Friday, November 14, 2008

महाबळेश्वर, कास, तापोळा - सातारा


सातारा जिल्ह्यात केवळ पाचगणी-महाबळेश्वरसारखी "थंड' ठिकाणंच नाहीत; तर इथे "पाहण्याजोगी' वस्तुसंग्रहालयं, मंदिरं नि लेणीही आहेत. तुम्ही "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' पाहिलीय? त्यासाठी हिमालयाच्या कुशीतच जाण्याची गरज नाही. साताऱ्याच्या पश्‍चिमेला असणारं "कासचं पठार' तुम्हाला निसर्गाच्या अगदी अशाच सौंदर्याचं दर्शन घडवेल. साधारण ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत या पठारावर वर्षातील 15 ते 20 दिवसांचंच आयुष्य असणाऱ्या असंख्य वनस्पती फुलत असतात. दर दोन- तीन दिवसांनी वेगळ्या रंगांची फुलं फुलतात आणि साऱ्या पठारावर फुलांचा गालिचा पसरल्यासारखं चित्र पहायला मिळतं. दर दोन दिवसांनी पठाराचं नवं रुपडं. जगात अन्यत्र कुठेच आढळत नाही अशीही एक वनस्पती या पठारावर आहे, असं वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर सांगतात. कासचं पठार, कास तलाव, तापोळे, बामणोली, वासोटा, ठोसेघर ही सगळी पर्यावरणावर मनापासून प्रेम करणाऱ्या मंडळींनी पहायलाच हवीत अशी सातारा जिल्ह्यातील ठिकाणं! सातारा जिल्ह्यात केवळ निसर्गसौंदर्य किंवा पाचगणी, महाबळेश्‍वरसारखी थंड हवेची ठिकाणं आहेत असंही नाही. सज्जनगड, प्रतापगड यांसारखे ऐतिहासिक किल्ले या परिसरात आहेत. यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांपासून ते डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारख्या चळवळ्यांपर्यंत आणि रामशास्त्री प्रभुण्यांसारख्या न्यायाधीशापासून औंध संस्थानच्या गुणग्राहक व वेगळे प्रयोग करणाऱ्या राजापर्यंत, विविध नामवंत साहित्यिक - कलाकारांपर्यंत अनेक माणसं या जिल्ह्याने आपल्याला दिली आहेत. याचीही नोंद साताऱ्यात फिरताना मनात ठेवायला हवी. आता आपण प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांकडे एक नजर टाकू. निसर्गसौंदर्य आणि निवांतपणाही वाई : पुण्याहून पाचगणी-महाबळेश्‍वरकडे जाताना 88 कि.मी. अंतरावर वाई हे गाव लागतं. कृष्णा नदीच्या काठावरच अनेक देवळं आणि घाट यांनी आपले वेगळंपण ठसवणारं वाई गणपती आळीच्या घाटावरच्या ढोल्या गणपतीच्या मंदिरासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इ.स. 1762 मध्ये या मंदिराची स्थापना झाली. वाईमध्येच "मराठी विश्‍वकोश मंडळा'चं विशेष कार्यालय आहे. वाईतच मुक्काम करून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी "विश्‍वकोश निर्मिती मंडळ' नावारूपाला आणलं. वाईपासून अवघ्या 6 कि.मी. अंतरावर उत्तरेला पालपेश्‍वर गुहा आहेत. 8 गुहांचा समूह इथे पहायला मिळतो. अश्‍विन महिन्यात मोहोरणारा आंबा पहायचा असेल तर वाई-महाबळेश्‍वर रस्त्यावरील दांडेघर गावी केदारेश्‍वर शिवालयाला भेट द्यायला हवी. वाई ते भोर रस्त्यावर अंबाडखिंडी जवळ मांढरदेवी इथे काळुबाईचं देवस्थान आहे. तिथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. वाईच्या पश्‍चिमेला 4 कि.मी. अंतरावर असलेलं मेणवली म्हणजे पेशवाईच्या काळातील नाना फडणवीसांचं गाव. कवी वामन पंडित यांची समाधी मेणवलीपासून काही अंतरावर असलेल्या भोगावमध्ये कृष्णेच्या काठी आहे. पाचगणीतलं टेबललॅंड, टेबललॅंडवर आढळणारी वेगवेगळ्या प्रकारची ऑर्किडस्‌ तसंच ड्रॉसेराची फुलं, टेबललॅंडच्या दक्षिण बाजूस पायथ्याशी असणारं घाटजाईचं मंदिर, शिवपूर्व काळापासून सर्वज्ञात असलेलं श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर हे उंचावरील देवस्थान ही सर्वांनाच आकर्षून घेणारी स्थळं. श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर इथे छत्रपती शिवरायांनी आपल्या आईची सुवर्णतुला केली होती. इ.स. 1824 मध्ये जनरल लॉडविक यांनी महाबळेश्‍वरला भेट दिली आणि त्यानंतर आताचं थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्‍वर नवं रुप घेऊन अवतरलं. कृष्णा-वेण्णा-कोयना-गायत्री आणि सावित्री या पाच नद्या महाबळेश्‍वर परिसरातूनच उगम पावतात. महाबळेश्‍वरमधून मोटारबोटने बामणोली तसंच वासोट्याला जाता येतं. तापोळा इथूनही वासोटा म्हणजे व्याघ्रगडाला भेट देता येते. महाबळेश्‍वर ते तापोळा आणि तापोळा ते महाबळेश्‍वर अशी एस.टी सेवाही उपलब्ध आहे. साताऱ्यातून कासमार्गे बामणोलीला जाऊन तिथूनही वासोटा किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी लॉंच उपलब्ध आहे. कोयना आणि सोळशी या नद्या एकत्र होऊन शिवसागर या कोयना धरणाच्या जलाशयाला तापोळ्याजवळ येऊन मिळतात. हा साराच परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे हे वेगळं सांगण्याचं कारण नाही. अजिंक्‍यतारा हा अगदी सातारा शहराला लागून असलेला गड. या किल्ल्यावरुन सातारा शहर न्याहाळता येतं, पण किल्ल्याचं सौंदर्य पहायचं तर ते शेजारच्या येवतेश्‍वराच्या डोंगरावरून पहायला हवं. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यातला आणखी एक गड. महाबळेश्‍वरला गेल्यानंतर प्रतापगडपर्यंत पर्यटक गेला नाही असं घडत नाही. शिवछत्रपतींनी इ.स. 1657 मध्ये मोरोपंत पिंगळ्यांना हा किल्ला बांधायला सांगितला होता. महाबळेश्‍वरहून सुमारे तासाभरात प्रतापगडावर पोहोचता येतं. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झालेला सज्जनगड साताऱ्यापासून अवघ्या 15 कि.मी. अंतरावर आहे. एस.टी. सेवेबरोबरच साताऱ्यातून सज्जनगडावर जायला टॅक्‍सी व रिक्षाही मिळू शकते. इथे आल्यावर शिवथरघळीचाही "अनुभव' घेता येईल. इतिहासाच्या खाणाखुणा माण तालुक्‍यातील गोंदवले हे श्रीगोंदवलेकर महाराजांचं जन्म व समाधीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सातारा-पंढरपूर मार्गावरील दहीवडीजवळ गोंदवले आहे तर, माण तालुक्‍यामध्येच शिखरशिंगणापूर हे शंभू महादेवाचं स्थान आहे. सातारा जिल्ह्यातील औंधमध्ये श्री यमाईदेवीचं मंदिर आणि राजवाडा तर पाहण्यासारखा आहे; पण त्याहून पाहण्यासारखं आहे ते येथील वस्तुसंग्रहालय आणि कलादालन. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्‍यात असणारं कण्हेरखेड इथे श्रीमंत महादजी शिंदे यांचं स्मारक आहे तर कराडजवळच्या जखीणवाडी इथे 54 बौद्धलेणी आहेत. खंडोबा हे ज्यांचं देवस्थान आहे त्यांच्यासाठीचं सातारा जिल्ह्यातलं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे पाली. इथं नदीच्या वाळवंटात दरवर्षी पौष महिन्यात 8 दिवस खंडोबाची यात्रा भरते. थोडक्‍यात इतिहासावर, गड-किल्ल्यांवर आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांना खुणावेल असं खूप काही सातारा आणि परिसरात आहे. गढ्या वगळता प्रमुख 27 किल्ले असल्याची माहिती उपलब्ध आहे. काही ठिकाणी बुरुज, जुनी मंदिरं, शिलालेख यातून इतिहासाचा प्रत्यय येत राहतो. सगळीकडेच पोहोचायला गाड्या उपयोगी पडत नाहीत. तेव्हा मनात "पाहण्याचं वेड' व पायांची त्यानुसार "धावायची तयारी' हे जमून आलं की मग "क्‍या बात है!' गरज आहे ती थोडा अधिक मोकळा वेळ हाताशी ठेऊन भटकायला निघण्याची, अस्सल मराठमोळं जेवण जिथं मिळेल तिथं ते घेण्याची तयारी ठेवण्याची आणि प्रवासासाठी योग्य नियोजन करण्याची! सातारा परिसरातील निवासासाठी शासकीय विश्रामगृहं अथवा वनखात्यामार्फत उपलब्ध सोयींचा लाभ घेता येऊ शकतो. शिवाय महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाशीही आपण संपर्क साधू शकतो. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, महाबळेश्‍वर, जि. सातारा. फोन : 02168-260318/261318

No comments: