने ओळखल्या जाणार्‍या या उपासकाने 11 वर्षे या लहानशा मंदिरात या देवीची पूजा केली. त्यानंतर काही कारणांमुळे हे मंदिर बंद झाले. सन 1965 साली तुर्गा वेंकटेश्वरलू याने 15 वर्षांपासून बंद असलेल्या या मंदिराचे द्वार उघडले. द्वार उघडल्यानंतर त्याला व त्याच्यासोबत असणार्‍यांना मंदिरात ज्योतीचा प्रकाश पसरलेला दिसला. मूर्तीभोवती त्यांना आभा दिसली. महाकालीच्या शक्तीचा त्यांना प्रत्यय आला. त्यानंतर शास्त्राप्रमाणे नियमित वैदिक पध्दतीने पूजा केली जाऊ लागली. त्यानंतर येथे भाविकांच्या गर्दीत नवरात्र, दिवाळी व विविध उत्सव साजरे केले जात आहेत.

दशमुखी माहाकाली
या महाकालीला दहा तोंड व दहा पाय आहेत। ती निळ्याशार रंगाची आहे. तिच्या आठही हातात नक्षीदार आभुषणे व शस्त्रे आहेत. तिने तलवार, चक्र, धनुष्य, मानवी डोके, चक्र, कमान, शंख, गोफ, खण आदी आयुधे धारण केली आहेत. तिला योगनिद्रा असे संबोधले जाते. तिच्या प्रभावाखालीच भगवान विष्णूला निद्रेच्या आधीन झाले. म्हणून ब्रह्मदेवाने तिला विनंती केली, की मधू व कैटभ या राक्षसांचा निःपात करण्यासाठी विष्णूला निद्रेतून जागे कर.

अठरा हातांची महालक्ष्मी
महालक्ष्मी ही देवीचे राजस रूप आहे। ही महालक्ष्मी लाल रंगाची आहे. तिच्या अठरा हातांमध्ये तलवार, खण, धनुष्यबाण, पाण्याचे भांडे, कमळ, सुदर्शन चक्र, जपमाळ, वज्रास्त्र, गदा, घंटा, त्रिशूळ, ब्रम्हपाश आदी शस्त्रे आहेत. ही देवी शक्तीचे आणि त्याचवेळी आसुरी शक्तींविरूद्ध लढण्याच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा रंग रक्ताचा, युद्धाचा म्हणजे लाल आहे. तिने महिषासूरालाही संपविले आहे. म्हणूनच महिषासूर मर्दिनी म्हणूनही शक्ती उपासक तिची उपासना करतात.

अष्टहातांची सरस्वती
महासरस्वती ही देवीचे सात्विक रूप आहे। ती शिशिरातल्या चंद्रासारखी दिसते. तिच्या आठ हातांमध्ये घंटा, त्रिशूळ, धनुष्यबाण आदी शस्त्रास्त्रे आहेत. ही देवी शारीरिक शक्तीचे व सौंदर्याचे प्रतीक आहे. सरस्वतीने धुम्रलोचन, चंड, मुंड, निशुंभ, शुंभ या असुरांचा वध केला. माहेश्वरी किंवा राज राजेश्वरी ही या तिनही देवींच्या उर्जेचा स्त्रोत आहे. तिलाच 'ललिता त्रिपूरसुंदरी' असे तिला म्हणतात. ललिता म्हणजे सौंदर्य.

मंदिरापर्यंत कसे जाल

विजयवाडा शहराच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर वसले आहे. रेल्वे स्टेशनपासून किमान 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. विजयवाडा हे शहर हैदराबादपासून 275 किलोमीटरवर आहे. हे शहर रस्ता, रेल्वे, हवाई सेवेने पूर्ण देशाशी जोडले आहे.

No comments: