Saturday, December 6, 2008

जैन महातीर्थ मोहनखेडा


इतिहासप्रसिध्द धार जिल्ह्यातील सरदारपूर तालुक्यात मोहनखेडा येथे श्वेतांबर जैन समाजाचे एक तीर्थक्षेत्र आहे। हे तीर्थक्षेत्र केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. परमपूज्य दादा गुरूदेव श्रीमद् विजयराजेंद्र सूरीश्वरजी महाराजांचे वास्तव्य येथे आहे. दरवर्षी गुरूसप्तमीच्या दिवशी येथे भाविक चांगलीच गर्दी करतात. लाखो भाविक पूज्य गुरूदेवांचा जयघोष करत त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त करतात. या वर्षी 15 जानेवारीला गुरूसप्तमीचे पवित्र पर्व आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे.

पूजनीय दादा गुरूदेव श्रीमद् विजय राजेंद्र सूरीश्वरजी यांच्या दिव्य दृष्टीतून हे मंदिर बांधले गेले आहे। त्यांनी सन 1928 व 1934 मध्ये राजगड येथे चातुर्मास केला होता. 1938 मध्ये त्यांनी आलीराजपुरात चातुर्मास केला. त्यानंतर धार जिल्ह्यातील राजगड येथे त्यांचे पुनरागमन झाले. त्यावेळी त्यांनी शिष्य लुणाजी पोरवाल यांना सांगितले, की सकाळी उठून नदीवर जा आणि ज्या ठिकाणी कुंकूचे स्वस्तिक दिसेल तेथे खूण ठेवून त्याच जागी मंदिर बांधा. गुरूदेवांच्या आदेशावरून लुणाजी यांनी मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू केले. संवत 1940 मध्ये ते राजगड नगरीत राहीले. श्री गुरूदेवांनी या दरम्यान शुक्ल सप्तमीच्या शुभ दिवशी मूळ नायक ऋषमदेव भगवंत यांच्यासह 41 जैन साधूंची पूजा बांधली. हे तीर्थ आगामी काळात मोठे तीर्थ बनेल व ते मोहनखेडा या नावाने पुकारले जाईल, असे त्यांनी सांगितले. ते आता प्रत्यक्षात उतरले आहे.

मंदिराचे वर्तमान स्वरूप -

सध्या या परिसरात भव्य व तीन मजली मंदिर आहे। मंदिरात मूळ नायक आदिनाथ यांची 31 इंची सुदर्शन मूर्ती आहे. या मूर्तीची प्रतिष्ठापना गुरूदेवांनी केली आहे. श्री शंखेश्वर व श्री चिंतामणी यांच्याही मूर्ती येथे आहेत. तळघरात प्रवेश करण्यासाठी संगमरमरी तीन कलात्मक द्वार आहेत. त्या ‍जागी श्री अनंतनाथ, श्री सुमतीनाथ व अष्टधातू यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या वरील भागात अजून एक मंदिर आहे. ते श्री शांतीनाथ यांचे आहे. याशिवाय परिसरात श्री आदिनाथ मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. भगवान आदिनाथ यांची 16 फूट 1 इंच श्यामवर्ण कायोत्सर्ग मुखवटा असलेली मूर्ती आहे. ही प्रतिमा अष्टमंगल आसनावर स्थानापन्न आहे. मोहनखेड्यात मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूस तीन शिखरांनी युक्त पार्श्वनाथ मंदिराची स्थापना केली आहे. यात श्री पार्श्वनाथ यांच्या श्यामवर्णाच्या दोन पद्मासन प्रतिमा स्थापित आहेत. जैन परंपरांमध्ये तीर्थकार भगवान, आचार्य, व मुनी भगवंतांच्या चरण पादुकांची स्थापना करण्याची परंपरा आहे.

सुवर्णजडित समाधी मंदिर-

गुरूदेवांची पवित्र मूर्ती मोहनखेड्याला आहे। त्यांचे निर्वाण येथेच जाले. त्यांची मूर्ती सुवर्णजडित आहे. आजही मंदिराच्या भिंतींवर सुवर्ण जडवण्याचे काम सुरू आहे.

सामाजिक बांधिलकी-

गुरूदेवांच्या आशीर्वादामुळेच हे तीर्थक्षेत्र आज मानवसेवेचे मोठे तीर्थक्षेत्र बनले आहे। येथे श्री आदिनाथ राजेंद्र जैन गुरूकूल चालविले जाते. यात विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवण्याची व त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे शेकडो विद्यार्थी शिकत आहेत. मानवसेवेसारखा कोणताच धर्म नाही ही शिकवण प्रत्येक धर्म देतो. हीच शिकवण हे मंदिर देते. नेत्रसेवेसाठी देखील हे तीर्थ प्रसिध्द आहे. 1999 मध्ये याठिकाणी 5 हजार 427 लोकांचे ऑपरेशन केले गेले. याशिवाय शाकाहाराचा प्रचार व व्यसनमुक्तीसाठी शिबिरे आयोजित केली जातात. इतकेच नव्हे तर गोवंशासाठी मोठी गोशाळा बांधली आहे. यात सर्व सुविधांनी युक्त गो निवास बनविले आहेत. प्राण्यांसाठी 10 हजार वर्गफूटाचे भव्य कुरण आहे. ज्योतिष सम्राट श्री ऋषभचंद्र विजयजी यांच्या प्रेरणेने व त्यांच्या मेहनतीने साकार झाले आहे.

संशोधन संस्था-

श्री गुरू राजेंद्र विद्या संशोधन संस्थेची स्थापना मोहनखेडा तीर्थ येथे केली गेली। याचा मुख्य उद्देश जैन साहित्याची आवड असणार्‍यांना ग्रंथालय उपलब्ध करून देणे व संशोधन साहित्य प्रकाशित करणे हा होय.

कसे पोहचाल-

मोहनखेडा येथे जाण्यासाठी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील सरदारपुर तालुक्यातील राजगड येथे जावे लागते. तेथून मोहनखेडा 5 किमी दूर आहे. इंदूरहून राजगडला जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. धार जिल्हा मुख्यालयापासून प्रत्येक तासाला बससेवा उपलब्ध आहेत. मोहनखेडा येथून 60 किमी अंतरावर मेघनगर रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी यात्रेकरूंची राहण्यासाठी धर्मशाळांची व्यवस्था आहे.

No comments: