Friday, November 14, 2008

रम्य समुद्रकिनारे आणि अपूर्व खाद्ययात्रा- रत्नागिरी


थिबा पॅलेस, राजापूरची गंगा, हेदवीचं गणेशमंदिर, हर्णे-गणपतीपुळे-वेळणेश्वरचे किनारे... असं सारं रत्नागिरी जिल्ह्यात भटकताना पाहायलाच हवं.रत्नागिरी म्हणजे कोकणचं वेगळं वैभव. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांशी रत्नागिरीचं नाव कायमचं जोडलं गेलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातच अनेकांचं श्रद्धास्थान असणारं गणपतीपुळ्याचं गणेशमंदिर आहे. हेदवी इथला दशभुज लक्ष्मीगणेश आणि चिपळूणपासून 13 किलोमीटरवर असणारा परशुराम गणेश तसंच आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती यांना मानणाऱ्या भाविकांची संख्याही कमी नाही. राजापूरची गंगा पाहायची तर त्यासाठीही रत्नागिरी जिल्ह्यात भटकंती करायला हवी. याखेरीज डेरवणची शिवसृष्टी, गुहागर, दिवेआगर यांसारखे समुद्रकिनारे यांनीही रत्नागिरी जिल्हा समृद्ध केलेला आहे. श्री.ना.पेंडसे, चि.त्र्यं.खानोलकर यांच्यासारख्या लेखकांनी शब्दरुपातून मांडलेला कोकणचा हा परिसर म्हणजे "थकल्या मनांना ताजवा देणारी, हिमाचल प्रदेश आणि केरळ इतकंच निसर्गसौंदर्य असणारी देवभूमी' आहे. हिचा उल्लेख "परशुरामभूमी' असाही केला जातो. रत्नागिरीपासून अगदी जवळ म्हणजे अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर रत्नदुर्ग हा किल्ला आहे. रत्नदुर्ग हा जलदुर्गात मोडणारा किल्ला. पूर्वी हा किल्ला पूर्णपणे पाण्यात होता. आता हा किल्ला रत्नागिरी शहराशी जोडला गेलेला आहे. बहामनी काळात उभारल्या गेलेल्या या किल्ल्याला एकूण 27 बुरूज होते. आता त्यापैकी 7 बुरुज आणि तटबंदी शिल्लक आहे. सध्या या किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर, दीपगृह आणि काही घरं आहेत. या किल्ल्यावर जिचं मंदिर आहे ती भगवती म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची बहीण आणि तिने महालक्ष्मीच्या सूचनेवरून रत्नासुराचा पाडाव केला व ती कायमस्वरुपी रत्नदुर्ग किल्ल्यावर राहाण्यासाठी आली, अशी आख्यायिका आहे. या देवीची स्वयंभू मूर्ती अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र, ढाल, तलवार अशी आयुधं आहेत आणि देवी महिषासुरावर बसलेली आहे. दरवर्षी नवरात्र आणि शिमगा यावेळी मंदिरात उत्सव असतो. रत्नागिरी शहराला भेट देत असताना लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पतितपावन मंदिर आणि थिबा पॅलेसला भेट द्यावी. थिबा पॅलेसची बांधणी 1910-11 मध्ये करण्यात आली. आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रम्हदेशच्या थिबा नावाच्या राजासाठी बांधण्यात आलेला राजवाडा म्हणून या राजवाड्याला "थिबा पॅलेस' या नावाने ओळखण्यात येतं. 1916 पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं आणि अगदी अलीकडेपर्यंत त्यांची मुलगीही राहात होती. आता मात्र हा राजवाडा एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय किंवा "हेरीटेज हॉटेल' बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सागरी जीव संशोधनात रस असणाऱ्यांनी रत्नागिरीतील "मरीन बायॉलॉजिकल रिसर्च स्टेशन'ला भेट द्यावी. सध्या हे केंद्र दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाशी जोडलेलं आहे. या ठिकाणी एक छान मत्स्यालय/संग्रहालय पाहायला मिळू शकतं. गणेशभक्तांचं श्रद्धास्थान गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून 40 कि.मी. अंतरावर असलेलं श्रीगणेशाचं स्वयंभू स्थान. या ठिकाणच्या 300 फूट उंचीच्या संपूर्ण टेकडीलाच गणपती मानण्यात येतं. येथील मंदिर सुमारे 400 वर्षांपूर्वीचं आहे. देवळाला प्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण टेकडीला प्रदक्षिणा घालावी लागते. गणपतीपुळे येथील देवतेला पश्‍चिमद्वार देवता म्हणून ओळखण्यात येतं. इथे दर संकष्टीला आणि अंगारकी संकष्टीलाही मोठी गर्दी असते. इथला समुद्रकिनारा रमणीय तसंच राहण्याची वेगवेगळ्या प्रकारची सोयही इथे उपलब्ध आहे. गणपतीपुळ्यापासून अवघ्या 1 कि.मी. अंतरावर असणारं मालगुंड म्हणजे ख्यातनाम मराठी कवी केशवसुत यांचं जन्मस्थान. मालगुंड येथील केशवसुतांच्या घरी आता त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. गणपतीपुळ्यापासून साधारण 35 कि.मी. अंतरावर जयगड हा किल्ला आहे. 17 व्या शतकात या किल्ल्याची उभारणी करण्यात आलेली आहे. गणपतीपुळ्याप्रमाणेच रत्नागिरीपासून 22 कि.मी. अंतरावर असणाऱ्या पावस गावाजवळ गणपतीगुळे हे गणेशाचं स्थान आहे. पावस येथे स्वामी स्वरुपानंदांचा आश्रम आहे आणि तिथे कायम भाविकांची गर्दी असते; तर गणपतीगुळे येथील गणपतीला गलबतवाल्यांचा गणपती म्हणूनही ओळखलं जातं. संकटाच्यावेळी 11 फूट उंचीची शिळा जहाजातील कर्मचाऱ्यांनी गणपती म्हणून पूजली आणि त्यांच्यावरचं संकट दूर झालं, तेव्हापासून गलबतवाल्यांच्या स्वयंभू दक्षिणाभिमुख गणेशावर अनेकांची श्रद्धा निर्माण झाली, असं सांगतात. प्राचीन मंदिरांनी समृद्ध भाग रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण या गावाला पूर्वी स्वत:ची अशी ओळख नव्हती. पण या गावातील विठ्ठलराव गणेश जोशी तथा दिगंबरदास महाराज यांनी या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. जोशी यांनीच समर्थ रामदास यांचं स्मारकही उभारलं आहे. डेरवणमध्ये उभारण्यात आलेल्या शिवसमर्थगडाची रचना एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणेच करण्यात आली आहे. चिपळूणपासून अवघ्या 3 किलोमीटरवर आहे परशुरामाचं मंदिर. डोंगरात असलेल्या या मंदिरामध्ये काम - परशुराम आणि काळ यांच्या मूर्ती आहेत. काहीजण त्यांना ब्रह्मा- विष्णू-महेश यांचे अवतार मानतात. भगवान विष्णूंचा सहावा अवतार म्हणून भगवान परशुराम यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनीच कोकणाची निर्मिती समुद्रात एकेठिकाणी बाण मारून केली, असं सांगितलं जातं. हे हिंदू मंदिर असलं तरी त्यासाठी पैसे जंजिऱ्याच्या सिद्धीने दिले होते आणि पोर्तुगीज कारागीरांनी मंदिर बांधलं असं सांगतात. त्यामुळे या मंदिराचा घुमट चर्चसारखा आहे तर गिलावा मुस्लिम पद्धतीने केलेला आहे. परशुराम मंदिरापासून जवळच रेणुकामंदिर आणि बाणगंगा तीर्थकुंड आहे. अक्षयतृतीयेला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. खुद्द चिपळूण शहराच्या रावतळे भागात विंध्यवासिनीची अष्टभूजा मूर्ती असणारं मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात सहा मुखांच्या कार्तिकेयाचीही मूर्ती आहे. चिपळूणच्याच उत्तरेला नागेश्‍वर लेणी आहेत. चिपळूणला गेलेला माणूस संगमेश्‍वरला गेला नाही, असं होत नाही. संगमेश्‍वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. याच ठिकाणी मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केलं होतं. कसबा संगमेश्‍वर या गावातील मंदिरं कलात्मक शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. शास्त्री व अलकनंदा नद्यांच्या संगमावर संगमेश्‍वराचं मंदिर आहे. याखेरीज याच परिसरातल्या आरवली, बोळीवली व राजवाडीमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. गुहागर हे रायगड जिल्ह्यात असलं तरी चिपळूणपासून आहे अवघ्या 44 कि.मी. अंतरावर. इथे प्रसिद्ध व्याडेश्‍वर मंदिर आहे. पायी भटकत फिरण्याची आवड असलेल्या मंडळींनी येथून अंजनवेलपर्यंत बसने जाऊन गोपाळगड परिसरात पदभ्रमंती करायला हरकत नाही. गुहागरच्याच दक्षिणेला 25 कि.मी. अंतरावर वेळणेश्‍वर हे शास्त्री नदीच्या तीरावरचं गाव आहे. येथील प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. गुहागरपासून 18 किलोमीटरवर "हेदवी' हे गणेशाचं स्थान. इथल्या मंदिरात गणपतीची संगमरवरी दशभुज मूर्ती आहे. गळ्यात नाग असलेल्या या दशभुज गणेशाची स्थापना केळकर स्वामींनी केली आहे. या मंदिरात माघी चतुर्थीला उत्सव असतो. हेदवीच्या किनाऱ्यावर उमामहेश्‍वरचं एक मंदिरही आहे. दर तीन वर्षांनी प्रकटणारी गंगा हे राजापूरचं वेगळं आकर्षण असल्याचं सांगतात. राजापूरपासून जवळच उन्हाळे या गावी कायमस्वरुपी गरम पाण्याचे झरे आहेत. आणि हो, राजापुरातलं धूतपापेश्वराचं मंदिर तर अगदी वेळ काढून, आवर्जून पाहण्याजोगं आहे. लोभस निसर्ग आणि ताजे मासेही... दापोली तालुक्‍यात हर्णे हे निसर्गरम्य बंदर आणि सुंदर समुद्रकिनारा असणारं गाव आहे. इथला निसर्ग नि निवांतपणा अनुभवण्यासाठी राहावंसं वाटतं. इथे स्थानिक लोकांनी सुपारीच्या बागांमध्ये छोट्या झोपड्या बांधून ही हौस भागवायची सोय केली आहे. येथून जवळच आहे सुवर्णदुर्ग हा भुईकोट कम जलदुर्ग. इथून "तरी'ने जोग नदी ओलांडली की आंजर्ले हे गाव लागतं. इथे कड्यावरती चढून गणपती मंदिराला भेट द्यावी लागते. पन्हाळी काजीच्या लेण्यांना भेट द्यायची असली किंवा केळशी गावातील गणेशमंदिर, वेळासमधील रामेश्‍वर मंदिर, हिम्मतगड पाहायचा असेल तर त्यासाठी हर्णे येथून जाता येतं. इथून जवळच आहे मुरुड. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं जन्मस्थळ. इथे त्यांचं स्मारकही आहे. या ठिकाणाला लाभलेल्या स्वच्छ, सुंदर किनाऱ्यामुळे, नारळी-पोफळींनी सजलेल्या सृष्टीमुळे इथे भटकायला मजा येते. या ठिकाणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचं काम चालू आहे. लाकडावरील अप्रतीम कोरीव काम असलेल्या इथल्या पुरातन दुर्गा मंदिरात शारदोत्सव, वसंतोत्सव साजरे केले जातात. कोकणात मिळतात माशांचे विविध प्रकार... पण शाकाहारी माणसांनाही सोलकढी, भाजणीचं थालीपीठ व वडे, घावन, हळदीच्या पानावरचे पातोळे, सांजणं, डाळिंब्यांची उसळ, मौसमानुसार गेलात तर ओल्या काजुगराची उसळ, उकडीचे मोदक अशा प्रकारचे पदार्थ चाखता येतात. समुद्रकिनारी बसून भरलेली पापलेटं, खेकडे, शिंपले (तिसऱ्या) खाणं याचा एक वेगळा आनंद असतो. याखेरीज गोडसर शेवकांडं तसंच कोकम, आंब्यांचा त्या-त्या हंगामात पर्यटक आस्वाद घेऊ शकतात. घरचा पाहुणचार अनुभवताना कोलंबीचं भुजणं, तांदळाची भाकरी आणि खूपसा भात हे कॉंबिनेशन एकदा खाल्लं की चोखंदळ पर्यटकांना तृप्तीची अशी काही ढेकर येते की......बस्स्‌!

1 comment:

Unknown said...

tu khup mast lihile aahes. ratnagirichi khup mahiti aahe.
me suddha ratnagiricha aahe.