Tuesday, December 30, 2008

श्री अरूणाचलेश्वर (तिरूअन्नामलय्यर) मंदिर


अरूणाचलेश्वर मंदिर असलेल्या पवित्र टेकडीस प्रत्येक पौर्णिमेस जवळपास दोन ते तीन लाख भाविक अनवाणी पायांनी चौदा किलोमीटर प्रदक्षिणा घालतात। मंदिराच्या वार्षिक सोहळ्याच्या निमित्ताने या पवित्र टेकडीवर प्रज्वलित करण्यात आलेल्या ज्योतीचा 'याची देही याची डोळा' अनुभव घेण्यासाठी जवळपास पंधरा लाख भाविक जमतात. हिंदू धर्मांत महाशिवरात्र या पवित्र सणांची सुरवात या ठिकाणाहूनच झाली. दक्षिणेतील सुप्रसिद्ध श्री अरूणाचलेश्वर मंदिर तमिळ भाविकांमध्ये तिरू अन्नामलाईयार नावानेही प्रचलित आहे. साक्षात भगवान शंकराची ही टेकडी असल्याचे मानण्यात येते. टेकडीची उंची साधारणत: अडीच हजार फूट आहे.

धार्मिक, अध्यात्मिक महात्म्य लाभलेल्या या ठिकाणी एकदा तरी डोके टेकवून पुण्य पदरी पाडलेच पाहिजे। भगवान शिवशंकराच्या पंचमहाभूतांपैकी श्री अरूणाचलेश्वर एक आहे. (अरूणाचलेश्वर हे अग्नीक्षेत्र आहे. कांची व तिरूवरूर हे पृथ्वी, चिदंबरम आकाश, श्री कलाहस्ती वायू व तिरूवनायका जलक्षेत्र आहेत.)

महाशिवरात्र-

शिवपुराणानुसार भगवान शंकराने विराट अग्निरूप धारण करून ब्रह्मा व विष्णूस आपल्या श्रेष्ठत्वाची प्रचिती येथेच दिली होती। देवराज ब्रह्मा व विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वासाठी वाद झाला. श्रेष्ठ कोण यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ते भगवान शंकराकडे आले. शंकराने दोघांपैकी जो माझ्या डोक्याचे किवा पायांचे दर्शन घेऊ शकेल तो श्रेष्ठ, अशी अट घातली. भगवान शंकराने धरतीपासून आकाशापर्यंत पेटत्या ज्योतीचे रूप धारण करून दोघांनाही डोके व पाय शोधण्यास सांगितले. भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण केले व भगवान शिवाचे पाय शोधण्यासाठी जमीन खोदण्यास सुरूवात केली. ब्रह्मदेवाने हंसाचे रूप धारण करून महेश्वराचे डोके शोधण्यासाठी आकाशात भरारी घेतली. मह्त्प्रयायासानंतरही त्यांना महेश्वराचे डोके किवा पाय शोधण्यात यश आले नाही.

विष्णूंनी पराभव स्वीकारला. ब्रह्मदेवही दमले. त्यांनी आकाशातून फूल पडत असल्याचे पाहिले. ब्रह्मदेवाने त्याला विचारणा केली असता, भगवान शंकराच्या केसांच्या जटांमधून पृथ्वीवर पोहचण्यासाठी युगायुगाचा प्रवास करत असल्याचे उत्तर त्याने दिले. शिवाच्या अग्निरूपातून निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेत धरती तर होरपळून निघालीच, शिवाय स्वर्गही असहाय्य उष्णतेने उकळून निघाला.

No comments: