Friday, November 14, 2008

लालमाती, गडदुर्ग, सागराची गाज, मासेही- सिंधुदुर्ग


सिंधुदुर्ग जिल्ह्यात भटकायचं तर आंबोली, कणकवली, कुणकेश्‍वर, तारकर्ली, पत्रादेवी, परुळे, पोंभुर्ले, बांदा, माणगाव, मालवण, मोचेमाड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, शिरोडा, सावंतवाडी अशी अनेक ठिकाणं खुणावायला लागतात.महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटला भेट दिली की महाभ्रमण योजनेंतर्गत महामंडळाने तयार केलेली पर्यटनाची 51 पॅकेजेस समोर येतात. खाजगी टूर ऑपरेटर्सना बरोबर घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटनाचेही वेगवेगळे प्रकार आहेत. पर्यावरणाशी मैत्री करणारं पर्यटन, साहसी पर्यटन, ग्रामीण, कृषी पर्यटन, गडकिल्ल्यांचं पर्यटन, सागरी किनाऱ्यांचं पर्यटन अशा वेगवेगळ्या पॅकेजेसपैकी झटकन लक्ष वेधून घेतात त्या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील पर्यटनासाठीच्या वेगवेगळ्या योजना. लाल दगडाची कौलारू घरं, सडा टाकून स्वच्छ व टापटीप ठेवलेलं अंगण, घरांमधूनच वाट काढणारी, लाल मातीने न्हालेली पायवाट, सतत ऐकू येणारी समुद्राची गाज, समुद्राच्या लाटा अंगावर झेलत दिमाखात उभे असणारे जलदुर्ग, नाखव्यांच्या लाटांवर हेलकावणाऱ्या होड्या आणि सोलकढीसोबत माशांचे निरनिराळे खाद्यपदार्थ... या गोष्टींचा मोह पडणार नाही असा माणूस विरळाच! सिंधुदुर्ग जिल्ह्यात भटकायचं तर आंबोली, कणकवली, कुणकेश्‍वर, तारकर्ली, पत्रादेवी, परुळे, पोंभुर्ले, बांदा, माणगाव, मालवण, मोचेमाड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, शिरोडा, सावंतवाडी अशी अनेक ठिकाणं खुणावायला लागतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय पूर्वी ओरोस इथे होतं, आता सिडकोने सिंधुदुर्गनगरी या वसाहतीचा विकास केला आहे. सिंधुदुर्गनगरीच्या मध्यभागी 7 हेक्‍टरमध्ये पसरलेलं एक उद्यान आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयं सिंधुदुर्गनगरीमध्येच आहेत. भव्य किल्ला महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर सावंतवाडीपासून 37 कि.मी. अंतरावर तेरेखोल इथे एक किल्ला आहे. किल्ला गोवा राज्यात असला तरी तिथे जाण्याचा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातो. तेरेखोल किल्ल्याची बांधणी 18 व्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांनी केली. महाराष्ट्रातील किल्ल्यांपेक्षा दिसायला थोड्याशा वेगळ्या असणाऱ्या या किल्ल्यातून गोव्याच्या निसर्गसमृद्ध किनाऱ्याचं छान दर्शन घडतं. या किल्ल्यात सध्या एक रिसॉर्ट उभारण्यात आलं आहे. सावंतवाडीतून तेरेखोलला जायला बसेस आहेत आणि किल्ल्यातच रिसॉर्ट असल्यामुळे खाण्यापिण्याची अडचण येण्याचाही प्रश्‍न नाही. साहजिकच सिंधुदुर्ग किल्ला पहायला येणाऱ्यांनी रेडीतील गणपती मंदिर पाहावं, लोहखनिज म्हणून रेडी बंदरातून वर्षानुवर्ष निर्यात होत असलेल्या मौल्यवान खनिजाविषयी जाणून घ्यावं आणि तेरेखोललाही भेट द्यावी. सावंतवाडी हे मूळचं संस्थान. सावंतवाडीत मोती तलाव, नरेंद्र डोंगर, पुरातन विठ्ठल मंदिर अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहाण्यासारख्या आहेत. विशेष म्हणजे सावंतवाडीत रंगीत लाकडी खेळणी चांगली मिळतात. सिंधुदुर्ग हा मालवणच्या परिसरात छत्रपती शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग. 48 एकर इतकं क्षेत्र व्यापलेल्या या किल्ल्यात छत्रपती शिवरायांच्या हाताचे व पावलांचे ठसे आहेत, असं सांगण्यात येतं. या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेलं शिवरायांचं मंदिरही आहे. सिंधुदुर्गला भेट देणारे मालवणच्या काजू कारखान्याला व देवबाग येथील समुद्रकिनाऱ्यालाही भेट देऊ शकतात. देवबागच्या किनाऱ्यावर असणारं खारफुटीचं जंगल कमी झालं आणि गेल्या काही वर्षांपासून समुद्र देवबागच्या किनाऱ्यावर आक्रमण करतो आहे. त्यामुळे येथील लोक चिंतेत आहेत. पुण्यापासून या परिसराचं अंतर साधारण 400 कि.मी. आहे तर कोल्हापूरपासून 150 ते 160 कि.मी. निळ्याशार समुद्राची अनुभूती मालवणपासून दक्षिणेला 6 कि.मी. अंतरावर आहे तारकर्ली हा समुद्रकिनारा. अतिशय लांब- रुंद असा हा किनारा आणि स्वच्छ पाणी. अगदी 20 फुटांपर्यंतचा सागरतळही या किनाऱ्यावरून स्वच्छ दिसू शकतो. कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांची भेट तारकर्ली परिसरात होते. फेसाळणाऱ्या निळ्या पाण्याचा नितळ समुद्रकिनारा ही तारकर्लीची खरी ओळख. या किनाऱ्याला खेटून असणाऱ्या सुरुच्या उंच झाडांमध्येच राज्य पर्यटन विकास महामंडळाने निवासव्यवस्था केली आहे. तिथे नव्याने उभारण्यात आलेली बांबू हाऊस हे बोटीच्या आकाराची आहेत. याखेरीज या ठिकाणी वातानुकुलीत हाऊसबोटही उपलब्ध आहेत. स्कूबा ड्रायव्हिगंचा आनंद लुटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्नॉर्कलिंग व स्कूबा ड्रायव्हिंगमुळे पर्यटक समुद्रात एक-दोन मीटर खोल जाऊन तेथील जैवविविधता पाहू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि प्रवाळ यांच्या जवळून दर्शनाने वेगळाच थरार अनुभवता येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मरीन पार्क करण्याची शासनाची कल्पना आहे. मालवण परिसरात असलेल्या सागरी अभयारण्यात सागरी कासव, कोरल, डॉल्फिन मासे, स्टारफिश, बटरप्लाय फिश असे जवळपास 350 प्रकारचे जलचर आढळतात. या परिसरात सागरी द्राक्षं, समुद्रकमळ, शेवाळ, प्रवाळ, गेलीडेरिला, ग्रॅसिलेरिया अशा जलवनस्पतींचं दर्शन घडू शकतं. तारकर्लीचं एक्‍सटेंन्शन म्हणजेच देवबागचा किनारा. मालवणपासून साधारण 20 कि.मी. अंतरावर धामापूर तलाव आहे. या तळ्यामध्ये जलक्रीडेची आणि नौकानयनाची वेगवेगळी साधनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मालवणपासूनच 15 कि. मी. अंतरावर आहे. वालावल हे कर्ली नदीच्या काठावरचं ठिकाण. तिन्ही बाजूला वनश्री आणि एका बाजूला कर्ली नदीची खाडी असं वालावल ठिकाण लक्ष्मी नारायणाच्या देवस्थानासाठीही प्रसिद्ध आहे. श्रीदेव रामेश्‍वराच्या भक्तांना आचरा हे गाव खुणावतं. येथील समुद्रकिनाराही खूप मोठा आणि आकर्षक आहे. मालवणपासून 15 कि.मी. अंतरावरती मसूरे इथे भराडीदेवीचं मंदिर आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी यात्रा भरते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मोचेमाड हे निसर्गसौंदर्याची उधळण असणारं गाव. या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर केवड्याची बनं आहेत. या किनाऱ्यावर स्टारफिश मोठ्या प्रमाणावर आढळतात. सावंतवाडीपासून 35 कि.मी.वर असलेल्या मोचेमाड येथील दशावतारी या लोककलेचे कलाकार प्रसिद्ध आहेत. दशावतार पाहायला आणि समजून घ्यायला मोचेमाडला जायला हवं. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आणखी एक किल्ला. 27 बुरुज आणि तिहेरी तटबंदी असलेल्या या दुर्गाला पूर्वी "घेरीचा' असं म्हणत असत. पेशवाईच्या काळात कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराच्या दृष्टीने विजयदुर्ग हा एक महत्त्वाचा किल्ला होता. इ.स. 1897 मध्ये खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी लॉकिअर नावाच्या शास्त्रज्ञाने हेलिअम या वायूचा शोध विजयदुर्ग किल्ल्यावरच लावला. वाहोटणे खाडीतून विजयदुर्ग किल्ल्यावर जाता येतं किंवा मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण इथून तळेरे मार्गे बसने विजयदुर्गवर जाता येतं. शिरोडा या गावाला महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहामुळे आणि दिवंगत साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या 18 वर्ष वास्तव्यामुळे वेगळं महत्त्व प्राप्त झालं. येथील शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असतानाच खांडेकरांनी अनेक कथा- कादंबऱ्या लिहिल्या. शिरोड्यापासून जवळच असलेलं आरवली म्हणजे जयवंत दळवी यांचं मूळ गाव. वेंगुर्ला परिसरात भुईकोट किल्ला आहे तसंच फळ संशोधन केंद्रही आहे. रत्नागिरीचा आंबा इथेच विकसित करण्यात आला. दुसरीकडे कर्ली नदीच्या काठाने परुळे या गावी गेलं तर तिथे रवळनाथ, वेतोबा, आदिनारायण, गौरीनारायण अशा अनेक देखणी देवळं पहायला मिळतात. कोकणातलं पहिलं सूर्यमंदिर परुळे इथं उभारलं गेलं असं सांगण्यात येतं. लाटांचा ध्वनी ऐकावा इथेच! चि.त्र्यं. खानोलकरांच्या एका पुस्तकाचं नाव आहे "कोंडुरा.' खरं तर कोंडूरा हे वेंगुर्ल्याहून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या एका ठिकाणाचं नाव आहे. वेंगुर्ला ते मालवण या सागरी मार्गापासून 3-4 कि.मी. बाजूला असणारा कोंडुरा येथील समुद्रकिनारा नारळी पोफळीच्या बागांमध्ये लपलेला आहे. या समुद्रकिनाऱ्याला थोडीशी गूढपणाची छटा आहे. समुद्राच्या लाटांच्या धडकांनी खडकांमध्ये येथील किनाऱ्यावर काही विवरं निर्माण केली आहेत आणि लाटांच्या त्या विवरांवर आपटण्याने एक वेगळा आवाज येथे सतत कानावर पडत राहातो. सावंतवाडी तालुक्‍यात येतं आंबोली हे थंड हवेचं ठिकाण. याच परिसरात हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान आहे. हिवाळ्यात तसंच पावसाळ्यात येथील अद्‌भुत निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. याच सावंतवाडी तालुक्‍यातच पत्रादेवी इथे गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांचं स्मारक आहे तर इथून जवळच बांदा या ठिकाणी बांदेश्‍वर व रामेश्‍वराची मंदिरं आहेत. संत सोहिरोबानाथांचं स्थान अशीही बांद्याची ओळख आहे. पारगड हा किल्ला पाहायचा असेल तर तो बांद्यातून जवळ पडतो. पोंभुर्ले हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचं जन्मगाव तर देवगड तालुक्‍यातील कुणकेश्‍वर हे महादेवाचं मंदिर यादव राजांनी बांधलेलं. देवगडपासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या कुणकेश्‍वर मंदिराचा छत्रपती शिवरायांनी जीणोद्धार केला होता. पांडवही आपल्या अज्ञातवासाच्या काळात इथे येऊन राहिले होते अशी आख्यायिका आहे. कुणकेश्‍वर इथे येणारे पर्यटक लक्षात घेऊन पर्यटन विकास महामंडळाने तिथेही एक प्रकल्प हाती घेतला आहे. कोकण पर्यटन करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने जसे दरवर्षी वेगवेगळे महोत्सव आयोजित करण्यात येतात तशाच नवनव्या पॅकेज टूर आयोजित करण्यात येतात. स्थानिक माणसाला पर्यटकांकडून लाभ मिळावा, या दृष्टीने महामंडळाने मध्यंतरी निवास- न्याहारी योजना सुरू केली. या योजनेमुळे पर्यटकांना कमी खर्चात गावातील छान कौलारु घरांमध्ये राहता येतं आणि पर्यटकांच्या तिथे राहाण्या-जेवण्याने स्थानिक माणसाच्या खिशातही काही पैसे पडतात. कोकणात आणि विशेषत: सिंधुदुर्गात जायचं तर खाण्यापिण्यामध्ये वेगळे माशांचे विविध प्रकार असू शकतातच; पण शाकाहारी माणसांनाही सोलकढी, थालीपीठ ,घावन, उकडीचे मोदक अशा प्रकारचे पदार्थ चाखता येतात. या मालवणी खाद्याचा आस्वाद घेत कोकण अजूनच यादगार होतो हे नक्की.

No comments: