Saturday, November 1, 2008

दर्शन द्वारकाधीशाचे आणि सोमनाथाचे


सोळा कलांनी परिपूर्ण असलेल्या द्वारकाधीशाचे दर्शन घेण्याची माझी फार दिवसाची इच्छा होती. माझे मानस माझ्या मुलाने जाणले होते. अखेर द्वारकाधीशानेही माझी हाक ऐकली. जवळ जवळ 10-15 वर्षापासून मी त्याच्या दर्शनाची आस धरली होती. पण त्या राजाधीराजाला माझ्या हांके कडे लक्ष देण्यास वेळच नसावा किंवा --- असो! काही ना काही अडचणी येत होत्या आणि जाणे जमत नव्हते. भगवंताने जेव्हां माझी हाक ऐकली तेव्हा त्याने मला त्याच्या चरणाकमळापाशी येण्याची परवानगी दिली.

त्याच्याच आदेशानुसार आम्ही दोघे, चि. अमोलकडे मुंबईला पोहोचलो. चि. अमोलने 31 डिसेंबरपर्यंत सर्व कार्यक्रम आखून ठेवला होता. आरक्षण करून ठेवले होते. मग आम्ही मुलगा सून व नातवासोबत मुंबईहून अहमदाबाद एक्सप्रेसने निघालो. अहमदाबादला सकाळी पोहोचलो. गांधीनगर येथील 'केन्द्रीय सुरक्षाबल' ह्याच्या केंद्रीय सरकारी विश्रामगृहात थांबलो. स्नान, नाश्ता आटोपून गांधीनगरला असलेले स्वामी नारायण मंदिर पाहायला गेलो. या मंदिराला 'अक्षरधाम' असे म्हणतात. मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आहे.

आम्ही ह्या पवित्र परिसरात शिरलो आणि जादूची कांडी फिरावी त्या प्रमाणे काहीसे मनाचे झाले. मन दिपून गेले. डोळे आश्चर्यचकीत झाले. देवळातल्या प्रथमदर्शनी भागात दुतर्फा कारंजाची सजावट आहे. ती पाहिली आणि 'ताजमहल'ची आठवण झाली. दुपारी सुद्धा कारंजावर दिवे लागले होते आजूबाजूला सुंदर हिरवळ आणि बाग आहे. ते दृष्य पाहात पाहात आम्ही मंदिरात प्रवेश केला तेथील भारदस्त लाकडी खांब्याचे कोरीव काम पाहून मन भारावून गेले. वास्तुशास्त्राच्या कल्पनेचे कौतुक वाटले. जवळ जवळ 15 फूट उंचीचे नारायण स्वामींची पिवळी पिवळी धम्म मूर्ती मनाचा ताबा घेते. ही मंगलमय मूर्ती तांब्याची असून त्यावर सोन्याचे पॉलिश आहे. मूर्ति अत्यंत रेखीव आहे. त्याच प्रमाणे सजीव वाटते.

देव्हार्‍यातून बाहेर पडून डाव्या बाजूने वळले की खाली उतरण्यास पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरून गेलो की मोठी मोठी दालने आहेत. पहिल्या दालनात एक मोठा संगमरवरी दगड आहे. त्यात एक सुंदर मूर्ती कोरली आहे, त्या मूर्तीच्या एका हातात हातोडा व दुसर्‍या हातात छन्नी आहे. ते पाहून ती मूर्ती आपल्याला संदेश देते असे वाटते. कोणता संदेश? मानव हा एक र्निर्विकार दगड आहे. विवेक आणि वैराग्य ह्या छन्नी-हातोड्याने माणसाने स्वत:चे आयुष्य स्वत: घडवावे, असा संदेश आपल्याला मिळतो.

हा संदेश घेऊन आम्ही वाट चालू लागलो तर दर्शन घडले ते आकाशाचे. निळे काळे आकाश! आकाशातील नक्षत्र ग्रह तारे तारे यांचा खेळ पाहात पाहात पुढे चालावे तर दाट जंगल दिसू लागले, किर्र झाडी. त्यात पशुपक्षी वावरतांना दाखविले आहेत. हे सारे दगडांचे बनविले असून तेथील दृश्य मनोहर आहे. ह्या जंगलात स्वामी नारायणांची पांढर्‍या दगडाची मूर्ती आहे. स्वामी तपाला बसलेले आहेत ते पाहून वाटले की निर्जीवाला सजीवत्व प्राप्त झाले आहे. चालताना पुढल्या दालनात केव्हा प्रवेश केला कळलेच नाही. या दालनात सर्वत्र अंधार. पडद्यावर चार खाणीतील चार प्राणी दाखविले आहेत ते पाहून 'पृथ्वीवरील विविध प्राण्यांच्या देहांचे वैज्ञानिक पृथ:करण करून एक पेशीय देह उत्क्रांत होत होत मानवी देहाची निर्मिती झाल्याची, उत्क्रान्तीवादाची नवीन दृष्टी जगाला देणार्‍या, डार्विनच्या सिद्धान्ताची आठवण झाली. मानवी जीवनांत जगण्याची चाललेली धडपड, विज्ञानाची होत असलेली प्रगती, त्यापासून होणारे फायदे तोटे, त्यावर उपाय म्हणून अध्यात्मिक जीवनाची दिशा दाखविणारे संत, मानवी जीवनाचे ध्येय सांगणारे योगी, सोंगी भोगी सार्‍यांची जीव जगण्याची धडपड, निसर्गाचा प्रकोप, एक न दोन अनेक चित्र आपल्याला त्या पडद्यावर दाखविले जातात.

श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखविलेले 'विश्वरूप' आपण पाहात आहोत असे वाटते. त्यागुरुशिष्याच्या स्मृतिला आपण नतमस्तक होतो. मला तरी तसे काहीस वाटले. पुढे पाउले चालत होती एकदम महाभारत काळात पोहोचल्याचा भास झाला चौंसराचा डाव मांडून बसलेले कौरव पांडव, द्रौपदी वस्त्र-हरणाचा प्रसंग, सर्व सजीव मूर्तीच्या माध्यमातून दाखविले आहे. पुढे रामायणातील प्रसंग रंगविले आहेत. शेवटचा देखावा तर अतिशय बोलका आपले देहभान हरविणारा! स्वामी नारायण स्वत: सिंहासनावर विराजमान झाले आहेत त्यांच्या डाव्या बाजूला त्यांचे खास दरबारी सरदार आसनस्थ झाले आहेत, उजव्या बाजुला गाणार्‍यांचा संघ बसला आहे ह्या सार्‍यामूर्ती प्रत्यक्ष हावभाव करीत गात आहेत.

राजे नारायण स्वामी त्यांच्या गाण्याला दाद देत आहेत. एक सरदार नम्रपणे हात जोडून राजांना प्रश्नविचारीत आहे. महाराज हातातील फुलाचा सुवास घेऊन उत्तर देत आहेत. ह्या सार्‍या मूर्ती निर्जीव आहेत हे आपण विसरूनच जातो. भारावलेल्या मनाने आपण जेव्हां बाहेर पडतो, तेव्हां वेगळेच काही भव्य दिव्य पाहिल्याचा आनंद मिळतो व आनंदाची जाणिव होते. कोणी म्हणेल हे का द्वारकेचे दर्शन? पर सर्वाभूती असलेल्या त्या द्वारकाधीशाचेच हे दर्शन नाही का?

No comments: