Thursday, November 20, 2008

अविस्मरणीय केदारनाथ

चार धामच्या यात्रेतील एक प्रमुख तीर्थ केदारनाथ. पायथ्यापासून देवळापर्यंत १४ कि. मी. चालत जावे लागते. तिथपर्यंत जायला डोली, घोडे, खेचरे इत्यादी व्यवस्था पायथ्याशी आहे. तरीही त्या वर्षी थ्रिल अनुभवण्यासाठी मी व माझा मित्र पार्सेकर यांनी हे अंतर पायी चालत जायचा निश्‍चय केला. कुणी म्हणू लागले १२ तास लागतील, तर कुणी सांगितले १० तास चालावे लागेल. कुणाच्याच अंदाजात एकवाक्‍यता नव्हती. चालतच जायचे असे आम्ही ठरविले खरे. परंतु प्रोत्साहन, पाठिंब्याऐवजी कुत्सित, नकारार्थी बोलणीच ऐकू येऊ लागली. कुणी म्हणाले, "आठदिवसांपूर्वी एक डॉक्‍टर चालत जात होता. मध्येच ऍटॅक येऊन खलास झाला.' असे आणखीन दोन-तीन किस्से आम्ही पुढे ऐकले. तरीसुद्धा आमचा निश्‍चय तसू भर ही ढळला नाही. त्यात भर म्हणून आमची चालण्याची चिकाटी पाहून घोडेवाले "आनेका है क्‍या साब ? रास्ता बहुत लंबा है! सवारी कम ही लेंगे' असे वारंवार म्हणत आम्हाला खिजवत होते. एक डोंगर ओलांडला की दुसरा. सगळी डोंगर-टेकड्यांमधून पायपीट. तशी पावलोपावली विश्रामगृहे, त्यातील खाद्यपदार्थ प्रवाशांना मोहवतात. परंतु होणाऱ्या दमछाकीने जिवाला काहीही नकोसे वाटायचे. तासा मागोमाग तास गेले. घोड्यावरून, डोली मधून जाणारे लोक आमची कीव करत होते, की आदरभाव व्यक्‍त करीत होते, हा विचार करण्याइतपत आम्ही स्थिर नव्हतो. परंतु कसली तरी प्रेरणा, किंवा स्थानाचे नावीन्य एकापाठोपाठ दुसरा डोंगर ओलांडण्याचे काम आमच्याकडून करवून घेत होते हे निश्‍चित. पार्सेकरांचे विनोद, किस्से सांगणे चालू होते. पुढे ते ही थांबले. उगाच हे धाडस अंगावर घेतले. बोलल्याविनाही एकमेकांचे चेहरे जणू हेच सांगत होते. पुढे पावसाची रीप-रीप सुरू झाली. नजर पोहोचत नाही, इतक्‍या खोल दऱ्या एका बाजूला तर पुढे जणू जीवनाच्या अंतापर्यंत न संपणारी वाट! दोघांच्याही खांद्यावर एक-एक बॅग आणि आधारासाठी हातात काठ्या. अर्धी वाट संपल्याचा बोर्ड दिसला आणि मेटाकुटीला आलेला जीव त्यातल्या त्यात सुखावला. कुणी तरी पाठीवरचे ओझे कमी केले, तर चालणे सुसह्य होईल, अन्यथा आहे तिथेच बसकण मारावी लागेल, असा विचार मनात येतो ना येतो तोच एक पोरसवदा तरुण जवळ आला. ना ओळख ना पाळख. त्याच्या लाघवी, हसऱ्या चेहऱ्यामुळे आम्ही खूश! त्याच मूडमध्ये त्याने आमच्या बॅगा आपल्या हाती घेत म्हटलं "मै पकडता हूँ साब! आप आराम से चलिये'! त्याच्या गप्पांचा ओघ वाट संपेपर्यंत सुरू होता. शेवटी नऊ तासांच्या पायपिटीनंतर की तंगडतोडीनंतर देवळालगतच्या सपाटीला आम्ही पोहोचलो. आमच्या आधी घोड्यावरून गेलेल्या अन्य साथीदारांनी आम्हाला पाहून मिठ्याच मारल्या. सगळ्यांशी गळाभेट होताना आमच्या धैर्याचे कौतुक चालले होते. जवळपास उचलूनच सगळ्यांनी आम्हा दोघांना विश्रामगृहात नेले. थोडावेळ गेला आणि वाटेत भेटलेल्या त्या वाटसरूची बॅगांमुळे आठवण झाली. त्या सुखरूप होत्या... परंतु तो अनामिक साथीदार कितीतरी वेळ शोधूनही पुन्हा दिसलाच नाही.

No comments: